भाग २ इथे वाचा
जेलच्या अंधारकोठडीत कबीर स्थिरावलाय.अंधुक उजेडात एक सुतळी गजांना अडकवून तो काही विणायचा प्रयत्न करतोय.अंधारकोठडीच्या दुसरय़ा कोपरय़ात हालचाल होतेय.एक जिना प्रकाशमान होतो.त्या जिन्यावरून टाईट जीन्स, लांब कॉटन फुलशर्ट घातलेली स्त्री खाली उतरतेय.फुलशर्टचा रंग हलका गुलाबी असल्याचं स्पष्टं होत जातं आणि ती स्त्री, सिविल ड्रेसमधली लांबसडक केस मोकळे सोडलेली मोहिनी असल्याचंही स्पष्टं होत जातं.
कबीरची तंद्री भंगली आहे.तो समोर पहातच रहातो.अगदी टक लाऊन.स्वत:च्या नकळत तो उभाही राहिलाय.त्याचवेळी त्या मागच्याच जिन्यावरून दणदणणारी पावलं.हा किर्तीसिंग आहे, युनिफॉर्ममधला, धावतपळत आलेला, त्याच्या हातात शाल.तो जोरजोरात ’मॅडम! मॅडम!’ म्हणून मोहिनीला पुकारतोय.मोहिनी शांतपणे मान वळवते.
“अरे! सिंगजी?... क्या हुआ?”
सिंग हातातली शाल पुढे करतोय, “ये शॉल-”
“शॉल?”
“तुम्ही मागितली होतीत मॅडम!” मोहिनी चकीत.
“मी?”
त्या दोघांकडे बघणारा कबीरचं छद्मी हसतोय.
सिंग रागारागाने कबीरकडे पहातोय, प्रयत्न सोडत नाहीए.
“असं काय करताय मॅडम! तुम्ही-”
मोहिनी हात पुढे करते, “द्या!... या तुम्ही!" तरीही सिंगचं समाधान झालेलं नाही.तो आळीपाळीने त्या दोघांकडे बघत तिथेच थांबलाय, “सिंगजी!... तुम्ही जाताय नं वर?”
“ये-येस-मॅडमसाब!” सिंगला कसातरी काढता पाय घ्यावा लागलाय.तरीही जाता जाता वळून ’दिलेली शाल ओढून घ्या!’अशी खूण त्याच्या मॅडमसाबला केल्याशिवाय त्याला रहावत नाही.कबीरचं त्याच्याकडे बारीक लक्षं असल्यासारखं.कबीर पुन्हा तसंच हसतो.त्याच्याकडे नजर रोखत सिंग तिथून निघतो.
मोहिनीनं आपला मोर्चा आता निश्चितपणे कबीरकडे वळवलाय.उजव्या हातात धरलेली शाल उंचावून मोहिनी ती आपल्या डाव्या आडव्या हातावर टाकते आणि जरब असलेला तिचा आवाज अंधारकोठडीत घुमतो.
“हॅलो मिस्टर कबीरलाल!”
कबीरचं लक्षं अजून सिंग नुकताच गेलाय त्याच्या जाण्याकडे आहे.मोहिनीचा आवाज ऐकल्यावर तो नजर वळवतो आणि मोहिनीकडे रोखून बघायला लागतो.
“हॅ-हॅलो-मिस-मिसेस-”
“जेलर!”
“ओह! ऑफ कोर्स! जेलर!... जेलर!"
“काय चालंलय?”
“का-काही नाही! काही नाही!” दीर्घ श्वास घेऊन कबीर मोहिनीवर रोखलेली आपली नजर काढून घेतो.वळून पाठमोरा होतो, “आता काय चालणार?”
मोहिनीचं लक्षं गजांकडे गेलंय.
“विणकाम करताय!”
“असंच! सुतळीचा तुकड मिळाला... हात स्वस्थं बसून देईनात... काहीतरी-"
“स्कूल ऑफ आर्ट सोडून किती वर्षं झाली?”
“झाली... त्याचं काय आता...” तिच्याकडे वळतो.पुन्हा तेच रोखून बघणं, “माझे पेपर्स वाचले असतील तुम्ही तर माझं सगळं चरित्रं लिहिलंय त्यात- ते सगळं पुन्हा माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर आय एम सॉरी मी तुम्हाला-”
“कबीर!... एकेकाळी तुम्ही खूप नावाजलेले कमर्शियल आर्टिस्ट होतात, खूप कमी वेळात आर्ट डायरेक्टरही झालात आणि-”
“हे सगळं तुम्ही मला का सांगताय?”
मोहिनी हसतेय.हसता हसता वळते.गजांपासून दूर चालायला सुरवात करते.कबीरला पाठमोरी, “माझा अजूनही विश्वास आहे!”
कबीर पाठमोरय़ा मोहिनीकडे टक लाऊन पहातोय.तितक्यात ती थांबते आणि त्याच्या दिशेने वळते.कबीर हडबडतो.
“क-कशा-कशावर विश्वास आहे?”
कबीरकडे, त्याच्या हडबडण्याकडे लक्ष जाऊन मोहिनीला हसू आलंय,
“माणसावर!”
कबीर तिच्यावरची नजर काढून घेतो, “मी एक जन्मठेपेचा कैदी आहे!”
“हे मान्य आहे तर तुम्हाला!” कबीर तिच्याकडे बघू लागलाय, “हेच- तुम्हाला पश्चातापाची एक संधी मिळतेय- अजूनही वेळ गेलेली नाहिए- अजुनही तुम्ही-”
“हे तुम्ही सांगताय? हंऽऽ... अडकलोय आता मी!... पुरेपुर!”
“का? अजूनही पळवाटा आहेतच की! सुप्रिम कोर्ट, मग जन्मठेप कमी व्हावी म्हणून दयेची याचना-”
“आता दयेची याचना...” वर बघतोय, “त्याच्याकडेच!”
मोहिनीला आता हसू आवरेनासं झालंय. “काय म्हणता?” मोहिनी खिल्ली उडवल्यासारखं हसतच राहिलीय.
“तुम्ही हसा! हसा!... सगळेच!-”
मोहिनी त्याच्याकडे बघत अचानक झाल्यासारखी गंभीर, कठोर दिसू लागते.एका एका शब्दावर जोर देत बोलू लागते.
“मिसेस रितू शिवदसानी आठवतेय?”
कबीरची मान खाली.तो पुटपुटतोय, “रितू... रितू...” चिडल्यासारखा दिसायला लागतो.
“का?... आठवतेय तर!”
कबीरची बोलती बंद झाल्यासारखी.
“नो आर्ग्युमेंट्स?”
“मॅडम जेलर... मला बरंच काही आठवतंय... तुम्हाला ऐकायचंय?...
No comments:
Post a Comment