romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, August 19, 2011

राज्य (९)

भाग ८ इथे वाचा!
धडधाकट, कळकट काळा, मध्यमवयीन माणूस आत येतो.ढगळ पॅंट, बाहेर काढलेला भलत्याच रंगाचा स्वस्तातला पारदर्शक शर्ट, बारीक केस, लांब शेंडी, तोंडात पान, हातात चेन लाऊन बंद केलेली फाईल.
“आओ!”
आई आणि राजू त्या नवागताकडे बघत राहिलेत.
गुंडू कॉटकडे निर्देश करून त्याला बसायला सांगतो.स्वत: त्याच्या बाजूला कॉटवर बसतो.आई आणि राजूनं आ वासलाय.गुंडू नवागताच्या मांडीवर थाप मारून हसतोय.
“आप बैठो.. आरामसे.. ह ह ह.. आईऽ दूध गरम कर आणि आण!”
आई तशीच उभी.
“हेऽ एजंट आहेत माझ्या ऑफिसचे!”
आई आत निघून जाते.
“राजूऽ”
राजू आज्ञाधारकपणे उठून जवळ येतो.
“ये छोटा भाई! अच्छा छोकरा है! पढता है!”
राजू एजंटला वाकून नमस्कार करतो.
“ऑरे! ऑरे!”
तोंडातल्या पानाच्या तोबरय़ामुळे एजंटला बोलता येत नाही.खिडकीबाहेर थुंकू का? म्हणून खुणेने गुंडूला विचारतो.उठून पिचकारी टाकतो.मग राजूला हातानेच आशिर्वाद देतो.पान चघळणं चालूच.गार्गी नटून थटून बाहेर आलीय.
“येऽ छोटी बहन!”
तिला बघताच बसलेला एजंट टाणकन् उभा रहातो.गार्गी पटकन् नजर काढून घेते.एजंट हसत, मान डोलावत परत बसतो, तिच्याकडे बघतच.
“गार्गी, हे एजंट आहेत माझ्या ऑफिसचे!”
गार्गीनं खोटखोटं हसायला सुरवात केलीय.
“ह ह गुंडूभाऊ घाईत आहे रे जरा! लग्नाला जातेय मैत्रिणीच्या-”
एजंट तिच्याकडे सारखा वाकून बघतोय त्याच्याकडे लक्षं जातं आणि तिचं तोंड वाकडं होतं.
“ऍंऽऽ.. येऊ मग भाऊ?”
“ये! ये! स्टेशनवर घ्यायला येऊ? उशीर होईल?”
“नाही रे! ठीकय! येईन मी! रहदारी असते! येते!”
गार्गी निघून जातेय.तिच्याकडेच बघत असलेल्या एजंटचा जास्त वाकावं लागल्यामुळे तोल जातो.गुंडू त्याला सावरतो.आई दुधाचा पेला घेऊन येते.एजंट हाताने ’थांबा’ म्हणून सांगतो.खिडकीतून पान पूर्णपणे थुंकतो.हसत पेला स्विकारतो.पितो.आई रिकामा पेला घेऊन तंद्रीत स्वैपाकघरात निघून गेलीय.
“राजूऽऽ बाळाऽ जरा उठशील तिथून?”
“भाऊ मी.. माझी पुस्तकं..
“सगळं उचल आणि जरा बाहेर पॅसेजमधे जाऊन बस!”
“बाहेर? भाऊ.. सगळी घाण आहे रे तिथे कॉमन पॅसेजमधे! आत्ता सगळे पाणी भरत असतील! सगळ्यांची येजा-”
“राजूऽ माझं ऐक! याना इथे झोपायचंय! आपले पाहुणे आहेत ते, जरा सतरंजी अंथर आणि तूऽ”
राजू गपचूप उठतो.पुस्तकं आवरतो.सतरंजी अंथरतो.पुस्तकं ओझ्याच्या पाटीसारखी डोक्यावर घेऊन हळू हळू, मागे पहात चालू पडतो.
“आप सो जाओ बिनधास्त!”
एजंट पडत्या फळाची आज्ञा मानून आहे तसाच जाऊन पसरतो आणि आई बाहेर येते.
“अरे गुंडू जेवायचं- अग्गंबाईऽऽ ह्याना काय चक्कर बिक्कर आली का काय?”
“आम्ही जेऊन आलोय आई-”
“जेऊनच नं?”
“होऽऽ.. ते झोपलेत!”
“राजू कुठे गेला रे इतक्यात? म्येला नेमका गिळायच्या वेळेला-”
“आहे! बाहेर बसवलाय त्याला-”
“बाहेर? पॅसेजमधे? अरेऽ–”
“जरा आवाज हळू! झोपलेत ते, त्याना झोपू दे!”
“अरे पण राजूला जेवाय-”
“आम्ही जेऊन आलोय, झोपू दे त्याना स्वस्थं!”
आई गुंडूकडे बघत रहाते.मग झोपलेल्या एजंटकडे पहाते.बाहेरच्या दाराकडे पहात पुढे जाण्याच्या विचारात आहे.
“आई तू जेऊन घे जा!”
आईची चलबिचल.ती बाहेरच्या दरवाज्याकडे नुसतीच पहात पाय ओढत स्वैपाकघराकडे निघून जाते.एव्हाना एजंटच्या घोरण्याचा आवाज आसमंतात घुमू लागलाय..
Post a Comment