romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, May 23, 2008

कथकनृत्य कार्यशाळा

भव्य अलिशान हॉल.चकचकीत.काचेचे दरवाजे असलेला.वातानुकुलित.आत शिरायच्या आधीच काचेच्या दरवाजातून दिसतो दूर पलिकडच्या भिंतीला लागून खाद्यपेयांचा काउंटर.या हॉलमधे एरवी अतिउच्चमध्यम आणि त्यावरच्या वर्गातले रसिक दिसतात.नटले, थटलेले.लगतच्या प्रेक्षागृहात प्रवेश मिळण्याची वाट बघणारे.सेंट,कलोन,अत्तरं यांचा मिश्र वास एखाद्या कनिष्ठ मध्यम नवख्याला बुजवणारा.नवखा कनिष्ठ मध्यम/कनिष्ठ मध्यमा आपली चुळबुळ लपवण्यासाठी मेन/विमेन असं मोठ्या सोनेरी इंग्रजी अक्षरं असलेल्या दरवाजाकडे(आपापल्या प्रकृतीप्रमाणे) वळतात आणि आणखी बुजतात कारण तिथे पुन्हा भला मोठा हॉल, आरसे इ.इ. त्यात बाहेरच्या प्रेक्षागृहात लवकरच कुणातरी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गायक, वादक, नृत्य कलाकार, कलाकारसमुहाचा क्वचितच होणारा एखादा अपूर्व कार्यक्रम बघायला मिळणार असतो.त्या कुणा “कनिष्ठ”चं केवळ भाग्य उजळल्यामुळेच त्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण, तिकीट मिळालेलं असतं किंवा बराचसा आटापिटा करून त्यानं ते मिळवलेलं असतं…
हे असतं एरवीचं चित्र.दरवर्षी मे महिन्यातल्या या दरम्यानच्या आठवड्यात सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात या वेळात कधीही तुम्ही इथे गेलात तर एक वेगळंच दृष्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं!
बाहेरच्या या हॉलमधे निदान शंभर-एक मुली, अपवादानं मुलगे अक्षरश: बागडताना दिसतात.ती नुसती बागडतच नाहीत तर गटागटाने सराव करताना दिसतात.पायांत बांधलेल्या घुंगरांचा आवाज करत, एकमेकाना सूचना देत, गोंधळ करत.त्यांचे पालक(काहीकाहींचे तर दोघेही पालक)त्यांची काळजी घेत त्यांच्यावर डोळे लाऊन असतात.हे पाच दिवस या मुलांना इथे हटकलं जात नाही. कुणीही आलं गेलं तरी दरवाजावर त्याला तिकीट विचारलं जात नाही, फक्त न्याहाळलं जातं.दुपारी ही मुलं आपापल्या गटांचे गोल करून इथेच, याच हॉलच्या लादीवरच डबे उघडून जेवायला बसतात.यात फक्त लहान मुलंच नसतात तरूणी, प्रौढाही असतात.त्याही सराव करतात, एकमेकाला सराव करायला मदत करतात.
मधेच एखादा गट उठतो.घाईघाईत तयारी करतो, पायात घुंगुरं बरोबर बांधली आहेत ना?, आपलं सलवारकमीझ, त्यावर कंबरेला बांधून खांद्यावर घेऊन पुन्हा कमरेला खोचलेला दुपट्टा बरोबर आहे की नाही? हे बघतो आणि फुलपाखराच्या थव्यासारखा प्रेक्षागृहाच्या दरवाजाकडे पळतो.गटातली इंटुकली पिंटुकली मागेच रहातात. उत्साहाच्या भरात प्रेक्षागृहाचे जाड लाकडी दरवाजे आपल्यामागे लावले गेले आहेत का हे कुणीच बघत नाही.दरवाज्यांचा आवाज होतो तरीही शू:शू:व्यतिरिक्त मोठी प्रतिक्रिया आतून ऐकू येत नाही.धावत आत येणाऱ्या गटाबरोबर गोंगाट आत येतोच, आत जर पंडित बिर्जूमहाराजजींची मुलाखत रेकॉर्ड केली जात असेल तर मोठ्या पण दबक्या आवाजात तशी सूचना करून गोंगाटावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो पण तो पाळला जातोच असं नाही.तरीही कुणाला काही शिक्षा वगैरे होत नाही.
रंगमंचावर आधीच कुठल्या तरी गटाचा सराववर्ग चालू असतो.प्रेक्षागृहातल्या खुर्च्यांमधल्या मार्गिकेत एखाद्या वाहिनीचे प्रतिनिधी कॅमेरा, माईक महाराजजींच्या अवतीभोवती सरसाऊन मिळेल ती माहिती घ्यायला आतूर असतात. पण सराववर्गात खंड पडलेला नसतो. रंगमंचावर बिर्जूमहाराजजींच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन सराववर्गाकडून ठरवलेला सराव ठोकून ठाकून करून घेत असतात.बोलून बोलून त्यांचा आवाज बसलेला असतो.पण त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असतं.मुलाखत संपवून महाराजजी पहिल्या रांगेतल्या खुर्चीत आपल्या नेहमीच्या आसनावर येऊन बसतात.त्यांचं सतत सर्जन चालू असतं.नवीन तोडे, तुकडे, परण यांची आतषबाजी चालू होते.शिकवलेलं पुन्हा पुन्हा आणखी सफाईदार केलं जातं.मधेच महाराजजी रंगमंचाच्या पायऱ्या चढून वर येतात.त्यांचं करून दाखवणं बघायला सगळे डोळे एकवटतात.महाराजजी करून दाखवतात ते अद्‍भूत असतं.ते पटकन कुणाला जमतंच असं नाही.त्यांच्या ज्येष्ठ शिष्या ते आत्मसात करायला धडपडत असतात.जमतं ते बहुदा शाश्वतीदिदिंनाच आणि मग त्या ते वर्गाला शिकवतात.महाराजजी ते आणखी सोपं करून दाखवताना शारिरिक हालचालींची सोप्या पध्दतीने फोड करून दाखवतात.भाव शिकवण्यासाठी समर्पक, मजेदार उदाहरणं देतात.महाराजजींचं सतत चाललेलं सर्जन, त्यांच गाणं त्यांच्या पंच्याहत्तरीतही केवळ अद्‍भूत असतं.संपूर्ण वातावरण भारून टाकणारा उल्हास सतत त्यांच्यातून बरसत असतो आणि त्याचबरोबर आवश्यक शिस्त शाश्वती सेन घालून देत असतात.
या कार्यशाळेत पूर्णपणे नव्यांना प्रवेश नसतो.ऑडिशन देऊन प्रवेश असतो.किमान चार बॅचेसमधे वर्गवारी केली जाते.शिकायला सुरवात केलेले विद्यार्थी ते आपापल्या ठिकाणी आपापले विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षिका या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा असते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपासून ते अहमदाबाद, कलकत्ता, दिल्लीपासून शेदोनशे विद्यार्थी तीर्थक्षेत्री जमावं तसे दरवर्षी इथे जमतात. आणि…
हे सगळं नेहरू सेंटर मुंबई या संस्थेनं या विद्यार्थ्यांसाठी “विनामूल्य” ठेवलेलं असतं.ही आपल्या भारतातली गोष्टं आहे! परदेशातली नव्हे!... यासाठी नेहरू सेंटरचे आभार मानावे तेवढे थोडेच.
असे कार्यक्रम जर अश्या संस्थांनी अश्या पध्दतीने राबवले तर त्याला मिळणारा प्रतिसाद इथे ताबडतोब दिसतो.छोट्या छोट्या मुलींनी केलेले पदन्यास, त्यांची या वयातली तयारी बघून माध्यमांच्या भयकारी आक्रमणातूनही आपली कला कशी जोमदारपणे फोफावते आहे ते इथे आल्यावर पटतं.आजुबाजूला काहीच चांगलं चाललेलं नाही असा विचारही अश्या ठिकाणी आल्यावर संपतो.मस्तकं आदरानं झुकतात.

No comments: