romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, May 7, 2011

मोहिनी आणि कबीर (१)

IPS Beretमोहिनी सरकार ही पस्तिशीची, अत्यंत आकर्षक अशी जेलर स्त्री आपल्या केबिनमधे बारकाईने कागदपत्रं चाळत बसली आहे.तिच्या टेबलजवळ उभा आहे हवालदार किर्तीसिंग.निवृत्तीचं वय जवळ आलेल्या किर्तीसिंगमधला कडक वर्दीतला सतत ऑन द टोज असलेला शिपाई आजही तरूण आहे.प्रचंड एकाग्र झालेल्या मोहिनीचं लक्ष कधीतरी किर्तीसिंगकडे जातं.
“अरे! सिंगजी! किती वेळ उभेच आहात! बसा! बसा!”
सिंग बसायला तयार नाही, आणखी अदबीनं तो ’मी ठीक आहे!’ हे नेहेमीचं वाक्य बोलतो.मग त्याचा पुतळा झालाय.
मोहिनी आज त्याच्याकडे पहात रहाते.मग मोठ्याने हसते.सिंग बावचळलाय.आपलं नक्की काय झालंय त्याला कळत नाही.त्याचं मन त्याच्या कोर्‍याकडक युनिफॉर्मच्या कानाकोपरर्‍यात जलद फिरून येतं.’सगळं तर बरोबर आहे! सकाळी आरश्यात बघून चारचारदा खात्री करून घेतलीवती मी!’ तो स्वत:शीच अचंबा करतोय.तो अचंबा आपल्या कडक सैनिकी शिस्तीतून बाहेर पडू नये याचं रितसर शिक्षण त्याने सर्वीसच्या सुरवातीलाच घेतलंय.
“सिंगजी! तुम्ही आज्ञापालन करत नाही!” मोहिनीच्या हसण्याचं आता वाक्यात रूपांतर झालंय.सिंगचं सैनिकी रूप आज पार मोडून टाकायचं असा मोहिनीचा खेळ दिसतोय पण बावल्या किर्तीसिंगपर्यंत तो कितीसा पोचणार? त्याच्या तोंडून त्याचा मगासचा अचंबा ’अं ऑ उ ऊं’ च्या बारखडीच्या स्वरूपात आता मार्ग शोधतोय.मग तो म्हणतो,
“ना- नाही मॅडम- मी उभाच आहे- अटेंशनमधे- कधीचा-”
“अहोऽऽ मी तुम्हाला बसायला सांगितलंय!”
“आपण जेलरसाब आहात मॅडम! मी साधा हवलदार, मी-”
मोहिनीला आता आवाज उंचावल्याशिवाय गत्त्यंतर नाहीए.ती ’बसा!’ एवढंच ओरडते आणि प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखा सिंग पटकन् बसतो.मोहिनीला मोठ्या कष्टानं हसू आवरायला लागतंय.मग कनवाळू होऊन ती सिंगच्या बायकोबद्दल, जिला मोहिनी ’बाईजी’ म्हणते तिच्याबद्दल विचारते, “बाईजी... कशा आहेत आता?”
“तिला काय धाड भरलीए!”सिंगमधला पुरूष फुत्कार सोडून आपण नॉर्मल झाल्याचे संकेत देतोय.मोहिनीला अचानक झालेला हा बदल खुपलाय.पण ती आणखी मायाळू होते.
“सिंगजी... काल बुखार होता त्याना!”
“इथल्या या समुद्री वातावरणात बुखार काय नवीन आहे का मॅडमसाब? गेले कित्येक वर्षं येतोय तो.औषधं वेळेवर घेतली नं तर काहीही होणार नाय! पण ऐकतो कोण?”
मोहिनीचं लक्षं पुन्हा हातातल्या कागदपत्रांवर गेलंय पण ती संभाषणाचा धागा तोडत नाही, “तुम्ही द्यायची सिंगजी त्याना औषधं वेळेवर!”
“काय काय करू मी मॅडम? ही ड्युटी करू की-”
“बाईजी किती काळजी करतात तुमची सिंगजी! -तुमचीच काय सगळ्या जगाची काळजी करते ही बाई!” मोहिनीच्या हातातले कागद आता बाजूला ठेवले जातात. “आठवतंय नं मला! मी इथे जॉईन झाले तेव्हापासून तुम्ही आणि बाईजी अगदी माझ्या आईबाबांसारखी काळजी घेताय माझी!”
“आमची ड्युटीच आहे ती मॅडम!”
“तुमची ड्युटी इथे! या ऑफिसमधे!”
“माणूस म्हणून जी ड्युटी, ती सर्वात जास्त महत्वाची मॅडमसाब!”
“सगळेच असा विचार करत नाहीत सिंगजी! या जगातली माणूसकी नष्टं होण्याच्या मार्गावर आहे असं माझं स्पष्टं मत होत चाललेलं आहे!”
सिंगला आपली बसण्याची सैनिकी पोज आता नकळत मोडावी लागलीय.
“तुम्हीच असं म्हणताय मॅडम? आपल्यासारख्यांचाच विश्वास जर असा डळमळीत झाला- मला माफ करा मॅडमसाब- म्हणजे मी-” काही स्पष्टं करू न शकण्याची सिंगची नेहेमीची अडचण वाजणार्‍या फोनने तत्परतेने ओळखलीए.तो वाजतो आणि सिंग नको तेवढ्या तत्परतेने रिसीव्हर उचलतो, “हालोऽहा-हालोऽ–जी-जी-” सिंग तत्परतेने उठून उभाच राह्यलाय, “जी-देतो-” सिंगनं माऊथपीसवर हात ठेवलाय आणि तो कुजबुजतो, “मॅडम! कमिश्नरसायबांचा फोन आहे!”
मोहिनी चटकन् फोन घेते, “येस सर! येस!... योर ऑर्डर्स सर!... राईट सर! राईट! आ’ईल डेफिनीटली टेक द नेसेसरी प्रिकॉशन्स सर!... माय रिस्पॉन्सबिलीटी सर!... थॅंक यू-थॅंक यू सर!” मोहिनीनं रिसिव्हर ठेवलाय.सिंग पुन्हा नको तेवढा सैनिकी होतो.
“सिंगजी!”
“येस मॅडमसाब!”
“कबीर... येतोय इथे अ‍ॅट लास्ट!”
“कबीर!” सिंगचा चेहेरा सगळ्या जेलची काळजी आपल्या डोक्यावर पडल्यासारखा झालाय...
Post a Comment