romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, May 30, 2011

हुबळी ते सिरसी आणि मधुकेश्वर, मरिकांबा...

रात्री साडेनऊ ते दुसरय़ा दिवशी सकाळचे साडेनऊ असा प्रवास करून हुबळीला पोचलो.सकाळचे विधी आटपले.हुबळीच्या हॉटेल स्वाती (Swathi) मधे ही सोय केली गेली होती.इडली सांबार, उपमा आणि रसम वडा नव्हे पण तसाच आणि त्यापेक्षाही उत्कृष्ट चवीचा वडा खाल्ला.बारीक पाऊस पडतोय की काय असं वातावरण.तरीही पुढचा हुबळी-सिरसी हा अडीच तासाच प्रवास अंगावर आला होता. अनुभवच्या चार-पाच टेंपो ट्रॅवलर्स सज्ज झाल्या आणि आमचं छप्पन्न जणांचं कुटुंब सिरसीच्या दिशेने निघालं.हुबळी शहर मागे पडलं आणि जाणवलं की प्रवासानंतर जिथे पोचायचं आहे त्या शेवटच्या मुक्कामापेक्षा प्रत्यक्ष प्रवास किती गुंगवून टाकतो.असं काही आम्ही अनेक महिन्यांनी, वर्षांनी पहात होतो!
सिरसीला पोचलो.हॉटेल शिवानी या हॉटेलमधे सहा रात्रींचा मुक्काम असणार होता.प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सहा रात्रींसाठीच्या जागांचं वाटप झाल्यावर आंघोळ आणि त्यानंतर हॉटेलच्या डायनिंग हॉलमधे दुपारचं जेवण.हे पहिलं जेवण.जेवणाची सुरवातच पुरणपोळीनं झाली आणि इथपासून आम्हा सगळ्यांचा आहाराचा अफलातून सिलसिला सुरू झाला.नाश्त्यात कधी वाटीतली गुबगुबीत इडली, कधी कुरकुरीत मेदूवडा, कधी उपमा, अननसाचा शिरा, पोहे वेगवेगळ्या प्रकारचे जवळ जवळ रोज! आम्लेटब्रेड, ब्रेडबटर रोज, डोसे असं सगळं पोट भरून.ज्याला जे आवडेल ते आणि मनसोक्त.अरुण भटांचा आग्रह आणि त्यांच्या सगळ्याच सहकारय़ांची तत्परता.जेवण झाल्यावर मेसच्या प्रमुख दाराला जणू कायमचाच टांगलेला वेलची केळ्यांचा घड.तो असतानाही चार-पाच दिवस चोखून खाण्याचे आंबे!
जेवणातही तसंच.शाकाहारी, मांसाहारी दोन्ही.पोळ्या, पुलाव, रोज दोन-तीन प्रकारच्या भाज्या, आमटी.डाळ.कारवार-कर्नाटकातला सासम हा प्रकार.हे सासम अननसाचं, आंब्याचं आणि अगदी कारल्याचंसुद्धा! कुठलीही चव बिघडलेली नाही.मीठ कमी जास्त नाही.मांसाहारीसाठी जवळ जवळ रोज तळलेला मासा तर शाकाहारींसाठी वांग्याचे, बटाटयाचे तळलेले काप! वर प्रेमाचा आग्रह आणि आग्रह! नको नको! फार होतंय! असं म्हणत मंडळी आडवा हात मारतातच आहेत! नूडल्स, चिकन, फिशकरी, कर्नाटक पद्धतीचा घी राईस, बासुंदी, श्रीखंड, खीर! रोज नवीन! रिपीट मेन्यू नाहीच! चं.. ग.. ळ!..
पहिल्या दिवशी आडवा हात मारेस्तोवर अडीच वाजलेच.साडेचार वाजता स्थलदर्शनाला टेंपो ट्रॅवलर्स निघणार होत्या, शिरसी जवळच्या ’बनवासी’ या स्थळाकडे, मधुकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी.
“शांत झोप काढा! साडेचारला जमा! आपल्याला घाईगडबड करायची नाही!”अरूण भट सांगत असतात आणि हे घाई गडबड न करण्याचं तत्वं ते सहल संपेपर्यंत पाळतात हे विशेष!
’बनवासी’ ही जुन्या कर्नाटकाची राजधानी.सिरसी पासून २२ किमी.जिला दक्षिण काशीही म्हटलं जात होतं.कानडी किंवा एकूणच दक्षिणेला मंडपाला मंटप किंवा मंटपा अशी संज्ञा आहे.असे एकूण पाच दगडी मंटप इथे आहेत.मधुकेश्वर मंदिर पुरातन.इथल्या शिवलिंगाचा रंग मधासारखा म्हणून हे मधुकेश्वर.या लिंगाला मधाचाच अभिषेक केला जातो.मुगलांच्या आक्रमणाच्या वेळी हे लिंग नाश पावू नये म्हणून त्याच्या असंख्य प्रतिकृती करण्यात आल्या आणि मूळ लिंग जपून ठेवण्यात आलं, म्हणून ते वाचलं अशी कथा आहे. मंदिर प्रशस्त आहे.मंदिराचं आवार विस्तीर्ण आहे.आवाराच्या कडेला रांगेने या टोकापासून त्या टोकापर्यंत विविध देवतांची मंदिरं आहेत.ह्या देवतांच्या मूर्ती कर्नाटकाच्या वेळोवेळीच्या राज्यांनी स्वारीला जाऊन विजय संपादन केल्यावर, त्या विजयाची आठवण म्हणून भारतवर्षातून कुठून कुठून आणल्या.आवारात अर्ध गणपतीचं देवालय आहे.ही भग्नं मूर्ती नाही तर खरंच घडवलेला अर्ध गणपती आहे.आवारातल्या देवालयांवर देखावे कोरलेले आहेत.त्यात राक्षसमंथन असा एक देखावा आहे.देवीदेवतांची चित्रंही आहेत.मंदिराच्या आवारातल्या एका गाळ्यात एक पलंग आहे.हा ग्रेनाईटचा प्रशस्त पलंग भारतातला एकमेव असं सांगितलं जातं.
मधुकेश्वराच्या मंदिरातल्या नंदीचीही चित्तचक्षुचमत्कारिक म्हटली जाते अशी हकीकत आहे.मंदिरात प्रवेश केल्याकेल्याच हा नंदी नजरेस भरतो.महादेवाच्या अर्धांगिनीला, पार्वतीला नंदीचं महादेवावरचं हे तिच्या दृष्टीनं भलतंच प्रेम आवडत नव्हतं.नंदीला तिच्या वागण्याचा राग आला.परिणामी पार्वतीला मंदिराच्या आवारातल्या दुसरय़ा छोट्या देवालयात जाऊन बसावं लागलं.तरीही हा नंदी तिच्याकडे आजही एक डोळा रोखून बघतो आहे! अशी हकीकत सांगितली जाते.रचनाकारांचं कौतुक ह्यासाठी की खरोखरंच पार्वतीच्या मूर्तीजवळ जाऊन नंदीच्या दिशेने बघितलं तर मधल्या सगळ्या दगडी खांबांच्या जंजाळातून नंदीची एका डोळ्याची वक्रदृष्टी ठळकपणे नजरेस भरते!
अत्यंत पुरातन अशी ही वास्तू निरखताना पावसाळी वातावरण झाल्यामुळे एक वेगळाच परिणाम जाणवत होता.अंधार पडायलाही सुरवात झाली होती.
परतताना सिरसी गावात शिरल्यावर ग्रामदेवता मरिकांबेचं दर्शन घेतलं.कर्नाटका एकूणच याआधीही जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे टापटीप आणि सुव्यवस्थित नियोजन.एकही घर जुनाट, भग्नं दिसणार नाही.सगळी घरं आताच रंगरंगोटी केल्यासारखी.आपल्याकडे एका गावातून बाहेर पडल्यावर वाटेत छोटे छोटे बसथांबे दिसतात.कधीकाळी बांधलेले, भंगलेले, उकीरडा झालेले.या प्रवासात हे सगळे थांबे जाहिरातीने रंगवेलेले का असेना पण अगदी कोरे करकरीत!
ग्रामदेवता मरिकांबेचं देऊळही तसंच.प्रशस्त वास्तू.प्रवेश केल्याकेल्या भलामोठा हॉल किंवा सोपा लागतो त्याचा छान दुहेरी उपयोग करून घेतलेला.देवीसमोरच्या भक्तांना दर्शन किंवा आरतीला जमण्यासाठी उभं अवकाश आणि आडव्या अवकाशात त्याच हॉलच्या उजव्या बाजूला एक स्टेज, छोटा रंगमंच बांधलेला.आडव्या अवकाशात बसून शंभर एक माणसं सहज किर्तन, व्याख्यानादी कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात.
मंदिरात टांगलेल्या भल्यामोठ्या तसबिरी फक्तं देवीरूपांच्याच! कुणी कुठल्याही देवाची तसबीर भेट दिली, दिली टांगून, असं नाही.देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या, लक्ष्मी, सरस्वती, अंबाभवानी इतकंच काय भारतमातेचीही एक तसबीर! सगळ्या तसबिरी भल्यामोठ्या आणि एकसारख्या.
पूर्वी ग्रामस्थांकडूनच चालवलेलं हे देऊळ आता रितसर ट्रस्ट स्थापून चालवण्यात येतं.ह्या देवळाच्या उत्पन्नातून दहा बालवाड्या चालवल्या जातात.केवढा मोठा आणि कौतुकास्पद असा हा उपक्रम!

No comments: