आमची वसाहत एका गावासारखी होती.देऊळ, सोसायटीचं सभागृह, छोटसं वाचनालय, शाळा, शाळेचं मैदान, त्या मैदानावर सिमेंटचं स्टेज बांधून खुला रंगमंच अर्थात ओपन एयर थिएटर तयार केलेलं.आम्ही सगळे एकाच शाळेतले.त्यामुळे मैदानी खेळ खेळणं, शाळेव्यतिरिक्त शिकवण्या, गप्पा मारण्यासाठी भेटणं हे सहज होत होतं.एका वर्गातले आम्ही बरेच जण आणि काही वरच्या, खालच्या वर्गातले नाटक करण्याच्या निमित्ताने एकत्र आलो.आमचा एक चमू- ग्रुप तयार झाला.नुसतं एकत्रं भेटणं, मित्र म्हणून गटागटाने गप्पा मारणं, फिरणं सहज होत असतं.सांघिक खेळ खेळताना एक ग्रुप तयार होतो.क्रिकेट मजेसाठी खेळलं जात होतं आता नाटकाची भर पडली.नाटकाचा ग्रुपही सहज तयार झाला.त्यात लेखक-दिग्दर्शक, नेपथ्यकार, वेषभूषाकार, पार्श्वसंगीतकार, कलाकार आणि बॅक्स्टेज वर्कर्स अर्थात रंगमचामागे नाटकाला मदत करणारे कलाकार असे सगळे आपलं काम पार पाडत होते.सगळं त्यावेळी सहज जमून आल्यासारखं होत होतं.असा हा ग्रुप तयार होणं, तो टिकणं हे नाटकं करण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि सातत्याने नाटक चालू रहाण्यासाठी खूप आवश्यक असतं, मस्ट असतं.नाटक ही एक समूहकला आहे.
पहिला एकांकिका केली.तिचा पहिला प्रयोग झाला.सगळेच एका वसाहतीतले.एकाच शाळेतले.नव्याने ओळख करून घेण्याचा प्रश्न नव्हता.सगळे साधारण एकाच वयाचे होतो.लेखक-दिग्दर्शक-निर्माता असा आमचा जो नेता होता.तो माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा.तो चांगला अभिनेता होता.ग्रुपला कसं हाताळायचं याचं त्याला चांगलं ज्ञान होतं.प्रायोगिक, मुख्यत: भाषांतरित एकांकिका-नाटकं करणारय़ा आणि त्यातल्या कलाकारांसाठी नाट्यशिक्षण शिबिरं घेणारय़ा एका प्राध्यापकांचा तो लाडका शिष्य होता.आमच्या भागात प्रायोगिक एकांकिका- नाटकं त्यानेच आणली.खूप वर्षं त्याने पदरचे पैसे घालून ती केली.आज तो एका प्रथितयश वर्तमानपत्राचा सहसंपादक आहे.तो नाट्यसमीक्षाही करतो.
त्यावेळी त्याचा अभिनय, त्याचं बोलणं आमच्यावर प्रभाव पाडणारं होतं.विशेषत: त्याचे डोळे.डोळ्यातून तो चांगलं एक्सप्रेस करतो असं आम्हाला वाटायचं,रिहर्सल बघताना त्याचा अभिनय थोडा जास्त वाटायचा पण प्रेक्षकातून बघताना सहज वाटायचा.रंगभूमीसाठी थोडा जास्त अभिनय जरूरीचा असतो.रंगमंचावरचे कलाकार आणि प्रेक्षागृहातले लोक यात चांगलंच अंतर असतं.काही बारकावे स्पष्टं होण्यासाठी हावभाव, हालचाल, आवाज जरा जास्त वापरावा लागतो, प्रोजेक्ट करावा लागतो हे हळूहळू कळत गेलं.
आमचा हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता इत्यादी जवळजवळ सबकुछ असणारा नेता हा आमचा सगळ्यांचा मित्र होता ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू होती.नेत्याला हे मित्रपण सांभाळावं लागतं.कधीकधी ती तारेवरची कसरतही होऊन बसते.आमच्या या मित्राला स्वत:चं स्वत:च या माध्यमात काहीतरी घडवायचं होतं.हे मोटिवेशन- ध्येयप्रेरित असणं खूप मोठं बळ देत असतं.आपल्याबरोबर काम करणारय़ांनाही ते प्रेरित करून सोडत असतं.
या आमच्या मित्राने केलेलं, त्याच्या गुरूंनी भाषांतरित केलेलं भारावून टाकणारं नाटक याचवेळी मला पहायला मिळालं.आम्ही केलेल्या एकांकिकेत सगळं असण्याचा भास निर्माण करायचा होता आणि या नाटकात रंगभूषा, वेषभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सगळ्यांची रेलचेल होती.तरीही हे नाटक त्यावेळी आम्ही बघत असलेल्या व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळं होतं.
परदेशातल्या समुद्रावर असलेल्या एका जहाजाच्या कप्तानाची ही गोष्टं होती.या कप्तानाची भूमिका आमच्या त्या वडीलमित्राने केली होती.अतिशय महत्वाकांक्षी असा हा कप्तान.त्या जहाजाचा लीडर.डॉमिनेटिंग नेचरचा.दर्यावर्दी साहसांपुढे आपल्या सुंदर, कोमल बायकोवर प्रेम असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करणारा.काळ्या गुलामांना राबवून घेणारा.या जहाजाला आणि पर्यायाने त्याच्या या कप्तानाला भर समुद्रातल्या एका देवमाश्याशी सामना करावा लागतो.कशालाही न जुमानणारा, कुणापुढेही न झुकणारा, कधीही हार न मानणारा हा कप्तान या देवमाश्याशी झुंजताना हैराण होऊ लागतो.त्याचा समतोल ढळू लागतो.जहाजाच्या पुढच्या प्रवासाबद्दल आणि जहाजावरच्या सगळ्यांच्या सुरक्षेबद्दल काय निर्णय घ्यायचा या गोष्टीवरून जहाजावर बंडाळी होऊ लागते.कप्तानाला आपल्या महत्वाकांक्षेसाठी सगळ्या जहाजाला वेठीला धरायचं आहे.अश्या महत्वाकांक्षी माणसाच्या हाताखालचा कुणीतरी नेहेमीच अश्या माणासाविरूद्ध बंड करण्याच्या पवित्र्यात असतो.बरय़ाचदा हा बंडखोर सगळं मनात दाबून असतो.संधी मिळताच बंड उघड होतं.दुसरीकडे कप्तानाची बायको हळवी होऊ लागते.आयुष्यभर सतत जिकंणारय़ा, आपल्या मनासारखंच करणारय़ा, समुद्राचा राजा म्हणवून घेणारय़ा कप्तानाला एक देवमासा अखेरीस जेरीला आणतो…
हॅट्स ऑफ टू यू! ही माझ्यासारख्या या माध्यमात नुकत्याच आलेल्या मुलाची प्रतिक्रिया होती.जुन्या काळातले परदेशी दर्यावर्दी पोषाख, ब्राऊन केस, ब्राऊन दाढ्या, कॅप्स, काळे, कुरळ्या केसांचे गुलाम अशी सगळी पात्र जिवंत वाटत होती.प्रत्येक पात्राला स्वत:चं असं वैशिष्ट्य होतं.नाटकाला गोष्टं होतीच पण खूप मोठा संघर्ष होता.हा संघर्षच नाटकाचा आत्मा असतो हे या माध्यमासंदर्भातलं ब्रह्मवाक्यं असतं हे नंतर समजलं.
सगळ्या संघर्षाचा केंद्रबिंदू न दिसणारा देवमासा (नियती?) होता पण रंगमंचावर आम्हाला दिसणारा संघर्षाचा केंद्रबिंदू जहाजाचा कप्तान होता! हा कप्तान आमच्या ज्येष्ठ मित्राने कमालीचा रंगवला होता.त्याचं दिसणं, त्याची रंगभूषा, त्याची रग, त्याचं न दिसणारय़ा त्या देवमाश्याबरोबर निकरानं झुंजणं, बायकोबारोबरचं भावूक होणं आणि सरतेशेवटी हतबल होणं आणि तेही त्याच्या त्या करारी व्यक्तिमत्वाला सहन न होणं.काय रेंज होती त्याच्या रोलची आणि तेवढ्याच अप्रतिमपणे ती भूमिका त्याने वठवली होती.एखाद्या कसलेल्या, व्यावसायिक नटासारखी.एवढंच नाही तर त्यात पहिल्यांदाच रंगमंचावर प्रवेश केलेले, जेमतेम अनुभव असलेले अश्या सगळ्यांनीच इतकं बेमालूम काम केलं होतं, आमच्या त्या नेत्या मित्राने ते करवून घेतलं होतं की प्रेक्षकांची नजर नाटकावरून हलत नव्हती.
सांघिक परिणाम! एखादा एकसंध ग्रुप रंगमंचावर काय किमया करू शकतो हे मी डोळ्याने बघत होतो.नाटक संपलं.मी रंगमंचावरच्या सगळ्यांना भेटायला गेलो.अभिनंदनांचा वर्षाव होत होता.सगळे भारावलेले होते आणि त्याचवेळी नाटकात अभिनय करणारे, न करणारे सगळेच आवाराआवरीलाही लागले होते.
तयारी करून रंगमंचावर उभं रहाणं, भूमिका वठवणं पर्यायाने सोपं असतं.रंगमंचावर एकसंध कलाकृतीचा आभास निर्माण करणंही खूप सोपं असतं पण नाटक उभारण्यासाठी ग्रुपनं एकसंधपणे काम करणं, नाटक संपल्यानंतर आपापलं काम समजून बिनबोभाट आवराआवर करणं खूप महत्वाचं असतं.
नाटकाचा ग्रुप खरंच एकसंध असेल तर त्याचा परिणाम रंगमंचावर दिसतोच!
हे सगळं आज, हे लिहित असताना, मांडता येतंय.त्यावेळी मात्रं भारावून टाकणारं काही समोर येणं आणि आपण त्यात गुंगुन. गुंतून जाणं एवढंच होत होतं!
No comments:
Post a Comment