romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, August 13, 2011

राज्य (८)

भाग ७ इथे वाचा!
दिवेलागण झालीय.बाप तीच खुर्ची घेऊन खिडकीखालच्या टेबलाशी काही खरडत बसलाय.राजू त्याच्या नेहेमीच्या जागी, जमिनीवर, पुस्तकात डोकं खुपसून बसलेला.नजर पुस्तकात आणि लक्ष बापावर.
“मग? काय देण्याघेण्याचे हिशेब चाललेत?”
“अं?”
“देणं घेणं लिहिताय?”
“घेणं कसलं बाबा राजू! सगळं देणंच!”
“कंपनीवाले.. आले कसे नाहीत अजून घरी!”
बाप रागाने राजूकडे बघतो.मग उजव्या हाताची तर्जनी डाव्या हाताच्या तर्जनीवर घासतो.
“तुम्ही माझी करताय तेवढी पुरेशी नाही, आता तेही येतील!”
“करावे तसे भरावे पण किर्तीरूपी उरावे!”
“आता मरावेच!”
राजू हसतो.
“तुम्ही हसावे- तुम्ही सुद्धा हसावे!”
“हॅऽऽ हसावे की रडावे तेच कळत नाहिए!”
“होऽ गुंडूभाऊ मोठे स्पॉन्सरर झालेत आता!”
“तुमच्या एरोड्रमचा विमा.. त्यानीच उतरवलाय!”
“तुला काय काय आश्वासनं दिलीएत?”
“पुस्तकं वाचणं चालू रहातयं ते काय कमी! शिवाय पाटी आणि हातगाडी यातला संभ्रम मिटला!.. तुमच्या हातात काय देतात ते बघा! कटोरा तर तुम्ही स्वत:हूनच-”
“तुझी पत वधारली! मोठा माणूस झालास राजू-”
“हो!ऽ आणि त्याबद्दल तुमच्या दु:खात मी सहभागी आहे! मला आता जरा माझं काम करू द्या! तुमची लिस्ट तयार झाली असली तर नेहेमीचं काम करा- आडवं पडण्याचं! ते तुम्हाला बरं जमतं!- पण आता खुर्चीतल्या खुर्चीत ते कसं करायचं ते-"
“ते बघतो मी! तू तुझी ढापणं सांभाळ!”
बाप लिहित रहातो आणि राजू वाचत.गार्गी ऑफिसमधून परतली आहे.येतायेताच समोर बापाला बघते.
“ओऽ ओऽ काय खरडत काय बसलाय? चला! चला! माझी साडी घेऊन या! घाईत आहे मी! चला! उठाऽ”
“आणतो.. आणतो..”
“फटाफट! आधीच आणून ठेवायची! मला वाटलंच तुम्ही-”
केसांच्या पीन्स सोडून हेअर स्टाईल करायला लागते.बाप चोरासारखा बाहेर जायच्या तयारीत.थबकून गार्गीकडे बघू लागतो.
“गार्गी.. पैसे?”
“पुन्हा विचारायचे नाहीत! तुमच्याकडे असतात! नसतील तर इस्त्रीवाल्याला खात्यावर मांडायला सांगा!”
बाप जातो.गार्गीचं पुटपुटणं चालू.
“..एक काम व्यवस्थित करेल माणूस तर- मग? काय राजू?”
राजू हसतोय.
“ये ताई! कशी आहेस? पुन्हा जायचंय का कुठे?”
“हो! कळी खुललीए तुझी कधी नाही ते!”
“वाईट वाटतंय?”
“छे रे बाबा! मला कसलं वाईट वाटणार!”
“नाही!.. जो तो माझ्या खूष होण्यावर टपलाय!”
“अरे तू सगळ्यांचा लाडका!”
“हो! हो! हो!”
“तुझी सगळ्याना काळजी!”
“ही! ही! ही!”
“तुझ्यावर सगळ्यांचं सगळं अवलंबून!”
“हु! हु! हु!”
“तू सगळ्याना महत्वाचा!”
“हं! हहा! झाली बाराखडी पूर्ण! आता बास! काम काय बोल!”
गार्गी केस विंचरत विचारात पडलीए.
“काही नाही रे!.. ह्याचं.. काय करायचं.. कळत नाही!”
“कापून टाक!”
“अं?”
“केस गं! मॅनेज करता येत नसतील तर कापून टाक!”
गार्गी डोक्यात प्रकाश पडल्यासारखी.
“हं!.. हो रे!ऽ हे माझ्या लक्षात आलंच नाही!”
“मलाच सांग ते! मला पटेल!”
“नाही रे! तूच आपल्या घरात विचारी!”
“बिच्चारा म्हणायचात इतके दिवस!”
“झालंय काय.. एकानं सांगितलंय नोकरी कर म्हणजे.. तो सुटेल.. दुसरा म्हणतो नोकरी सोड-”
“म्हणजे? म्हणजे काय होईल?”
“तेच कळत नाहिए रे!”
“तुला कळत नाहीए म्हणजे खरंच कठीण आहे! सरशी तिथे पारशी या नियमाने जाऊनसुद्धा?”
“माझा प्रत्यक्ष फायदा कशात?”
“चांगल कोडं आहे! एखाद्या वाहिनीवर अनाऊंस करूया! बक्षिसं द्यायला हजार स्पॉन्सरर्स होतील तयार!”
“अरे गद्ध्या! तुला विचारतेय तर तू-”
“ताई! माझा फायदा कशात हेच मला अजून ठरवता येत नाहिए! हे पुस्तक म्हणजे सवय नुसती!”
गार्गीची बाकीची तयारी संपत आलीए.ती बाप आणायला गेलेल्या इस्त्रीच्या साडीची वाट बघतेय.
“एक काम वेळेवर करेल हा माणूस तर शपथ!”
“तू मात्रं लावलंस कामाला हं! माझं ओझं हलकं झालं आता!”
“तुझं काय बाबा! गुंडूभाऊला नोकरी लागली, तुझं सोनं झालं!”
बाप येतो.गार्गीचं लक्ष आता त्याच्यावर.
“आलात? लवकर आलात! द्या!”
बाप तिची इस्त्री केलेली साडी तिच्या सुपुर्द करतो.
“मुलाखत असेल ताई मोठी! चहात्यांची रीघ लागते बघायला! ऐकायला! जिथे जातील तिथे! येन केन प्रकारेण-”
“चान्स घे! चान्स घे तू प्रत्येक वेळी!”
गार्गी हसत आत निघून जाते.राजूचं चालूच.
“इतके दिवस दिला नाहीत त्याला मी काय करू?”
“मीच मिळालोय सगळ्याना!.. हीऽऽ आत्ता आत गेली- ही भवानी बघ! नुसती साखर पेरायची! आणि आता-”
“तुमचं लाडकं पिल्लू ते!”
“तंगडी वर करतंय आमच्याच अंगावर!”
“तुमचं कर्म!”
“कर्म नाही बाबा! वेळ! वेळ कठीण हेच-”
आई बाहेरून आलीए तिला बघून थांबतो.मग तिच्यावर घसरतो.
“या! या! तुम्ही कुठे होतात इतका वेळ?”
“कुठे म्हणजे? आजचा दिवस काय? गुंडू कमवता झाला, नवस फेडून आले! मारूतीच्या देवळात हीऽऽ गर्दीऽऽ”
“सगळे! गुंडूसाठी? नवस फेडायला?”
“नाही! तुमच्या मुलाखती घ्यायला! तुमचा पराक्रम मोठाऽऽ नाही आनंदा तोटाऽऽ हे घ्याऽ प्रसाद घ्या! तोंड गोड करा!... हॅ हॅ हॅ हे काय होऽ कुठे निघालात?”
“जातो मुलाखती द्यायला! इथे बिन पाण्यानी होण्यापेक्षा ते बरं!”
“हा हा हा.. गिळायला यालंच! ते दुसरीकडे नाही मिळणार! घे रे राजू प्रसाद!.. गार्गी आली?”
“परत जाणार आहे ती!”
“अरे पण केव्हा? कुठे पसंतच पडत नाही! आता जमलं असतं तर बापाने शेण खाल्लं!”
“काळजी करू नकोस तिची! ती-”
“हा हा.. हो रे बाबा! आता काही कठीण नाही! माझा गुंडू आता सगळं व्यवस्थित करेल!”
गुंडू येऊन दारात उभाच राहिलाय.
“अरे! आलास बाबा गुंडू! अगदी शंभर वर्षं आयुष्य आहे रे बाबाऽऽ”
“एवढं?”
हसतो.बाहेर बघतोय.
“आओ! आओ!”
धडधाकट, कळकट काळा, मध्यमवयीन माणूस आत येतो.ढगळ पॅंट, बाहेर काढलेला भलत्याच रंगाचा स्वस्तातला पारदर्शक शर्ट, बारीक केस, लांब शेंडी, तोंडात पान, हातात चेन लाऊन बंद केलेली फाईल.
“आओ!”
आई आणि राजू त्या नवागताकडे बघत राहिले आहेत..
Post a Comment