romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, February 18, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (४)

भाग ३ इथे वाचा
महेश तरातरा आत गेलेल्या आईकडे पहातोय, "गौरूऽऽ आई चिडते! चिडतेय आई! आल्यापासून मी एक बघतोय गौरूऽऽ-" आता गौरी वैतागलीये, "काय रे महेश?" महेश नेहेमीसारखा कात्रीत सापडलेला, "आता तुला काय झालं चिडायला?" "महेश अरेऽ तुला कितीवेळा सांगितलंय मला पाहिजे तर हाक मारू नकोस! पण हे गौरू काय?" महेश नेहेमीसारखाच, "काय?"
"गावातल्या तुमच्या त्या गोठ्यात गेल्यासारखं वाटतं अगदी!"
"अगं गोठ्यात कुठली जातेस? आईकडे बघ!"
"कुणाच्या?"
"आता कुणाच्या! माझ्या!"
"काय बघू?"
"अगं आपली ’ही’ बातमी कळल्यावर ती खूष नाही झाली!"
"नेहेमीचच!" गौरी केसांच्या पिना सोडून केस मोकळे करत आरश्यात बघतेय.
"काय?"
"अरे चेहेराच तसा असतो त्यांचा नेहेमी!.. असा!" गौरी शांताबाईंची नक्कल करायची संधी साधतेच.
"एऽऽ तसं काय नाहीये हं गौरील्ला!"
"काय रे महेश! आता गोरीला काय?"
"आईचा चेहेरा ’असा’ काय! आणि तुझा?"
"तो ’ह्या’च्या मुळे झालाय रे!" गौरीनं अगदी सटली आपल्या वाढलेल्या पोटाकडे कटाक्ष टाकलाय.
"कशामुळे? अं?ऽऽऽ"
"काय रे हे?ऽ शी:ऽऽ मह्यू!" गौरी लाडीकपणे महेशचा हात हातात घेते.
"हाऽ हाऽऽ हाऽ मह्यू! आत्ता?ऽऽ"
"हॉऽ हॉऽ हॉऽऽ ऑत्तॉ!.. आता विसरा ते! .. मी काय म्हणते-"
"काय?"
"आपल्या दोघानाही दुसरं मूल हवं होतं!"
महेशनं गौरीचं हात हातात घेतलाय, "हो नं!"
"अंकितही खूप एकटा एकटा असतो हल्ली! खूप हट्टी झालाय तो! दोन मुलं हवीतच!"
"अगं दोन काय? मेरा बस चले तो मैं-"
"बस! बस! बस! आता बस! पुढे सगळं कसं पार पडणार आहे त्याचं टेन्शन आलंय मला आत्ताच!"
"अगं टेन्शन कशाला घेतेएस? बघ कसा फुलासारखा जपतो तुला!"
गौरी हसते.
"काय झालं हसायला?"
"ते दिसलंच मघाशी बाहेरून येताना! ह ह ह.. काही महिन्यानी उचलून घेऊनच नेशील आणि आणशील!.. हा हा.."
"दाखवू! दाखवू कसं ते!" तो तिला उचलायला जातो.
"एऽऽ नको! नको! नको रे! तुला एक सांगितलं कि तुझं- नकोऽऽ-"
शांताबाईंची त्या दोघांवर नजर असल्यासारख्या त्यांच्या हाका सुरू झाल्याएत.
"गौरीऽऽ महेशऽऽ चला!ऽऽ झालंय का तुमचं?"
दोघेही हसत हसत बेडरूमबाहेर पडून स्वैपाकघरात शिरतात. समोर शांताबाई मान वळवून उभ्या.
"चला! जेवून घ्या लवकर!"
गौरीला शांताबाईचा मूड जाणवलाय. ती महेशकडे सहेतुक पहातेय.
"आई.. तुम्ही नाही घेणार जेवून?"
"गुरूवारी रात्री मी कधी जेवते का?"
"अगं असं काय करतेस गौरी? गुरूवारी रात्री आई कधी जेवते का? चार केळी, दोन सफरचंदं, तीन संत्री आणि ग्लासभर दूध नाही का घेत ती-"
शांताबाई वैतागलेल्या, " महेऽऽऽश-"
"नाही आई! अगं गौरी विसरली असेल! अगं, आज आम्ही डॉक्टरकडे जाऊन आल्यापासून ती-"
"महेश! सकाळी सातची एशियाड कितीला येते?" शांताबाई थेट निर्वाणीलाच जाऊन पोचल्याएत.
"असं काय करतेस आई! सातलाच!.. पुण्याहून उमेशकडून कुणी येणार आहे?"
"मी जाणार आहे!"
शांताबाईंच्या या पवित्र्यानं महेश-गौरी दोघेही हैराण. दोघेही ’कुठे?ऽऽ’ म्हणून किंचाळताएत.
शांताबाई आता शांत झालेल्या, " पुण्याला! सातची एशियाड स्टॅंडवर कितीला लागते ते सांग!"
"अगं पण अशी अचानक कशी जातेएस तू पुण्याला?"
"एशियाडने!"
"ते कळलं गं पण-"
"मला जायचंय, माझं एक महत्वाचं काम-"
"ठीक आहे! परत कधी येणार आहात आई?" आता गौरीही चार्ज्ड झालेली.
"येणारच नाहिए!"
महेश हादरलेला, "अगं का? का आई? काय झालं?"
"आमचं काही चुकलं का आई?"
"गौरी तू अंकितला बघ! आत जेवतोय तो!"
"ते बघते मी! पण आई तुम्ही एकदम अश्या-"
त्याचवेळी अंकित ताटावरून उठलाय, " आज्जीऽ ममाऽऽ शी आलीऽऽ"
महेश वैतागलाय, " नेहेमीचंच आहे! नेहेमीचंच आहे! जेवताना याला शी लागणार म्हणजे लाग-"
"चल! चल! आत चल!" गौरी अंकितला  घेऊन आत जाते. महेशला एकट्याला आता किल्ला लढवावा लागतोय.
"अगं पण आई, उमेशकडून काही निरोप आलाय का?"
"नाही!"
"मग?.. अगं आई काही स्पष्टं बोललीस तर मला समजेल तरी की-"
"मला कंटाळा आलाय इथे!"
’हात्तिच्याऽऽ एवढंच ना! एक काम करतो! जुन्या हिंदी सिनेमांच्या सीडीज आणतो उद्याच! अं? हं! मग?"
"एक गोष्टं ऐकत नाही अंकित!"
"अगं लहान आहे तो! आत्ता कुठे सात वर्षाचा झालाय- आणि मी ओरडीन हं ओरडीन त्याला आता आला की!"
"आज कडीच लावली त्याने!"
"कुठली?"
"रिकामजीच्या घराची!"
"हा हा हाऽऽ कोण कडले काका? हा हा हा.. म्हणून तू पुण्याला जातेएस?"
"महेश मला झेपत नाही आता सगळं!"
"अगं असं काय करतेएस आई? तूच म्हणालीस नं मी सांभाळीन अंकितला! त्याला दुसर्‍या कुणाजवळ ठेवायचं नाही! पाळणाघरात तर नाहीच नाही! आणि आता तूच-"
"तू आपला मला सोड उद्या सकाळी मी जाते आपली पुण्या-"
"असं करू नकोस आई! तू कायमची गेलीस की सगळा घोटाळा होईल! मला आणि गौरीला थोडा वेळ तरी दे! अगं शेजारी बघतेस नं तू? बघतेस नं? तिथे, त्या पाळणाघरात, ठेऊ अंकितला? तू असताना? असा घोटाळा करू नकोस तू ऐक माझं-"
"तुम्ही करा घोटाळे!"
"का- काय केलं आम्ही?"
"ते आता मी सांगू? हे बघ महेश, एकट्या अंकितला सांभाळता सांभाळता मला नाके नऊ आलेत आणि आता हे दुसरं! तेही लहान बाळ!- तू असं कर! आत्ता असते ना एशियाड? किती वाजता असते शेवटची?"
"अगं असं काय करतेस आई माझं ऐक तू-"
शांताबाई खिडकीतून वाकत ओरडायलाच लागल्यात, "रिक्षाऽऽ रिक्षाऽऽ"
"अगं आई असं काय करतेस? इकडे ये! इकडे ये! तू माझं जरा ऐक मी-"
महेश आईची मनधरणी करतोय आणि आई ऐकायला तयारच नाही असा सिलसिला आता सुरू झालाय. तो संपतच नाहिए... (क्रमश:)

No comments: