पाऊस
पाठीवर झेललेल्या गारा
गारेगार झालेलं तोंड
आभाळ फाटून कोसळणारं पाणी
“कपडे भिजले आजारी पडाल”
म्हणून आजीनं घातलेले धपाटे
पाऊस
आयुष्याची सुरवात
इमारतीचं चालू बांधकाम
त्यावरून गळणारं पाणी
ओल्या सिमेंटचे वर जाणारे जिने
वर्गात दाखल होणारा मी
पाऊस
छपरावर होणारा आवाज
रात्रीसारखा दिसणारा दिवस
नळासारख्या गळणारय़ा पागोळ्या
मधूनच चमकणारं आभाळ
दार बंद केल्यावरचा काळोख
आईच्या कुशीत
पांघरूणात गुरफटलेला मी
पाऊस
छत्री न नेणारा मी
पोटात घातलेल्या कॉलेजच्या वह्या
लोकलाजेस्तव डोक्यावर घेतलेला रूमाल
शहारून जाणारं अंग
वडलांना काही कळणार नाही याची खात्री
आईनं पुसलेले केस
पाऊस
गार हवेनं आलेली जाग
डोळे चोळत उठलेला मी
ओढ्याला आलेला पूर
कॉलनीत शिरलेलं पाणी
बंद झालेल्या लोकल्स
खिडकीत हातावर हनुवटी ठेऊन
आरपार बघत रहाणारा मी
पाऊस
भन्नाट झालेला मी
ऑफिस सुटल्यावर चालत एकटा
समुद्रावर सुरू झालेला पाऊस
ठरवून भिजत भिजत पुढे
मोकळं झालेलं मनावरचं मळभ
लाटा मोटारी रस्ता माणसं
सगळीकडे धुकंच धुकं
दाटलेली भिती म्हणजेच
जगावसं वाटणं
स्टेशनमधे शिरताना
ओथंबणारय़ा माझ्याकडे
आ वासून बघणारय़ा मुली
पाऊस
नव्या जीवनातला पहिला
स्वत:चं घर आणि माणूस
वातावरणात घरंगळलेलं आभाळ
खाली गुडघ्याएवढं पाणी
तरीही पाण्याची बोंब
गच्चीतून भरलेल्या पाण्याची
गारगार आंघोळ
पाणी नाही म्हणून
घर सोडून निघालेलो आम्ही
पावसातच
पाऊस
२६जुलैचा
महाप्रलय आणणारा
जुन्यातलं काय राहिल
आणि नव्यानं काय उगवेल
याची शाश्वती न देणारा
माणसाच्या जीवनेच्छेला
मात्र सलाम ठोकणारा
पाऊस
यापुढचा कसा?
असाच
नेमाने येणारा
वळणावणावर भेटणारा
आयुष्याचा प्रत्येक!
No comments:
Post a Comment