क्लायमॅक्स?... की?...
खरं तर क्लायमॅक्सला पर्यायी शब्द आहे उत्कर्षबिंदू.माझ्या आयुष्यात मात्र भलताच क्लायमॅक्स आला होता.
मी नाटकात अपघाताने ओढला गेलो.एकामागोमाग अशा संधी येत गेल्या की शहरातल्या मुख्य प्रवाहाजवळ येऊन ठेपलो.दूरदर्शनवर नाटक जाहीर झालं.ते दोनदा रद्द झालं.पुढे ढकललं गेलं.नंतर ते सादरही झालं.जेमतेम दोन प्रसंग.तेही नवखेपणाने सादर केलेले.पण परिचितांनी कौतुकही केलं.सर्वसाधारण तरूणच आहोत अशी बोच मनाला होती.ती नाहीशी होतेय असं चित्रं दिसायला लागलं.
राज्य नाट्यस्पर्धा जाहीर झाली.संस्थेचं महत्वाकांक्षी नाटक उभं रहाणार अशा हालचाली सुरू झाल्या.रूपांतरित नाटक.रूपांतरकाराशी चर्चा.वाद.संवाद.सगळी तयारी जोशात सुरू झाली.नाटकाचा दिग्दर्शक निवडला गेला.भूमिका ठरवल्या गेल्या.नाटकात डबलरोल होता.जमिनदाराची दोन तरूण मुलं.या भूमिकेसाठी माझी निवड झाली.शोषण करणारा निर्दयी जमिनदार आणि शोषित अतिवृद्ध शेतकरी असा संघर्ष होता.मरणाला टेकलेला हा अतिवृद्ध हळूहळू जवान होऊ लागतो आणि जमिनदारासमोर उभा ठाकतो अशी ब्लॅक ह्यूमर पद्धतीची नाटकाची थीम होती.व्यंगचित्रात्मक पात्रं, उपरोधिक भाषा असलेलं परिणामकारक असं नाटक होतं.
तालमी सुरू झाल्या.दिग्दर्शकानं पहिल्या दिवशी वाचन घेतलं.माझ्या वाचनावरून माझी मनसोक्त हजेरी घेतली.हा दिग्दर्शक सर्वार्थानं रांगडा होता.त्यानं नेपथ्याचा प्लान समजवला.हे मला नवीन होतं.तो नीट लक्षात ठेव असं त्यानं मला बजावलं.माझी भूमिका कोणती हे त्याने सांगितलं.एक अर्कचित्रात्मक रंग असलेला उत्साही कार्यकर्ता आणि एक मुजोर जमिनदारपुत्र असा तो डबलरोल होता.दोघे जुळे भाऊ अर्थातच एकाचवेळी दिसणार नव्हते.
“या आधी तू एकांकिका केलीस नं! तो काय तो अनाथाश्रमाचा ट्रस्टी केला होतास आणि असं बोल्ला होतास-” अशी सुरवात करून रांगड्या दिग्दर्शकानं मला मी कसा बोललो होतो, उभा राहिला होतो याची नक्कल करून दाखवली. “ते तसलं मला नाय चालणार! कळलं ना?” असा दमही दिला.मी पुरता ब्लॅंक झालो आणि तो काय सांगतो याच्याकडे जीवाचा कान करून धडपडू लागलो.
रात्री उशीरा घरी येत होतो.आल्यावर जेवता-झोपताना नाटकाचाच विचार, प्लान, डोळ्यासमोर, हातात असायचा.घरात काहीतरी घडत होतं.काय ते माझ्यापर्यंत पोचेल अशी माझी मनस्थिती नव्हती.आईचं कसलं तरी मेडिकल चेकप होत होतं.फार गंभीरपणे ते माझ्यापर्यंत पोचत नव्हतं कारण मी वेगळ्याच जगात वावरत होतो.मला कसं सांगायचं या पेचात घरचे वडिलधारे असावेत.रात्री हे (म्हणजे मी सध्या करतोय ते) बास झालं वगैरे कळकळीने मला सांगून झालं.मी तो नेहेमीचा माझ्या नाटकांना विरोध म्हणून घेतलं.मान डोलावून पुन्हा माझ्या जगात वावरू लागलो.मग मला आईच्या चेकअपबद्दल सांगितलं गेलं.प्राथमिक रिपोर्ट आला होता.तो चांगला नव्हता.काय आहे ते उच्चारायचं धाडस कुणाच्यातच नव्हतं.घरात मी मोठा.हा रिपोर्ट नक्की काय आहे हे समजाऊन घेण्यासाठी मी मित्राच्या फिजीयोथेरपीस्ट बायकोकडे गेलो.तिनं ज्या स्त्री डॉक्टरनं रिपोर्ट दिला होता तिला फोन लावला. “मी काय झालं ते त्या बाईंबरोबर जे आले होते त्याना सांगितलंय” असं त्या स्त्री रोग तज्ज्ञानं सांगितलं.माझ्याकडे वळून माझ्या मित्राची बायको म्हणाली, “सीए आहे रे!” मी विचारलं, “सीए म्हणजे?” मित्राची बायको ब्लॅंक होऊन माझ्याकडे बघत राहिली.मला खरंच काही माहिती नाही असं तिच्या लक्षात आलं आणि तिनं काय झालंय ते सांगितलं.माझ्या पायाखालची जमिन सरकली.गर्भाशयाचा कॅन्सर. “ट्रीटमेंट आहे ना त्याच्यावर?” तरीही मी जोर लावला. “बिनाईन नाही मॅलिग्नंट आहे.खूप वरची स्टेज आहे.काहीही होऊ शकणार नाही हे लक्षात घे.जेवढ्या लवकर हे पचवशील तेवढं चांगलं.तू पचव आणि इतरांनाही समजव!” तिनं मनापासून सल्ला दिला.खूप मोलाचा सल्ला होता हा आणि आचरणात आणायला तितकाच कठीण.पण माझ्या समोरचं चित्रं पूर्णपणे स्पष्टं होत होतं.समोरचं चित्रं स्पष्टं होत असलं तरी घरी गेल्यावर समोर दिसणार्याा आईला फेस करणं महाकठीण होतं.
“सगळ्यात आधी संस्थेच्या कार्यवाहाला जाऊन सांगून येतो नाटक करता येणार नाही म्हणून!” अशी पळवाट काढून आईच्या नजरेला नजर न देता मी बाहेरची वाट धरली.खरं तर त्या अर्थानं ती पळवाट नव्हतीही.संस्थेला सर्वप्रथम सांगणं जरूरीचं होतं.आईला पुढची ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं.त्या ट्रीटमेंटचा काहीही उपयोग नाही हे मला आधीच माहित होतं.एका जबरी तिढ्याला मी आयुष्यात पहिल्यांदा सामोरा जात होतो.आई मला प्रचंड जवळची होती.माझ्या दृष्टीनं सगळंच संपलं होतं.
तासाभराचा प्रवास करून संस्थेच्या कार्यवाहाच्या घरी पोचलो.रविवार होता.सगळं जग त्या मूडमधे आणि प्रवासात मी माझ्या गतआयुष्यात कुठे कुठे जाऊन परत येत होतो.शाळेत असताना मी कशावरूनतरी आईवर रूसलो होतो.तिच्याशी बोलणं बंद केलं होतं.डबा न घेताच गेलो होतो.मधली सुट्टी झाली.मी धुमसतच होतो.तसाच इतर मुलांबरोबर शाळेतल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ येऊन नळाला तोंड लावत होतो.इतक्यात आई कडीचा डबा घेऊन आली.त्यात पोळीचे लाडू होते.आई आग्रह करकरून मला डबा घे, डबा घे म्हणून विनवत होती.मी हट्टाने तो घेत नव्हतो.आईकडे बघतसुद्धा नव्हतो.मित्र म्हणाला, “अरे घे! असं काय करतोएस?” मग मी तो घेतला.बर्या च वेळा आईच्या डोळ्यात पाणी यायचं आणि तिच्या जिवणीच्या कडा खाली झुकायच्या.आईकडून डबा घेताना त्या मला दिसल्या.मी मख्खंच राहिलो होतो त्यावेळी.पण या क्षणी मला आवरत नव्हतं.निराधार होण्याचं फिलींग पचवण्याचा माझा प्रयत्न त्याचवेळी सुरू झाला असावा.
कार्यवाहाच्या घरी पोचलो.मला बघून तो चकीत झाला.काय झालं ते मी सांगितल्यावर त्याचा आ वासला.महाप्रयत्नाने त्याने सगळं नाटक जमवत आणलं होतं. “मला बदली दे” असं तो मला वेगवेगळ्या तर्हे ने सांगून बघत होता.आता मी काहीच करू शकत नाही, हा माझा हेका कायम होता.मी त्याच्याकडून निघालो तेव्हाही तो आ वासून माझ्याकडे बघत राहिला होता.
त्याच्याकडून निघालो तेव्हा मी पूर्णपणे रितं होणं म्हणजे काय हा अनुभव घेत होतो.एका बाजूला माझं रक्ताचं माणूस माझ्यापासून कायमचं लांब जाणार होतं आणि दुसरीकडे अपघातानं माझ्याजवळ आलेलं माझं संचित मी माझ्यापासून लांब करून टाकलं होतं.सगळंच संपलं होतं.भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला होता…
No comments:
Post a Comment