romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, August 9, 2011

राज्य (७)

भाग ६ इथे वाचा!
नवी सकाळ झालीय.बाहेरच्या खोलीत गुंडू अजून जमिनीवर आडवातिडवा पसरलेलाच.खोलीच्या मधोमध उभा बाप.पाठमोरा.समोरच्या भिंतीवर लावलेल्या तसबिरीला हात जोडत पुटपुटतोय.
“वासांसि.. वासांसि जीर्णानी यथा विहाय.. जसे आपण आपले कपडे जुने झाल्यावर टाकून देतो आणि नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे- वासांसि-”
“गुरूदेऽऽवऽऽ” असं ओरडून बाप त्याच्या दिशेने पटकन् वळायच्या आत गुंडूनं कूस बदललीए.
बाप यड्याबागड्यासारखा इकडे तिकडे बघतो.पुन्हा तसबिरीकडे वळतो.
“आपण- आपण जसे कपडे- नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा हे शरीर नाश पावल्यावर.. हे शरीर.. टाकून नवीन शरीर धारण करतो.वासांसि जीर्णानी यथा विहाय.. वासांसि जीर्णानी.. वासांसि-”
गुंडू बरोब्बर बापाच्या मागे उभा.
“ओऽ वासांशीऽ” गुंडू नुसता ओरडतच नाही तर “फिऽऽश” असा शिट्टीवजा आवाज काढून बापाला वाटेतून बाजूला व्हायला सांगतो.बाप ताबडतोब आज्ञा पाळून बाजूला होतो.गुंडू त्याच्याकडे बघत बघत राजासारखा चालत स्वैपाकघराकडे रवाना होतो.त्याचवेळी आई घराबाहेरून आत येते.तिच्या हातात पेढे.
“घ्या! घ्या! पेढे!.. माझा गुंडू कुठे गेला?”
बाप हातात पेढे घेऊन पेढ्यांकडे बघतोय.
“पेढे? म्हणजे गुंडूनं दारू सोडली?”
“अहोऽ आहात कुठे? गुंडूने नोकरी मिळवलीए स्वत:च्या बळावर!”
“कुठे?”
“इथेच.. कुठे तेऽऽ.. कुठे होऽते जळ्ळं मेलंऽऑफिसऽऽ”
“दूध घालतात तसं.. आता दारूही घालायला लागलं वाटतं गुंडू!”
“तुम्ही नाऽऽ कुसकेपणा करा सतत! जळाऽ पोरगं येवढं स्वत:च्या पायावर उभं राह्यलंय-”
“पाय रहातात का जमिनीवर स्थिर?”
“तुम्ही काय दिवे उजळले? हात दाखवून अवलक्षण मेलं! आता काही बोलले की शू: शू: करत नाचाल घरभर! त्या कंपनीवाल्यांनी चोपलं नाही जिवानीशी नशीब समजा! का चोपलं?”
“चो-चो-चोपताएत! ते काय- काय नाक्यावर उभं राहून वासुगिरी नाही केली!”
इतक्यात आतून गुंडू आलाय.फ्रेश होऊन.तो ऐकतोय.
“मग काय केलंत? सांगू का सगळ्यांना बोंबलून?”
“गुंडू बाळाऽ आऽ कर! पेढा घे बाबा पेढा!.. राजूच्या जन्मानंतर पेढा काही आला नव्हता या घरात!”
गुंडूनं पेढ्याचा बोकाणा भरलाय.
“शॅणॉचॅ गॉळे ऑलॅ ऍसतॅ घॅरॉवॅर! नॅशॉब सॅमॅज!.. वेळीच पोरं पाठवली कंपनीत म्हणून नाहीतर.. एरोड्रम खणून काढला असता कंपनीने!” असं म्हणताना मुद्दाम स्वत:च्या डोक्यावरून हात फिरवतो.बाप चवताळतो.
“तुम्ही शेण घालताय तेवढं पुरेय! आता नाक्यावर उभं राहून बोंबला!”
गुंडू खिल्ली उडवल्यासारखा हसू लागतो.
“हॅऽऽ हॅऽऽ हॅऽऽ तुम्हाला काय वाटलं कळलं नाहिए कुणाला? तुम्ही गंजीफ्रॉकने खिडकीला टांगून घेतलंत इथपर्यंत-”
आईला आता गुंडूला थांबवावं लागलंय.
“गुंडू! बाबा! जरा बरं बोलत जा बाबा आता!! जबाबदार माणूस झालास तू! चल्! डबा करून देते तुला! आज पहिला दिवस तुझ्या नोकरीचा!”
आई स्वैपाकघरात जाते.बापाला जरा उसंत मिळालेय.तो कॉटवर बसतो.
“बरंच- बरंच बोलायला लागलास गुंड्या!.. हसतोस काय गध्ध्या! तुझ्या चड्डीच्या गुंड्या मी लावत होतो तेव्हा तुला बोलताही येत नव्हतं!”
“हं! हं!”
“मी तुला चालायला शिकवलं! सायकल शिकवली! पहिली सिगरेट ओढून आलास तेव्हा आख्खं पाकीट आणून दिलं!-”
आता गुंडूच बापाची री ओढायला लागतो.
“पहिल्यांदा दारूची चव घेऊन आलो तेव्हा आख्खा खंबा आणून मला घेऊन बसलात! सगळं लक्षात आहे माझ्या! हसताय काय?.. नापास होत गेलो तरी कधी ओरडला नाहीत! मारलं नाहीत! फार उपकार केलेत!”
“आणि तू ते असे फेडतोएस!”
“तुम्ही आमचं काय फेडायचं बाकी ठेवलंत?”
“आणि इतके दिवस तुमचं जे केलं ते-”
“आख्खी गीता नाय् सांगायची बापू आता! आपण केलेलं पापच आपल्या डोक्यावर बसतं! आणि.. आम्हाला ते आमच्या डोक्यावर घ्यायचं नाहिए!”
“सगळ्यांचा तारणहारच तूऽ”
“बघाल!”
“बघू! बघू!”
“उद्यापासून त्या दाराजवळच्या खुर्चीत बसायचं!”
“तुझा हुकूम!” बाप तोंड मुरडतो.
“तोंड चालवायचं नाही! जमिनीला नाक लागलंय तरी टांग ऊप्पर करायची नाही! उठाऽऽ”
बाप, त्याने हक्काच्या मानलेल्या कॉटवरून उठायला तयार नाही.
“ओऽ वासांशीऽऽ फीऽऽश!”
गुंडूनं शिट्टीसारखा आवाज करून दाराजवळच्या खुर्चीकडे निर्देश केलाय.बाप गुपचूप कॉटवरून उठतो, खुर्चीत जाऊन बसतो.गुंडू कॉटजवळ जाऊन कॉटवर हात झाडून कॉट झटकून घेतो.बसतो.
“हांऽ अंगाऽऽशीऽ”
बाप बेरकी तिरक्या नजरेने ते सगळं बघतोय.
“नोकरी.. कुठे मिळाली रे?”
“अं?” गुंडू त्याच्या त्या पूर्ण रूबाबात मान वाकडी करतो.
“कुठे लागली नोकरी?”
“वि.पु.म. मधे!” गुंडू कॉटवर ठाकठीक, ऐसपैस बसतो.
“कुठे?ऽऽ”
“आयला रेऽ.. विऽऽत्त पुरवठा महासंघाऽऽतऽऽ”
“वाट लागली!”
“काय?”
“नाहीऽ ब्-अ- कशी काय लागली?”
“गप् बसा होऽ.. मी तुम्हाला कधी काही विचारलं होतं?.. पडू दे मला निवांत!”
गुंडू कॉटवरच आडवा होतो.लगेच घोरायला लागतो..

No comments: