लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.
म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्यावर राहिले.
नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.
माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ लागल्या.
ही बेटं प्रत्यक्षात बघता, अनुभवता आली नव्हती. माझ्यापर्यंत ती थेट पोचली नसावीत. खरं म्हणजे मी अशा अनुभवांपर्यंत थेट पोचलो नव्हतो असं म्हणायला पाहिजे. अनेक घटना, भावना, विचारांच्या धुक्याआड अनेक गोष्टी त्यांची त्यांची वेळ आल्यावर जाणवत, लक्षात येत असाव्यात.
हल्ली त्या प्रकर्षानं जाणवू लागल्या आहेत.
माणसं, अनेक वर्षांची सवय असलेले मित्र अचानक समोरून अनोळखी होऊन निघून जातात. मी खुळ्यासारखा बघत रहातो. हसलेला असतो, हात दाखवलेला असतो, कधी चौकशी करायला थांबलेलोही असतो. पोपट होतो. पोपट झाला की राग येतो. समोरून अचानक असा प्रतिसाद येण्यासारखं मी काहीच केलेलं नाही असा पहिला विचार येतो. मग असं का? या विचाराचा भुंगा खायला सुरवात करतो. त्याची सुई नेहेमीप्रमाणे मी स्वत:च असतो. मग स्वत:ला पोखरून पोखरून झाल्यावर लक्षात येतं, अरे! त्या तसल्या प्रतिसादाचं केंद्र तर समोर होतं! मग मी कशाला माझ्या दिमागचं दही करून घेतोय! हा झाला माझा प्रवास.
बरेचसे, जा! गेलास उडत! असे असतात. त्यांचा हेवा वाटायला लागतो. पण आत कुठेतरी वर्षानुवर्षाचे बंध तुटल्यामुळे खुपत राहतं. माझ्या दृष्टीने माझी चूक नसताना. समोरच्याने मात्र ’ठान’ लेली असते. मी असाच वागणार! त्याना आत काही खुपत नसेल? का करत असतील असं हे? न्यूनगंडातून? अहंगंडातून? प्रचंड संकटं आल्यामुळे? की परिस्थितीवश एखादा दिवा तेल आणि वात कमी कमी होऊन विझत जावा तसे विझत जात असावेत हे आतून? किंवा भडकत, मी! मी! माझं! माझं! असं करत आणखी आणखी मिळवतो आहे याची नशा चढवत असावेत हे?
गरज नाही समोरच्याची म्हणून त्याच्याशी असं वागत असावेत हे? काय असावं?
मग मी माझाही झाडा घेऊ लागतो. मी भूतकाळात नव्हतो का काही कारणानी कासव झालो होतो? आत आत मान घालून जगाशी संबंध तोडून घेत होतो. काही काळ असं वागणं शक्य असावं.
मग मला मागचे काही संबंध संपल्यासारखे नाही का वाटायला लागले. एका मोठ्या वयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला होता, लहानपण एकसारखं असतं, मोठं झाल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या दिशेने वाढतो. मग समानधर्मी काहीच रहात नाही. मग बालपणीचे ते रम्य इत्यादी दिवस गतरम्येतेतच रहातात. समोरासमोर आलो की काय बोलावं तेच कळत नाही, गतरम्यताच उगाळली जात रहाते.
अलिकडे जे जाणवलंय ते थोडसं मध्यमवयीन अडचणी- middle life crisis च्या दिशेने गेल्यासारखं वाटतंय. पण ते तेवढंच नाही. कॉर्पोरेटी झगमगाटातल्या तरूणांचंही असं होतंय असं दिसतं.
एखादा स्तरच असा आहे की हे सार्वत्रिक आहे? मग सोशल नेटवर्कींग साईट्सनी ही दरी काही प्रमाणात तरी बुजवली आहे की बुजवलेली ही दरी आभासमय आहे?
मतं पटत नाहीत म्हणून, स्वभाव म्हणून अंतर राखून राहणं समजून घेता येईल. पण हे जाणवलेलं वेगळं आहे. इथे अचानक, माझ्या दृष्टीने, समोरच्याच्या दृष्टीने नियोजित असा पूर्ण बहिष्कारच व्यक्त होताना दिसतोय. अनेक वेळा तो वैयक्तिक नाही तर सार्वजनिक आहे असंही दिसतंय.
कदाचित हे असं चालूच असेल. माझं लक्ष आज तिथे वळलं असेल.
काळजी वाटते. मीही काही खूप सोशल, सदैव भेटीगाठी करत असणारा माणूस नव्हे. काही कारणांनी, काही वेळा बहिष्काराचा अवलंबही करावा लागलाय मला. काळजी आपण तसे झालोत, होऊ, ही नाही. एकूणच हे बेट प्रकरण बेटं माझ्या मनात हल्ली चांगलंच रूजून बसलंय.
दुसरीकडे वैद्यकीय सल्ला सतत हा दिला जातोय की सतत माणसं जोडा, मित्रं जोडा, माणसात रहा! तुमच्या अनेक रोगांचं मूळ तुमच्या एकटेपणात आहे.
माणूस मुळातच एकाकी आहे. कुटुंबसंस्थेत रमलेला दिसला तरी.
यातून मला जाणवलेला धडा मी घेतोच आहे.
बेटं तर झाली... पुढे? हा विचार मात्र खाऊ लागला आहे हे खरं!