आशियाई चित्रपट महोत्सवाबद्दल या आधी लिहिलं ते द सिरियन ब्राईड आणि मुतलुलुक- ब्लिस या चित्रपटांबद्दल.मुंबईत दरवर्षी थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव होत असतो.या वर्षी तो २२ डिसेंबर २०११ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत साजरा होणार आहे.२००५ सालापासून या महोत्सवात बरेच चांगले चित्रपट बघायला मिळाले.यातल्या पटकन आठवणार्या आणखी दोन चित्रपटांबद्दल केव्हापासून लिहायचं होतं.राहून गेलं.यातला एक चित्रपट ’डेस्पेरेडो स्क्वेअर’ हा इस्त्रायली चित्रपट! एक भारतीय चित्रपटांचा प्रेक्षक असलेल्या मला हा अतिसुखद धक्का होता.मी हा चित्रपट मस्त एंजॉय केला.
१९६४ साली आलेला राजकपूरचा संगम बहुतेकांनी पाहिला असेलच.तो कुणाला खूप आवडला.कुणाला आवडला नाही.चित्रपटातली गाणी हा राजकपूरच्या चित्रपटांचा मुख्य गुणविशेष! ती गाणीही बहुतेकांना आठवत असतीलच.चित्रपट आवडो न आवडो यातल्या गाण्यांवर अनेकांनी समरसून प्रेम केलंय हे नाकारता येत नाही.
१९६४ साली आलेला संगम हा १९४९ साली आलेल्या मेहेबूब खान या चित्रसम्राटाच्या अंदाज या चित्रपटाचा रिमेक होता.या चित्रपटातली गाणीही अविस्मरणीय होती.राजकपूर, दिलिपकुमार, नर्गीस हे मेहेबूब खान यांना गुरूस्थानी मानत.मेहेबूब खानचा १९५७ साली आलेला मदर इंडिया कोण विसरू शकेल? तो त्यानेच १९४० साली बनवलेल्या औरत या चित्रपटाचा रिमेक होता! आता या रिमेकच्या खेळातून जरा बाहेर पडूया!
’संगम’ किंवा तो ज्यावरून घेतला तो ’अंदाज’ या चित्रपटांची मूळ गोष्टं कुणाची होती माहित आहे?
’तीन मुले’ ही ती मूळ गोष्टं होती, पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपल्या परमपूज्य साने गुरूजींची!
असो!
’डेस्पेरेडो स्क्वेअर’ ह्या इस्त्रायली चित्रपटाचा विषय असा.
इस्त्रायलमधलं एक जमान्यापासून बंद पडलेलं एक सिनेमागृह.त्या सिनेमागृहाचा मालक मरण पावलाय.त्याला दोन तरूण मुलं.त्यातल्या धाकट्याच्या स्वप्नात बाबा येतात आणि कायमचं बंद पडलेल्या त्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करा! असा आग्रह धरतात.त्या मुलांचा काका त्यांच्यापासून लांब गेलाय तो ते सिनेमागृह बंद पडल्यापासूनच.त्याच्याही स्वप्नात त्याचा वडीलभाऊ येऊन बंद पडलेल्या सिनेमागृहाचे पुनरूज्जीवन करण्याची गळ घालतो.
मुलं ते कायमचं बंद पडलेलं सिनेमागृह चालू करण्याचा विडा उचलतात.पण पहिला चित्रपट कुठला लावायचा? ते काकाला विचारतात.काका म्हणतो आपण हा प्रश्नं ’इस्त्रायल’ ला विचारू.’इस्त्रायल’ ही नमुनेदार व्यक्ती आहे या कुटुंबाचा जीवलग.तो अफलातून हेअरडू करतो.स्वत:ला राजकपूर समजतो.सतत आपल्या दुचाकीवर राजकपूरच्या सिनेमातली गाणी वाजवतो! तो म्हणतो बंद पडलेल्या चित्रपटगृहाची सुरवात करायची तर ती ’संगम’ याच चित्रपटाने.
इस्त्रायल आणि अरॉन-मुलांचा काका या दोघांनाही मदर इंडिया, संगम या चित्रपटांची स्टार कास्ट, गाणी यांचं अक्षरश: वेड लागलेलं आहे. इस्त्रायल गोपाल, राधा, सुंदर यांची ( तीन मुलांची?) गोष्टं अर्थात पिच्चरची थीम सांगतो. त्या मुलांसमोर ’दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं गाऊन दाखवतो! काका-अरॉनही त्याला साथ देतो.धाकटा मुलगा मोठ्या भावाला म्हणतो. अरे! हेच संगीत मी माझ्या ’त्या’ स्वप्नात ऐकलं होतं! आता बोला!!
पुढे काय होतं? ते पहाण्यासारखं आहे! चित्रपटाचं कथानक त्या बंद पडलेल्या चित्रपटगृहाच्या पुनरूज्जीवनाबरोबर पुढे सरकू लागतं आणि एक वेगळंच इमोशनल नाट्य उभं रहातं.त्यात गुंतागुंत होते.ती गुंतागुंत संपते की नाही? चित्रपटगृह पुन्हा चालू होतं की नाही? हे बघत आपला जीव वरखाली होत रहातो!...
यूट्यूब वरचा या चित्रपटातल्या महत्वाचा सीन तुम्हा सगळ्यांशी इथे शेअर करतोय! तो बघितल्यावर तो डालो करायचा की नाही? याचा निर्णय तुम्हालाच घेता येईल! काय? :-)
डाऊनलोड केलात तर मला दुवा- लिंक हो!- द्यायला विसरू नका! तुम्ही माझ्यापेक्षा सहजतेने अशी लिंक शोधू शकता, मला माहिती आहे!
मागच्या पिढीतल्या लोकांजवळ लहानपणी गणेशोत्सवात आपण रस्त्त्यावरच्या पडद्यावर चित्रपट बघत होतो याच्या मनोरंजक आठवणी असतील.काळाचा महिमा अगाध आहे.आज आपण डालो करून हवे ते सिनेमे सहज बघू शकतो! नाही?
आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
2 comments:
चित्रपटाचं कथानक मस्त वाटतंय... मला पाहायला मिळाला तर मी नक्की पाहीन... संगम किंवा अंदाजचे मूळ स्त्रोत मला माहीत नव्हतं. आभार विनायक!
धन्यवाद श्रीराज! :)
Post a Comment