romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, October 26, 2009

"वसा" दिवाळी अंकातल्या माझ्या दहा कविता

मित्रांनों वसा दिवाळी अंकात माझ्या खालील दहा कविता घेण्यात आल्या आहेत!

वसातलं इतरही साहित्य आपण वाचण्याजोगं आहेच!

कबीर प्रकाशन ९८२०५०७३४२ हे आहेत वसाचे प्रकाशक!

बाप

धुकं

ठिपका

मनोव्यापार

मी...झाड...संध्याकाळ...

मी जागा आहे

ब्रेव्हो मदर!

भर गर्दीतून...

प्रतीक्षेस...

आयुष्य

Saturday, September 5, 2009

कमीने! आणि विशाल भारद्वाज जॉनर...

मित्रांनो, कमीने बघितलात की नाही? मी दुसऱ्य़ाच दिवशी बघितला.त्याचं कारण विशाल भारद्वाज हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक! त्याचा "मकबूल" बघितल्यावर मी त्याच्या प्रेमात पडलो! शेक्सपिअरच्या "मॅकबेथ" या नाटकाचं हे बॉलिवूड रुपांतर.विशालने यात त्याच्या पठडीप्रमाणे गुन्हेगारी पाश्वभूमी वापरली आहे. यात भावलेली गोष्टं म्हणजे तब्बू आणि इरफ़ानखान यानी साकारलेल्या पात्रांमधला नात्याचा विकास त्याने अप्रतिम दृष्यांतून केला आहे! सहकुटुंब दर्ग्याला भेट द्यायला जाताना डॉन-पंकज कपूरची पत्नी तब्बू हीनं आपला जुना आणि कायमचा प्रेमवीर, डॉननं आश्रय दिलेला आणि त्यामुळे हतबल असलेला-इरफ़ान याला आपल्या जाळ्यात पूर्ण अडकवणं हे दृष्य खूप भावलं होतं.दुसरं दृष्यं शेवटाचं, इरफ़ानच्या गेमचं! इरफ़ानच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, अप्रतिम कॅमेरावर्कने ते दृष्य संस्मरणीय केलं आहे!
त्याने बनवलेला पहिला चित्रपट "मकडी"ही केबलवर पाहिला तोही आवडला होताच!
"ओंकारा" पुन्हा शेक्सपिअरचा बॉलिवूड अथेल्लो! हा मकबूलपेक्षा जास्त ग्लॉसी, चकचकीत वाटला.विशालचं व्यावसायिक चित्रपटाकडे जाणं! यात प्रचंड भावला सैफ अलि खान! मकबूलमधला इरफान, शेवटी स्वत:चा रक्ताळलेला चेहेरा, तश्याच भिंतीं यांचा भास होऊन संपूर्णपणे खचून जात असलेली लेडी मॅकबेथ तब्बू याना विसरता येतच नाही पण त्यांच्याबरोबर अपरिहार्यपणे दॄष्यंही येतातच.पंकज कपूरलाही आठवा!
ओंकारामधे सैफ अलि खान सगळ्यांच्यावर लक्षात रहातो, अजय देवगण आणि करीना कपूर हे चांगले कलावंत आणि त्यांच्या भूमिका उत्तम लिहिलेल्या असूनही, हे लक्षात घ्या!! आणि तो करीनाच्या हळदीचा सीन! एक तगडं गिमिक विशालनं इथे वापरलं होतं! मकबूलमधे इतक्या उघडपणे त्याने असं केलेलं आढळत नाही! तरीही घारीच्या तोंडातून सुटून अचूक हळद भिजवलेल्या पात्रात आकाशातून पडलेला साप, त्यामुळे सर्वत्र फासली गेलेली हळद यामुळे दष्यात्मक, आशयात्मक आणि सिनेमॅटिक असा उत्तम परिणाम साधला गेलाच.शिवाय बिहारी परंपरावादी पार्श्वभूमीवर तो संयुक्तिक वाटला.पण एवढंच होतं का? विशाल आणि त्याचा सिनेमा त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे हे आम्हाला कळलं! मकबूल तेवढा पोचला नव्हता!!
...मित्रांनो, आणि "कमीने"चं काय झालंय? त्यामुळे विशाल आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचलाय! विशेषत: सर्व तरुण वर्गापर्यंत! "ढँट्नान" ची झिंग तुम्ही चित्रपटगृहात अनुभवली आहे का? सगळ्या वयाच्या लोकांना, एकावर एक आदळून डोळ्यांवर आघात करणाऱ्य़ा प्रतिमा आणि कानांचा पडदा फाडून टाकणारा ताल आणि शब्द (पंच्याहत्तरीतल्या गुलजारचे?) नीट ऐकू येत नसूनही झिंगल्यासारखं होतं! विसर्जनाच्या डीजे आणि जनरेटर, नाशिकबाजाग्रस्त मिरवणुकीला कितीही नावं ठेवली तरी एखाद्या वृध्दालाही आतून झिंग येत असते तसं! वाढत चाललेल्या प्रचंड ताणांमुळे झिंग येत रहावी आणि थोडा काळ का होईना वास्तव विसरावं ही मानसिकता वाढत जाणार आहे मित्रांनो! आणि विशाल भारद्वाजनंही ते बरोबर ओळखलंय!
शाहीद कपूर दोन्ही भूमिकांमधे लक्षात रहातो. प्रियांका ज्या माझ्यासारख्यांना आजवर अजिबात आवडली नाही त्याना ती यात बरी वाटते. तारे जमी पर वाला अमोल गुप्ते अप्रतिम! विशालनं लिहिलेलं पात्र तो तंतोतंत जगलाय.चार्ली-शहीदच्या घरात मिखाईलला वेताच्या झोपाळ्यावर बसवून मारण्याचा सीन विशालचा कमीनेमधला परमोच्च बिंदू वाटतो.विशालचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गाढा आहे का? अमोल खूपच चांगला अभिनेता आहे!... पुढे काय? पुढे?...
विशालनं सुरवातीच्या मुलाखतीत चित्रपटाचा बेस पुन्हा शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एररचा असे म्हटल्याचं आठवतं.त्याबरहुकुम यात दुहेरी भुमिकांच्या घोळाव्यातिरिक्त काही नाही, असलंच पाहिजे असंही नाही. अमोल गुप्तेच्या भोपे भाऊ या पात्रासंदर्भात वस्तीतला एक लहान मुलगा आणून, मग कधीतरी त्याला गणपतीचा मुखवटा चढवला आणि तो काढून तो भोपेकडे लाच मागतो असं दाखवून विशालला काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत नाही. गुड्डू-शहीदच्या एंट्रीला एड्सच्या गाण्याचे प्रयोजन कळत नाही.भोपे आणि गुड्डू यांच्यामधल्या शेवटाकडे जाणाऱ्य़ा प्रसंगात परप्रांतीय अस्मिता वगैरे विशाल जास्त ठळकपणे आणतो असं वाटतं. त्याला स्वत:ला बरेच दिवस मनात ठेवलेलं काही म्हणायचं असल्यासारखं. हा पुन्हा जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न?
जुळ्याभावांच्या पूर्वायुष्याचा पट बघताना कधी नव्हे ते कंटाळायला होतं जे विशालच्या सिनेमात सहसा होत नाही.विशेषत: विशाल इथे टिपिकल बॉलिवूडपेक्षा वेगळं काहीच दाखवत नाही आणि असलेलं कंटाळवाणं होतं. त्याला टिपिकल बॉलिवूडी भुतकाळ दाखवायचा होता तर मग सगळे आक्षेप पत्करून स्लमडॉग डॅनी बॉईलचा बॉलिवूड फिल्म्सचा, जॉनरचा, अभ्यास जास्त चांगला होता असं विधान करावसं वाटतं.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ताशी या पात्राचा सगळाच पट कळत नाही, त्याचं प्रयोजन कळत नाही. कस्ट्म किंवा तत्सम ऑफिसर्सचे सीन मार्मिक होतात.
क्लायमेक्स पुन्हा कृत्रिमरित्या घडवून आणवल्या सारखाच वाटतो. पोलिसांबरोबरचा भोपेचा बार्गेनिंगचा प्रयत्न पुन्हा मार्मिक! पुनरुक्ति होईल पण भोपे, लिखाणात आणि अमोल गुप्तेमुळे सगळ्यांच्या वर कमीना वाटतो!
शेवट पुन्हा मार्मिक!
मित्रांनो अनेक गोष्टी निसटत जातात, पुरेश्या स्पष्टं होत नाहीत. एकिकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न आणि एकिकडे अस्पष्टता, जुळ्या भावांच्या भूतकाळाचं नीरस डिटेलिंगही! एड्सच्या गाण्याचं प्रयोजन गुड्डूच्या न दाखवलेल्या गेलेल्या पार्श्वभूमीत होतं? मग ते संकलनात गेलं? विशाल भारद्वाजच्या चित्रपटात संकलनाचा घोळ?
मित्रांनों, चित्रपटातून तुला नक्की काय सांगायचं आहे? असं दिग्दर्शकाला विचारायचा अट्टहास करू नये असं म्हणतात पण विशालला कमीने दाखवण्याव्यतिरिक्त काय म्हणायचं आहे हे समजत नाही अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. आपल्याला सिनेमाची गोष्टं पूर्ण होऊन काही मिळाल्यासारखं वाटावं लागतं तसं वाटत नाही असं सार्वत्रिक मत.
मित्रांनो, जास्तीतजास्त व्यावसायिकतेकडे जाण्यातही गैर काहीच नाही पण विशाल त्याच्यासारखा (त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा) वेगळा रहावा असंही वाटत रहातं.
मित्रांनो, माझ्यासारख्यांसाठी विशालने, आपला पुढचा प्रवास कसा असणार याबद्दलची उत्कंठा, प्रचंड वाढवून ठेवली आहे हे मात्र निर्विवाद!

Friday, July 24, 2009

खेळणं

माझं

खेळणं

झालं स्वतंत्र

शोधतोय

आठवणींचा फडताळ

उसनी समज पांघरून

म्हणतो

आजपासून

फिसकारणं बंद केलं आहे

खरा बाप होण्याच्या प्रयत्नात आहे...

Monday, July 13, 2009

निळूभाऊ!

निळूभाऊ! तुमच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू? तुमच्या व्यक्तिमत्वानं रंगमंचावर, पडद्यावर आणि त्याबाहेर भाराऊन जाणं या व्यतिरिक्त काहीच भावना मनात रहात नाही.तुमचं काम डोळेभरून फक्तं पहात रहाणं, बारकाईने पहात रहाणं एवढंच.एकदाच तुम्हाला भेटायचा योग आला तेव्हा तुम्ही सांगत होता ते नाटक बघितल्यामुळे तुम्हाला आठवलेल्या पुस्तकाबद्दल.नाटकातले तुम्ही आणि एरवी वावरणारे तुम्ही.एरवीचं तुमचं निर्व्याज हसणं, तुमचं रिलॅक्स्ड चालणं-बोलणं आणि नाटक-चित्रपटातल्या भूमिकांमधे शिरल्यानंतरचं तुमचं संमोहित करणारं वावरणं.निळूभाऊ! चांगलं, उत्तम असं संपत चाललं आहे असं काहीसं नकारात्मक मनात येत रहातं तुमच्या जाण्यानं.तुम्हाला ते कधीच आवडलं नसतं.नाट्यशिक्षण वेगळं काही नसतं तर आयुष्यभर मिळवलेल्या शिक्षणाचा तो एक भाग असतो.हे आयुष्यभराचं शिक्षण मिळवायला शाळेत जावं लागत नाही तर बरंच काही देण्याच्या मोबदल्यात ते निष्ठेने मिळवायचं असतं.तुमच्या पिढीकडून हे शिकलो आम्ही तरी खूप आहे... सततची तगमग हे चांगल्या माणसाचं भागधेय असतं... ती तगमग शांत व्हावी... तुमच्या आत्म्याला शांती लाभावी... तुमचं काम नक्कीच पुढे चालू रहाणार एवढं वचन आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला द्यावं हीच तुम्हाला श्रध्दांजली...

Friday, July 3, 2009

ध्वनिमुद्रण "माझ्या आजोळच्या गोष्टी"

नमस्कार!
३० जूनला अस्मिता वाहिनी, आकाशवाणी मुंबई वरून प्रसारीत झालेल्या
माझ्या आजोळच्या गोष्टींचे ध्वनिमुद्रण खालिल लिंकवर आपण जरूर ऐकू शकता!
http://www.esnips.com/doc/6dc4838a-8bfe-43ef-84af-5e3708eace75/Mazya-Ajolchya-Goshti_300609



Monday, June 29, 2009

Mazya Ajolchya Goshti @ 10pm, Tusday,30th June on AIR,Mumbai!!!

Listen To Me!

Listen To My Childhood Tales in SAHITYA SAURABH!!

On ASMITA Channel of All India Radio, Mumbai!!!

"Mazya Ajolchya Goshti" @ 10 PM On Tusday, 30th June!!!!


Thursday, May 14, 2009

त्यानं आपला रस्ता पकडला...

पुन्हा एकदा त्यानं आपला रस्ता पकडला.

आपला रस्ता पकडणं हा त्याचा स्वभावधर्म होता.

सरळसाध्या माणसाचा असतो तसाच.

रस्ता पकडणं आणि पुन्हा नव्या रस्त्याकडे ओढलं जाणं,

ही कुतरओढ, हे त्याच्या जीवनाचं भागधेय होतं.

त्या कुतरओढीत नको तेवढं गुंतून निष्क्रीय झालो आहोत,

असं सतत स्वत:बद्दल निदान करणं हे ही.

सरळ साधा माणूस म्हणजे सर्वसाधारणपणे सरळ साधा.

निखळ सरळ साधा असणं कुणाला झेपतं?

त्यानं पहिल्यांदा आपला रस्ता केव्हा पकडला?

परत परत नव्या वाटणाऱ्या रस्त्याला तो लागत होता,

तो त्याचा आपला रस्ता होता की

ज्याला तो आपला रस्ता समजत होता तो?

हल्ली त्याचा जाम गोंधळ उडतो आहे...

 

अभिलेखवरचं हे माझं शंभरावं पुष्पं(?)