डिसेंबर १६, २०१२...
"कन्या" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.
"कन्या" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.
डिसेंबर १६, २०१२ ही तारीख तरीही
वेगळ्या आणि अतिमहत्वाच्या दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवावी लागते आहे.
आयरनी- अंतर्विरोध लक्षात यायला
लागले की सर्वत्र तेच दिसायला लागतात की काय?
’कन्या’ हे एक तासाचं नाटक लिहिलं
ते तसा प्रस्ताव समोर आला म्हणून. प्रस्तावाबरहुकुम नाटक लिहिणं तोपर्यंत झालं नव्हतं.
तसं काही करायची इच्छा नव्हती. स्वत:ला लेखक समजणं अनेक प्रकारे व्यक्त होत असतं. पुढे
तेंडुलकरांच्या लिखाणात ’जो हुकुम’ लेखन करणं सतत नाकारलं असा उल्लेख आला तेव्हा काहीही
कारण नसताना मी उगाचाच फुशारलो, बादरायण संबंध जोडायची सवय जाता जात नाही.
पण कन्या लिहिलं. एक वयस्कर आणि
एक तरूण स्त्री किंवा प्रौढा म्हणूया, अशा दोनच कलावंतांच्या संचात ते सादर व्हावं.
त्यात वेगवेगळ्या आणखी भूमिका असल्यास त्या दोन्ही कलावंतांनी आलटून पालटून कराव्यात
स्त्री प्रश्नावर ते आधारलेलं असावं. तो कुठेही सादर करता येण्यासारखं असावं. कुठल्याही
रंग्मंचावर, कचेरीच्या ठिकाणी इत्यादी.. असा प्रस्ताव होता.
अर्धांगानं ढकलल्यावर काहीच इलाज
चालत नाही. माझ्यासारख्या ’स्टबर्न’ माणसाला केवळ अर्धांगानं ढकललं म्हणून मनात नसलेलं
करावं लागलं. बरं असतं श्रेय अपश्रेय यांची वाटणी करायला..
खूप वर्षांपूर्वी महानगरातल्या
समुद्रालगतच्या पोलीसचौकीत अघोरी प्रसंग घडला होता. स्मृती ताज्या होत्या. मनाशी जुळवाजुळव
सुरू झाली. अत्याचारित महाविद्यालयीन मुलीचा विचार करताना अचानक महिला आश्रम, तिथल्या
संचालिका, एक आश्रित वृद्धा.. असं कुठून कुठून डोक्यात आलं प्रस्तावाच्या अनुषंगाने
आणि ’हे सगळे कोठून येते?’ या सुचण्याच्या नेहेमीच्या प्रक्रियेप्रमाणे...
दोनच पात्रात ते पूर्ण झालं नाही. आडमुठेपणाचं एक टोक राहिलंच. ती मुलगी आत- संहितेत आल्याशिवाय राहिली नाही. तरीही ती रंगमंचावर अगदी शेवटीच प्रवेश करती झाली.
उत्साहानं संहिता प्रस्ताव देणार्यांसमोर वाचली. तिथे, त्या प्रस्तावात भाग असेल हे मला माहित नसलेलं स्त्री व्यक्तिमत्व रंगकर्मी उत्साहानं हजर होतं. वाचन झाल्याबरोबर प्रतिक्रिया.
प्रस्ताव देणार्यांना नक्की काय हवं असतं? जे हवं असतं त्याबद्दल त्यांच्या मनात तरी त्याचं स्पष्टं चित्र असतं का? हे मला पडणारे चिरंतन प्रश्नं इथेही पडलेच. मग चर्चा, माझं स्वभावानुसार मुद्दे खोडणं. माझं नाटक साधं सरळ. एका रेषेतलं. त्याना काही त्याहून ’प्रायोगिक’ बहुदा अमूर्त वगैरे पद्धतीचं- काय हवं तेही अमूर्तात असल्यासारखं- नक्की काय हवंय ते स्पष्टं नसणारं...
प्रकल्प बारगळून पुन्हा असं ’जो हुकुम’ करायचंच नाही हा माझ्या कानाला खडा...
ही आयरनी?
मग नेहेमीप्रमाणे मध्यंतर. आवर्तनांतली मध्यंतरं...
आपणच आपलं काम उभं करावं. आपलं संचित एकवटून. खुदही को कर बुलंद इतना... हे दरप्रसंगी ठरत आलेलं.
या साखळीतून कधीतरी माझं, मला अभिप्रेत असलेलं "कन्या" उभं राहिलं.
स्त्रियांच्या प्रश्नांच्या अनेक टोकांपैकी एक टोक.
आता मी ते सर्व पात्रांत. पाच वेगवेगळ्या स्त्री कलाकार घेऊन करायचं ठरवलं. ’ह्या’ मुलीला सुरवातीपासून रंगमंचावरच ठेवायचं हे ही ठरलं.
पहिल्या वेळी एका ’जाणत्या’ रंगकर्मी म्हणवणार्या स्त्रीने खो घातला. यावेळी स्त्री प्रश्नावरच्या या नाटकासाठी पाच पाच स्त्रिया कुठून आणायच्या आता? अशी आयरनी... नुसत्या स्त्रिया नव्हेत तर त्या त्या भूमिकेला दिसण्यात तरी अनुरूप असणार्या.
मुळात नाटकात काम करायला धजावणारेच कमी. त्यात स्त्रिया अगदीच कमीत कमी. अनेक कारणं... वेळ, सवड, इच्छा... मालिकेत काम करण्याची इच्छा, प्रलोभनं, जुने अनुभव, कमाईचं साधन इत्यादी...
मुख्य तीन पात्रांपैकी एक महत्वाचं पात्र मिळता मिळेना...
आश्वर्य वाटायचं. असं कसं?
मग अचानक ते गवसलं. पात्रानुरूप स्त्री.
पाचापैकी तीन जणींना रंगमंचावर उभं कसं रहावं, बोलावं कसं हे अथ पासून इतिपर्यंत शिकवायचा प्रयत्न केला.
हा प्रयत्न सगळ्यांनी अजिबात वाया जाऊ दिला नाही...
मग प्रयोगाची उभारणी. कालाच्या अवकाशात बरंच काही घडून जात असतं. अनवधानाने आपण जुन्याच काळात राहून जात असतो. प्रायोगिक नाटक आहे हे समजून सहाय्य करणारा तंत्रज्ञ असेल असं आपण समजून चालत असतो. स्वत:च्या कामाचं नाणं दुसर्याच्या पैशांवर वाजवून दाखवण्यासाठी तो जेव्हा येतो तेव्हा तंत्राची तीही बाजू अंगावर घ्यावी लागते. तशी तीही घेतली.
रंगभूमीची प्रायोगिक वगैरे बैठक- महानगरातली तरी- विस्कटलेली आहे. जगण्याची पद्धतच बदलत चालली. जे जगण्यात बदलतं तेच रंगभूमीवर काम करण्यात...
एका बाजूला "कन्या" उभं रहात होतं. दुसर्या बाजूने वास्तवाच्या आकलनात भर पडत चालली.
नाटकातला स्त्रीप्रश्न आणि स्त्री कलाकारांचे कलाकार म्हणून, माणूस म्हणून, समूह म्हणून पुढे ठाकणारे प्रश्नं. आणखी एक आयरनी. आणखी एक अंतर्विरोध...
त्यादिवशी १६ डिसेंबर २०१२ ला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ’कन्या’ सुरू झालं. सहाच्या आसपास संपलं. एक ’कहाणी’ सुफळ संपूर्ण झाली. थोडं इकडे थोडं तिकडे होतं, तेही झालं. आनंदी आनंद पसरला...
त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो प्रकार झाला. दिल्लीच्या बसमधला...
तीन तासांपूर्वी आम्ही सगळ्यांनी एका अत्याचारित तरूणीची ’उभी’ रहाण्याची प्रक्रिया अनुभवली होती आणि पुन्हा आयरनी समोर उभी राहिली होती...
ते कशाला... काही दिवसांपूर्वी एका महिला संस्थेनं स्वत:हून प्रयोग करण्यासाठी बोलावलं. अगदी योग्य व्यासपीठ. प्रचंड उत्साह. एक महत्वाची संधी...
मिळकत नाही स्वत:ची काही म्हणून नाराज असलेल्या, मिळकतीच्या संधीची बहुदा चातकाप्रमाणे वाट पहाणार्या एका प्रमुख कलावंताला तेव्हाच नोकरीचं आमंत्रण आलं... तिनं प्रयोग नाकारला... आयरनी...
पुन्हा, बदली कलावंत नाही. पुन्हा सगळं उभं करायला मी ही दुसर्या एका वेगळ्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पात अडकलेला...
पुन्हा, बदली कलावंत नाही. पुन्हा सगळं उभं करायला मी ही दुसर्या एका वेगळ्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पात अडकलेला...
पुढे काय?...
या सगळ्या मंथनातून माझीच एक जुनी कथा स्मरणात समोर येऊन उभी राहिली.
सर्वत्रच अंतर्विरोधाचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. एका बाजूला स्वत:च्या पायावर स्वत: उभ्या रहाणार्या स्त्रिया. त्याना उभं रहायला मदर करणारी माणसं, संस्था आहेत. स्त्रिया वेगवेगळी क्षितिजं पादाक्रांत करताएत... दुसरीकडे ’त्या’ तसल्या कहाण्या अंतहीनपणे वर्तमानपत्रातले कोपरे न कोपरे सजवताएत. वाहिन्या त्याच घटनांच्या बातम्या करून सजताएत.
देव, दैव, धर्म या संकल्पना एकिकडे मोडकळीला येताएत तर दुसर्या दिशेने उच्चशिक्षित लोंढा सिद्धिविनायक, शिर्डीकडे पायी जाताना, रांगताना, लोळण घेताना दिसतोय...
खरं काय खोटं काय...
वास्तव कठोर होतं, जळजळीत होतं...
ते आता शतखंडित झालंय म्हणे...
ते पकडता येत नाही कुणालाच...
मग काय करायचं?
पुन्हा पुराणांकडे, मिथ्सकडे जायचं? महाभारत, रामायण उघडायचं?
माझ्यासारख्या ब्लॉगरच्या हाती काय आहे?
एक एक टोक पकडणं... वास्तवाचं... समस्येचं...
"कन्या" हे त्यातलं एक टोक...
"कन्या" नंतर काय?
’भूक’ ही कथा अर्थातच क्रमश: सादर करतोय.
स्त्रीच्या जगण्याचं या क्षणी सापडलेलं आणखी एक टोक... ते टोक असल्यामुळे प्रातिनिधिक असेलच असं नाही...
गवसेल त्यानंतरही आणखी एखादं टोक...
टोकं जुळवून एखादं चित्र होईल का ते माहित नाही.
कोलाज मात्र नक्की होईल.
नाहीतरी आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं?
देव, दैव, धर्म या संकल्पना एकिकडे मोडकळीला येताएत तर दुसर्या दिशेने उच्चशिक्षित लोंढा सिद्धिविनायक, शिर्डीकडे पायी जाताना, रांगताना, लोळण घेताना दिसतोय...
खरं काय खोटं काय...
वास्तव कठोर होतं, जळजळीत होतं...
ते आता शतखंडित झालंय म्हणे...
ते पकडता येत नाही कुणालाच...
मग काय करायचं?
पुन्हा पुराणांकडे, मिथ्सकडे जायचं? महाभारत, रामायण उघडायचं?
माझ्यासारख्या ब्लॉगरच्या हाती काय आहे?
एक एक टोक पकडणं... वास्तवाचं... समस्येचं...
"कन्या" हे त्यातलं एक टोक...
"कन्या" नंतर काय?
’भूक’ ही कथा अर्थातच क्रमश: सादर करतोय.
स्त्रीच्या जगण्याचं या क्षणी सापडलेलं आणखी एक टोक... ते टोक असल्यामुळे प्रातिनिधिक असेलच असं नाही...
गवसेल त्यानंतरही आणखी एखादं टोक...
टोकं जुळवून एखादं चित्र होईल का ते माहित नाही.
कोलाज मात्र नक्की होईल.
नाहीतरी आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं?
No comments:
Post a Comment