romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, September 13, 2010

गणेशोत्सवाचा रंगमंच

सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांची नाटकं व्हायची.शाळेच्या इमारत निधिसाठी होणारय़ा नाटकातले कलाकार व्यावसायिक असायचे पण वसाहतीत एरवी हिंडणा-फिरणारी आपल्यातलीच माणसं गणेशोत्सवाच्या रंगमंचावर बघणं हे एक वेगळंच अप्रूप होतं.शाळेच्या इमारतनिधिसाठी होणारय़ा उघड्या रंगमंचावर दरवर्षी होणारय़ा व्यावसायिक नाटकांतून या माध्यमाची मेक-बिलिव्हची जादू लक्षात आली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा नाटकातून ही जादू आपल्या जवळपासही आहे हे लक्षात आलं.आदल्या रात्री यम म्हणून भुरळ पाडणारा नट दुसरय़ा दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे धूर सोडत ऑफिसला जाताना दिसायचा आणि आम्ही लहान मुलं तोंडात बोटं घालून त्याला पहात रहायचो.हे ग्लॅमर होतं.एक स्वप्नं.पण ते स्वप्नं आता फार दूरवरचं राहिलं नव्हतं.आपल्यात आलं होतं.
सार्वजनिक उत्सवातली नाटकं ही त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावरून होणारय़ा गाजलेल्या नाटकांच्या आवृत्याच असायच्या पण आपल्यातली माणसं त्यात दिसतात ही मजा और होती.सुदैवाने आमच्या वसाहतीत प्रचंड उत्साही वातावरण होतं.दरवर्षी व्यावसायिक रंगमंचावर गाजलेलं एक तरी तीन अंकी नाटक सादर केलं जायचं.त्यावेळी व्यावसायिक रंगमंचावर एक अफलातून लेखक-नट आणि एक अफलातून नट-दिग्दर्शक फार्सचा धुमाकूळ घालत होते.ते फार्स या रंगमंचावर यशस्वीपणे सादर झाले.ऐतिहासिक नाटकांचे प्रवेश सादर झाले.प्रचंड मेहेनत घेऊन हे स्थानिक कलाकार काम करायचे.नुसतं कामच नाही तर नाटकाचे देखावे, कपडे, रंगभूषा सगळं सगळं जमवायचे.एवढी प्रचंड हौस आणि त्यात बहुतेकवेळा पाऊस! नाटक सोसायटीच्या कार्यालयात.समोर पेंडॉल.पाऊस ताडपत्र्यांमधूनही कोसळायचा आणि पाणी जमिनीवरूनही वहात बसलेल्यांच्या बुडाला लागायचं.जोराचा पाऊस आला की पडदा पाडायलाच लागायचा.पाऊस जरा थांबला की आणखी एक प्रयत्न.असे काही प्रयत्न आणि मग पाऊस कोसळतोच आहे म्हटल्यावर पडदा कायमचा बंद.कलाकार हिरमुसायचे.पण नंतर पुन्हा तालमी करून पाऊस संपल्यानंतरच्या दिवसांत पुन्हा त्याचा यशस्वी प्रयोग करायचेच करायचे.हॅट्स ऑफ टू देम!
...आणि आम्ही नाटकाची वेळ साडेनऊ तर साडेआठपासूनच रंगमंचासमोर जमिनीवर बसायला आतूर.आसनं म्हणजे भारतीय बैठक.जमिनीवर किंतान अंथरलेलं.पण ते कुणी अंथरायच्या आधीच आम्ही जाऊन बसलेले.समोरचा मरून रंगाचा पडदासुद्धा मोहक वाटायचा.तो वारय़ाने उडायचा.मग हुटिंग.तोपर्यंत पडद्याचे मधोमध सरकणारे दोन भाग असतात त्या जॉइंटवर हार घातलेला.अगदी पहिली रांग तो पडदा वर करूनही बघायची.मग कार्यकर्ते किंतान अंथरण्यासाठी यायचे.बसलेल्यांना उठवायचे.मग पुन्हा पुढची जागा पकडण्यासाठी दंगा.खटाखट टपल्या मारणं हा काही जणांचा आवडता उद्योग.मग कचकचून टपली खाणार ते पोर कावरंबावरं, रडवेलं झालं की मारणारे टगे खूष.एखादं गिर्हाईक असायचं सततच्या टपल्या खाणारं.कधी टपल्या खाणारा वैतागून मागच्या कुणालातरी आरोपी करायचा.या आरोपीनं टप्पल मारलेलीच नसायची.मग मारामारी.कार्यकर्त्यांनी हसत हसत ती सोडवायची.टगे ग्रुपचे बरेच उद्योग असायचे.पेंडॉलमधल्या या प्रेक्षागृहाच्या एका बाजूला वीज कंपनीचं स्टेशन होतं.त्या पायरय़ांवर खास मुलींसाठी जागा होती.तिथे मुली येऊन बसल्या रे बसल्या की प्रेक्षागृहातच करमणुकीचे प्रकार सुरू व्हायचे.स्थानिक कलाकारांना नेहेमीच काही न काही कारणांनी नाटक सुरू करायला उशीर व्हायचा.मग मुली स्थानापन्न झाल्या की कुणीतरी छोटासा दगड वर पेंडॉलच्या दिशेने असा भिरकवायचा की तो अलगद मुलींच्या घोळक्यात जाऊन पडेल.मग तो कुणीतरी किंवा इतर कुणीतरी ’बेडूक बेडूक’ असं ओरडायचा की झाला मुलींचा हलकल्लोळ सुरू.मग ’ते’च कुणीतरी मुलींच्या सुटकेला धावायचे.
आज टीव्ही हा लहान मुलांवर सर्वांगानं ठसा उमटवणारा घटक झालाय.वरचं सगळं वर्णन आता मागच्या पिढीत जमा झालंय.आजच्या पिढीला अशी नाटकं किंवा त्याकाळी गणेशोत्सवात होणारे पडद्यावरचे सिनेमे हे प्रकार कितपत इमॅजिन करता येतील माहित नाही.त्यात काही गंमत असेल असं त्याना वाटत असेल?
शाळेच्या मैदानावरच्या उघड्या रंगमंचावर होणारय़ा व्यावसायिक नाटकांना काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रंगमंचावरून होणारय़ा स्थानिक नाटकांना काय मी एक जबरदस्त कुतुहल असलेला प्रेक्षक होतो.हे सगळं प्रचंड भारून टाकणारं होतं.आमच्यातलीच चुणचुणीत मुलं किंवा ज्यांचे कुणी न कुणी स्थानिक कलावंतांच्या ओळखीतले असतील अशी मुलं स्थानिक रंगमंचावर वर्णी लाऊन यायची.कौतुक करून घ्यायची.मला त्यावेळी ही सगळी जादूच होती.आपल्याला प्रत्यक्ष त्यात काही करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.असे जे काही चुणचुणीत, वक्तृत्व स्पर्धेत चमकणारे किंवा ओळखीतले अश्या कुणातच मी मोडत नव्हतो.फक्त आ वासून सगळं मनापासून बघत मात्र होतो.या सगळ्यापेक्षा आपण खूप लांब आहोत असं वाटल्यामुळे नाटकाचं आकर्षण वाढत होतं.चांगलं काही करणारय़ांचं अपार कौतुक वाटायचं.
मग लहानपणातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर कधीतरी अपघातानं नाटक माझ्यासमोर येऊन ठाकलं.मला त्या ग्रीक शोकांत पद्धतीच्या प्रायोगिक एकांकिकेत अभिनय करावा लागणार होता.वेळ कमी होता आणि आधीच्या कसलेल्या कलाकारांबरोबरीनं माझं काम व्हावं म्हणून माझा दिग्दर्शक धडपडत होता.मी आजपर्यंत बघितलेल्या एकूणएक नाटकांपेक्षा हे नाटक संपूर्णपणे वेगळं होतं.यात पात्रांचं बोलणं कुजबुजल्यासारखं होतं पण ही विस्पर प्रेक्षकांपर्यंत कशी पोचवायची ते दिग्दर्शक मला शिकवत होता.यात हंडा नव्हता पण तो आपण दोन हातात धरलाय.तो डोक्यावर घेतलाय.तो घेऊन तलावाकाठी गेलोय.तो भरलाय.सगळं सगळं हालचालीतून दाखवायचं होतं.मी या सगळ्यात पूर्ण गुंतून गेलो होतो.हे सगळं समोरून प्रेक्षक म्हणून कसं दिसेल याचा विचार करायला माझा दिग्दर्शक समर्थ होता.माझी भूमिका मात्र बदलली होती.मी आता प्रेक्षकाऐवजी अभिनेता झालो होतो.
Post a Comment