माजी विद्यार्थी संघाच्या संमेलनात ती ग्रीक शोकांत पद्धतीची एकांकिका होणार होती.त्यातल्या चार पात्रांपैकी एक असणारय़ा माझ्या क्रिकेट खेळणारय़ा मित्राला मॅच सुरू होण्याआधी डोक्याच्या मागच्या भागावर बॅट लागल्याचं निमित्त होऊन चार-पाच टाके पडले आणि घरच्यानी त्याचं तालमीला जाणं बंद करून टाकलं.मी काय करू? मी त्याला विचारलं.तो म्हणाला, तू जा तालमीला, बस जाऊन.मी गेलो.तालिम बघणं मला आवडायला लागलं होतं.
मी गेलो तेव्हा दिग्दर्शक एकटाच हॉलमधे बसला होता.तू पाहिलीएस रिहर्सल बरोबर?- त्यानं विचारलं.मी चाचरत मान डोलावली.राहशील उभा?- त्याने विचारलं.मी म्हटलं, मी अजून कधीच- तो म्हणाला, काळजी करू नकोस.मी सांगतो तसं करायचं.चल.सुरवातीचे दोन सीन्स करूया.मी पडत धडपडत तो सांगेल तसं करून दाखवत होतो.कुठलीही कृती करताना मेल्याहून मेल्यासारखं होत होतं.असं का? करताना माझं मलाच कळत होतं मी किती वाईट करतोय.साधं हंडा उचलून डोक्यावर ठेवण्याचा हावभाव करणं मला जमत नव्हतं.एरवी त्या मुलांकडून कठोरपणे सगळं करून घेणारा दिग्दर्शक मला मात्र समजाऊन, उत्तेजन देऊन सगळं करून घेत होता.आता थांब- असं त्याने म्हटलं तेव्हा मी घामाघूम झालो होतो.आजुबाजूला बघतो तर नाटकातली इतर मुलं जमलेली.ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघताएत असं माझं मलाच वाटायला लागलं बहुतेक.आता एकांकिकेची संपूर्ण तालिम मी इतर पात्रांबरोबर केली- म्हणजे तसं करायचा प्रयत्न केला.उद्यापासून तू सगळ्यांच्या तासभर आधी यायचंस- दिग्दर्शकानं फर्मान सोडलं.मी घरी कधी आलो.घरच्यांना कधी सांगितलं.अंथरूणावर कधी पडलो.झोप लागली की लागलीच नाही.काहीच कळलं नाही.नोकरी लागली होती, माझ्या नाटकात काम करण्याच्या घरच्यांच्या विरोधाला नामोहरम करणारी एक जमेची बाजू आता माझ्याकडे होती.सकाळी उठलो.सगळं आवरलं.ऑफिसला गेलो.हे सगळं कसं पार पडत होतं मला काहीच कळत नव्हतं.
दुसरा दिवस.माझी एकट्याची रिहर्सल नावाचा तो एकाचवेळी घाबरवणारा आणि एक्साईटही करणारा प्रकार संपला.इतर पात्रं आली.दिग्दर्शक म्हणाला, आता बस आणि संपूर्ण रिहर्सल बघून घे.मी बारकाईने बघू लागलो…
ते तिघे सैरावरा धावत होते.वाट फुटेल तिथे.कुणीतरी मागे लागल्यासारखे.आपण काय करतोय हे ते तिघे संवादातून सांगत होते.संवादाचा एक पॅटर्न होता.प्रत्येक पात्राच्या वाटेला दरवेळी साधारण एक वाक्य.तिघे पाळीपाळीने आपापलं वाक्य म्हणत होते.या प्रत्येकाच्या एकेक वाक्यातून होणारय़ा त्यांच्या आपापसातल्या संवादातून त्यांची मनस्थिती, वातावरण उभं रहात होतं.धावणारे तिघे दमले.तरीही धावत राहिले.बरंच अंतर कापलं गेलं.एक काळा डगला घातलेला म्हातारा सामोरा आला.तो त्याना म्हणाला- जा! या दिशेने जा! त्याचं सगळं बोलणं ऐकून न घेताच ते धावले.तो पुढे म्हणाला, त्या तिथे आहे, तुमचा मृत्यू!
न ऐकता भरधाव धावणारे ते तिघे आता जंगलात शिरले.फक्त हावभावानेच ते जंगलात शिरल्याचं दाखवता होते.वेली, झाडं, लहान, लहान ओहोळ, टेकड्या, चिखलाचा प्रदेश असं सगळं ते ओलांडताहेत.एका जागी उभं झाड.म्हणजेच झाडासारखे हात करून पाठमोरा उभा असलेला मगासचाच तो म्हातारा.तो वळतो.झाडाचा पुन्हा म्हातारा होतो.म्हणतो, इथे उकरा!- पुन्हा वळून तो झाड होतो.
तिघे त्या जागी खणायला सुरवात करतात.बरंच खणून झाल्यावर हंडा सापडलाय.जीव तोडून, जोर लाऊन तिघांनी हंडा बाहेर काढलाय.हंडा बराच जड आहे.काय आहे यात? ते तिघे हंडा जमिनीवर रिकामा करतात तर काय? चांदीच्या मोहरा! त्याना झालेला आनंद त्यांच्या चेहेरय़ातून, डोळ्यातून, हालचालीतून ओसंडायला लागलाय.तरीही तो कशातच मावत नाहीये.
आनंद ओसरायला लागलाय कारण आता भुकेची जाणीव होऊ लागलीए.एकाला मोहरांची राखण करायला सांगून इतर दोघे जेवणाआधी पाण्याची सोय करायला पाहिजे असं म्हणून रिकामा हंडा घेऊन तिथून निघतात.
मोहरांची राखण करणारा मोहरांच्या त्या ढीगाचे तीन समान भाग करतो.मग ते तीन ढीग न्याहाळत असताना इतर दोघांचे ढीग कमी करून तो आपला ढीग वाढवायला लागतो.
पाणी आणायला निघालेले दोघे पुन्हा वेली, झाडं इत्यादीतून वाट काढत पाण्याचा ओहोळ शोधून काढतात.त्यांच्या मनात कली शिरलाय.जंगलातल्या विषारी मुळ्या ते शोधून काढतात.त्या पिळून त्यांचा रस ते हंड्यातल्या पाण्यात मिसळतात.पाण्याने भरलेला हंडा आणी चेहेरय़ावर विचित्र हास्य घेऊन ते दोघे ’त्या’ झाडाखाली मोहरांची राखण करणारय़ा आपल्या तिसरय़ा मित्राकडे निघाले आहेत…
माझ्या डोक्यात रात्रंदिवस एकच विचार.वाक्यं, हावभाव, त्यांचा क्रम.दिग्दर्शकानं बजावून सांगितलेलं.प्रत्येकानं फक्तं आपलंच वाक्य लक्षात ठेवायचं असं करायचं नाही.सगळ्यांची वाक्य लक्षात ठेवायची… लोकलट्रेनमधे, ऑफिसला जाता येता माझ्या डोक्यात तेच सगळं.प्रवासात लोक माझ्याकडे चमकून बघताएत? मी सावध.पण पुन्हा माझ्या आत ते नाटक चालूच!
रिहर्सल करायला उभा राहिलो की मला दुसरं काहीच जाणवायचं नाही.दिग्दर्शकाच्या सूचनेबरहुकूम फक्तं एकेक कृती करत रहायची.त्या त्या वेळी मी काय करत असतो हे नंतर मला आठवतसुद्धा नसे.मजा वाटत होती.आनंद होत होता.थरार जाणवू लागला.संमेलनाचा दिवस जवळ येत चालला तसं मग हळूहळू टेन्शन चढायला लागलं.मला आणि कदाचित माझ्यामुळे की काय सगळ्यानाच!
No comments:
Post a Comment