ते म्हणे अनेक वर्षांतून एकदा
फक्त रात्रीच उमलतं
त्याचा वास, त्याचं दिसणं
मन धुंद करणारं, वेडावणारं
ते पहाणारासुध्दा भाग्यवान
ज्याच्या बागेत ते डोलतं
तो तर सुखी सदरेवाल्याचा वडिलभाऊच!...
कोपऱ्यावर माझा मित्र परस्थाला सांगत होता-
याच्या बागेत पण ते डोलतं, मी पाहिलंय!
मला कसं माहित नाही म्हणून
मी स्वत:लाच खूप शिव्या दिल्या
सुंदरता, सुवास, भाग्य, सौख्य
साली वेड लागायचीच पाळी!...
…आणि मग सुरू झाली
अनेक धृपदांची आवर्तनं
सुख, दु:ख, अपेक्षा, अपेक्षाभंग,
भय, शरम…
असा कल्लोळ
नि:श्वास, उच्छ्वास, प्रच्छ्वास
श्वासोच्छवास बंद पडावा इथपर्यंतची पाळी
सामान्य भाषेत सरबरीतपणा…
अश्या मग बऱ्याच रात्री चाळवून
बर्फाचे डोंगर, लिंबांच्या राशी रिचवून
हल्ली थंड होत चाललेल्या डोक्यात
प्रकाश पडत चाललाय-
उमलत्या त्या रात्रींमधे
मी माझ्या अस्तित्वाशी झुंजत होतो
माझ्याच तुरूंगात…
कुंपणाचाच फरक होता
त्यानाच काय मलाही वाटत होतं
ती बाग माझीच म्हणून…
शिवाय माझ्या गल्लीला
कोपराच नव्हता……
1 comment:
सुरेख!
Post a Comment