romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, April 9, 2008

वाटबघ्याचं दिवास्वप्न

आता ती येईल
पायांच्या बोटांवर चालत
चवडे उंच करून घसटत घसटत
जागच्या जागेवर पावलं टाकल्यासारखी
पण वेगानं…
पाचांपैकी एक बोट (एकच: नशीब माझं!)
दातांनी सोलत
फणसाच्या उकडलेल्या आठळ्या सोलाव्यात तसं
नजर पाडसासारखी भेदरलेली
मला बघून पुटपुटेल “ऍग्वू न्कोस्न!”…
आज तशी तिची पंचाईतच
माझ्या डोळ्यावर गॉगल
त्यामुळे पारा किती चढलाय
या बाबतीत गोंधळच गोंधळ
मी काहीच बोलणार नाही
काचांच्या आड मिष्कील डोळे
हा आज ऍडवांटेज टू मी असेल
खरोखर न चिडता
अजिबात न चिडता
चिडण्याचं बेअरिंग घेऊन (इति: नाटयकला)
तिची घालमेल मी एंजॉय करत असेन…
आता ती भांबावणे, हवालदील होणे
जीव खालीवर होणे इ. अवस्थांमधून
परमोच्च बिंदूला पोचत असेल…
सफाईसाठी स्वत:जवळच्या कुठल्या
माध्यमाचा आसरा घ्यावा
ह्या संभ्रमात ती जेव्हा
कोंडी फोडायला जाईल
तेव्हा मी उजवा हात वर करून
नाट्य शिक्षण शिबिरात शिकवतात
ते जेश्चर पहिलं करीन
थांबवण्याचं!...
तिला काहीच कळणार नाही
(मला तरी तेव्हा कुठे काय कळलं होतं!)
बॉम्बहल्ल्याच्या आधी
खबरदारीची सूचना करतात तिला अनुसरून
ती मनातल्या मनात-
कानावर हात घेऊन
आडोशाखाली आंग आकसून
थरथरत असेल
आणि मी म्हणेन
“अगंऽ… फक्त तास-दीड तास तर झालाय मला
इथं उभं राहून
तुझी वाट बघत!”…

No comments: