बेचैन व्हायला आजच्या युगात तसं म्हटलं तर काही कारणच लागत नाही.आपण बेचैन आहोत हे समजायला आपल्याला वेळ मिळतो का? बेचैनी हा स्थायीभाव झालाय का आज सर्वसामान्यपणे? सतत बेचैन असल्याचे धोके काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज प्रत्येकाकडे आहेतही आणि ती असून प्रत्येक जण ह्या अपरिहार्य बेचैनीकडे कानाडोळा करतोय! का? मग आरोग्याला धसका लागला की जागा होतो.उपाय करायला लागतो.सारांश, बेचैनी, बेचैन असणं नाकारता येत नाहीए.काही प्रमाणात झुगारताही येत नाहीए.सर्वसामान्यपणे म्हणतोय.अपवाद आहेत.त्यांचं स्वागत आहे.
’सतत बेचैन असतो, अस्वस्थ असतो, चळवळ्या आहे नुसता!’ काय बरं वाटतं तेव्हा, लहानपणी असं कुणी म्हटलं की! थेट बाळाचे पाय पाळण्यात दिसून तो थोरामोठ्यांच्या पंक्तीत विराजमान झाल्यासारखं! ’सृजनशील’ वगैरे बिरूदावली चिकटायची ही सुरवात. ’नाहीतर बसलाय आपला अजगरासारखा सुस्त!’ हा आणखी टोकाचा प्रतिसाद.अजगरासारखा सुस्त असूनही तो आत बेचैन असतो का? की नाही? बेचैनी ही नुसती शारीरिक की मानसिकसुद्धा? मानसिक बेचैनीचं रूपांतर मग शरीराच्या आवश्यक-अनावश्यक हालचालींमधे होतं, शारीरिक बेचैनीमधे होतं की एखाद्याची मानसिक बेचैनी बाहेर दिसतंच नाही, ती आतल्याआतच घुसमटत रहाते?
बेचैन असणं म्हणजे प्राप्त असलेल्या परिघात खूष नसणं.बदलाची अपेक्षा करणं.बदलासाठी प्रयत्न करणं आणि बदल घडवणं अशा सकारात्मक प्रवासाचा एक प्रवाह दिसतो.सर्जनशील असणारा.
प्राप्त परिघामुळे आलेली बेचैनी विचार करायला लावणारी आहे.काही सकारात्मक दिसत नाही, वैयक्तिक आयुष्यात.सामाजिक आयुष्यात.चांगले बदल घडलेलेच दिसत नाहीत.मिडिऑकर माणसं धो धो यश कमवतात.पात्रता असून, मेहेनत करून सरळ मार्गाने काही होत नाही किंवा जे होतं त्यापेक्षा वाममार्गानं जाऊन होतंय.
आणखी एक प्रवाह म्हणजे यश मिळतंय.प्रचंड मिळतंय पण त्यासाठी काय काय करावं लागतंय त्यानं बेचैनी कायमची चिकटून राहिली आहे.ही बेचैनी आज जास्त आढळते आहे असं दिसतंय.
मग ’वांझ बेचैनीचं कंत्राट!’ हे काय खटलं आहे?
ही नुसतीच बेचैनी आहे.सगळं काही आहे.मध्यवस्तीत तीर्थरूपांच्या पुण्याईने मिळालेली सदनिका आहे.सुस्वभावी पत्नी आहे.अभ्यास करा! करा! म्हणून मागे न लागता त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात स्थिर होत असलेली मुलं आहेत.स्वत:ला स्वत:च्या आस्थापनात स्वत:ची अशी नोकरीतल्या कामाव्यतिरिक्त असलेली चांगली प्रसिद्धी आहे! मग?
प्रचंड गोंधळ आहे आत.तो दुसर्या कुणाला कळण्याच्या पलिकडचा आहे.स्वत:ला तरी तो कितपत कळतो, किंवा तो कळावा अशी इच्छा आहे, माहित नाही! संवेदनशीलता आहे पण ती ताणली गेली की ती उघडी पडते.ती पूर्णपणे स्वकेंद्रित आहे.इतकी की पार मोठ्या झालेल्या मुलांना अजून ती लहान असल्यासारखं जपणं आहे.हे जपणंही निखळ जपणं आहे? की आपला इगो, आपला हक्कं, आपलं स्वामित्व टिकवण्यासाठी ते आहे? स्वकेंद्राला जरा धक्का लागला की मग समोरचा कितीही वाईट परिस्थितीत असो त्याच्याबद्दल पूर्णपणे निब्बरपणा असणारी अभिवृत्तीही आहे.निखळपणा असणारं काहीच नाही? सगळं काहीतरी स्वकेंद्रित, काही कुरघोडी करायच्या हेतूनं? का?
उच्चपद स्विकारायचं तर अजिबात नाही पण बरोबरचे चार आपल्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत कमी आहेत, तर त्यांच्यावर साहेबगिरी करायचा आगाऊपणा आहे.सगळं मी करून वरचढपणा करण्याची सोय करून ठेवायची वृत्ती आहे.कारण नसताना सगळं मी केल्यामुळे ते कारण नसताना आक्रमकपणे बोलून दाखवणंही आहे! त्यानं कुणी दुखावला तर झक मारत गेला!
समोरचा जो अजिबात हिंगलत नाही त्याला शरण जाण्याचं कसब आहे आणि जो समजून घेतो, सरळसोट आहे त्याला नामोहरम करायची जिद्द आहे.
आपण चुकतो हे कबूल करायचंच नाही हा हट्टी खाक्या आहे.आपण चुकलो म्हणून समोरच्या एखाद्यानं निषेध नोंदवला, काही बोलून किंवा संबंध जेवढ्यास तेवढे ठेऊन, तर त्याला कामाच्या ठिकाणी कसं कॉर्नर करायचं हे कौशल्यं(?)ही आहे!
हे सगळं तुम्ही म्हणाल की फार वरच्या पातळीवर, चढाओढीच्या, फायद्याच्या, कर्तृत्वाच्या अपेक्षेने आहे तर तुमचा कयास चुकलाय.हे सगळं एखाद्या डबकं म्हटल्या जाणार्या ठिकाणी आहे.
…आणि या सगळ्याला वेढून टाकणारी ती वांझ बैचेनी आहे.हे सगळं असल्यामुळे ती आहे? की तो एक जन्मजात स्वभाव आहे? नुसती फुटकळपणे येणारी वांझ बैचेनी नाही.वांझ बेचैनीचं कंत्राट घेतलेलं आहे.हृदरोगाला आमंत्रण दिलेलं आहे.वर दुसर्यानीही हे कंत्राट घेतलं पाहिजे असा आग्रह वाटावा असं वागणंही आहे.
आपण घेतलेलं कंत्राट ही चूक अजिबात नाही असं ठाम मत असल्यामुळे त्यावर उपाय करण्याचा मुद्दाच निकालात निघतो.
बरं, प्रचंड बडबड्या स्वभावामुळे, स्वत:ला वाटेल तेव्हा कृती करण्याच्या किंवा कृतीच न करण्याच्या स्वत:च घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे समोरच्याला सतत धडा शिकवल्याचं समाधान मिळूनतरी ह्या कंत्राटाचं विरेचन होत असेल, कधीतरी ते पूर्णपणे होईल असा कयास केलात तर तेही होत नाही.
देव आहे आणि तो काय एकेक नमुने घडवतो ह्याचं आश्चर्य करत बसलो तर आणि तरच काही संगती(?) लागते.नाहीतर... तुम्ही सांगा.तुम्हाला काय वाटतं?
No comments:
Post a Comment