भाग ५ इथे वाचा!
रात्र बरीच झालीए.रातकिड्यांची किरकिर चालू आहे.मधेच कुठल्यातरी वाहिनीवरच्या सिनेमातलं घणाघाती संगीत ऐकू येतंय.घराच्या या बाहेरच्या खोलीत अंधार.निजानीज झालीए.बाप कॉटवर डाराडूर.जमिनीवरच्या अंथरूणावर गार्गी झोपलेली.एका कोपरय़ातल्या पुस्तकांच्या गराड्यात राजू अंगाची वळकटी करून झोपलाय.
आई दाराजवळ बसलीए, एक पाय जमिनीवर आडवा दुमडून आणि दुसरा पाय उभा दुमडून.आडव्या पायावर हाताचं कोपर टेकवलंय आणि हाताच्या पंज्यात हनुवटी टेकवलीय.दरवाज्याकडे डोळे लावून बसलीए.दरवाजा ओढून घेतलेला, किलकिला.आई जांभया देतेय.मधेच हाताचे दोन्ही पंजे डोळ्यावरून आणि चेहेरय़ावरून खसाखसा चोळते.किलकिला असलेला दरवाजा हळूहळू उघडू लागतो.अंधारात एक बुटकी, ढेरपोटी, पुरूष असावी अशी दिसणारी व्यक्ती लडखडत, सौम्यपणे झिंगत आत येतेय, ’हम होंगे कामयाब’ ची धून गुणगुणत.आईकडे पहाते.थांबून डुलत रहाते.
“आईऽऽ तू.. जागी कशाला रहातेस? तुला सांगितलंय ना मी? उगाच-”
“गुंडू! अरे काय हे? वेळ, काळ- आणि आज पुन्हा झोकून-”
गुंडू तळहाताच्या चार बोटांवर आडवा अंगठा ठेवण्याच्या प्रयत्नात.
“जराशीऽ”
आई नाईटलॅंप लावते.
“गुंडू अरेऽ आपलं घराणं काय! आपली परिस्थिती काय! तू मोठा सगळ्यात! एव्हाना सगळी जबाबदारी तू उचलायचीस तर-”
गुंडू तडक कॉटवर झोपलेल्या बापाकडे हात करतो.
“तो आहे ना अजून जिवंत-”
“जेवणार आहेस की जेवण झालंय तुझं?”
गुंडू विचारात बुडलाय.ते बघून आई आत जायला लागते.
“एऽऽ आई.. आण! थोडसं..च.. पोळीभाजी..”
गुंडूला स्वत:ला अॅडजेस्ट करत जमिनीवर बसायचा प्रयत्न करू लागलाय. ’हम होंगे कामयाब’ ची धून गुणगुणणं चालूच आहे.आई आतून वाढलेलं जेवणाचं ताट घेऊन येते.त्याच्या समोर ठेवत बसते.
“गुंडूऽऽ”
“बोलऽ”
“..बाबा.. काय करतोस?”
“जेवणाराय!”
“ते नाही रे.. आपल्या घराची अवस्था-”
“कधी बरी होती? आजोबा गेला.. त्याच्या दुसरय़ा दिवशी.. मामा जेवण घेऊन आला.. म्हणून जेवायला मिळालं!”
“ते गेलं रे आता!.. आज! आज काय करायचं?”
गुंडू कॉटच्या दिशेने एक हात पसरतो.
“हे सगळं.. त्याला सांगायचं! कोणी.. आणली ही अवस्था? मी आलो होतो.. बाबानो.. मला जन्माला घाला म्हणून-”
“गुंडूबाळ आपल्याला मोठं कुणी केलं? लाड कोणी केले? कौतुक-कोडकौतुक कुणी केलं?”
पुन्हा गुंडूचा एक हात कॉटच्या दिशेने पसरलेला.
“याने!.. इनवेस्टमेंट होती त्याची त्यात!.. त्याला त्याच्या हातात सगळं हवं होतं! मी.. कामातून गेलेलाच.. त्याला हवा होतो! तुला कधीच गुंडाळलं.. गार्गी-राजू लहान..”
“करायचं काय? सावरायचं कसं यातनं?”
“कशातनं?”
“काय बाबा बोलायचं तुझ्याशी! नको त्यावेळी विषय काढला! मीच मूर्ख!”
अगदी समाधानाने खाकरतो.
“हाऽहाऽहा.. ते आहेच!.. हे बघ!.. आपला परमेश्वर तो! त्याला शरण जायचं की आपलं.. काम झालं!”
“अरे पण तू कधी उजेड पाडणार?”
“रात्र संपल्यावर!”
“हजरजबाबी बिरबल आहेस!.. रोज धुंद होऊन ये! वासूनाक्यावर जग! पण इथे माझं काय होतंय-”
गुंडू आता जेवणाला आणि तिच्या बोलण्याला कंटाळलाय.
“काय होतंय?”
“बापाची नोकरी सुटलीये तुझ्या!”
“काढलंय!”
“तेच ते!”
“महत्वाच्या फायली जाळल्या!”
“काय सांगतोस काय गुंडू!?”
“लोच्या, झोल, लफडी, अफरातफर! इतके दिवस टिकला तेच-”
“पुढे काय?”
“आता बसफुगडी!”
आई तोंडाजवळ हाताची बोटं जुळवून धरते आणि करवादते.
“अरे कारट्याऽ गिळायचं काय?”
गुंडू ढेकर देतोय.
“जिसने दात दिये है.. वो चना भी देगा.. मां!”
आणखी एक ढेकर देतो.
“तुझं बरंय बाबा! पोटात टाकलीस की सुटलास! ती उतरेपर्यंत तू ढगात! जरा माझ्यासाठीपण घेऊन येशील का?- होऽ पण त्यालाही दिडक्या लागतात!.. असं करू, नाक्यावरच उभे राहू! वर्गणी गोळा करू! हप्ता गोळा करू!-”
“माझं येक.. ऐकशील?”
“पाजळ!”
“घाबरायचं नाही! सगळं व्यवस्थित होणार तू-”
“गुंडू!.. दिसायला तू बापाच्या वळणावर गेलाएस! आता त्यांचीच वाक्यं तूही बोलायला लाग!”
“तुला असं वाटतंय का.. की मी बरळतोय!”
“नाही!.. मलाच वासानं झालीए!”
“मी सांगतोय ते लक्ष देऊन ऐक! काळजी करायची नाही! टेन्शन घ्यायचं नाही-”
“मी.. थोडी थोडी.. रोज आणून देईन.. ती घ्यायची!”
“नाईऽऽ आऽऽईऽऽ.. तुझे हाल संपले आता!.. इतके दिवस पिचून गेलीस आता-”
“तू पार संपून जा!”
“आसं.. नाई बोलायचं आई! हा गुंडू असताना आता डरायचं नाई!”
लडखडत उभा रहातो.
“सावर!”
“मोरी.. कुठे आहे?”
“तुझ्या मागच्या दिशेला!”
वळायचा असफल प्रयत्न करतो.
“ठीक आहे!.. ठीक आहे! तू ऐक.. तुझ्या या लाडक्या गुंडूने नोकरी मिळवलेय स्वत:च्या.. हिंमतीवर!”
त्याचा तोल जातो, आई आधार देते.त्याचं चालूच.
“काय?..नोकरी!.. तुझा-तू-गुं-”
“हो! हो! मोरी दाखवू न तुला? चल हात धुवायला.सकाळी बरं वाटेल..”
गुंडू धडपडतो.
“नाऽऽय!.. तुझी.. सगळी स्वप्नं साकार होणार आई.. आईऽऽ तुझ्या गुंडूचं राज्य येणार! यालाऽ आता झोपवतो चांगलाच! बघ तूऽऽ”
कॉटच्या दिशेने जोरात लाथ झटकतो.आता गुंडू पुरता पडणारच पण आई पुन्हा त्याला सावरते.
“तो आधीच झोपलाय गुंडू! तू चल आता तुला-”
गुंडू आता पुरता भावविवश झालाय.
“तुझी शप्पत आई!.. मला खरंच.. नोकरी लागलीए!”
“गुंडूऽऽऽ...”
गुंडू जमिनीवर स्थिर रहायचा अटोकाट प्रयत्न करतोय आणि त्याचवेळी दूर कुठल्यातरी वाहिनीवर वेगातलं लेझीम-संगीत सुरू झालंय.त्यापाठोपाठ लांबलचक तुतारी ऐकू येऊ लागते.
गुंडू दोन्ही पाय फाकवून जमिनीवर घट्टं उभं रहायचा प्रयत्न करत छद्मी हसतोय.तोपर्यंत आई आनंदविभोर झालेली..
2 comments:
ह्रदयाला पीळ पाडणारं शब्द चित्र.
:-( अभिप्रायाबद्दल आभार आशाताई!
Post a Comment