त्याने बनवलेला पहिला चित्रपट "मकडी"ही केबलवर पाहिला तोही आवडला होताच!
"ओंकारा" पुन्हा शेक्सपिअरचा बॉलिवूड अथेल्लो! हा मकबूलपेक्षा जास्त ग्लॉसी, चकचकीत वाटला.विशालचं व्यावसायिक चित्रपटाकडे जाणं! यात प्रचंड भावला सैफ अलि खान! मकबूलमधला इरफान, शेवटी स्वत:चा रक्ताळलेला चेहेरा, तश्याच भिंतीं यांचा भास होऊन संपूर्णपणे खचून जात असलेली लेडी मॅकबेथ तब्बू याना विसरता येतच नाही पण त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे दॄष्यंही येतातच.पंकज कपूरलाही आठवा!
ओंकारामधे सैफ अलि खान सगळ्यांच्यावर लक्षात रहातो, अजय देवगण आणि करीना कपूर हे चांगले कलावंत आणि त्यांच्या भूमिका उत्तम लिहिलेल्या असूनही, हे लक्षात घ्या!! आणि तो करीनाच्या हळदीचा सीन! एक तगडं गिमिक विशालनं इथे वापरलं होतं! मकबूलमधे इतक्या उघडपणे त्याने असं केलेलं आढळत नाही! तरीही घारीच्या तोंडातून सुटून अचूक हळद भिजवलेल्या पात्रात आकाशातून पडलेला साप, त्यामुळे सर्वत्र फासली गेलेली हळद यामुळे दष्यात्मक, आशयात्मक आणि सिनेमॅटिक असा उत्तम परिणाम साधला गेलाच.शिवाय बिहारी परंपरावादी पार्श्वभूमीवर तो संयुक्तिक वाटला.पण एवढंच होतं का? विशाल आणि त्याचा सिनेमा त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे हे आम्हाला कळलं! मकबूल तेवढा पोचला नव्हता!!
...मित्रांनो, आणि "कमीने"चं काय झालंय? त्यामुळे विशाल आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचलाय! विशेषत: सर्व तरुण वर्गापर्यंत! "ढँट्नान" ची झिंग तुम्ही चित्रपटगृहात अनुभवली आहे का? सगळ्या वयाच्या लोकांना, एकावर एक आदळून डोळ्यांवर आघात करणाऱ्य़ा प्रतिमा आणि कानांचा पडदा फाडून टाकणारा ताल आणि शब्द (पंच्याहत्तरीतल्या गुलजारचे?) नीट ऐकू येत नसूनही झिंगल्यासारखं होतं! विसर्जनाच्या डीजे आणि जनरेटर, नाशिकबाजाग्रस्त मिरवणुकीला कितीही नावं ठेवली तरी एखाद्या वृध्दालाही आतून झिंग येत असते तसं! वाढत चाललेल्या प्रचंड ताणांमुळे झिंग येत रहावी आणि थोडा काळ का होईना वास्तव विसरावं ही मानसिकता वाढत जाणार आहे मित्रांनो! आणि विशाल भारद्वाजनंही ते बरोबर ओळखलंय!
शाहीद कपूर दोन्ही भूमिकांमधे लक्षात रहातो. प्रियांका ज्या माझ्यासारख्यांना आजवर अजिबात आवडली नाही त्याना ती यात बरी वाटते. तारे जमी पर वाला अमोल गुप्ते अप्रतिम! विशालनं लिहिलेलं पात्र तो तंतोतंत जगलाय.चार्ली-शहीदच्या घरात मिखाईलला वेताच्या झोपाळ्यावर बसवून मारण्याचा सीन विशालचा कमीनेमधला परमोच्च बिंदू वाटतो.विशालचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गाढा आहे का? अमोल खूपच चांगला अभिनेता आहे!... पुढे काय? पुढे?...
विशालनं सुरवातीच्या मुलाखतीत चित्रपटाचा बेस पुन्हा शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एररचा असे म्हटल्याचं आठवतं.त्याबरहुकुम यात दुहेरी भुमिकांच्या घोळाव्यातिरिक्त काही नाही, असलंच पाहिजे असंही नाही. अमोल गुप्तेच्या भोपे भाऊ या पात्रासंदर्भात वस्तीतला एक लहान मुलगा आणून, मग कधीतरी त्याला गणपतीचा मुखवटा चढवला आणि तो काढून तो भोपेकडे लाच मागतो असं दाखवून विशालला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत नाही. गुड्डू-शहीदच्या एंट्रीला एड्सच्या गाण्याचे प्रयोजन कळत नाही.भोपे आणि गुड्डू यांच्यामधल्या शेवटाकडे जाणाऱ्य़ा प्रसंगात परप्रांतीय अस्मिता वगैरे विशाल जास्त ठळकपणे आणतो असं वाटतं. त्याला स्वत:ला बरेच दिवस मनात ठेवलेलं काही म्हणायचं असल्यासारखं. हा पुन्हा जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न?
जुळ्याभावांच्या पूर्वायुष्याचा पट बघताना कधी नव्हे ते कंटाळायला होतं जे विशालच्या सिनेमात सहसा होत नाही.विशेषत: विशाल इथे टिपिकल बॉलिवूडपेक्षा वेगळं काहीच दाखवत नाही आणि असलेलं कंटाळवाणं होतं. त्याला टिपिकल बॉलिवूडी भुतकाळ दाखवायचा होता तर मग सगळे आक्षेप पत्करून स्लमडॉग डॅनी बॉईलचा बॉलिवूड फिल्म्सचा, जॉनरचा, अभ्यास जास्त चांगला होता असं विधान करावसं वाटतं.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ताशी या पात्राचा सगळाच पट कळत नाही, त्याचं प्रयोजन कळत नाही. कस्ट्म किंवा तत्सम ऑफिसर्सचे सीन मार्मिक होतात.
क्लायमेक्स पुन्हा कृत्रिमरित्या घडवून आणवल्या सारखाच वाटतो. पोलिसांबरोबरचा भोपेचा बार्गेनिंगचा प्रयत्न पुन्हा मार्मिक! पुनरुक्ति होईल पण भोपे, लिखाणात आणि अमोल गुप्तेमुळे सगळ्यांच्या वर कमीना वाटतो!
शेवट पुन्हा मार्मिक!
मित्रांनो अनेक गोष्टी निसटत जातात, पुरेश्या स्पष्टं होत नाहीत. एकिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न आणि एकिकडे अस्पष्टता, जुळ्या भावांच्या भूतकाळाचं नीरस डिटेलिंगही! एड्सच्या गाण्याचं प्रयोजन गुड्डूच्या न दाखवलेल्या गेलेल्या पार्श्वभूमीत होतं? मग ते संकलनात गेलं? विशाल भारद्वाजच्या चित्रपटात संकलनाचा घोळ?
मित्रांनों, चित्रपटातून तुला नक्की काय सांगायचं आहे? असं दिग्दर्शकाला विचारायचा अट्टहास करू नये असं म्हणतात पण विशालला कमीने दाखवण्याव्यतिरिक्त काय म्हणायचं आहे हे समजत नाही अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. आपल्याला सिनेमाची गोष्टं पूर्ण होऊन काही मिळाल्यासारखं वाटावं लागतं तसं वाटत नाही असं सार्वत्रिक मत.
मित्रांनो, जास्तीतजास्त व्यावसायिकतेकडे जाण्यातही गैर काहीच नाही पण विशाल त्याच्यासारखा (त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा) वेगळा रहावा असंही वाटत रहातं.
मित्रांनो, माझ्यासारख्यांसाठी विशालने, आपला पुढचा प्रवास कसा असणार याबद्दलची उत्कंठा, प्रचंड वाढवून ठेवली आहे हे मात्र निर्विवाद!