romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, September 8, 2010

अभिनयातून लेखनाकडे…

’अभि’नयातून ’लेख’नाकडे या प्रवासात मी काय शिकलो हे ’अभिलेख’ मालिकेत लिहायचं आहे.ह्या अनुभवांमुळे तुमचं रंजन होईल.काहींना याचा उपयोग होईल.काहींना आपलं काही शेअर होतंय असंही वाटेल.हे आत्मचरित्र नाही आणि मला कुठलेही चांगले-वाईट संदर्भ फक्त सूचित करायचे आहेत.संदर्भांपेक्षा त्यातून काय मिळालं हे मला वाटतं कुणालाही वाचायला नक्कीच आवडेल.’मनू आणि मी’ ला तुमचा प्रतिसाद अफलातून आहे आणि ’अभिनयातून लेखनाकडे’ या प्रवासाचं भवितव्य तुमच्यावरच तर अवलंबून आहे.
मुळात अभिनयात मी ठरवून आलोच नाही.विहीरीच्या काठावर बेसावधपणे उभं असताना कुणीतरी खोल पाण्यात ढकलून द्यावं तसं झालं.मराठी घरातला असल्यामुळे नाटक या माध्यमाचं आकर्षण प्रचंडच होतं पण ते स्वप्नवत होतं.अचानक ते स्वप्नंच समोर येऊन ठाकलं.
नोकरी लागली, स्वस्थता आली आणि त्याचवेळी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या प्रचंड उत्साही प्रमुखाने नाटकाच्या तालमीला येऊन बस असं सांगितलं.मी उत्साहानं जाऊन बसू लागलो.ग्रीक शोकांत प्रकारची ती एकांकिका होती.मी एरवी बघितलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळी.एकांकिका बसत आली आणि एक अपघात झाला.तीन मुख्य पात्रांपैकी एक असलेला माझा मित्र क्रिकेटच्या मॅचच्या आधी चांगलाच जखमी झाला.तो मॅच सुरू होण्याआधीचा सराव करत होता.यष्टीरक्षक बॅटच्या दस्त्याने यष्ट्या जमिनीत ठोकत होता. एक रूपया प्रत्येकी म्हणजे दोन्ही संघ मिळून बावीस रूपये शिल्ड असलेली आमची टेनिस बॉल मॅच लवकरच चालू होणार होती.यष्टीरक्षकानं स्टंप ठोकण्यासाठी उचलेला बॅटचा दस्ता उत्तम खेळाडू असलेल्या माझ्या मित्राच्या डोक्याच्या मागच्या भागावर लागला.चांगलंच रक्त येऊ लागलं.टाके पडले.घरी बोंबाबोंब झाली आणि त्या मित्राची एकांकिकेतली रिप्लेसमेंट कोणी करायची असा आणखी एक पेच पडला.मी तालमींना सतत हजर असल्यामुळे ते माझ्यावर आलं.माझं नाटक सुरू झालं.माझ्या त्या मित्राचंही नाटक थांबलं नाही.एक संधी हुकली तरी तो या प्रवासात नुसता राहिला असंच नाही तर काही वर्षांनी त्याला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दिग्दर्शनाचं पदकही मिळालं.
मी जेव्हा अचानक ढकलला गेलो तेव्हा अभिनयासाठी काही ’शिक्षण’ असतं हे गावीही नव्हतं.नेहेमीचं शिक्षण घेऊन पदवी घेता घेता नाकी नऊ आले होते.अचानक ढकलला गेल्यामुळे आणि मुळात सामान्य मध्यमवर्गीय असल्यामुळे यात करियर वगैरे होते हे सुद्धा विचारापलिकडचं होतं.पार्श्वभूमी नव्हतीच.अगदी रस्त्यावर झोपत नसलो तरी पावसात गळणारय़ा मंगलोरी कौलांच्या खाली असलेल्या चाळीतल्या बारा बाय अकरामधे पाच जणांचं कुटुंब होतं.हातातोंडाची गाठ नक्की पडत होती.पण हे तेव्हा माझ्यासारख्या बरय़ाच जणांच्या बाबतीत होतं.त्याचं त्यावेळी आणि आत्ताही तसं अप्रूप अजिबात नाही.नाटकात काम करणं घरी आवडत नव्हतं हा सांगायचा मुद्दा.हा काही १९४०चा सुमार नव्हता आणि आम्ही जळफळायचो घरच्यांवर.यांना भगतसिंग (?) दुसरय़ाचा घरीच जन्मावा असं वाटतं म्हणून.जुनी संगीत नाटकं, नाट्यसंगीत.एका बुजुर्ग कलाकारानं त्यावेळी रंगमंचावरून वठवलेल्या पाच पाच भूमिका आणि अनेक बायकांना फसवून कोर्टात उभं रहाण्याचं त्याचं अफलातून बेअरिंग या सगळ्याची चर्चा घरात खूप व्हायची.
शाळेच्या इमारत निधीसाठी शाळेच्या मैदानावर पेंडॉल ठोकून उघड्या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं बोलवली जात.शाळेत जाणारय़ा आम्हा आठ-दहा-बारा वर्षांच्या मुलांना ही पर्वणीच असे.सोफा, लाल गादीच्या खुर्च्या, साध्या कुशनच्या खुर्च्या आणि नुसत्या लाकडी खुर्च्या अशी प्रेक्षागृहातल्या आसनांची उतरंड असे.शेवटच्या नुसत्या खुर्च्यांच्या रांगेतल्या पंधरा किंवा दहा रूपये पर नाटक मूल्य असलेल्या आठ-दहा नाटकांची फक्त दोन सीजन तिकीट घरातल्या पाच माणसांत काढण्याची ऐपत होती.हा नाट्यमहोत्सव थंडीच्या दिवसात होई.मागच्या बाजूला डोंगरांची रांग.शाली लपेटून थरथरत नाटक बघणं हे एक थ्रील होतं.व्यावसायिक नाटकाचं बंदिस्त नाट्यगृह आमच्यापेक्षा तासभर अंतरावर त्यामुळे हा महोत्सव म्हणजे एक गावच असलेल्या वसाहतीतला एक भला थोरला इव्हंट होता असं आजच्या भाषेत सांगता येईल.रोवलेले बांबू, त्यांच्यावर सुतळ्यांनी ताणून बांधलेलं किंतान होतं.आत-बाहेर करायला आसन मूल्यांप्रमाणे प्रवेशद्वारं होती पण किंतान कधीही वर करून आत-बाहेर करणं आणि फुकटेपणानंही नाटक बघणं सवयीचं होतं.
या वयात बघितलेली एक एक नाटकं मनात घर करून राहिली.रंगमंचावरचे देखावे, प्रकाशयोजना आणि विविध रंगभूषा केलेले त्यावेळी फक्त वर्तमानपत्रांतून वाचायला मिळालेले प्रथितयश कलाकार ही जादू होती.याच दरम्यान झालेल्या दूरदर्शनच्या आगमनानंतर या कलाकारांशी जवळीक झाली आणि ही जादू आणखी गडद झाली.
त्यावेळी प्रथितयश असलेल्या एका नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तद्दन व्यावसायिक नाटकानी आम्हा मुलांना चांगलीच भुरळ पाडली.दहा-बारा वर्षाचं ते वय म्हणजे कळायला नुकतीच सुरवात झालेली असते आणि त्यावेळी बघितलेलं जन्मभर लक्षात रहातं.
एक अत्यंत कुरूप असलेला डॉक्टर हे प्रमुख पात्रं असलेलं ते नाटक होतं.प्रेयसीवरचं एकतर्फी प्रेम फसलं म्हणून तिच्या मुलाचा जीव मागण्यासाठी डॉक्टर तिच्या घरात येतो तेव्हा योगायोगाने वीज गेलेली असते.बाई टॉर्च पेटवते.टॉर्चचा झोत घरभर फिरू लागतो आणि अचानक एका क्षणी त्या टॉर्चच्या प्रकाशात त्या डॉक्टरचा विद्रूप, सुळे बाहेर आलेला, हिरवा-काळा चेहेरा दिसतो.बाई जोरात किंचाळते.त्याच दृष्यावर मध्यंतर होतं.प्रेक्षागृहात बसलेल्या सगळ्या वयाच्या प्रेक्षकांच्या हृदयातून एक वीजेची लहर निघून जाते.आज विचार करताना ह्या नाटकातलं, प्रसंगातलं तद्दनपण लक्षात येतंच पण या माध्यमाची मेकबिलिव्हची, आख्या प्रेक्षागृहाला (ते उघडा रंगमंच स्वरूपाचं असल्यामुळे पूर्ण काळोखाची मदत नसताना, आजूबाजूचा कुठलातरी प्रकाश व्यत्यय आणत असताना सुद्धा) धक्का द्यायची जबरदस्त ताकद जाणवली.या माध्यमाला मी त्या वयात नकळतपणे सलाम ठोकला असला पाहिजे.
दहा-बारा वर्षाच्या वयातले ठसे आयुष्यावर परिणाम करतात.त्यावेळी या माध्यमाचे असे अनेक जबरदस्त वाटलेले ठसे नक्कीच गोळा झाले.पुढे नाटक माध्यमात यायची ती पूर्वतयारी होती…
Post a Comment