बेलूर मठाची अचानक आठवण यायचं कारण काय? कधीही काहीही आठवतं.मन कुठेही सैर घडवतं आणि आपण आश्चर्य करत रहातो, हे कुठून आलं म्हणून! सुट्टी, नेहेमीपेक्षा वेगळं रूटीन (!).आळस, झोप, आराम, वर्तमानपत्रं, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा इत्यादी प्राथमिकता पार पडल्यावरच विचार या गोष्टीला जाग येते.एरवीच्या रूटीनमधे उठलो की आज काय करायचंय, काय होणार आहे, काय वाढून ठेवलेलं असणार आहे असे प्रश्न विचार या तत्त्वाला चालना देतातच.
आज सगळं झालं आणि नंतरच घड्याळाकडे लक्ष गेलं.पाच वाजलेत.घामानं कोंदटल्यासारखं झालंय.अजून दोन तास आहेत सूर्याचं तेज पूर्णपणे निवायला.मग कदाचित थोडं सुसह्य होईल.
पाच वाजले म्हटलं आणि कुठलीतरी कळ दाबल्यासारखी झाली.पाच वाजता सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता बेलूर मठात पोचलो तेव्हा! बेलूर मठ! तिथे जाऊन झाली आता जवळ जवळ वीस वर्षं!
झुलवाचा दौरा होता कलकत्त्याचा.कलकत्ता तेव्हा कोलकाता झालेलं नव्हतं.हावडा रेल्वे स्थानकाबाहेर पडलो.चाळीस जणांच्या आसपास असलेला ग्रुप.एक ठिकाण आलं की सगळे एके ठिकाणी जमायलाच पाच दहा मिन्टं लागायची.तोपर्यंत जागच्या जागेवर उभं राहून दृष्टी पोचेल तिथपर्यंतचं स्थलदर्शन.बाहेर उभे होतो रेल्वेचा लांबलचक प्रवास आटपून.पहिलं जाणवलं ते धूसर वातावरण.प्रदूषण असावं असं धुकं.लांबवर दिसणारा हावडा ब्रिज.टक लाऊन बघत बसलो.सगळा ग्रुप जमलाय चला आता बसकडे असा रेटा जाणवेपर्यंत.मग बस, महाराष्ट्र भवन, तिथे जागा उपलब्ध नाही म्हणून गावभर फिरत सॉल्ट लेक सिटी या नव कलकत्त्यातल्या भागाकडे.आख्ख्या कलकत्त्यातून.जिथे ट्रॅम, माणसं, इतर वहानं, अगदी माणसांनी ओढायच्या रिक्षांसकट अशी सगळी भेळ असते- असायची- आता काय झालं असेल ते देव- कालिमाताच जाणे!
रुद्रप्रसाद सेनगुप्ता नावाचा ज्येष्ठ प्रायोगिक रंगकर्मी.त्याची नांदीकार नावाची संस्था.त्यांनी भरवलेला राष्ट्रीय नाट्यमहोत्सव.रवींद्र भवन या नाट्यगृहात.रवींद्र भवन हे तिथल्या मेट्रो रेल्वेचं स्थानक आहे.मेट्रो रेल्वे कलकत्त्यात कधीच आली.
झुलवा या प्रायोगिक नाटकाचे देशभरात आणि महाराष्ट्रात अनेक दौरे झाले.दौर्यावर एक दिवस स्थलदर्शनासाठी ठेवलेला असे.त्यादिवशीची संध्याकाळ बहुदा खरेदीसाठी राखून ठेवलेली.बाहेर गेल्यावर स्थलदर्शनापेक्षा खरेदीसाठीचीच झुंबड जास्त.काय काय घ्यावं? बांबूच्या चटया करतात तश्या पद्धतीने चार घट्टं पाय विणून आणि वर चौकोन विणून छोटे मोडे विकायला होते.हीऽऽ झुंबड.आमचा एक मित्र बहुदा तो या मौल्यवान खरेदीबद्दल अनभिज्ञ असावा.त्याला ते ज्ञान प्राप्त होईपर्यंत उशीर झाला असावा.बसमधून सगळा चमू खरेदी आटपून परतताना हा आपला सारखा त्या इतरांनी खरेदी केलेल्या मोड्यांकडे टक लाऊन पाही आणि अस्वस्थं होई.आम्ही काही टारगट ’कारे’ होतो.संसार नव्हता.खरेदी-बिरेदी म्हणजे भंपकपणा असा आमचा समज.आमचं लक्षं आता नवीन कुणाला लक्ष्यं (टारगेट) करायचं याकडे असायचंच.मोडा न मिळालेल्या मित्राची अस्वस्थता आमच्या डोळ्यात भरलेली.हा अनुनासिक होता.प्रत्येक मोडेमालकाकडे जाऊन हा आपला चौकशी करी आणि आपल्याला इतका स्वस्तं आणि मस्त मोडा मिळाला नाही म्हणून चुकचुके.कलकत्त्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस म्हणजे आत आजूबाजूनी सीट्स आणि मधे मोकळी जागा.अशा मोकळ्या जागेत माणसांची गर्दी उभी.आमच्या मोडेप्रेमी मित्राला त्या जराश्या विरळ गर्दीत खाली ठेवलेला एक मोडा दिसला.तो त्या मोड्याजवळ गेला आणि त्या मोड्यावर बसला.मग घाईघाईने उठून, “च्यांयला फांलतूं आंहे!”असा जोरदार रिमार्क मारून आमच्याजवळ आला.आम्हाला हसायला कुठलंही कारण चालायचं.या मित्राच्या मनात नक्की काय चाललं होतं त्याचं तोच जाणे.पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट असं म्हणत सगळ्या ग्रुपला एकमेकांना सांगायला तो किस्सा बरेच दिवस पुरला.
आज स्थलदर्शनाचा दिवस! अशी घोषणा झाली आणि सगळे रंगकर्मी (!) उंडारायला तयार झाले.समस्त स्त्री वर्ग ’खरेदी’ या विषयावर ठाम होता.खरं तर आम्ही- म्हणजे चाळीसबिळीस जणांच्या ग्रुपमधे सबग्रुप्स पडतात तसा ग्रुप- कोण नेईल तिथे जाणारे.दौर्याआधी प्रचंड प्लानिंग करून दौर्यात काय काय बघायचं ते पक्कं ठरवून ते पूर्ण करायचं म्हणजे करायचंच असला मुशाफिरी खाक्या आमच्याकडे नव्हता.आम्ही आपले रेंगाळत, पुन्हा कुणी ’लक्ष्यं’ बरोबर असेल तर दिवस मस्त जाईल या इच्छेने ते शोधण्याचा प्रयत्नात.इतक्यात आमचाच एक गायक मित्र जोरदार कॅनवासिंग करतात तसं, “ए, बेलूर मठला जाऊया बेलूर मठला! येताय का? खरेदीबिरेदी कधीही कराल.आपण रहातोय तिथपासून जरा लांब आहे.विचारत विचारत, दोन-तीन बसेस बदलत जावं लागेल.अप्रतिम ठिकाण आहे! पुन्हा इथे कधी यायला मिळेल सांगता येत नाही.खरेदी करणार आहात का? ती काय कुठेही करता येईल तुम्हाला पण बेलूर मठ बघता येणार नाही! दक्षिणेश्वर कालीमातेचं मंदिरपण अप्रतिम आहे.येताय का?” असं सांगून सांगून आख्ख्या ग्रुपला हैराण करत होता खरंतर.असं कुणी जास्त सांगायला लागलं की लोक उगाचच सावध होतात आणि जायचं की नाही असा विचार करायला लागतात.अशा बर्याच जणांच्या मनात खरेदी करणं ठाण मांडून बसलेलं असतं.खरेदी न करता वेळ घालवायचा म्हणजे जरा अतिच वगैरे... आमचं तसं नव्हतं.आम्ही तयार झालो.बेलूर मठाकडे जाणारा आमचा ग्रुप छोटाच झाला, मोठा खरेदी करायला निघून गेला.
विचारत विचारत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस बदलत आम्ही दक्षिणेश्वर कालिमातेच्या मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराचे दरवाजे दुपारभरासाठी बंद झाले.आता?... मित्र म्हणाला, “पुढे जाऊ.इथे बोटींग असतं.बघूया!”बोटींग स्थानकाजवळ गेलो.चौकशी केली.तिथे एका स्थानिकानंच आयडिया दिली की तासादीडतासाचं बोटींग करा.परत येईपर्यंत देवळाचे दरवाजे उघडलेले असतील.मग बोटींगच्या तिकीटांची घासाघीस.बोट म्हणजे बंगाली वातावरणातली होडी दाखवतात तशीच.तुटकंमाटकं शीड आणि भली मोठ्ठी वल्ही घेऊन उभ्याने वल्हवणारे ’मांझी रेऽऽ’आणि ती होडी डुचमळत, हिंदकळत नदीच्या पात्रात वेग घेतेय.नदी म्हणजे जवळ जवळ समुद्रासारखीच लांबलचक आणि आडवीतिडवी.बरोबर होडी हलली रे हलली की चित्कारणारा स्त्रीवर्ग.आम्ही (टगेही) सुरवातीला जरा जीव मुठीत धरूनच.बोटींग क्लबवर बोटींग करणं वेगळं आणि हे असं नदीत होडी सोडून देणं वेगळं.जरा वेळानं वारा.मग सगळ्याना कंठ फुटून गाणी.मग माझ्या अंदाजे कधीतरी हावडा ब्रिजच्या खालून प्रवास.अपरिहार्यपणे ’अमर प्रेम’ शक्ती सामंता-राजेश खन्ना-शर्मिला टागोर-आनंद बक्षी-एस डी-किशोरकुमार या सगळ्याची आर्त आठवण.
हा प्रवास संपूच नये असं आता वाटायला लागलेलं आणि आमचा गायक गाईड मित्र बैचेन.अंधार पडायला सुरवात झालेली.नदीकाठची एकाकी हवेली पुन्हा बंगाली वातावरणातल्या चित्रपटांकडे घेऊन जाणारी.मित्राला वेगळीच काळजी.पूर्ण अंधार झाल्यावर किनार्यावर जाऊन जे बघायचंय ते शोधायचं कसं?
नौकानयन संपलं.काठावर आलो.सूर्यास्त होऊ लागलेला.किती वाजले? फक्त पाच? हो! इथे डिसेंबरमधे संध्याकाळी पाचला सूर्य मावळतो! घंटा वाजू लागलेल्या.आमची पावलं त्या दिशेने.
तो... बेलूर मठ! मित्र सांगतो.आम्ही जवळ जातो.स्वर्गीय असं दगडी बांधकाम.लांबलचक.पायर्या.आत गर्दी बसलेली.घंटांचा आवाज वाढून आता गजर होऊ लागलेला.बाहेर चपला काढून आणि त्या कुणी उचलणार नाहीत ना? हा विचार कायम ठेऊन आम्ही सगळे आत.हा भला मोठा दगडी मंडप.ही गर्दी आत बसलेली.समोरच्या टोकाला रामकृष्ण परमहंसांची ध्यानस्थ मूर्ती, पद्मासनातली.आरती करणारे येतात.त्यांच्या हातात मोठमोठ्या ज्योती असलेल्या पंचारत्या.काही जणांच्या हातात पांढर्याशुभ्र चवर्या.मृदुंग, टाळ वाजू लागतात.सगळ्यांचा एकच सूर त्या विशाल दगडी मंडपात घूमू लागतो.परमहंसांची आरती सुरू होते.ते विशिष्टं बंगाली उच्चार.बंगाली संगीत.खरं तर आम्ही भाविक नव्हे पण ते तिथलं वातावरण.ते सूर.ती चाल, ताल, त्या पंचारत्या, त्यानी तेजाळून गेलेली खरी वाटणारी रामकृष्ण परमहंसांची मूर्ती.पाय निघेना तिथून.स्वप्नवत, स्वर्गवत वातावरण.आरती संपल्यावर पुढे गेलो.अजूनही परमहंसावर चवर्या ढाळणारे कुणी.फार पुढे जाऊ न देणारे.बाहेर पडताना मित्र काही सांगत होता.बेलूर मठ संस्थानाविषयी.तिथल्या व्यवहाराविषयी.
तो संध्याकाळी पाच वाजताचा सूर्यास्त, तेव्हाचा तो अथांग नदीतला होडीचा प्रवास आणि मग बेलूर मठातली ती आरती... हे सगळं इतकं मनात ठाण मांडून बसलेलं की इतर काही आत येतंच नव्हतं...
आजही ती संवेदनशील कळ कधीमधी सहज दाबली जाते आणि सगळा पट समोर उभा रहातो.त्या तोडीचं दृष्यं आजवर दुसरं पाहिलं नाही...
2 comments:
सुंदर.
आज ह्या क्षणी वाटून गेलं....तडक जाऊन बसावं...सगळ्या काळज्या विसरून जावं...आणि कधीही...कधीही परत येऊच नये...
:)अगदी! अगदी! मी वीस वर्षं वाट बघतोय! संधी आपणच निर्माण कराव्या लागतात हे इथेही लागू होतं! :):)आभार अनघा!
Post a Comment