romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, March 29, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (१०)

महेशची अवस्था खूपच बिकट झालीए. तो आपल्या बेडरूममधे एक उशी हातात घेऊन तिलाच झोपवतोय. उशी आडवी धरतो. उशी उभी खांद्यावर धरतो. अंकित त्याच्या मागेमागे फिरतोय, आपला पपा काय करतोय ते बघत. महेश चालता फिरता चक्कं झोपतोय. झोपेत त्याला स्वत:चा तोल सावरावा लागतोय.
"अंकित- अंकु- अंकुडी- अरे बाबा कुठेएस नक्की तू!"
पाळण्यातून अवनीचा रडण्याचा आवाज आल्यावर जरासा सावध होतो. मग खांद्यावरच्या उशीलाच थोपटू लागतो.
"उगी उगी अवनीबाळू ललायचं नाई- झोपायचं-"
अंकित एकदा पाळण्यात रडणार्‍या अवनीकडे बघतो आणि एकदा खांद्यावर उशी थोपटणार्‍या आपल्या पपाकडे बघतो. त्याला हसू फुटतं. ते बरोब्बर महेशच्या कानावर पडतं.
"अवनीऽ- उगी उगी- हसू नये अंकितबाळ- बापाला हसू नये- अर्‍ये तरीही हसतोएस घोड्या- गप! गप! बारा वाजवलेस सगळ्याचे आणि- आणि दात काय काढतोएस सारखा? बाप काही प्यालेला नाहिए तुझा! झिंगतही नाहिए! पेंगतोय तो! पेंगतोय!- तू अवनीबाळ उगी उगी- दिवसभर ही ड्यूटी- तुम्हा दोघांना सांभाळायची- माझ्या मागे लागलेली- मी- मी स्वत:हून घेतलेली- आणि रात्री- रात्रपाळी- ऑफिसमधे- मी-मी-मीच मागून घेतलेली! ऑफिसमधे कायमची रात्रपाळी मागून घेतलेय रे तुमच्यासाठीऽऽ तुमच्यासाठी!- आणि तू हसतोएस शुंभा! हसतोएस?"
अंकितला आता स्वत:ला आवरता येत नाही, तो त्याच्या स्टाईलमधे ओरडतो.
"पपाऽऽ तुम्ही हे कोणालाऽऽ झोऽऽपवताऽऽय?ऽऽ"
महेशचा पवित्रा अंकितच्या ओरडण्याने एकदमच बदलतो. तो ऑफिसमधे असल्यासारखा, सायबाच्या खुर्चीसमोर अदबीने वाकल्यासारखा पेंगत पेंगत वाकतो.
"माफ करा साहेब! चुकी झाली साहेब झोपेत- म्हणजे साहेब- काय सांगू तुम्हाला- घरची दिवसपाळी संपली की इथे- साहेऽऽब.. हात जोडतो.. पदर पसरतो.. साहेबऽऽ दया कराऽऽ पाठीवर मारा साहेऽऽबऽऽ पण पोटावर मारू नकाऽऽ पोटावर मारू नका- तुम्ही सांगाल ते करतो साहेब- तुम्ही सांगाल ते-"
महेश भलताच मेलोड्रॅमॅटिक होतो आणि अंकित आणखी मोठ्याने ओरडतो.
"ओऽपपाऽऽ तुम्ही कुणाला झोपवताऽऽय?ऽ कायेऽऽ तुमच्या हाताऽऽत?"
"साहेब- साहेब लहान झाले- छोटे- छोटे साहेब- अरे- अरे- हे काय?- उ-उशी? उशी? मग ती- ती कुठाय? अवनी? अरे बापरे! ती तर तिथेय- पा-पाळण्यात!- अलेलेले बाळू- सॉरी- सॉली- थॉली-"
महेश झोपेतच पाळण्याजवळ जातो आणि झोपेतच पाळण्याला झोके देऊ लागतो. त्या झोक्याच्या लयीमुळे आणखी पेंगू लागतो. मग डोळ्यावरची झोप उडवायचा प्रयत्न करू लागतो. अंकितला ते बघून आणखी हसायचं निमित्त मिळालय. तो हसत रहातो.
"हस हस तू गाढवा- घोड्या- गेंड्या- दगड्या- हस! तुझ्या दोन्ही आज्ज्याना हाकलून दिलंस-"
अंकित लगेच दादागिरीवर आलाय, "येऽऽ कुणी?ऽ मी?ऽऽ"
"नाहीऽ तुझ्या बापानीऽऽ मीऽऽ छळ छळ छळलंस त्यानाऽऽ त्या भांडल्या भांड भांड.. आणि पळ पळ पळ..."
महेशला डुलकी लागलीए.
"ओऽऽ मी कुट्येऽ मी कुट्येऽऽ त्या भांडतच होत्या! पहिल्यापासूनच!"
"चूऽऽऽऽप!" महेश जोरात ओरडतो आणि स्वत:च दचकतो. मग अवनीला जाग येईल म्हणून घाबरतो. मग हळू आवाजात, पेंगत बोलू लागतो, " एक शब्द बोलू नकोस! फटाक्यांची माळ कुणी सोडली निमामावशीच्या पाळणाघरात?.. हसू नकोस! हसू नकोस गद्ध्या!.. तुज्या मारीऽऽ आता मोठ्याने बोलायचं नाही हे- पण पोलिस कंप्लेंट झाली असती तर तू लहान म्हणून मला जावं लागलं असतं माहितीए आतमधे- जेल- जेलमधे!.. तू हास! हास तू!.."
महेशचं कुजबुजत्या स्वरात, झोपेत, पेंगत बोलणं हा अंकितला आणखी एक टाईमपास झालाय. तो खुदखुदून हसू लागतो आणि इकडे महेशनं झोपेत आणखी एक भलताच ट्रॅक पकडलाय.
"काय सांगू मोना तुलाऽऽ तू माजी अगदी जवळची मैत्रिण आपल्या ऑफिसमधली.. म्हणून तुला सांगतो.. वैरी आहेत गं वैरी- गेल्या आणि ह्या दोन्ही जन्माचे- तो पोरटा वाट लावणाराय माझ्या आख्ख्या खानदानाची! परवा फटाके फोडले.. आणखी काही वर्षानी सुरूंग फोडेल- माझ्या- माझ्या टाळक्यावर गं! आणि- आणि- तुला सांगतो मोना.. त्याची आई आहे ना आई.. माझं आख्खं आयुष्य उध्व-उध्व-उध्व..."
हे बोलत असताना महेशनं अंकितचाच हात घट्टं पकडून ठेवलाय. अंकितला तो काही केल्या सोडवून घेता येत नाहिए. महेशला पुन्हा एक डुलकी येते आणि अंकित आपला हात सोडवून घ्यायचा निकराचा प्रयत्न करतो.
"मोना- मोना- असं करू नकोस मोना. तूच माझा आधार आहेस मोना!- ते ते टेलिफोन घेणं- ते टेलिफोन ऑपरेटिंग झन्नममधे गेलं मोना.. माझ्या आयुष्याची दासतान ऐक- माझ्या दिवट्या पोरानं- मोनाऽऽ-"
अंकित जिवाच्या आकांताने आपला हात सोडवून घेतो आणि बोंब ठोकतो.
"सोडा- सोडा मला- सोडाऽऽ.. मी तुमची मोना नाहिएऽऽ मी दिवटा काय? माझ्या आईनं- ममानं तुमचं आयुष्य उध्वस्त केलं काय? थांबा आता तुमचं चांगलंच टेलिफोन ऑपरेटिंग करतो- मोबाईलच करतो ममालाऽऽ"
महेशची झोप क्षणार्धात उडालीए. तो कासावीस होऊन अंकितच्या मागे धावत सुटलाय.
"अर्‍ये- अर्‍ये- थांब- थांब- असं करू नकोस! आताच- आताच- माझं जीवन उध्वस्त- उधवस्त-"
अंकित महेशचाच मोबाईल घेऊन पळत सुटलाय, महेशलाच वाकुल्या दाखवतोय आणि महेशची अवस्था दारूण झालीए...    (क्रमश:)
या आधीचे भाग  भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ इथे वाचा!

 


No comments: