romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, January 11, 2016

कथा: 'तोरण' 'कान्हेरी' दिवाळी अंक २०१५

तेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला... तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वेळ या जागेत आम्ही .. इन मिन तीन- साडेतीन महिने, एका वर्षभरात. चार- साडेचार महिने म्हणजे डोक्यावरुन पाणी. दोघे मिळून एकत्र रहाणार त्याहीपेक्षा कमी काळंच. मी हॅम्बुर्ग, जर्मनीत. तो कॅनडात- ओटावामधे. पण त्याचं म्हणणं माझं पहिलं घर. माझ्या स्वत:च्या मालकीचं. म्हणजे मी अर्धी मालकीण होतेच. त्याच्या मान्यतेची गरज नव्हती. तोही नाकारत नव्हता म्हणा. तर, दोघांनी मिळून हवं तसं बाविसाव्या मजल्यावरचं, जिम, गार्डन विथ भला मोठा राऊंड जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल असं सगळं असलेलं घेतलं घर. ते घ्यायलाही पार शहराच्या त्या टोकापर्यंत जावं लागलं. मी नकोच म्हणत होते. बड्जेट आणखी वाढवूया म्हणाले. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ घेऊया म्हटलं तर अभ्याचं म्हणणं, नको. राष्ट्रीय उद्यानाजवळ पाहिजे... आणि तोरणाचं म्हणाल तर तोरण म्हणजे शुभसुरवातीचं एक प्रतिक, माझ्या दृष्टिने... बस्स...
मला... केवळ तोरण इत्यादी माझा प्रॉब्लेम नव्हता. एखाद दुसर्‍या अशा परंपरेमुळे मला फरक पडत नव्हता, काही ऑबजेक्शन नव्हतं. पण अभ्याचा प्रवास मी जज करत होते. अभ्या त्यात खरा उतरताना दिसत होता. त्याचा विचार मला करायला लागत होता...
अभ्यानं मग केलंच हाऊस वार्मिंग. मी हॅंबुर्गला असताना. मला कळल्यावर अर्धातास स्काईपवर झापला त्याला. केलंसच का? मी नसताना का? असताना का नाही?... काय उत्तर दिलं असेल? म्हणाला, केळकरगुरुजींना वचन दिलं होतं ना... वचन??? कसलं वचन?... आणि गुरुजी कसले आमच्याच स्कूलमधे होता तो शिक्या... शिक्या केळकर. कसा होता, काय होता, त्याला आता काय स्टेटस झालंय... ते जाऊ द्या... नेमकी तेव्हा मोठी आत्या होती माझ्याजवळ. जर्मनी पहायला आलेली. म्हणाली, “तुलाही दिलं असतं वचन तुझ्या त्या अभ्यानं, सप्तपदी घातली असतीस तर... आता काय उपयोग? भाऊ बिचारा कंटाळून गेला शेवटी!” इथे गेला वर चांगलाच जोर दिलेला. “भाऊला वाटलं आज ना उद्या घालशील तू सप्त-” ती गळा काढायच्या बेतात होती अगदी. ते काय ते नक्राश्रू की काय म्हणतात तसलं. मी लगेच तिला आणखी एक साईट दाखवली टुरिझमची. सगळं विसरली.
अभ्याचं हे काही नवीन नव्हतं मला. समजुतीनंच घेत गेले. कसं असतं, सोशिकबिशिक असतोच आम्ही पहिल्यापासून. एवढंतेवढं ॲडजस्ट करणं हा व्यवहार आहेच. दोन्हीकडून समजूत असली की फ्रिक्शन रहात नाही- म्हणजे काय ते- हं, संघर्ष! संघर्ष रहात नाही. संघर्ष- अभ्याचा शब्द. तो असे, गांभीर्य, संघर्ष असे शब्दं सहज वापरतो येता जाता. सुरवातीला बरा होता अभ्या. ओटावाला सेटल झाल्यापासून जरा वाढलंच त्याचं. इथे नव्हता तेवढा तसा झाला तो मातृभूमीपासून दूर गेल्यावर. बरंच गांभीर्य का काय ते बाळगून बाळगून...
मला भेटला अभ्या, त्या आधीपासून माझे मित्र होते. त्याला माहित होते. मान्य होते. काळाच्या ओघात आणखी होणार हे ही तो जाणून होता. ॲज द टाइम पासेस यू नो... ही हॅड हिज सेट ऑफ प्रायरिटीज... मी कधीच चॅलेंज नाही त्याला. बट हिज लव फॉर द ट्रॅडिशन... नॉट लव आय से, बट ऑब्सेशन- सॉरी- काय होतं बोलताना, नॅरेट करताना, बरंच इंग्लिश येतं माझ्याकडून. आय ट्राय टू अवॉईड, बट यू नो... हा कामाचा भाग आहे. हॅम्बुर्गला तर इंग्लिशही नाही जास्त चालत. जर्मनच. एकदा तुम्ही ग्लोबल झालात की हे आलंच. मग तुम्ही वर्ल्ड लिटरेचर वाचायचं, वर्ल्डली व्ह्यूव्ज समजून घ्यायचे की... आय आय अग्री... तुम्ही तुमच्या मुळाकडे प्रवास करायला लागता. मला आठवतं की माझं आजोळ! ते खेडगाव. जिथे आमचं रान होतं. शेती होती. आमचं म्हणजे माझ्या मामालोकांचं. आईला हिस्से दिले प्रॉपर. तिची अपेक्षा नसतानाही. आम्ही जात नव्हतो शेंदूर फासलेल्या म्हसोबाला? खेडेगावी राह्यचो चार दिवस तेव्हा रोज जायचो. पण म्हणून काही कोणी तेच धरुन उलटा प्रवास करत नाही. यू टर्न.. ऑर से अबाऊट टर्न...
हे हे म्हणाले मी अभ्याला तेव्हापासून आमचं जरा... “अबाऊट टर्न करु नकोस तू अभ्या!”... मी स्पष्ट म्हणाले. माझा स्वभावंच तसा आहे. ते जुन्या बायकांसारखं सजेस्टीव- काय ते सूचक- पुन्हा अभ्याचा शब्द.. नाय बोलता येत यार आपल्याला. थेट हृदयाला का काय म्हणतात तशी साद घालायची... तेच अभ्याला आवडलं नव्हतं माझ्यातलं?! थेट विचारलं होतं मीच. आर यू अग्री टू लिव विथ मी?... त्यानंच वेळ घेतला. आय वॉज डॅम शुअर अबाऊट मायसेल्फ! मला आत्मविश्वास यायला वेळ लागत नाही. निर्णय घ्यायला त्याहून नाही. आय लाईक्ड हिम. होते मला मित्र. सगळ्या थरातले होते समाजातल्या. इच अन एवरी स्ट्राटा. मी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधे होते. आरटीआय वर्कर म्हणून काम करत होते... खूप इंटरेस्ट होता मला त्या सगळ्यात. हत्त्या झाल्या काही माहिती अधिकाराच्या अधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या तेव्हा मी बराच फॉलोअप केला होता.. सिंगल हॅंडेडली... मग गवर्मेंट टॉपल झालं. नवं राज्य आलं. ते सहिष्णू की काय ते असेल, असं जनमत तयार झालं.. पण अंदरकी बात- तशा बर्‍याच होत्या- बाता... मला उमजायला लागल्या होत्या... सगळ्यात राहून राहून. वयही वाढतं ना... मुलींचं लवकर वाढतं म्हणायचे पूर्वी... समज येतेच... मला आलीच. मग मी हळू हळू बस्तान हलवलं जर्मनीला. इथली नाळ तोडायची नव्हती. जॉब अपॉर्च्युनिटी, वाढत चाललेलं वय, काम करण्यायोग्य परिस्थिती सगळ्याचा विचार होत जातो. ब्रेन ड्रेन म्हणा अथवा ब्रेन गेन म्हणा... अभ्या स्कॉलर होता. त्याची वाट तीच असणार होती. त्याला तर नाळ अजिबात तोडायची नव्हती...
...मला भेटला अभ्या तेव्हा एका अभ्यासगटात होता. जरासाच गंभीर. आतासारखा गांभीर्य कोळून प्यायल्यासारखा नव्हता. वेकेशनमधे एका एनजीओशी अटॅच्ड होता. हाईक्स, ट्रेक्स करत होता. इनसंस भावला होता त्याचा तेव्हा. निरागसता- त्याने सांगितला हा शब्द नंतर कधीतरी. मला ज्याम म्हणजे ज्याम आवडला होता तो शब्द... अभ्यासुद्धा. न आवडण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात... माझ्यातही... मला लग्न करायचं नाही ह्यावर मी ठाम होते. हां! हे कदाचित माझ्यातलं न आवडण्यासारखं होतं. बर्‍याच जणांना नाही आवडलं. भाऊंना देखील सुरवातीला अभिमान वाटायचा. भाऊवहिनी दोघांनीही वाढवलं मला ओपन वातावरणात. एकदम खुलं. मोठी आत्या टॉम बॉईश म्हणून टोमणे मारत रहायची. मी माझा अभ्यास, अवांतर वाचनाची पालकांनी लावलेली गोडी आणि माझं उपजत कम्युनिकेशन स्किल यात मश्गुल होते. म्हातार्‍याकोतार्‍यांशीही माझी चट्कन मैत्री व्हायची. अभ्याचं माझ्या उलट. अभ्या स्वत:तच असायचा. ग्रुपमधे असूनही एकटं असणं जमायचं त्याला. माणूसघाणा नव्हता. बोलायला, चेष्टामस्करी करायला लागला की भरभरुन करायचा आणि लगेच कसा काय बुवा डिटॅच्ड होतो हा?... मी एकदा ओठांचा चंबू की काय तो करुन त्याला विचारलं हे. तर तो आपला इसेन्स ऑफ इनसन्स... निरागसतेची दैवी मूर्ती. मग मला कळलं त्याला स्वत:ला त्याच्याबद्दलचं हे ठाऊकंच नव्हतं ओपिनियन. मग तो म्हणतो की त्यानं हळूहळू स्टडी करायला सुरवात केला स्वत:चा... मीही सुरवात केली दरम्यान त्याच्यासारखं डिटॅच्ड होण्याची. अलिप्त होण्याची. योग्यवेळी. योग्यप्रकारे. फार वाहून घ्यायचे मी स्वत:ला सगळ्यात. आणि मग त्रास मलाच व्हायचा. बुद्धी आणि भावना फार तरल आहेत तुझ्या- भाऊ म्हणायचे. वहिनी- म्हणजे माझी आई भाऊंच्या उद्गाराच्या मधे ’नको तेवढ्या तरल’ अशी पुस्ती जोडायची. कधी चिडलेली असताना कधी मज्येत... एकत्र कुटुंबातनं विभक्त कुटुंबात आले भाऊवहिनी त्या काळी. यावं लागलं. बरीच कारणं होती. मुळात डिसइंटिग्रेशनचा काळ होता तो. ही दुसरी पिढी त्यांची. भावंडांतला मोठा म्हणून भाऊ. भावंडं वहिनी म्हणायची म्हणून आम्हीही वहिनी म्हणायचो आईला. चंद्या- चंदन माझा धाकटा भाऊ आता युएसला असतो. वेल सेटल्ड. नो झिकझिक. इकडचा गणपती युएसमधे नेऊन जश्याचा तसा बसवावा तसंच. सगळं तसंच. वाईट काय म्हणा. सुखी आहे तो. ते महत्वाचं... तो असा कसा झाला चंद्या?... त्याचं त्याला माहित. भाऊवहिनींनी त्यालाही कधी आडकाठी केली नाही. वेळोवेळी समजुतीचे चार शब्द सांगितले मात्र...
तर... अभ्या आवडला. अभ्याला निक्षून सांगितलं लिव-इन म्हणजे लिव-इन. कितीही आवडलेला असलास तरी. अभ्यानं बराच विचार केला. घरी वगैरे सांगितलेलंच असावं. विचारही घेतले असावेत कुणाकुणाचे. मी कुणाचेच विचार घेतले नाहीत. माझा निर्णय सांगितल्यावर कुणी कुणी ते आपणहून दिले. भाऊवहिनींसकट. भाऊवहिनी मला प्रमाण होते. ते दोघेही मनाने खुले. दोघांच्या मनात कुचकुच असावी असं मला जाणवत होतं. कधी ती कमी दिसायची कधी जास्त. डिसकशन्स व्हायची. त्या डिसकशन्सचा एंड त्याना माहित असायचा. शेवटचं माझं भरत का काय ते वाक्य त्याना माहित असायचं. माझ्या दृष्टीनं विषय भरकटायचा नाही. त्यांच्या दृष्टीनं मी काही वावगं करणार नाही हयाबद्दल ते निश्चिंत होते...
वावगं... या शब्दावर माझी बरीच मतं आहेत. ती धाडसी वाटावी अशी आहेत नक्कीच. पण ती माझी स्वत:ची आहेत. मी ती अभ्यास करुन कमावलेली आहेत. अभ्यास म्हणजे पुस्तकी नव्हे. प्रत्यक्ष. इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस- समाज विज्ञान संस्थेत होते तेव्हा बरेच सर्वे केले. सगळ्या राज्यभर हिंडले. स्त्री हा विषय अध्याहृत असणारच होता... अनेक आयुष्यं बघितली. अशा आयुष्यांचं अवलोकन करत असताना आपण स्वत:लाही असेस करत असतो. कळत नकळत स्वत:बद्दलची धोरणं ठरवत असतो. मी मला नकळत वाटत असलेल्या गोष्टींनाही कागदावर मांडत गेले. लग्न न करता रहाणार्‍या मुलींचं वाढतं प्रमाण कुणाच्याही नजरेत भरण्यासारखं होतं. मी त्यामागची अनेक कारणं शोधली. नक्की काय गोची होते आहे? गोची होते आहे का नक्की?... इथपासून अनेक उलटसुलट प्रश्न स्वत:ला, संस्थेतल्या प्राध्यापकांना, विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना वेगवेगळ्या निमित्ताने विचारुन पाहिले...
एक मुख्य मुद्दा लक्षात आला प्रौढ कुमारिकांच्या प्रत्यक्ष जगण्यातला. स्वत:चं मन मारुन जगण्याचा. त्यात अनेकांसाठी म्हणून जगणार्‍या होत्या. विशिष्ट करियर फक्त कवटाळून जगणार्‍या होत्या. स्वत:च्या खाजगी इच्छांना तिलांजली देऊन जगणार्‍यांची संख्या प्रमाणाबाहेर होती. मी ते नाकारलं. पहिली नाकारली योनीसुचिता... हे तुम्हाला धाडसी वाटण्यापुरेसं नक्की आहे... योनिसुचिता न पाळणं आणि स्वैराचार करणं यात फरक आहे हे इथे मुद्दाम नमूद करते...
अभ्या लिव-इनला तयार झाला, त्याच्याच शब्दात विचार मंथनानंतर, त्याचं नाही म्हटलं तरी मला आश्चर्यच वाटलं... ‘तुला अभ्याच का आवडला?’ हा प्रश्न अनेकांनी मला विचारला, विचारतात. मी आधीच सांगितलंय एकमेकाना न आवडण्यासारखं आमच्यात काही नव्हतंच. शिवाय सामान्य संसार्‍यांप्रमाणे जन्मोजन्मीची ही गाठ नव्हती. लिव-इन कक्षेत आम्ही स्वतंत्र होतो... हे विधान जरा विचारपूर्वक करतेय मी... एकत्र या, रहा, वेळ आली की विभक्त व्हा हा जरी लिव-इनचा मूलमंत्र मानला जात असला तरी सढळपणे, सवंगपणे (दोन्ही अभ्याचे शब्दं) त्याचा वापर करायचा नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यानंही. तर... अभ्या आवडला. या आवडण्याला मला तसं एक्झॅक्ट लॉजिक सापडलं नाही, हे कबूल करते. मग तुम्ही अपोझिट पोल्स अट्रॅक्ट इचआदर म्हणा, प्रेम आंधळं असतं म्हणा.
अभ्याचं माझं इंटरॅक्शन, संवाद कितपत होता?... व्यवस्थित होता. एकमत होतं. माझ्या निरपेक्ष, खुल्या इत्यादी मनोवृत्तीला त्याचा आक्षेप नव्हता. होत्या त्याच्यात परंपरेशी जुळत रहाणार्‍या ट्रेट्स. त्याचं मला काही वावडं नव्हतं.
आमचं बॅकग्राऊंड, वाढलो ती परिस्थिती भिन्न होती. मध्यमवर्ग म्हणून एक टॅग असला तरी त्यात आपल्याकडे जात, मग तिच्या अनुषंगाने जडणघडण, व्यवहार, बोलचाल, जेवणखाण यात फरक असतो. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोण आपलेच पालक, आप्त पूर्वग्रहांनी वेढून टाकतात... इति अभ्याच... अभ्या कामगार वस्तीसारख्या वस्तीने वेढलेल्या मध्यम उच्चमध्यम भागातला. त्यांचं घर परंपराप्रिय होतं. सुखनैव सगळं चाललं होतं. कष्टातून वर आलेलं कुटुंब. व्यवहार आणि आधुनिकतेशी नात जोडणारंही होतं ते. त्याचे बाबा व्यवहारी होते. माणसं प्रिय असलेले. सणांच्या निमित्ताने अनेक कुटुंब या कुटुंबाशी जोडलेली. गावगाड्याशी अजूनही चांगलाच संपर्क होता... अभ्या स्कॉलर निपजला आणि तो आणखी काही डिग्रीज वर आला. मुख्य प्रवाह- हा त्याचाच शब्द- आता त्याला जवळचा होता... अभ्यासगट, ट्रेक, हाईक्स, वाचन, मित्रमंडळं, चर्चा... सगळ्यात छान गुंतला. म्हणून तर आमची भेट झाली...
अभ्याला त्याच्या परिस्थितीनुसार आम्हाला हवा होता तो निर्णय घ्यायला वेळ लागणं अपरिहार्य होतं... आमची थांबायची तयारी होती. तेव्हा आमच्या दोघांच्याही डोक्यात ग्लोबल होण्याचं नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगवेगळ्या रचनात्मक कामात दोघेही व्यस्त होतो. अभ्या माझ्यापेक्षा वयाने लहान होता- दोन, चार वर्षांनी. एक... zeal होती त्या वयात. दोघांच्याही ठिकाणी. लौकिकापेक्षा ज्ञानार्जन, भवताल समजून घेणं यात गुंततो नं आपण तसं...
हळूहळू भवताल बदलत असतो. बर्‍याच वेळा त्याची गति भल्याभल्या म्हणणार्‍यालाही थांग न लागणारी असते.
आम्ही एकत्र राहू लागलो. शहरात लगेच काही स्वत:ची जागा स्वत:च्या बळावर घेण्याची कुवत नसते कुणाची. दोघे मिळून असलो तरी. इनवेस्टमेंट्स वगैरेचा विचार अभ्याच्या डोक्यात होता. त्याचं कुटुंब, भावंडं होती. माझ्या डोक्यात तो विचार अजिबात नव्हता. अभ्या नोकरीला लागला. ती करून तो स्टार्ट अप लॉन्च करण्याच्या प्रयत्नात होता. मित्रांच्या मदतीने. ती सगळी उलाढालच होती. लायसन्सेस, हजारो परवानग्या, जागा... अशा कामांचा मला फारसा गंध नव्हता. मी सोशल सायन्सेस शिकवत होते. फिल्डवर्क करत होते... अभ्या अस्वस्थ होता. स्टार्ट अप्स तेव्हा काही कॉमन नव्हत्या... रेंटवर रहायचं, तेही शहराच्या मध्यभागात, कारण दोघांचाही कनविनियन्स... तेवढा रेंट भरायला प्रॉब्लेम नव्हता. डिपॉझिटची खटपट अभ्यानंच केली. माझा शेअर उभा करताना मला पहिल्यांदा कळलं गुंतवणूक इत्यादीचं महत्व...
आम्ही मजेत होतो. ठेवणारे नावं ठेवत होते. बर्‍याच नजरा मला सहन कराव्या लागत होत्या. अभ्याला अनाहुत सल्ले मिळत होते. लिव-इन शहराच्या आमच्या भागात तरी नवीनच होतं की. महानगर म्हटलं तरी...
आमचं खाजगी आयुष्य कसं होतं?... मी हे जरी ब्लॉगवर लिहून तुमच्यासमोर सादर करत असले तरी अनेकांसारखं सगळं पूर्णपणे सोशल साईट्सवर उघडं करणं मला मान्य नाही. मी स्पष्टवक्ती असले तरी. पहिल्यांदा एक क्लिअर करते... आम्ही दोघंही नऊ ते पाच किंवा दहा ते सहा आणि मग रात्री दहा-बारा अशा जातकुळीतले नव्हतो, नाही. हे मला कुणाला डिग्रेड करायचं, कमी लेखायचं म्हणून सांगत नाही पण आमचं सहजीवन सरासरी असतं तसंच नव्हतं. सेक्शुअल लाईफ समाधानकारक व्हायला काही काळ जावा लागतो तसा आमचाही गेला. दोघांनाही पुर्वानुभव होता. घरासंबंधातली कामं दोघात आपोआप वाटली जात. वॉशिंग मशीन येईपर्यंत कपडे सरळ लॉंड्रीला जात. खर्च झाला तरी सुटसुटीतपणा अपरिहार्य होता कारण रुटीन इतरांच्या मानाने जास्त जबाबदारीचं होतं. नुसती नोकरी करायची नव्हती. एकेकदा मी पाहिलेली, तेव्हा तुरळक असलेली जोडपी बर्‍याच काळानंतर कन्फ्युज होत. हे आपण लिव-इनमधे रहातोय की लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे रहातोय हे त्याना कळायचं नाही. काही वेळा दोघांचे आप्त चान्स घ्यायचे. बर्‍याचदा लिव-इनचं लग्नात रुपांतर व्हायचं... ह्या सगळ्यात अमुक चांगलं तमुक वाईट असं काही नाही पण सर्वसाधारण असं होत होतं असं म्हणता येईल. काही हा पार्टनर सोडून दुसरा असं सहजगत्या करत पण ते विशिष्ट क्षेत्रातले असत. विशिष्ट वर्गातले असत. आम्हीच बरोबर होतो असा माझा दावा नाही. शिवाय लिव-इनही इतकी रिजिड- बांधीव टर्म नाही असं मला वाटतं. अशा सोशल इश्यूजचे अर्थ माणसा, वर्गा, समूहाप्रमाणे वेगळे असू शकतात, लावले जाऊ शकतात...
घरातले सणसमारंभ हा एक मुद्दा होता. अभ्यानं स्वत:च माझ्याबद्दल घरी स्पष्ट करुन टाकलं. ती माझी लग्नाची बायको नाही. तिला जमेल, पटेल, रुचेल तशी ती सगळ्यात भाग घेईल. मी विरुद्ध घरातल्या इतर बायका असा सामना मी माझ्या हुशारीने संपवला. पलटवलाच नाही तर समंजसपणे सोडवला. घरातल्या, अभ्याच्या कुटुंबाशी संबंधित गावगाडयातल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीशी माझं चांगलं नातं तयार झालं. मला काय म्हणून संबोधायचं?- कॉमन प्रश्न. मी म्हणाले मला सरळ माझ्या नावाने हाक मारा. त्याना सुरवातीला जड गेलं सगळंच. त्यांच्या नजरा, माझ्या पाठीमागे त्यांचे माझ्या आणि अभ्याविषयी अभिप्राय, बोलणं, हसणं सगळं मी माझ्या स्वभानुसार सहज घेतलं, पेललं. मला सार्वजनिक जीवनाची सवय होती. ती इथेही कामी आली...
सभोवताल बदलत असतो. आपण वयाने वाढत असतो. काही घटनांचे दूरगामी अर्थ जेव्हाच्या तेव्हा आपल्या टाळक्यात शिरतातच असं नाही. आपल्या संबंधितांमधे होणारे बदल आपण पूर्ण तटस्थपणे पाहू शकतो का?... आपल्या आयुष्यात महत्वाचं काही वळण येतंय हे लक्षात आल्यावर आपल्याला मागचे सगळे संदर्भ, सगळे अर्थ जुळताएत असं वाटतं का?...
महानगरात बॉंबस्फोटांची मालिका झाली तेव्हा मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते. अभ्या कॉलेजमधेच असेल. आम्ही भेटलो तेव्हाच त्याचं इंजिनियरींग संपण्याच्या बेतात होतं... ती बॉंबस्फोट मालिका म्हणजे फार मोठा हादसा होता तो महानगरासाठी, इथल्या सामान्य लोकांसाठी. थेट प्रत्यक्ष संबंध न आलेल्यांसाठीही. गोदीतला मोठा बॉंबस्फोट ऐकले पाहिलेली मागची पिढी होती. पण ह्यावेळचं सगळं निराळं होतं... मी खोलात जात नाही. पर्यायानं हे बरंच ताजं आहे. अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा पक्ष सत्तेवर येण्यासाठी एखादं कॅंपेन करतो. ते धर्मावर अधिष्ठित असतं. त्याचा जोर वाढत जाऊन एक फार खोलवर परिणाम करणारी घटना घडते, घडवली जाते... त्याचा पडसाद म्हणून महानगरात एकाच वेळी दुर्दैवी स्फोटांची मालिका घडत जाते. सामान्य, ज्यांचा या सगळ्याशी प्रत्यक्ष, अर्थाअर्थी संबंध नाही ते यात हकनाक भरडले जातात...
अभ्या, मी भेटलो तेव्हा आम्ही एका ग्रुपमधे भेटत होतो. माझे असे अनेक ग्रुप्स होते. अभ्याचा हा पहिलाच सोशल ग्रुप असावा. शाळा, कॉलेज, आपण रहातो तिथला ग्रुप असे प्रत्येकाचे असतातच. सर्वांगाने वेगवेगळी मुलं मुली असणारा या अर्थाने मी सोशल ग्रुप अशी टर्म वापरते आहे. सगळे वर्ग, वर्ण, जाती इत्यादींनी बनलेल्या समाजाबद्दलचं भान आपल्याला अशा समुहामधनं, अशा वेगवेगळ्या समुहांमधनं येत असतं. मी अनुभवी, बोलकी आणि समाज हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे व्यक्त होत असे. अभ्या तुलनेने नवीन होता. अबोल होता. ऐकण्याचं काम तो उत्तम करत असावा. त्याचे पूर्वग्रह असतील, ग्रुपमधल्या चर्चा ऐकून नवे ग्रहही तयार होत असतील. त्यानं आपलं वाचन या काळात प्रयत्नपूर्वक वाढवलं.
आमच्या सगळ्याच सामान्यांच्या दृष्टीने त्या घटनेनंतरच्या काळात एक शांत मध्यंतर आलं... सगळे वैयक्तिक आयुष्यात स्थित्यंतराच्या प्रक्रियेत होते. आम्ही दोघं भेटू लागलो. फिरु लागलो. अभ्यानं नोकर्‍या केल्या. त्याला स्टार्ट अपचा किडा सुरवातीपासून चावला होताच... आम्ही एकत्र राहू लागलो. त्यानंतरचं सगळं वर आलंच आहे...
करियरमधेही आम्ही प्रगती करतच होतो. देश परदेश यांतल्या सीमा आता आमच्यासारख्यांसाठी पुसट होत होत्या. आम्हा दोघांमधे चर्चा होत. त्या इंटेन्सही असत. अनेक विषय, पुस्तकं, चित्रपट, नाटकं या सगळ्यांबद्दलच्या. मी बर्‍याचदा त्यातली जास्त जाणकार व्यक्ती असायचे. अभ्या ऐकून घ्यायचा. पटलं नाही तर बोलायचा.
नवं सरकार, अणुचाचण्या, सरकारातला त्रिशंकूपणा, घोटाळे, वेगवेगळ्या पक्षांचे उदय, नवे अजेंडे हे सगळं चालू असताना आमचं प्रत्येकाचं आपापल्या कामासाठी परदेशी जाणंयेणं चालू राहिलं...
हे सगळं तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलंय. तेच ते सगळं सांगत रहाण्यात काही हशील नाही. मला पोचायच्या मुद्याकडे जाण्यासाठी मी बांधत असलेल्या साखळीच्या या कड्या आहेत...
... तर माझ्या आता असं लक्षात येतंय की हळूहळू धार्मिकता, तिच्या अंगाने होणारं राजकारण, त्याचे दूरगामी आणि मूलगामी परिणाम याबद्दल मला काही निश्चित संकेत मिळायला सुरवात झाली. भवतालातूनच. मी माझ्या परखड, फटकळ म्हणा स्वभानुसार सामाजिकरित्या, खाजगीत अभ्याबरोबर व्यक्तही होत होते. माझ्या आता असं लक्षात येतंय की धार्मिकता, राजकारण आणि धार्मिकता अशा मुद्यांवर माझं- त्याच्या भाषेतलं प्रवचन- सुरु झालं की अभ्या गप्पच बसत असे...
या त्याच्या गप्प बसण्याच्या अर्थ मला लगेच का लागला नाही? मी माझ्या व्यक्त होण्यातच मग्न होते? मी अभ्याला गृहित धरलं होतं? अभ्याला त्याचं स्टार्ट अपचं क्षेत्र सापडलंय आता तो त्यात व्यस्त होतोय, ते सगळं उभं करण्यासाठी त्याला पूर्णपणे त्यावरच केंद्रित व्हावं लागतंय... एवढीच त्याच्या बाबतीतली माझी समज राहिली?... त्याचं या विशेष इश्यूबद्दल काही वेगळं मत होतं तर ते तो मांडत का नव्हता? मला दुखवायचं नाही म्हणून? मी त्याचं मत मानणारच नाही म्हणून? की त्याचं स्वत:चं काही निश्चित धोरण चाललं होतं त्याच्या मनाच्या तळात?...
दरम्यानच्या काळात आम्ही आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त व्यस्त होत गेलो. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली की सततचा प्रत्यक्ष सहवास आणि वर्च्युअल सहवास यात फार काही वेगळं नाही असं आम्हाला, मला वाटायला लागलं? की अनेक वर्षांच्या सहवासामुळे एक अलिप्तपणा येऊ लागतो, फिजिकलीही आपण आपोआप अंतरानेही दूर होऊ लागतो?...
याच दरम्यान आमचा फ्लॅट झाला. दोघांनी कर्ज काढून. तोरण, हाऊस वार्मिंग इत्यादी... तेव्हाही अभ्यानं सगळं लाईटलीच घेतल्यासारखं दाखवलं?... मी लग्नाची बायको असते तर त्याचा पवित्रा वेगळा झाला असता?... आम्ही दोघं आपापल्या व्यवसायाच्या देशात आता जास्त काळ व्यतीत करत होतो...
या, यानंतरच्या काळात तुम्हाआम्हाला माहित अनेक असलेल्या घटना घडलेल्या आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटत होतो तेव्हा एकमेकांच्या सहवासात मोकळे होत होतो. गप्पा, चर्चा, ग्रुप्स, मित्रमंडळी सगळं सगळं त्या त्या वेळी अतिशय नॉर्मल पद्धतीने, माझ्यामते चालू राहिलं होतं...
आमच्या दोघांतला नेमका सल अभ्यानं आधीच जाणला होता? तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असलो, असले- तरी आपण अभंगच रहायचं असं त्यानंही ठरवलं होतं?... की त्याचं काही वेगळं धोरण आतल्याआत ठरत होतं?... तो अतिशय कनींगली ते त्याच्यापाशी ठेऊन आहे?... आणि मी मात्र सगळं खुलं ठेऊन वावरते आहे... असंच आहे सगळं?
आजच मला हे सगळं तीव्रतेने का जाणवतं आहे?... मी माझी तीव्रता व्यक्त करत सुटायचं आणि अभ्यानं ती आत वळवून ठेवायची?... गाठीला बांधून?...
बर्‍याच काही तुम्हा- आम्हाला माहित असलेल्या गोष्टी घडल्यात भोवतालात. अनेक मोठे धर्माधिष्ठीत हल्ले झालेत, दंगली झाल्यात... दंगल थांबवू शकणारा पण तसं न करणार्‍याला जेव्हा सर्वेसर्वा पद मिळतं... अनेक शिकले सवरलेले, तरुण, प्रौढ आनंदाने त्याचं गुणगान गाऊ लागतात... मला आश्चर्य वाटू लागतं... पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल साशंकता वाढू लागते... अभ्या यांच्यातलाच आहे?... तो माझा आहे म्हणून मी त्याला वेगळा मानते आहे?... बदलत चाललं आहे सगळंच? समाजसुधारकांच्या हत्या होतात... त्यांचे तपास अधांतरीच रहातात... याबद्दल अभ्याचं नक्की काय मत आहे?...
माझ्या स्वभावाप्रमाणे मी जास्त वाट पाहिलेली नाही तुम्हाला सांगते...
मी आणि अभ्या भेटतो आहोत. लवकरच. मला काही गंभीर बोलायचंय, अशा माझ्या संदेशाला अभ्यानं होकार दिलाय. हे समाज माध्यमांचे दिवस आहेत. आम्ही दोघंही समाज माध्यमातल्या साईट्सवर सतत हजर नसतो. पण तरीही कळत नकळत माझं निरीक्षण चालू असतं. समाज हा माझा जवळचा विषय. अभय, त्याचे व्यवसायातले आणि इतर मित्र यांच्या चॅट्स मला वाचायला मिळतात. व्यावसायिक म्हणून अभ्याला माझ्या शब्दात- काही प्रमाणात तरी बोटचेपं रहावं लागणार -हे मला मान्य आहे. पण... ही पण नंतरची टिंबं मी आमच्या भेटीत अभ्याकडून समजून घेणार आहे...
लग्नाशिवाय एकत्र रहात असतानाही काही गोष्टी सहन करायच्या असतात, पाळायच्या असतात. मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही केवळ नऊ ते पाच काम करुन एकत्र रहाणारे नाही. तरी एकमेकांच्या सवयी एकमेकाला आपापल्या सवयीच्या करुन घ्याव्या लागतात. ते दरवेळीच तितकं सोप्पं असत नाही. साध्या साध्या गोष्टी वेगळं होण्याच्या मार्गावर आपसूक नेऊ शकतात.
यापेक्षाही मला या संबंधात असं जाणवतं की खोलवरच्या तुमच्या मानसिकता एकमेकांशी जुळतात का? तुम्ही सहजगत्या, प्रेमाने त्या जुळवून घेता का?... खोलवरच्या मानसिकतेतून वरचे, वरवरचे सगळे विचार, कृती प्रकट होत असतात. माझी एक ठाम मानसिकता आतापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल. दूरगामी सामाजिक परिणामांबद्दल मी वैयक्तिक आयुष्यातील परिणामांइतकीच दक्ष आहे... काकणभर जास्तच...
अभ्याबद्दल मला संदेह आहे... आम्ही भेटतो आहोत... त्यानंतर कदाचित आमच्या दोघांची नवी सुरवात होईल. शुभ सुरवात.
आजवर या ब्लॉगवर समाजासंबंधातले माझे विचार तुम्ही वाचलेत, प्रतिक्रिया दिल्यात. आज मी माझ्या वैयक्तिक जीवनासंबंधी पहिल्यांदाच व्यक्त होतेय... तुमच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत... मी वाट पहाते आहे...
पुढची ब्लॉगपोस्ट, तुमची उत्सुकता असेल, तर माझ्या आणि अभ्याच्या भेटीनंतर नक्की... गुडबाय...


No comments: