’जन्माष्टमीला मराठी हंड्या फोडतात आणि गुजराती सातम-आठम खेळून कमवतात!’ हा मनूचा दरवर्षीचा ज्योक.त्यानंतर त्याचं त्यावर स्वत:च हसणं.फवारा उडवून जिवणी फाकवत.मग मी पृथ्वीतलावर नव्यानेच आलोय असं समजून ’सातम-आठम’ म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री- दहिहंडीच्या आदल्या रात्री- पत्त्यांचा जुगार खेळणं’ असं एक्सप्लनेशन.
जन्माष्टमी झाली.गोपाळकाला सरला.अनेक गोविंदा भरती झाले- हॉस्पिटलात.काही ढगाला हात लाऊन आले.गेले.संघर्ष आणि संस्कृती दोन्ही लेबलं लाऊन राजकारण्यांनी गोविंदाचंही मनसोक्त भांडवल केलं.सगळ्यांना सुट्टी आणि आम्हाला मात्र नाहीच म्हणून आम्ही केजीतल्या मुलासारखे हिरमुसलो आणि दूरदर्शनला डोळे लाऊन बसलो.हल्ली महिला गोविंदा पथकंही कार्यरत झाली आहेत.
एवढ्या सगळ्यात मनूचा पत्ता नाही सरतेशेवटी काल संध्याकाळी मनूच्या गोकुळात गेलोच.चाट पडायचा बाकी राहिलो.बाहेरच्या खोलीत मनूनं ऑफिस थाटलेलं आणि आजुबाजूला हीऽऽ गर्दी! गर्दीच्या मधोमध मनू.ओळखू न येईल अश्या अवतारात.मांडीवर मातीचा मटका घेऊन बसलेला.त्याच्यासमोर लागलेली माणसांची लाईन खोलीभर अनाकोंडासारखी पसरलेली.एकेक माणूस पाचचं नवीन काढलेलं जुन्या आठ आण्यासारखं नाणं पुढे करतोय.मनूचा असिस्टंट चिठ्ठी फाडतोय, त्यावर रंगीत पेनाने मनाला येईल तो आकडा घालतोय.मनू त्या माणसापुढे मटका धरतोय आणि चिठ्ठी हातात आली म्हणून स्वर्गसुख मिळालेला तो माणूस चिठ्ठी चारचारदा कपाळाला लावतोय.देवाची पार्थना करतोय.त्या चिठ्ठीचे मुके घेतोय आणि ती चिठ्ठी जातेय मनूच्या मटक्यात.बाजूला स्टीलचं मोठं पिंप.त्यात पाच पाच रूपयांच्या नाण्यांचा खच पडतोय.मनूनं डोक्याला रंगीबेरंगी पट्टी बांधलेली.ती तो घट्टं करतोय.मग पुन्हा पुढचा माणूस, पुढचे पाच, पाच रूपये.पुढची चिठ्ठी.बाजूला भला मोठा जाड हार घातलेला बोर्ड. ’निकाल रोज रात्री १॥ वाजता! खेळा लोकांनो खेळा!!’
मला अक्षरश: मुष्कील झालं हो मनूपर्यंत पोचणं.त्या गर्दीत तुमच्या आमच्यासारखे असंख्य लोक होतेच.कॉलेजमधे जाणारी मुलं-मुली होत्या.मुलांना शाळेत पोचवणारय़ा आया होत्या.फिरते सेल्समन होते.एवढंच काय हातावर पोट असणारे मजूर, भाजीवाले, फेरीवाले… कोण नव्हतं? एका चिठ्ठीला पाच रूपये मोजणं कुणाला अशक्य होतं? या रूपयाला नवीन लोगो बहाल झालेल्या जमान्यात?
लोक दहा दहा, पंधरा पंधरा चिठ्ठया मटक्यात सोडत होते.माझ्या खिशातली पाच पाच रूपयांची नाणीही उड्या मारायला लागली.पण बायकोने त्या सगळ्यांचा नारळ आणायला सांगितले होते.कुठलासा नवस फेडायला ती नारळाचं तोरण बांधणार होती.तिच्या भीतीने मी गप झालो.
मांडीवर मटका ठेऊन आत चिठ्ठया सोडणारा मनू दमला आणि घाम पुसायला त्यानं मटका आपल्या एका शिष्याच्या मांडीवर दिला.बाजूला होऊन मनूनं ठंडा मागवला आणि मी मनूला गाठलंच.मला बघितल्यावर त्याने नेहेमीचे ते आश्चर्यचकीत भाव चेहेरय़ावर आणले आणि “ओऽहोऽहोऽहोऽऽऽ वेलकम! वेलकम!” असं जोरात ओरडला.जोडीला ते सुप्रसिद्ध जिवणी फाकवून हसणं होतंच. “भडव्याऽऽ पात पातची नाणी काढ आधी!” माझी चड्डी खेचत मनू भर गर्दीत बोंबलला.मी उगाचच कासावीस झालो.लोक शांतपणे मटक्यात चिठ्ठया सोडत होते.थंडा लवकर आला म्हणून मी वाचलो नाहीतर मनूनं मला पुरतं नागवलंच असतं.एक ग्लास थंडा पिऊन मी मनूच्याच कानात कुजबुजलो, “हे काय करतोएस तू?” मनू निर्विकारपणे डोक्याची रंगीत पट्टी सैल करत म्हणाला, “का? काय झालं?” मी त्राग्याने म्हणालो, “अरय़े हा मटका आहे मटका! कायद्याने गुन्हा आहे हा! लोकांना भीकेला लावतोएस तू!” मनू म्हणाला, कायदा कशाशी खातात माहितीए का तुला? सुजाण नागरीक आहेस ना तू? मी वेडा म्हणून हे दुकान उघडून बसलोय.हा रोखीचा शेवटचा व्यवहार आहे! लोकांच्याच पैशातून ब्लॅकबेरीची ऑर्डर दिलीए! तो आला की तो सोडणार या मटक्यात.मटका तोच! लोकांना माझ्या पायरय़ा झिजवायचीही गरज नाही मग! एसेमेस केले की झाऽलं!!” मनू एखाद्या किर्तनकार हरदासासारखा समेवर आला म्हणून मीही सरसावलो.इतक्यात मनूचा पुढचा अध्याय सुरू झालाच. “सगळं बांधून टाकल्याशिवाय मटका मांडीवर घेऊन बसणं सोप्पं वाटलं तुला? आणि हे- हे- सगळे इथे जमताएत ते भिकेला लागायला जमताएत? अरय़े यातूनच कदाचित उद्याचा जगातला सर्वात श्रीमंत माणूस निर्माण होणार, आहेस कुठे?”
मी आजुबाजूला बघितलं.मनूच्या मटक्याच्या अड्डयावरच तर उभा होतो. “अरे पण-” मनूनं मला पुढे बोलूनच दिलं नाही. “यड्या तुझ्यासारखे ऑर्डिनरी, थर्डग्रेड, सामान्य नसतात सगळे! त्याना रंगीबेरंगी स्वप्नं पडतात.त्याना महत्वाकांक्षा असतात.त्यासाठी ते धडपड करतात.तुझं स्वत:च जगाच्या खरय़ा-खोट्याचा निवाडा करण्याचं बुजगावणं टाक बाजूला! कार्यरत हो!” मी हळूच लाईनीकडे बघितलं.मटक्यात चिठ्ठया सोडण्यासाठी आता धक्काबुक्की चालू होती.
मनूनं एकदा तोंड उघडलं की ते बंद करणं ब्रह्मदेवाच्या बापाच्याही हातात नाही! “तू कष्ट करत रहा आणि लाख-दोन लाख पोराबाळांच्या हातात दे.मर! आणखी काय करणार तू?” मला रहावलं नाही.मी कळवळून म्हणालो, “अरे कॉलेजमधली पोरं पण-” मला अडवून मनू म्हणाला, “उद्याऽ त्याना नोकरय़ा देणारएस तू? पस्तीस-चाळीशीतल्या धडधाकट माणसांना व्हिआरेसचा बोनस द्यायला लागलेत आता! या पोरांना आतापासून सवय नको व्हायला? उद्या काय करणार ते? बरं! काय चोरय़ा मारय़ा करताएत का खून-मुडदे पाडताएत लोकांचे?” मी चवताळून म्हणालो, “अरय़े पण बापाचे खिसे फाडताएत ना पाच-पाच रूपयांसाठी!” मनू त्याहीपेक्षा जोरात म्हणाला, “तुझ्या बापाचे फाडताएत का? स्वत:च्याच आईबापाचे फाडताएत ना?... आता या घरी बसणारय़ा बायका.काय करणार नुसत्या बसून बसून? फाडल्या चिठ्ठया तर फायदाच आहे नं त्यांचा त्याच्यात?” मी म्हणालो, “फायदा? असा किती जणांना लागणार ते तुझा मटका?” माझा कान पकडून मनू म्हणाला, “हा बोर्ड बघ! जॅकपॉट कितीचा झालाय आता? चार कोटींचा! कुणाला मिळणार हे पैसे? सहा आकडे बरोबर जमलेल्या यातल्याच कुणाला तरी ना? का मला मिळणार आहेत? आणि प्रत्येक आकड्याला वेगळं बक्षिस आहेच की!” मी दम घ्यायला आजुबाजूला बघितलं.मनूचा एक शिष्य नाण्यांनी ओसंडलेलं ते स्टीलचं पिंप आतल्या खोलीत जाऊन ओतत होता.पुन्हा आणून लावत होता.लोक त्यात पुन्हा पैशांचा पाऊस पाडत होते.
मला आता फ्रस्ट्रेशन- नैराश्य आलं.मी त्राग्याने ओरडलो, “खेळ कसला रे याच्यात? सारखं खेळा, खेळा, लोकांनो खेळा! काय खेळ आहे याच्यात? चिठ्ठीवर नंबर.ती मटक्यात सोडायची.त्यातली एक तू रात्री दीड वाजता काढणार.एखादा झाला तर झाला करोडपती.बाकीचे होणार रोडपती.पुन्हा पुन्हा खेळून.छ्या!ऽऽ”
मनू एकदम गंभीर होऊन माझ्याकडे बघायला लागला.म्हणाला, राज्या तू खरंच तुझं डोकं तपासून घे! पैसे नसले तरी एक चिठ्ठी फाड.अरे हाच सगळ्यात मोठा खेळ! पैशाचा! नशिबाचा!” आणि आयुष्याचा! हे मात्र मी मनात म्हणालो.मनू अमिताभसारखा डावा हात पुढे करून उभा होता.
मी निकराने, काकुळतीला येऊन म्हणालो, “मनू अरे जनाची नाही निदान मनाची-” मनूनं माझा शर्ट पकडला.म्हणाला, "मराठी माणूस काहीतरी करतो तेव्हाच आडवे या रे तुम्ही! हेच मी टीव्हीवर टमाटम सिनेतारका आणून, प्रयोगशाळेतल्या भांड्यात लाह्या फोडल्यासारखे नंबर फोडले असते, एखादा जायनीज माणूस बाजूला उभा करून! तर?” अस्मितेला हात घातला गेल्यावर माझी बोलतीच बंद झाली.मान बाजूला वळवून मनू खच्चून बोंबलत होता.लोकांना बोलवत होता. “खेलो इंडिया खेलो! खेळा लोकांनो खेळा! प्ले जंटलमन प्ले! प्ले ऍंड विन! सुप्पर डुप्पर लोट्टो!!!” गर्दीनं मला ढकलून केव्हाच बाहेर काढलं होतं…
2 comments:
उत्तम ब्लॉग. उत्तम पोस्ट्स. उत्तम व्यक्तिमत्व. वा!
मन:पूर्वक आभार प्रभाकरजी!
Post a Comment