romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, October 5, 2008

देवीचं दर्शन

रामाचं देऊळ, रामाच्या सोप्यावरचे पुराणिकबुवा आणि श्रोते, समोरचा पार, कार्तिकेयाचं देऊळ, त्यानंतरची देवळांची रांग, घाटी दरवाजा, त्या बाहेरचा परिसर हे सगळं हिंडत, अनुभवत असताना लक्ष असायचं त्या संकुलाच्या मध्यभागी.रामाचं देऊळ ते घाटी दरवाजा हा त्या संकुल परिसराचा अगदी छोटासा भाग.संकुलालाच चार दरवाजे, म्हणजेच कमानी.मध्यभागी असलेल्या अंबाबाईच्या देवळामुळे हे ठिकाण ओळखलं जातं.संकुल वगैरे हा अलिकडचा शब्द.अंबाईला (मधला एक बा सायलंट) जाऊन यितो- हा स्थानिक सार्वजनिक उदगार.दिवस सुरू झाल्यानंतरचा.माझ्या आजोळातलं पहिलं घर महाद्वार रोडच्या वांगाया बॉळात.(स्थानिक बोलण्यात च्या मधला च सायलंट आणि बो चा बॉ झालेला) त्यामुळे महाद्वारातून येताना, गुलछडी, मोगरा, सोनचाफा अश्या फुलांचे वास घेत असतानाच टाचा ऊ-ऊंचाऊन देवीचं थेट दर्शन.भक्तांना साक्षात्कारासारखा अनुभव देणारी देवळाची रचना.संक्रातीला देवीच्या चेहेरय़ावर उन्हाची तिरीप पडते तेव्हा किरणोत्सव.अशी देवळाची रचना प्राचीन काळी कशी साधली असेल?... महाद्वारातून दर्शन झाल्यावर लगेच आत जायची ओढ.मुलांना गरूड मंडपात जायची ओढ.गरूड मंडपात पळापळीसारखे खेळ.याच गरूड मंडपात निजामपुरकरबुवा(थोरले, धाकले), वठारकरबुवा यांचे किर्तन सप्ताह.मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी गेल्यावर नुसता घरी काय बसून रहातोस म्हणून आजीनं या सप्ताहांना लहानपणी ढकलून पाठवलेलं.हे सगळं आठवलं ’शब्दछटा’ हा आपल्याच लिखाणावरचा एकपात्री कार्यक्रम करण्याची योजना आखल्याचं धाडस केलं आणि लोकसत्तामधे त्याबद्दल राईटअप आला त्या दिवशी मी नेमका देवळात आणि मित्राचा फोन… पुराण, प्रवचनं ऐकणं, किर्तन ऐकणं हे सगळं नंतर आयुष्यात आलेल्या नाटक, साहित्य या गोष्टींची पार्श्वभूमी होती.माझ्या आजोळी, आजीच्या रेट्यामुळे ती माझ्यापर्यंत पोहोचली.गरूड मंडपात गाण्याच्या मैफिलीसुध्दा.कोल्हापूर हे कलापूर.नामवंत गायक गरूड मंडपात, देवीच्या समोर, गणपतीच्या पुढ्यात, संगमरवरी कासव आहे त्या देवळात यायच्या पायरय़ांसमोर, आपली उपासना करतात.उपासना.कार्यक्रम नव्हे… पायरय़ा चढल्यावर आधी गणपतीचं दर्शन आणि त्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना, बरोबर गणपतीच्या मागच्या कमानीच्या टोकावर डोकं ठेऊन पुन्हा अंबाबाईचं दर्शन.पुढे येऊन मग “त्या” कासवाला हात लाऊन नमस्कार.(आतापर्यंत हा असा नमस्कार का करायचा हे वडिलधारय़ांनी सांगितलेलं विसरायला झालंय.)हे सगळं करत असताना देवीवरची नजर हटत नाही हा एक चमत्कार.पुन्हा देवळाच्या रचनेतला?... पुढे सरकताना “चला चला” या खाकी कपड्यातल्या पहारेकरी वजा माणसाच्या घश्यात मुसळ घातल्यासारख्या आवाजाबरोबर गाभारय़ाआधीचा अंधार सुरू झालेला.काळ्या शार दगडातले नक्षीदार गार गार स्पर्श असणारे खांब.अखंड रचनाच कशी केली असेल असा अचंबा सतत - या खांबांना जोडणारी आडवी रचना, मुलांना सहज चालता, पळता येईल अशी.वाढता अंधार आणि गाभारा जवळ येतोय.देवीकडेच जायचं.पण मधेच डाव्या, उजव्या बाजूच्या सरस्वती, महाकाली या दोघींचं दर्शन अनिवार्य.त्यापैकी एकिकडे जाताना मधे श्रीचक्र, जमिनीवरच्या काळ्या दगडात कोरलेला यंत्राचा चौकोन.त्यावर सततचा अभिषेक.यंत्राच्या नक्षीत जमून राहिलेलं पाणी, दूध, फुलं, तांदूळ.त्यातलं उजव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला लागून जे येईल ते नाकाच्या वर आणि दोन्ही डोळ्यांच्या मधे असलेल्या खड्ड्याला लावायचं.सरस्वती, महाकाली यांच्या काळ्याशार, रोखून बघतील असे डोळे असणारय़ा मूर्ती.त्यांचं दर्शन झाल्यावर अंधारात पुन्हा अंबाबाईच्या गाभारय़ाजवळ,तिथे जय आणि विजय हे -राक्षस (इति: वडीलधारे) भीती दाखवणारे.त्यांचा एक एक हात समोर पसरल्यासारखा. प्रवेश करताना आडवा, जाडजूड, लांबलचक, खाली न बघता ओलांडताच न देणारा सोनियाचा उंबरा!तिथून जोरदार घंटानाद करून आत आल्यावर देवी आणि फक्त देवी!तिचं मनसोक्त दर्शन.पुन्हा चला चला चा मुसळ घातलेला जोरदार गजर, फुर्रर्रर्र शिट्या.अंबाबाईचा त्यावेळी चांगलाच भीतीदायक वाटणारा, न संपणारा प्रदक्षिणामार्ग.तो सुरू होतानाच येणारा अंगारय़ाचा भाजका, लगेच तोंडात टाकावा असा वाटणारा वास सर्वत्रं.वाटेत भींतींवर लिहिलेलं महालक्ष्मीस्तोत्रं.कुंकवानं भरलेल्या भक्तांच्या डोकं टेकवण्याच्या जागा.प्रदक्षणा कधी पूर्ण झाली कळलंच नाही!तीर्थाची धार उजव्या हाताच्या ओंजळीत.हाताची ओली चिमूट दगडी अंगारापात्रात.मग तीच अनुक्रमे कपाळावर आणि तोंडात.देवीचं दर्शन पूर्ण.परतीची पावलं जड… प्रचंड देवभोळेपणा संस्कारक्षम वयातच बिंबवणारी आपली संस्कृती?... हे माझ्या आयुष्यातल्या श्रींमंत अनुभवांचं एक संचित! माझं आजोळ माझ्या आठवणीत येताना फक्त स्मरणरंजन करत नाही, माझ्या मुळांकडे नेऊन मला विचार करायला लावतं… नवरात्रं सुरू झालं आहे, मला आंबाबाईच्या देवळाचे वेध लागले आहेत…

No comments: