romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, March 9, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (७)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६
आणि त्यानंतर...
जावडेकरांच्या घरातलं चित्र आता जरा बदललंय. जरा काय चांगलंच बदललंय. दोन्ही आज्ज्या, शांताबाई आणि उर्मिलाताई अंकितला भरवताएत. दोघींच्या हातात दोन ताटं. शांताबाईंचा पवित्रा परंपरागत आणि उर्मिलाताईंचा आधुनिक! पहिला घास कुणी द्यायचा या स्पर्धेत शांताबाई बाजी मारताएत असं दिसतंय.
"अंकू हा घे चिऊचा‍ऽ नंतर काऊचा हं!"
उर्मिलाताई मग मागे सरत नाहीत.
"काऊ चिऊचा राहू दे रे! हा घे चिकनचा! मग फीशचा!"
अंकितला खरंतर स्वत:च्या हाताने जेवायचंय पण दोन्ही आज्ज्या आता फुल फार्मात आल्याएत.
"अंकित! वरण, भात, लिंबू सगळं संपवायचं हं!"
"अंकुडीऽ इट नॉनवेज फर्स्ट!"
"अंकी! शाकाहारी हो! त्यात सत्वं असतं!"
’ऍंक्स! नॉनवेजच खा! त्यात ताकद असते!"
अंकीत वैतागलेला. त्याला बोलायला संधीच मिळत नाहीए. एकदाची तो संधी साधतो.
"आज्ज्यानोऽ माझं पोट म्हणजे कचर्‍याचा डबा नाहियेऽऽ"
पण आज्ज्यांचं चालूच.
"आणि अंकित.. जेवण झालं की भरपूर पाणी पी!"
"नॉनसेन्स! जेवणानंतर एक तास अजिबात पाणी नको! ऍंड डोन्ट गो टू प्ले! लगेच खेळायला जाऊ नकोस!"
"काही नाही रे! बैठे खेळ खेळले तरी चालतात!"
"शतपावली घाल- फेर्‍या मार! फेर्‍या! हॅव अ वॉक!"
"तू अजिबात म्हातारा नाहिएस! फेर्‍या घालशील तर बघ!"
"होमवर्क राहिलंय ना बाकी? वेन आर यू-"
"गोष्टीची पुस्तकं कधी वाचणार रे! चौफेर ज्ञान पाहिजे बघ!"
अंकितचा पारा चढू लागलाय.
"गप्पं बसा आज्ज्यांनो! टीव्ही बघणार मी! टीव्ही!"
"कार्टून बघू नकोस!" शांताबाई त्याच्या हातातला रिमोट खेचून घेतात.
उर्मिलाताई सरसावून शांताबाईंच्या हातातला रिमोट पळवतात.
"अं हं! सिरियल नाही! सिरियल नाही! डिस्कव्हरी बघ! बघ डिस्कव्हरी!"
"अरे ’संस्कार’ बघ! ’संस्कार’ बघ!"
"अरे ही मूवी आहे बघ काऊबॉयची!"
"शी: अरे हा बघ डीडी मेट्रो!"
"हा फॅशन चॅनल इतका काही बॅड नसतो बरं!"
"मालिका बघ! ही बघ लवंगलतिका! हा तिचा-"
अंकित आता भडकलाय.
"ए आज्ज्यांनो! तुम्हीच काय बघताय टीव्हीऽऽ मग मी काय करू?ऽऽ"
"बाळूऽऽ तू नीज हां आताऽऽ"
"नो! नो! आता झोपलास की चारदा उठतोस रात्री!"
"पाणी पिऊन लगेच झोप!"
"च्यक च्यक च्यक! शू करून आलास तरच झोपायला मिळेल!"
"दप्तर भरलं का उद्याचं?"
"उद्याचं टेन्शन उद्या! आज कशाला ते!"
अंकित आता पिसाळलाय. तो जागेवरून उठून हातवारे करत ओरडू लागतो.
"आज्ज्यांनोऽऽ तुम्ही जाताय का आऽत जेवायलाऽऽ नाय गेलात तर फोडून टाकीन हा टीव्हीऽऽ हे कपाटऽऽ हे हेऽऽ-"
दोघी आज्ज्या त्याचा हा अवतार बघून पटकन आत पळतात. अंकित अजून धुमसतोय.
"हैराण करायचं नाही अजिबाऽऽत! च्याऽऽ मारीऽऽ- एक जे सांगते त्याच्या बरोब्बर उलटं दुसरी सांगतेऽऽ"
तोंडात अंगठा खुपसून टिव्ही ऑन करतो आणि मनसोक्त कार्टून बघू लागतो..
तो रंगून गेलाय न गेलाय इतक्यात डोअरबेल वाजते. अंकित दुर्लक्ष करतो. बेल पुन्हा वाजते. अंकित ओरडतो.
"एऽऽ आज्ज्यांनोऽऽ निदान आता दार तरी उघडाऽऽ"
आज्ज्या बाहेर येत नाहीएत हे बघून त्याची तार पुन्हा सटकलीए.
"बसल्या असतील भांडत आत!"
पुन्हा बेल वाजते आणि अंकितला नाईलाजानं उठावं लागतं. तो एखाद्या नाक्यावरच्या दादासारखा उठतो आणि त्याच्यासारखाच चालत येऊन दार उघडतो. दारात महेश आणि अगदी दिवस भरत आलेली त्याची आई, गौरी. महेश आत येतो. तो ज्याम खूष आहे आणि गौरी त्याला आवरायच्या प्रयत्नात. महेश आत येतो, अंकितला बघतो, त्याला उचलून घेऊन वेड्यासारखा नाचू लागतो. गौरीनं कपाळाला हात लावलाय. ती मागे वळून दार बंद करायला जाते तर दारातून कडलेकाकांचं मुंडकं आत डोकावणारं आणि त्यांच्या मागे निमामावशी त्याना बाहेर ओढणारी. प्रचंड रागावलेली..

No comments: