…चला बाई!…आज एवढ्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची…यथासांग सगळं पार पडतंय!शेजारणी चिडवत होत्या सारख्या…मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!...मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!...मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन…त्याच्या ह्या जेवणावळी.जास्तीत जास्त माणूस जेवून जायला हवं!...काही कमी पडता उपयोगी नाही!महादेवानं काही कमी पडू दिलं नाहीये मग-
“माई कुणी बैरागी आलेत दारावर.ते-”
“अगं, बोलाव, बोलाव नं त्याना आत!दारात कशाला तिष्ठवलंस?बोलाव!”
“माई ते आधी तुम्हाला भेटायचं म्हणतात”
“मला... बरं… हे घे!हे पात्र आत देऊन ये बरं तू!”
दारात दोन बैरागी.एक प्रौढ, पांढऱ्या मिश्या, पांढऱ्या जटा, दोन्ही वयापेक्षा लवकरच पिकलेल्या.कपाळावर भस्माचे पट्टे.गंधसुध्दा.नजर, रागीट, आडमुठी.दुसरा पोरगेलासा.तो हसला.निरागस.हसणं तसंच चेहेऱ्यावर, त्यामुळे वेडगळ वाटणारं.चेहेऱ्यावर सतत वाहणारा घाम.तो म्हणाला, “बाई, माई, ताई, आई-भिक्षा!” आणी स्वत:च ठसका बसल्यासारखा हसला.आभिप्रायार्थ बरोबरच्या प्रौढ बैराग्याकडे नजर टाकली.प्रौढ तसाच एकटक, निर्विकार, ऑलप्रूफ नजर.कोऱ्या कापडाच्या चिध्यांसारखा फाटत जाणारा त्याचा स्वर, “ आम्हाला हवी ती भिक्षा मिळेल?”
“महाराज, आज घरात काही कमी नाही! आज महाव्रताची सांगता-”
“बाई पुन्हा विचारतोय, आम्हाला हवी ती भिक्षा-”
“जरूर महाराज, आज्ञा व्हावी!”
“मुसळ आणा!”
“महाराज, मु-”
“उखळ कुठे आहे?”
“महा-हे काय…चलावं…स्वयंपाकगृहाकडे चलावं!”
दुसरा, तो तरूण बैरागी हसतोय तसाच-मघासारखा.त्याच्याकडे पाहिल्यावर ‘तुम्हाला काही कळणार नाहीऽगंमत आहे आमची!’ अश्या अर्थाचं हसणं…पांचट… ह्या बैराग्याना काय हवंय?...
“चल रे, चल स्वैपाकघरात!”
बाईऽऽऽमाझ्या मुलाला नेतोय हा आत?स्वयंपाकघरात?...आई गंऽऽऽत्या हसणाऱ्या, घामेजलेल्या तरूण बैराग्याने माझ्या मुलाला उचललंय आणि-आणि-आणि-
ती जागी झाली.धडपडतच.तो पत्र्याच्या खुर्चीत बसलाय.तांब्याच्या मोठ्या भांड्यातून पाणी पितोय.तिच्याकडे बघून हसला.हसणं कमीच.कुणाची फजिती झाली तरच.एरवी…घाईघाईत तिनं सगळं उरकलं.तशीच मोरीत शिरली.दरवाजा लावला.थंडगार पाणी रोजच्यासारखं डोक्यावर ओतून घेतल्यावरच ती तयार झाली-दिनक्रमासाठी…आंघोळबिंघोळ आटपून त्याचंही सुरू झालेलं साग्रसंगीत…ठाण मांडून…खोलीच्या मध्यभागीच…लोकरी आसनावर… “अरविंद माहोम…अथम सोमो कृतम सोमो…सोमाय नम:… मैत्र मैत्र वान भवती…मैत्र मैत्र…”