आंतरजालावरचा माझा वावर तसा अलिकडचा म्हणायला पाहिजे. अगदी अलिकडचा नव्हे पण आंतरजालात पार डुबकी मारून काही शोधणं मला या ना त्या कारणानं तेवढं शक्य झालेलं नाही असा माझा अनुभव. इतर अनेकांप्रमाणे माझंही शिक्षण पडत धडपडतच.
तेव्हा नॅनिरिमो अर्थात NaNoWriMo बद्दल तुम्हाला सगळ्याना माहित असेलच. मला गेल्यावर्षी नॅनोरिमोबद्दल कळलं. नॅनोरिमो हे एक संकेतस्थळ आहे एका पत्रकारानं बनवलेलं. काहीतरी लिहून बघणारय़ाला कधीतरी मोठं लिखाण करावं असं अगदी आतून वाटत असतं. तो ते कबूल करो अथवा ना करो. असं लिखाण सहजासहजी करणं शक्य असतंच असं नाही. ते इतरांपर्यंत पोचणं तर लिखाण करत असताना दुरापास्तच वाटत असतं. त्या पत्रकारालाही तसंच वाटत असलं पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला गंभीरपणे घ्यायचीच कोणाची इच्छा नसते. तयारी तर नसतेच नसते. अशांनी काय करावं? त्या पत्रकारानं काय केलं?
त्यानं नॅनोरिमो नावाचं दालनच उघडलं. NaNoWriMo अर्थात National Novel Writing Month या नावानं. ते उघडल्यालाही बारा वर्षं झाली. हे तेरावं वर्षं. गेल्यावर्षी मला दिसलं तेव्हा ज्ञात झालं. गेल्यावर्षी, यावर्षी इंग्रजी तसंच मराठी वर्तमानपत्रातून ते जाहीरही झालं आणि तुमच्याआमच्यासारख्या अनेकांपर्यंत ते पोचलं.
दरवर्षीचा नोव्हेंबर महिना हा राष्ट्रीय कादंबरीलेखनमास म्हणून ह्या संकेतस्थळावर साजरा केला जातो. याच्या प्राथमिक अटी म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपासून ३० तारखेपर्यंतच्या ३० दिवसांमधे कादंबरीलेखनाचे ५०००० शब्दं लिहायचे अर्थात १६६७ शब्दं रोज! बस्स! लिहित सुटायचं!
गेल्यावर्षी इंग्रजीत लिहायचं म्हणून घोटाळत तिथेच थांबलो. यावर्षी आणखी शोध (?) घेतला असता असं लक्षात आलं की जगातल्या कुठल्याही भाषेला हे दालन सताड उघडं आहे! मग म्हटलं वाघिणीच्या दुधापेक्षा आपल्या आईच्या भाषेत लिहिलेलं काय वाईट?
लिहावं का? जमेल? रोज दाबून बसलो तर किती शब्दं लिहून होतात याचा अंदाजच नव्हता. ५०००० म्हणजे तर खूप लांबचा टप्पा वाटला. नुसतं जाहीर करायचं म्हणजेही फारच वाटलं. यांचं काहीतरी भलतंच!!! अशापासून कुठल्याही प्रतिक्रिया अगदी घरापासून दारापर्यंत आल्या असत्या. त्यामुळे माफ करा दोस्तांनो पण हे जाहीर करून संगतीलाही कुणाला घ्यायचं डेअरिंग झालं नाही! आईच्यान सांगतो!
हूऽऽन जाऊद्या येकदाचं! असं म्हणून बसलो. सर्वात आधी सुचणं, मग पोटापाण्याच्या टायमाशी संधान बांधणं, मग संसारी (?) गृहस्थाच्या अथ पासून इतिपर्यंतच्या सगळ्या अडचणी, अकस्मात लिखाणाला होणारी एखाद दिवसाची दांडी, अपरिहार्य लग्नंसमारंभ ते अस्मादिकाचा अत्त्यंत साधेपणानं (????) पार पडलेला वाढदिवस. काय काय आणि किती सांगावं या उत्सवी माहोलात रमणारय़ा या जीवाविषयी!
एक कसं घडत गेलं माहित नाही पण टेन्शन नेहेमीसारखं डोक्यावर बसलं नाही खरं. दुसरं म्हणजे सगळी कामं करत हेही केलं. नेहेमीसारखा मी माझं लिखाण करणारच काहीही झालं तरी असा हट्ट धरला नाही.
खूपच वर्षांपूर्वी सुचलेलं एक बीज मात्र हाताशी होतं हे खरं. महत्वाची पाच पात्रं तयार होती. साधारण घटना मनात होत्या. अगदी जराशी सुरवात इथे केलेली होती.
तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा लाभलेल्या होत्याच. माझ्याकडून असं काही पूर्ण व्हावं ही सगळ्यांचीच, विशेषत: त्या सर्वव्यापी तत्वाची इच्छा असावी.
कधी एकदा तुम्हाला सांगतो असं झालंय आज! जवळजवळ महिनाभराचा माझा इथला उपवास आज संपवतो आहे.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत होत रहावा ही नम्र विनंती!
लोभ आहेच, तो वृद्धिंगत होत रहावा ही नम्र विनंती!