romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, April 7, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (११)

इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८,  भाग ९, भाग १० आणि त्यानंतर... 
महेशची अवस्था अत्यंत दारूण झालीए. अंकित महेशचा सेलफोन घेऊन घरभर पळत सुटलाय. अंकितनं आता महेशला ब्लॅकमेल करायला सुरवात केलीए. महेशची झोप पार उडालीए आणि त्याला अंकितच्या मागे पळत सुटण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही!
"अर्‍ये- अर्‍ये थांब- थांब-"
"मोनाला सांगता काय?"
"नाही- नाही रे माझ्या सोना- सोन्या!"
"मी दिवटा काय?"
"नाही रे कुलदीपका नाही!"
"आम्ही उध्वस्त केलंय तुम्हाला, काय?"
"नाही नाही रे मस्त मस्त- यायलारे- मस्त आहात तुम्ही दोघं- तू आणि तुझी आई- असं म्हणायचं होतं मला. हात जोडतो बाबा तुला- तुझ्या आईला यातलं काही सांगू नकोस- प्लीऽऽज- काय मागशील ते देईन पण आवर- तुझ्या भावना आवर- आवर भावना!"
अंकित आता महेशला दरडावू लागलाय.
"मगाशी मोना म्हणाला होतात ना? आता भावना काय?"
"अब मुझे कुछ नही होना- सच्चीमें- मापी करो-"
"मग... मागाल ते द्यायचं!"
महेशला आता मान डोलवण्याशिवाय पर्याय नाही.
"हं! आईस्क्रिम... पिझ्झा... बर्गर... टॉयगन... कार... सेलफोन... होंडासिटी... टोयोटा... सॅन्ट्रो... एसेलवर्ल्ड... बिग बझार..."
प्रत्येक वेळी महेश पेंगत मान डोलवत रहातो.
"खाना.. खजाना.. सोना.. मोना.. मोना.. मोना.." अंकित आता फिदीफिदी हसत काय वाट्टेल ते बडबडू लागलाय.
"घे बाबा तुला काय घ्यायचं ते घेना- पण मला सोड-"
अंकित आता खो खो हसू लागलाय. महेशचा सेलफोन वाजू लागलाय आणि महेश पुन्हा झोपेच्या आधीन होऊन बडबडू लागलाय.
"मोना- मोना- आता तू का बरं पुन्हा पुन्हा फोन करकरून त्रास देते आहेस? तू सुद्धा मला सोड- एकटं रहायचंय मला-"
महेशची अवस्था वेड्या माणसासारखी होऊ लागलीए. त्याला बघून अंकित कपाळावर हात मारतो.
"आयशप्पत! यांचं टाळकं सरकलं वाटतं... हॅलोऽऽ- हॅ- हॅ-लॉऽऽ- ओऽऽ बोला नाऽऽ ऍंऽ ऍंऽ हां- थांबा- प्लीज वेऽऽट! वेऽऽट प्लीऽऽज!"
धावत महेशकडे येतो. त्याच्याकडे बघतच रहातो. महेश स्वत:शीच पुटपुटतोय.
"च्यक च्यक च्यक... आधी बरे होते.. कामातून गेली केस! च्यक च्यक.. मोना काय, सोना काय, भावना काय- ममा येऊदे मग बरोब्बर करतो तुम्हाला-"
महेश आता झोपेत वेगळ्याच दिशेला बघत बडबडू लागलाय.
"मोना अगं कोण आहे? कोण आहे फोनवर?- मला फसवू नकोस. मी जागाए.. अजिबात झोपेत नाही- आऽआऽआईगंऽऽ मोना-मोना-बोलना-गप का मोना- बोल ना!"
"ओऽऽ पपाऽऽ मोनाबिना कुणी नाईएऽ इथेऽ- मोना- कोना- टोना- फोना- अरे हो! हा फोना- आपलं हा फोनए तुमच्यासाठी- पपा- डॅडी- बाबाऽऽ येडे झाले माज्ये बाबाऽऽ पपाऽऽऽऽ"
महेश त्या भोकाडाने जरासा सावध झालाय.
"ये रेड्याऽऽ रडतोस काय माझ्या नावानं- गळा काढून! अजून आहे मी जिवंत! गेलेलो नाही! वर!- झोपतोय नुसता!- घरी दिवसपाळी आणि ऑफिसात रात्रपाळी करून करून! जीव जायची पाळी आलीए आता!- पण गेलेला नाहीए अजून!... अर्‍ये गप! गऽऽप!"
महेश अंकितच्या तोंडावर हात ठेवतोय आणि त्याचवेळी अंकित ’तुमचा फोन’ तुमचा फोन’ असं ओरडायला जातोय.
:अर्‍ये- अर्‍ये- चावतोस काय कारट्या-" महेश आपला हाय चोळतोय.
"मग काय करू? तुमचा फोनए फोनए असं सांगतोय तर तुम्ही माझंच तोंड-"
"द्ये! द्ये इकड्ये!... कोण ए? काय ए? ऑं? काय ए? काय चाललंय काय? ऑं? काय वेळाकाळाचं भान आहे की नाही? ऑं? काय काय काय? वर मलाच विचारताय काय?- काऽऽऽय? अहोऽऽ मी तुम्हाला विचारतोय काय? का- काय- काय म्हणजे?- आं- आं- हां हां आपलं ते हे- हां! काय समजतं की नाही तुम्हाला? कधीही फोन करता? अहो इथे काय काय झालंय!- नाही ऐका तुम्ही- तुम्ही- तुम्हाला ऐकायलाच लागेल- नाही मी फोन सोडणारच नाही तोपर्यंत!"
अंकितनं कपाळावर- पुन्हा- हात मारून घेतलाय.
"अहोऽऽ माझी आई गेली- सासू गेली- ऑं? अहोऽ गेली म्हणजे तशी नाही हो - पळून गेली- गेल्या- च्यक च्यक च्यक... कुणाबरोबर नाही होऽऽ- म्हणजे झालंय काय- मला मुलगी झाली- मुलगी! मुलगी!- मुलगा?- अहो‍ऽ मुलगा होताच आधी, असं काय करता?.. तर.. दोघांना कुणी सांभाळायचं- च्यक च्यक.. दोघांना म्हणजे त्या दोघींना नव्हे होऽ आईला आणि सासूला नव्हे! मुलांना! मु लां ना! हां! मुलांना कुणी सांभाळायचं म्हणून पळून गेल्या त्याऽ- मुलांना घेऊन?- हे कुणी सांगितलं तुम्हालाऽऽ मी? - यायला कोण यडचॅप बोलतोय पलिकडून-"
अंकित आता कपाळावर हात मारून घेऊन दमलाय, "अहोऽऽ मला काय विचारताऽऽयऽ त्यानाच विचारा नाऽऽ"
"अहोऽऽ मला सांगाल काऽऽ मी कुणाशी बोलतोयऽऽ ऑं? ऑं? तुम्हाला काहीच समजत नाहिएऽ -अहोऽ मगऽ तुम्हीऽ माझ्याशीऽ का बोलत राह्यलाय मगासपासूनऽऽ हां हूं का करत बसलाय माझ्या बोलण्यावर? ऑं? तुम्हाला- तुम्हाला मराठीही कळत नाही!- अहोऽ मग काय सूड उगवताय माझ्यावर हां हूं करूऽऽन!- मऽऽग?.. हे शहाण्यासारखं झालं की वेड्यासारखं- हां हां!- ये श्यान्येजैसा हुवा की पागलजैसा- म्येरेको बोलोऽऽ- क्या? कोनसा?... परपरांतीय लालनपालन बालन संघ!- हे काय आहे?.. काय आहे म्हणजे नाव आहे की गाणं आहे?.. ऑं? येऽऽ क्या करताय क्या तुम- तुमारा ये- ये- बालन लालन पालन- ऑं? क्या बोलताय?- मैंने? कबी?ऽऽ- ऑं- ऑं- हां हां- मेरी बायकोने! आपलं हे बीबीने- बीबीने- हां हां!- म्येरे बीबीने फोन किया होगा आपकोऽऽ- मैईं? मैईं बीबी का मकबरा- आपलं ह्ये नवरा- नवरा- आदमी- मरद- यायलारे- हां हां- बच्च्येका बाप- पिता- हां हां तो- तो- हां- घरमेंच दोनो बच्चेकू- हां- घरमेच संभालनेका! हां रे हां- आंग्गाश्शीऽऽ क्या बराब्बार बॉलताय रे बाबाऽऽ हां हां वहीच! उसके वास्तेच फोन किया आपकोऽ- ऑं? फिर बोलोऽ किसको भेजताय? ऑं? टी मंजू?... हां टी मंजू! कोन है कोन? अहो म्हंज्ये- औरत या मरद? हां! हां! किदरका है? - आरे मेरा मतलब है साऊथका- यूपी या बिहार- नक्की किदरका- हां हां- हां साब!... मापी करना हम वो सुरवातमें आपको- हां-हां-हां- मंगताय उतना लो पैसा बाबा- हमारे आंगनमें झाड है पैसेका- हां हां- आता ठेव बाबा ठेव- ऑं- द्येव भ्येज द्येव बाबा मंजू टी- या टी मंजू कोन हय उसको! जल्दी जल्दी हांऽऽ हां! हांऽऽऽ... हाऽ हाऽ हाऽ हाऽ"
"पपाऽऽ काय झालं काऽऽय?"
"अर्‍ये बछड्याऽऽ टी मंजू येणारेय टी मंजूऽऽ तुम्हाला सांभाळायलाऽऽ"
"याऽऽ येऽऽ पपाऽऽ"
त्याचवेळी पाळण्यातली अवनी जोरजोरात रडू लागलीय आणि दोघे तिच्या दिशेने धावत सुटलेत...     क्रमश:     


 

2 comments:

siddhesh rane said...

अप्रतिम !!

विनायक पंडित said...

तुमचं स्वागत सिद्धेश! अभिप्रायाबद्दल आभार!