आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणापासून एकदा तरी एखाद्या नाटकात काम करावं असं खूप वाटत असतं.मी पहिल्यांदा प्रत्यक्ष रंगमंचावर यायला आता काही दिवसच उरले होते.विश्वास बसत नव्हता.नाटकात काम मिळालं म्हणून आनंद तर होताच पण दिवसेंदिवस जाणवणारय़ा आणि पडणारय़ा जबाबदारीमुळे रिहर्सलमधे असताना तरी तो निखळपणे जाणवला नाही.सगळं बिनचूक पार पडण्याचं दडपण मनावर होतं.ही समूहकला असते.आपल्यामुळे इतर कुणाचा किंवा नाटकाचा- करत असलेल्या या एकांकिकेचा- फज्जा उडू नये!
जसजसा रिहर्सलचा वेग आणि वेळ वाढत होता तसतशी रात्री झोप लागेनाशी झाली.एकांकिकेच्या रिहर्सलबरोबर संस्थेचे बॅनर रंगवणे, नेपथ्य- जे काही होतं ते- त्याची तयारी या गोष्टीतही आम्ही सगळेच झोपबीप विसरून व्यग्र झालो होतो.ऑफिसला निघाल्यावर लोकलट्रेनमधे झोप लागायची आणि दचकून जाग यायची.आपला परिक्षेचा पेपर आहे आणि आपण वेळेवर पोचलेलोच नाही किंवा पेपर हातात पडल्यावर काही आठवतच नाही अशी स्वप्नं पडायची.ऑफिसमधे पेंग आवरायला लागायची नाहीतर सहकारी पकडायचे.
एकांकिका पहिल्यापासून शेवटपर्यंत न चुकता सादर करायची हे मुख्य ध्येय होतं.पुढे मृत्यू आहे अशी म्हातारय़ाची/मीडीआची/प्रत्यक्ष मृत्यूची भविष्यवाणी होऊनही ते तिघे पिसाटासारखे जंगलाकडे धावत सुटले आहेत.कसलीही पर्वा न करता.त्या भविष्यवाणी किंवा आकाशवाणी प्रमाणे कृती करताएत.मोहरा शोधतात.त्यासाठी एकमेकांचा जीव घेतात.तो म्हातारा- मीडीआ- मृत्यू- सांगतो.त्यांना मी सांगितलं होतं, तिथे आहे तुमचा मृत्यू!
या सगळ्या सादरीकरणाचा सहज, सोपा, समजणारा निश्चित अर्थ काय? हा प्रश्न त्यावेळी पडलाच नाही! सादरीकरणात गुंतलेले आम्ही सगळे नवोदित आणि आमच्याकडून होता होईल तेवढा बिनचूक परफॉर्मन्स करून घेण्यात व्यग्र असलेला दिग्दर्शक- तोच एकांकिकेचा लेखक.त्याला सगळं समजाऊन सांगायला वेळच नाही.तो लेखन, दिग्दर्शनाबरोबर संमेलनाचाही सूत्रधार.त्याने काही सांगितलंही असेल पण आम्ही त्या सादरीकरणाच्या मोहाने आणि त्या बरोबरच्या भीतीनेही एवढे भारावलो होतो की आमच्या ते कानापर्यंतही पोचलं नसावं.नव्या कोरय़ा मुलांना अश्या एकांकिकेबद्दल सांगून काही कळण्यापेक्षा गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त असते हा ही विचार आमच्या लेखक-दिग्दर्शकच्या डोक्यात असेल.आम्हाला हे असं का? हे विचारायची तेव्हा बुद्धी झाली नाही.स्वत:ला आणि आपल्या समोरच्या जाणकाराला प्रत्येक वेळी असं का? हे विचारायला पाहिजे हे खूप नंतर डोक्यात बसलं.तरीही एकूण नाटक बसणं या प्रक्रियेत मग ते हौशी असो, प्रायोगिक असो, व्यावसायिक असो; सुरवात आणि शेवट जोडून न चुकता प्रयोग सादर करणं या कामात जास्त वेळ जातो असा अनुभव येतो.तुमची समज वाढेल तसंतसं तुम्ही जे करत असता ते समजून घेत असता.
एखादा विषय कठीण वाटावा.त्या विषयाच्या पेपरची भीती वाटावी पण इतर सगळ्याच विषयांच्या विचारांच्या गडबडीत इतकं व्यस्त असावं की मुख्य पेपर सहज लिहिता यावा तसं काहीसं झालं.माझं पदार्पण पार पडलं.सुरवातीच्या प्रवेशाआधीची- पहिल्या एन्ट्रीआधीची धाकधूक होती- जी अभिनेत्याच्या कायम मानगुटीवर बसलेली असते- ती होतीच.पण नंतर एखादी ताणलेली स्प्रींग सैल होत जावी तसा पहिला प्रयोग पार पडला.
प्रयोग पार पडल्यावर आता प्रतिसाद.तो तर प्रयोग चालू झाल्यापासून मिळायला सुरवात झाली. “आयला हा बघ! हा पण नाटकात! एऽऽ-” हा पहिला प्रतिसाद.माझ्या नावाने पुरूषी, घोगरय़ा आणि जास्त वेळ बायकी आवाजात हाका.प्रेक्षकातले, रंगमंचावरचे सगळे एकमेकांचे मित्रच.माझ्यासकट सगळ्यांच्याच नावाच्या हाकांचा गजर ही पहिली प्रतिक्रिया! नंतर मग काही गंभीर चाललंय या समजुतीनं बहुदा प्रेक्षकांत शांतता.मेजर चूक न होता प्रयोग पार पडला म्हणून आम्ही पडलेल्या पडद्याला नेहेमीच्या भाबडेपणानं लोटांगण करून वंदन केलेलं.मग भेटायला आलेल्या दिग्दर्शकाच्या पाया पडण्यासाठी रांग.त्याचा गंभीर चेहेरा.चांगलं झालं सगळं पण… असा त्याच्या गंभीर विचारी चेहेरा.फ्रीज झालेला.
एकांकिकेचा बराचसा भाग हा तिघांच्या कुजबुजीचा होता.ही कुजबुज प्रेक्षकात बसलेल्या आमच्या लेखक-दिग्दर्शकाला नीट ऐकू आली नाही.ही त्याची पहिली प्रतिक्रिया.आम्ही नवोदित नर्वस.माझं कुजबुजीतलं बोलणं स्पष्टं ऐकू आलं नाही असा त्याचा रोख.नंतरच्या काळात असं हे कुजबुजणं शेवटच्या रांगेपर्यंत पोचणं कठीण असतं हे समजलं.मग नवीन शब्द कळला.प्रोजेक्शन.तो वारंवार भेटीला येऊ लागला.
मी पूर्वी नाटकात पाहिलेलं असं या एकांकिकेत काहीच नव्हतं.ना दिमाखदार नेपथ्य.ना चमकदार कपडे.ना रंगीबेरंगी प्रकाश.झगमगतं असं काही नाही.अर्ध्यापेक्षा जास्त वेळ रंगमंचावर काळोखच.फार तर निळा झोत आणि झाड-म्हातारय़ावर लाल झोत.गोष्टंही नेहेमीची नाही.वेगळीच.सगळं दृष्टीआड.झाड, रान, ओढा, हंडा, सोन्याच्या मोहरा यापैकी दिसणारं काहीच नाही.ते सगळं अभिनेत्यानं आपल्या हालचाली, हावभाव यातून खरं आहे असं भासवायचं.’माईम’ हा आणखी एक नवा शब्द आमच्या डिक्शनरीत रूजू झाला.
“तुम्हाला कशाच्यातरी मागे जीव घेऊन पळायला लागलंय.दम लागलाय.या विंगेतून तुम्ही येता.थकून रंगमंचावर पडता! कसं कराल? दाखवा करून!” ही दिग्दर्शकाची सूचना.मग आमची तसं करण्याची धडपड.पहिले सगळे प्रयत्न हास्यास्पद.मग त्यातून योग्य प्रयत्न योग्य मार्ग सापडत जाणं.
“तुम्ही जंगलात शिरला आहात! करा! हं! झाड आलं.आता मोठा वेल आला.करा बाजूला.होत नाही? मग तोडून बाजूला काढा!” दिग्दर्शक सूचना देत होता आणि आमच्याकडून मुकाभिनयाद्वारे प्रसंग बसवून घेत होता.या प्रक्रियेला ’इंप्रोवायझेशन’ म्हणतात असं नंतर समजलं.थोडं समजत होतं.काही नवीन शब्दांनी पोतडी भरत होती.प्रयोग झाला, कालांतराने त्याप्रयोगसंदर्भातल्या चर्चाही संपल्या.इतक्या बिझी शेड्यूलनंतरचे दिवस खायला उठू लागले.आता काय? पुढे काय करायचं? काहीतरी करायचंच! नाटकच करायचं! पण कधी? एकदा तोंडाला रंग लागला की माणूस कितीही लहान असो, मोठा असो.वेडापिसा होतोच होतो…
No comments:
Post a Comment