romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, May 27, 2011

स्काय वॉक याने की ढगात जाणे?

परवा सलूनात माझी हजामत :) चाललेली असताना एक तिशीचे गृहस्थ आपल्या दोन-चार वर्षाच्या ’आदू’ला केस कापायला घेऊन आले.आदू गावाला जाणार होता, केस आधीच बारीक, क्रू कटच करा अश्या सूचना त्यांनी कारागीराला दिल्या.मग त्यांचा भ्रमणध्वनी वाजला.बराच वेळ ते राधेश्यामला फोन लावायचा प्रयत्न करत असावेत.आलेला फोन राधेश्यामचाच होता.
राधेश्यामला त्यानी ’अपन बना रहे स्काय वॉकका वो सेंटर का माप अब्बी के अब्बी दे!’ म्हणून हुकूम सोडला.पलिकडे राधेश्याम का कू करत असावा. “एक घंटा फोन होल्ड करो! तुम्हारा क्या जाता है, मुजे अब्बी के अब्ब्बी अपना स्काय वॉकका वो सेंटर का माप चाहिए” राधेश्याम कसा बसा तयार झाला असावा.
इतक्यात गृहस्थांना सूरजचा फोन आला. “हां बोल सूरज! अरे त्याच्याच पाटी आहे रे! स्साला तिकडे कुणी माहितगार फिटर वगैरे नाहीये! मी करतो तुला, करतो पात मिन्टात! करतो!”
इकडे कारागीरासमोर बसलेला दोन-चार वर्षाचा आदू डुलकायला लागला.गृहस्थांचं लक्ष तिकडे गेलंय.
“अरय़े आदीऽऽ अरेऽऽ हा हाऽऽ अरे झोपतोएस काय? उठ! अरे-”
“साब! इतना लुडक रहा है ये!ऽ”
“अरे आज मैं घरपे था नं! ये दोपरको सोयाही नई है! आदीऽऽ-”
इतक्यात गृहस्थांना राधेश्यामचा फोन आलाय.तो त्याला सांगितलेलं स्कॉय वॉकच्या सेंटरचं माप घेता येत नाहीये म्हणून रडतोय.
“ऐसा क्या बोल रहे है राधेश्यामजी! कोशीश करो यार! क्या यार तुम! कोशीश करो! देखो! देखो! थंडे दिमागसे ले लो सबकुछ! थंडे दिमागसे लो! जाओ! फिरसे जाओ! मुजे कैसा बी करके माप चाहिए! एक घंटा होल्ड करता हूं! कुच जल्दी नई! तुम्हारा खुदका फोन है क्या ये? तुम्हारा क्या जाता है? चलो! चलो!”
गृहस्थ पुन्हा पेंगणारय़ा त्यांच्या आदीकडे बघून रेस्टलेस झालेत.
“अरे आदित्यऽऽ अरे बाबा तुला मला आता रिक्षानेच न्यावं लागणार घरीऽऽ-”
आदित्य थोडासा जागा होतो, “का.. बाबा..”
“अरे तू बाईकवर कसा बसणार? किती झोप येतेय तुला? तुला सांगितलं होतो नं दुपारी झोप म्हणून!- हॅलो-हॅलो- हां बोल सुरज! अरे हो सांगतो! त्याच गडबडीत आहे! पात मिन्टात माप सांगतो तुला!- नाय् यार घरीए मी! नाय् नाय् आज नाईट आहे यार! नाईट आहे! तुला सांगतो पात मिन्टात! अरे ड्रॉईंग आहे ना तुझ्याकडे? अं? बघ! तुला सेंटरचं माप सांगतो आपल्या स्काय वॉकच्या.. बाकीचं सगळं तुला अडजेस्ट करावं लागेल! अं- तुला बाकीचं- हां करतो तुला! करतो”
गृहस्थांनी दुसरा मोबाईल डायल केलाय.
“हॅ-हॅलो शोएब! शोएब यार तू नीचे है ना? देक् न जरा वो राधेश्याम क्या कर रहा है?- अं? जल्दी यार! जल्दी! अपना तारापूरका फॅक्टरीमें वो पार्ट बन रहा है यार! अब्बी के अब्बी मुजे वो माप देना है! देक् जरा देक्!”
गृहस्थ पुन्हा पहिल्या फोनवर!
“हां राधेश्यामजी! बोलो! बोलो! क्या? कितना? पाच मीटर? पयला मुझे बोलो माप कैसा लिया? पयला तुम बोलो यार! फिर मैं बोलता हूं! कैसा लिया? सेंटरसे अं? कैसा? वो छोडके? कैसा कैसा? आं? हां हां! बराबर! बराबर! वो छोडके! बराबर! लेकीन! पाच मीटर कैसा? वापस लो! जाओ! अरे यार! राधेश्याम थंडा रखो दिमाग! थंडा रखो! शांतीसे काम करनेका ये सब! जाओ अब्बी जाओ!- और होल्ड करो! होल्ड करो!”
गृहस्थ दुसरय़ा फोनवर.
“शोएब यार! देक् देक् वो राधेश्याम क्या कर रहा है! अरे पाच मीटर माप है बोलता है सेंटरसे! बल्की पूरा माप तो चार आठसो है! तो ये सेंटरसे पाच मीटर कैसा आएगा! देक् देक् जरा!”
तो पर्यंत आदित्य कुरकुरायला लागलाय, “बाबा.. बाबा.. पानी पानी...”
“अरे आदू काय पायज्ये तुला! थांब! थांब! आणतो पाणी! -अरे यार इसका नींद जाएगा पानी पिएगा तो- आणतो रे!”
आदूला मिनरल वॉटरच लागत असावं.ते आणायला गृहस्थ सलून शेजारच्या दुकानात जाण्यासाठी बाहेर पडतात.
दुसरा कारागीर आदूला तासणारय़ा कारागीराला.
“आहिस्ता यार! आहिस्ता! उस्तरा लिया है हातमें! काटगा उसे!”
“बेटा! आपका नाम क्या है बेटा!- जरा बात करता हूं यार! नींद उडेगी इसकी!”
आदूचं डोकं दोन्ही बाजूला डुलत राहिलंय!
मी हे सगळं ऐकतो, बघतो आहे.तांत्रिक गोष्टींशी माझा जन्मात फारसा संबंध आलेला नाही.गृहस्थांचा हा साईड बिझीनेस होता की आपल्या नोकरीतलीच जबाबदारी ते अशा रितीने निभावत होते? की त्याना ती अतिव्यग्रतेमुळे अशी निभवायला लागत होती? कळायला मार्ग नाही!
आजच्या वेगवान घडामोडी, भ्रमणध्वनीची उपयुक्तता हे सगळं मला समजतं.
स्काय वॉक अशा पद्धतीने बनवले जातात? हा एकच प्रश्न मनाला व्यापून राहिला आहे.
असं असेल तर जनता जनार्दनाच्या दृष्टीने ’स्काय वॉक याने की ढगात जाणे!’ हाच पर्याय उरतो असं माझं मत बनलंय! थोडक्यात जनतेची अवस्था ’आदू’सारखी!!
माझं मत टोकाचं असू शकेल, तेव्हा या घडामोडीवर कुणी प्रकाश टाकू शकेल?
Post a Comment