आयुष्य
असंख्य जीवांचे पुंजके
या फलाटावर त्या फलाटावर
कुणाचा चुकलेला
बदललेला
कोण घाईत कुणी संथ
आपल्या आपल्यातच
प्रवेशासाठी तैय्यार…
जीव सगळी भानं, मर्यादा तोडून बेपर्वा
प्रवेशाचा धुमाकूळ!...
आधीच प्रवेशलेल्या हुशारांची स्थानं बळकट
मग नंतरचे कोण कुठे जमेल तसे
भांडून, उपकारावर, आधाराने
एकमेकांच्या पायावर, पुढे जाण्याच्या घाईत
असोशीने दाखल…
जागत, झोपेत प्रवास…
असंख्य स्थानकं आणि येणारे लोंढे लोंबकळत
त्यांचाही समावेश
त्यांची तर इच्छाही बळकट आणि दोरीही
मग सापशिडीतली शिडी गवसल्याचा वेग
स्थानकांवर न थांबता ती मागे टाकल्याचा आनंद…
नेहेमीच नाही तरीही वेळापत्रकाप्रमाणे
वेळेचं अंदाजपत्रक किंवा अंदाजपंचे वेळापत्रक…
पुन्हा कुणाचं सोडून जाणं, कोणाचं आगमन
कुणा भाग्यवंताला मिळालेलं
त्यानं करून घेतलेलं- स्वत:चं स्थान
स्वत:चं म्हणजे प्रवासाच्या अंतापर्यंतचंच…
कुणाला ते अंतीच गवसलेलं
तोपर्यंत चिकटून बसणाऱ्यांबद्दल चरफड…
संवेदी जीवांचं पाश तयार करणं
सुखदु:ख वाटणं, “वरच्याला” शिव्या घालणं
आपापली स्थानं सांभाळत
हिरीरीने, संतापाने, सौम्यपणे, नाईलाजाने, स्थितप्रद्न्य…
तोपर्यंत प्रवास संपत आल्याच्या खुणा
निर्गमनं
एवढा वेळ ताटकळणाऱ्यांना स्थानलाभ
चरफडीतून मुक्तता…
कुणा अध्यात्मी जीवाची मोडलेली
ब्रह्मानंदी टाळी
कुणाचे सुस्कारे, नि:श्वास
पायऊतार…
नीरवता… सुटलेसुटलेपण…
निर्वात पोकळी आणि
“ पुढे काय?”
रेल्वेच्या डब्यासारखंच
आयुष्यही!
1 comment:
रेल्वे डब्या सारखं आपलं आयुष्य ही ।
खरंय .
इथे मी हिंदी ब्लॉग वरून आले पण माझा मराठीचा ही ब्लॉग आहे झुळुक . त्यात ही आयुष्य नावाची कविता आहे पूर्वी पोस्ट केलेली .
asha-joglekar.blogspot.com
Post a Comment