तो रोज दुधाचा हंडा घेऊन बाहेर
पडायचा आणि संध्याकाळी त्याचा मोबदला घेऊन परतायचा. फारशी झिकझिक नव्हती. सुखात झोप
लागायची.
बरय़ाच वेळा या दिनक्रमाचा त्याला
उबग येई. कधी कधी वेगळं काही करावसंही वाटे. काही रात्री झोप चाळवली जायची. -पुढे काही
करायचं ते यातूनच मार्ग काढून- तेवढा security
conscious अर्थात होताच तो.
तशी तीही होती. विरजण घालायची.
कशावर?- I mean- विरजण लावायची, ते घेऊन बाहेर पडायची आणि संध्याकाळी
येऊन आलेले पैसे वडलांजवळ जमा करायची. बाबा आदमच्या- sorry- आई इव्हच्या काळापासून तिचा हा दिनक्रम चालू होता.
निसर्गत:च ह्या दोन जीवांचा फिरण्याचा
विभाग एकच असल्यानं दोघांची भेट व्हायचीच.
पुढे योगायोग म्हणा, चित्रपटात
दाखवतात तसं म्हणा, त्या दोघांना कुणी सुचवलं म्हणून म्हणा, दूध आणि विरजण एकत्र आल्यावर
ताक होतं आणि ताकाला market खूप आहे ह्यावर त्या दोघांचं एकमत झालं आणि तो व ती
अवघ्या पंचक्रोशीत ताकवाले म्हणून फेमस झाले.
तिच्या विरजणाला चांगलाच भाव येऊ
लागला. त्याचंही कर्तृत्व सिद्ध व्हायला लागलं. अर्थात जगाच्या दृष्टीने त्यांची इतिकर्तव्यता
झाली!
पण हे असं एवढ्यावरच थांबलं असं
झालं नाही. असं कधीच होत नाही, and they
lived thereafter ही पाटी फक्त सिनेमापडद्यावरच
दिसते.
मजा अशी झाली की मागणी तसा पुरवठा
असला तरी ताकसंचय खूप व्हायचा आणि मग ते टिकावं म्हणून घुसळून ठेवायला लागायचं.
असं रोज करता एक दिवस त्यातून
एक आकर्षक गोळा वर आला. आता त्या दोघांना आणखी पुढचे वेध लागायला लागले. गोळ्याच्या
रूपानं मनोराज्य फुलायला लागली. अर्थात ती प्रत्येकाची होती, तशीच दोघांची एकत्रही
होतीच. त्यामुळे तो गोळा ते नीट जपून ठेवत.
सगळं काही आलबेल असतानाच आताशा
मात्र अघटीत घडायला लागलं होतं. त्या दोघांच्या छातीत धडधडायला लागलं होतं. जीवापाड
जपलेला तो गोळा हळूहळू कमी कमी होऊ लागला होता. आधी त्याला वाटलं तो आपोआपच विरून जातोय.
नीट लक्ष ठेवून बघताना कळलं, नाही, त्या गोळ्यावर कुणीतरी घाला घालत होतं.
बरय़ाच त्रासाअंती, खूप विचाराअंती
त्याचं कारण त्याना समजलं. तो सोकावलेला बोका गोळ्यावर रोज ताव मारत होता. तेही त्याना
स्पष्टपणे कधीच दिसत नव्हतं आणि तरीही त्यांची त्या बोक्याबद्दलची आणि त्याच्या कर्माबद्दलची
खात्री मात्र पक्की होती. पण अघटीताचं कार्यकारण त्याना अजिबात उमगत नव्हतं.
गोळ्यावरून आपण कधी भांडलो नाही.
ना न्याय करायला त्या बोक्याकडे गेलो. वा मुद्दाम त्या बोक्याच्या वाटेला गेलो नाही.
त्याच्या नादी तर मुळीच लागलो नाही.
थोडक्यात मागच्यांसारखं काहीच
केलं नाही. मग तो लोण्यावर ताव मारतो कसा? आमच्या अंत:करणावर घाव घालतो कसा?
काही केल्या त्याना उत्तर सापडेना.
बोकाही जेमतेम दिसे अस्तित्व जाणवण्यापुरता पण लोण्याचा गोळा आणि पर्यायानं पुढचं सगळंच
खोल अंधारकोठडीत ढकलल्यासारखं झालं.
त्या अदृष्य कठोर शत्रुशी ते अंदाजपंचे
वेडेवाकडे हात करत राहिले आणि हे काय आपल्यापुढे वाढून ठेवलंय या विचाराने किंकर्तव्यमूढ
झाले.
त्या अदृष्य, अतर्क्य. कठोर शक्तीशी
झगडायचं सोडून; दांपत्यगुणाच्या मूळ स्वभावानुसार एकमेकांशीच झगडायला लागले.
जेव्हा सूर्य माथ्यावर तळपायला
लागला तेव्हा दोघांच्या काही गोष्टी लक्षात आल्या- आधी कुणाच्या आल्या हा मुद्दा गौण-
की इतकं सगळं होऊनही आपण जगतो आहोतच.
पुन्हा फार तर त्यानं दुधाचा आणि
तिनं विरजणाचा असे व्यवसाय स्वतंत्रपणे परत सुरू केलेत. तरीही आणि बोक्यानं सतत खाऊनही
थोडं थोडं का होईना लोणी तयार होतच आहे!
त्या लोण्याची जिद्द एवढी? मग
आपली अंत:करणं तर केवढी कणखर आहेत! अभेद्य आहेत! त्या अदृष्य, अतर्क्य, कठोर बोक्याचे
घावसुद्धा आपण हो नाही म्हणता म्हणता पचवले आहेत, पचवतो आहोत! मुख्य म्हणजे लोणी उरतंय..
..हल्ली ती दोघंही तुपाचा, तुपातल्या
मिठायांचा आणि लोण्यापासून बनणारय़ा इतर पदार्थांचा आस्वाद तर घेतातच. शिवाय ते पदार्थ
घेऊन दोघंही रोज सकाळी एकत्र बाहेर पडतात आणि संध्याकाळी- नव्हे रात्री- एकत्रच परतून
सुखासमाधानाने झोपी जातात...
2 comments:
सुंदर...
ह्याला रूपक कथा म्हणता येईल का?
तुमचं स्वागत आल्हाद! अभिप्रायाबद्दल मनापासून आभार! होय! या कथेला रूपककथा म्हणता येईल!
Post a Comment