romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, May 14, 2008

“कन्या” ह्या माझ्या लवकरच सादर होणाऱ्या सेन्सॉरसंमत दीर्घांकातला एक अंश

दोन-चार तरूण विचित्र पध्दतीने खिदळत असल्याचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. रंगमंचाच्या जराश्या मागच्या भागावर जांभळ्या प्रकाशझोतात एका जुनाट खोलीत एका कॉटवर कुणी व्यक्ति पांघरूण ओढून झोपली असल्याचं दिसतं आहे.आधीच सुरू झालेले ते विचित्र समुहहास्य भयंकर टोकाला जातं,एक स्त्री आवाजातली भयंकर किंकाळी आणि त्याच क्षणी वास्तव प्रकाश (वेळ सकाळची) येऊन त्याबरोबरच कॉटवरची ती व्यक्ती दचकून उठून बसते,कानावर हात ठेऊन,प्रचंड घाबरलेली… ती एक कॉलेजवयीन युवती आहे. आपण कुठे आहोत हे तिला समजलेलं नाही.पार्श्वभागी आघाती ठोकेवजा संगीत.घाबरून भानावर येत ती इकडे तिकडे बघते.भीती जावी म्हणून कशाचातरी आधार घेण्यासाठी तिचे हात आंधळ्यासारखे बसल्याजागीच कॉटवर इतस्तत: फिरतात.काहीतरी हाताला लागते म्हणून ती ते हातात घेते.ती वस्तू म्हणजे तिचीच ओढणी आहे.प्रचंड भीतीमुळे ती पहिल्याप्रथम ओढणीकडेही पाहिलं न पाहिल्यासारखं करते.मग पुन्हा ओढणीकडे पहाते.तिचे डोळे विस्फारतात.ओढणी हातात घेऊन ओढणीकडे बघत असतानाच तिचा कसलातरी निर्णय पक्का होऊ लागतो.मग पुन्हा ती इकडेतिकडे पाहू लागली आहे.तसं करताना अनवधानाने किंवा अर्धवट अवधानाने ती ओढणी लपवल्यासारखी करते.मग ती कानोसा घेते.घेतलेल्या निर्णयामुळे तिला धीर आलेला दिसतो आहे.हळूहळू तिची नजर खोलीच्या आढ्याकडे वळते.खोलीच्या आढ्याच्या दिशेने, दरवाज्याच्या वर बघत ती हातात ओढणी घेऊनच उठते.स्वत:भोवती फिरल्यासारखी हळूहळू सर्व खोलीभर वरच्या दिशेने बघत पण न बघितल्यासारखेही करत- जणू कुणी बघतंय त्याला चोरून वर बघितल्यासारखे करत- फिरते.खोलीच्या खिडकीकडे तोंड करून पाठमोरी होते.बाहेर बघते,खिडकीच्या वरच्या तावदानांकडे,गजांकडे बघत रहाते.पुन्हा बाहेर पहाते. खिडकीचा पडदा ओढून घेते आणि तिला खोली बाहेर कसलीतरी चाहूल लागते.ती स्तब्ध होते.खोलीच्या दाराच्या दिशेने बघत कानोसा घेते.
प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला असलेल्या विंगेतून एक म्हातारी नऊवारी नेसलेली स्त्री काहीतरी गुणगुणत, अधू झालेल्या नजरेने हातातल्या परातीत असलेले तांदूळ निवडण्याचा प्रयत्न करत प्रवेशते.ती हातातल्या परातीवर उजेड पडावा म्हणून जागा बदलत इथपर्यंत आली आहे.एकदम आठवण झाल्यासारखी मागे वळून डाव्या विंगेत बघत खणखणीत आवाजात साद घालते.
म्हातारी: सुनंदेऽऽ… (डोळ्यांवर हात धरुन आत पहात) एऽऽसुनंदेऽ (चरफडत) ओ देशील तर मरशील!(म्हातारीच्या पहिल्या हाकेसरशीच खोलीतली ती कानोसा घेणारी युवती पाय न वाजवता पटकन्‍ येऊन कॉटवर बसते.मांड्यांवर ओढणीचा बोळा दाबून धरत.कानोसा घेणं चालूच आहे.) जळ्ळ्मेलं!(परातीकडे पहात,तांदूळ निवडायचा प्रयत्न करत) दिसत नाही एकतर! उजेड म्हणून कुठेच… या आश्रमात…(मागे वळून विंगेजवळ येत) ए बाईऽऽअगं परसात कुठे उलथतेस सारखी सारखी,पहिलटकरणीसारखी! बस इथे! बस! त्या कैऱ्या चीर! कैऱ्या चीर लोणच्यासाठी!! कितीवेळा सांगायचं गं तुला!(जास्तच रागावलो आहे हे लक्षात येईन एकदम समजूत घातल्यासारखं करत)असं करू नये पोरी…आसरा मिळालाय तुला-मला इथे- या आश्रमात! अं? हं!(पुन्हा गुणगुणत काहीच न झाल्यासारखी तांदळाकडे लक्ष एकवटते.पुन्हा काहीतरी आठवल्यामुळे वळून विंगेत बघते आणि ओरडतेच) आगं आश्या चिरतात कैऱ्याऽऽ च्यक्‍ च्यक्‍ च्यक्‍(चुकचुकत आत विंगेत धावतेच.खोलीतल्या युवतीचं लक्ष जास्तच एकाग्र झालंय.कानोसा घेत,चाहुल आजमावत ती थोडा वेळ जाऊ देते.मग अधिक आत्मविश्वासाने ओढणीला हलका पीळ देत पक्का निश्चय झाल्यासारखी त्याच खिडकीजवळ जाते.त्याचवेळी प्रेक्षकांच्या उजव्या बाजूच्या विंगेतून,आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून एक चाळीशी उलटलेली रूबाबदार स्त्री घाईघाईत असल्यासारखी प्रवेशते.वाटेत संस्थेचं ऑफिस असल्यासारख्या टेबलावर हातातली बास्केटवजा मोठी पर्स ठेवते. मनगटावरच्या घड्याळात पहाते.उजव्या विंगेजवळ थबकून आत कानोसा घेते.मग त्या मुलीच्या खोलीकडे वळते.दारावर टकटक करते.दरम्यान आतली मुलगी थोडीशी दचकते पण सावध होते आणि ओढणी सावरून खांद्यावरून घेत,खिडकीचा पडदा दूर करून स्तब्ध उभी रहाते.दारावर टकटक करणारी स्त्री जरा वेळाने दार ढकलते.खोलीत प्रवेशते.समोर मुलीला पाहून थांबते.प्रसन्न हसते.)
स्त्री: (प्रसन्न हसत) गूड! व्हेरी गूड! शंभर पैकी शंभर मार्क सांगितलेलं ऐकल्याबद्दल- आतून कडी न लाऊन घेतल्याबद्दल! गूड! आणि आता तुला बरंही वाटायला लागलंय!- सांगितलेलं ऐकून वेळच्यावेळी औषधं घेतल्यामुळे! गूड! (मुलगी स्तब्धंच,बाहेर बघत.स्त्री तिच्याकडे बघत बघत,प्रसन्न हसत तिच्या मागून कॉटजवळ येत)ये!कितीवेळ उभी असशील ये! बस! (मुलगी तशीच) ये अगं! (कॉटवर, आजूबाजूला साफसूफ केल्यासारखे करते. मग मनाशी काहीतरी ठरवून मुलीकडे बघत) सारिका ये! झाल्या प्रकाराबद्दल तू तुझं मन मोकळं करणं खूप आवश्यक आहे आता! गरज आहे ती तुझी! आमची! ये! (मुलगी जागची हालत नाही.स्त्री हळूवार पावलं टाकत मुलीजवळ जाते.तिच्या खांद्याला हळूवार स्पर्श करते)ये! सारिका! चल!(त्याच वेळी उजव्या विंगेतून मगाशी आलेली ती म्हातारी स्त्री पुन्हा त्याच विंगेतून प्रवेश करते.)म्हातारी: (पुटपुटत, परातीत बघून डोळे फाडत) आश्या चिरतात कैऱ्या?(मागे वळून बघत) हिच्या बापानं-जाउदे सोमणबाई! तुम्ही असं काहीतरी बोललेलंच रहातं मागे-शिस्तीचं नाव काढलं-(उजेडासाठी पुढे पुढे येता येता टेबलावरची मोठी पर्स दिसते.) आग्गोबाई!ऽऽ जयाताई आल्या की काय? आतच गेल्या असणार! (लहान मुलीच्या चपळाईने खोलीच्या दाराजवळ जातात.आपण आतल्याना दिसणार नाही असा पवित्रा घेत दाराच्या फटीतून आत कानोसा घेत उभ्या. तोपर्यंत जयाताईंनी सारिकाला कॉटवर आणून बसवलेलं आहे आणि ती काहीतरी बोलण्याची त्या वाट बघत आहेत,प्रसन्नं चेहऱ्याने.) जयाताई: हं बोल सारिका... इथे येऊन तुला आता बरेच दिवस झाले…ही महिला आश्रमशाळा आहे… अनाथ लहान मुली इथे शिकायला असतात… आणि कुठलीही अन्याय झालेली स्त्रीसुध्दा, स्वत:च स्वत:ला मदत करून तिला पाहिजे तितके दिवस इथे राहू शकते. तिचा प्रॉब्लेम, तिच्यावर आलेलं संकट पूर्णपणे कसं निवारता येईल हे मी स्वत: या आश्रमशाळेची संचालिका म्हणून बघते. माझ्या इथल्याच (हसत) तुझ्यासारख्या, आमच्या सोमणबाईंसारख्यांच्या आणि इतर अनेकींच्या मदतीनं… बोल… मोकळी हो… स्वत:ला मदत कर… (इतका वेळ मान खाली घालून बसलेल्या सारिकाने दरम्यानच्या काळात आपली मान वर केली आहे पण कुठल्याही प्रतिसादाविना ती समोर शून्यात बघत बसली आहे.जयाताईंना हे जाणवतं. त्या प्रसन्न हसतात, त्याना अशा प्रकाराची सवय आहे, पण त्यांच्याही चेह्ऱ्यावर आता तिच्या प्रतिसाद न देण्यामुळे काळजी दिसू लागली आहे. त्या एक चाळा म्हणून जवळच्या टेबलावर ठेवलेल्या तिच्या औषधांकडे नजर टाकतात.त्यांच्या काही लक्षात येऊ लागतं. त्या तिच्याकडे पहातात.)तू… डोस घेतलेला नाहीस अजून सकाळ्चा… (अत्यंत काळजीने) असं करू नकोस सारिका… चल! (डोस देण्याची तयारी करत, पुन्हा नव्याने, प्रसन्नपणे) चल डोस घे आणि जेवायची वेळ होईपर्यंत झोप काढ… ती येईलच औषधांमुळे हं!… आता काहीही विचारत नाही मी तुला. घे! (सारिका त्यानी दिलेला डोस, गोळ्या घेते. तोपर्यंत त्या तिची चादर सारखी करतात.तिचं डोस घेणं झाल्यावर त्या तिला झोपण्यासाठी मदत करतात.ती झोपल्यावर आईच्या मायेने त्या तिच्या अंगावरची चादर नीट करतात.तिने डोळे मिटून घेतले आहेत.तिच्याकडे बघत प्रसन्न हसत त्या खोलीच्या दाराजवळ येतात आणि इतक्या वेळ कानोसा घेणाऱ्या सोमणबाई एखाद्या लहान मुलीसारख्या पळत पळत हातातल्या परातीसकट उजव्या विंगेजवळ येतात.तांदूळ निवडण्याचं नाटक चालू करतात.तोपर्यंत जयाताई खोलीबाहेर आल्या आहेत.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

वाट पहात आहोत.