romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, February 24, 2012

आमच्या मुलांना सांभाळा! (५)

भाग ४ इथे वाचा!
गौरीची ऑफिसला जायची गडबड सुरू झालीय. स्वैपाकघरातून येऊन गडबडीने आपला टिफिन पर्समधे ठेवते. बेडरूममधे येते आणि आरशासमोर केस विंचरू लागते. शांताबाई लगबगीने स्वैपाकघरातून बाहेर येतात आणि जराश्या थांबून बाहेर जायला निघाल्याएत. गौरीला चाहूल लागते आणि ती कानोसा घेतेय तोपर्यंत शांताबाईंनी दरवाजा उघडलाय आणि दारातच बाहेरून येणारा महेश त्याना आडवा आलाय आणि दचकलाय.
"क- काय गं आई? तू- तू निघालीस?"
घराबाहेर पडत शांताबाईंनी ’हो’ असं पुटपुटत मान डोलावलीय.
"अगं प-पण तुला काल मी-"
"अरे, मारूतीला निघालेय!"
"मा- मारूतीला? न- नक्की ना? की-"
शांताबाई वळून हसताएत, "अरे असं काय करतोस? काल ठरलंय नं आपलं? चल!"
लगबगीने निघून गेल्याएत. महेश त्यांच्याकडे पहात राहिलाय. मग अचानक पुन्हा दचकतो.
"अरे!ऽऽ सोन्या मारूतीला नाही न गेली ही पुण्याच्या?"
घरात आलाय आणि अस्वस्थ झालाय, "आयला टेन्शन टेन्शन! काय करायचं? कसं-"
"काय रे रडला नाही ना अंकित?"
"को- कोण?"
"अरे मी गौरी- अंकितला सोडायला गेला होतास ना शाळेत?"
"हो! आयला! काय करायचं काही कळत नाही!" वळून शांताबाई गेलेल्या दिशेने पहात राहिलाय.
"काय रे काय?"
"आई गेली ना?"
गौरीनं हंबरडा फोडायचाच बाकी ठेवलाय, "गेऽऽल्याऽऽ"
"अगं- अगं- तशी नाही गं गेली माझी आई! गौरी तू म्हणजे-"
"पुण्याला ना? तेच म्हणतेय मी! गेल्याना! गेल्याना शेवटी? एवढं समजाऊनसुद्धा! आता काय करायचं रे!.. अरे बापरे! दऽहाऽ वाजले म्हणजे माझं मॅटर्निटी कन्सेशनही संपलंय आजच्या दिवसाचं! आज गेलंच पाहिजे ऑफिसला! सरप्राईझ इन्स्पेक्शन आहे आज असं सांगून ठेवलंय सायबांनी काल! काय पण वेळ साधली आईंनीऽऽ तू पण न महेश-"
"जरा ऐक माझं! एवढी पॅनिक होऊ नकोस! जरा शांतपणे विचार कर!"
गौरीला धीर धरवत नाहिए, सारखी घड्याळात पाहतेय.
"ते काय करायचं ते तू कर! नाहीतरी डोकं फक्त तुलाच दिलंय देवानं. मी निघते! निघते मी! संध्याकाळी आल्यावर बघू काय करायचं ते!.. वेळेला काही उपयोग नाही! बहाणा काय तर म्हणे मारूतीला जाते-"
चरफडत गौरी ऑफिसला निघालीए.
"सावकाश! सावकाश गौरी! धावतपळत जाऊ नकोस! रिक्शा कर, रिक्शावाला यायला तयार असेल तर! नसेल तर भांडू नकोस त्याच्याशी! गेला खड्ड्यात म्हणाबं! गेली! गेली! धावू नको म्हणतो नेहेमी तर धावलीच! च्यक.."
तरीही लगबगीने बाहेर येऊन तिला टाटा करतो. वळून पुन्हा घरात येणार इतक्यात समोरून कडलेकाका आलेत. त्यांचं घर शेजारीच. त्या पाळणाघरातून मुलांचे चित्रविचित्र आवाज आणि निमाचं त्या मुलांवर ओरडणं यानी कळस गाठलाय. कडलेकाकांच्या हातात जड पिशव्या, खांद्यावर जड पिशव्या. महेश त्याना बघितलं न बघितलं करतच घरात जायच्या प्रयत्नात आहे आणि कडले नेहेमीप्रमाणे त्याला अडकवण्याच्या प्रयत्नात.
"फिऽऽश.. फिऽऽश.. महेश!ऽ मऽऽहेश!ऽऽ"
महेशला त्याना बघून शेवटी हसणं भागच पडतं. तो पाळणाघराकडे पहात रहातो.
"काय कडलेकाका? आख्खा बाजार खरेदी केलात. आज काय वर्धापनदिन आहे काय?"
"कुणाचा? माझा? हुऽऽश्श!"
"तुमचा नाही हो तुमचा नाही-"
"आमच्या निमूचा?"
"निमू? होऽहोऽहोऽ मिसेस कडले? नाही! नाही! तुमच्या पाळणाघराचा हो म्हणतोय मी! बरीच गर्दी झालेली दिसतेय!" आत डोकवायला लागतो.
"वर्धापनदिन? हुऽऽश्श!"
"हो!"
"काय उपयोग?"
"का? का? का?"
"हुऽऽ- एक मिनिट! हे जरा खाली ठेऊ का?" हाताखांद्यावरच्या पिशव्या खाली ठेवू लागलेएत.
"कडलेकाका हमाल करायचा एखादा!"
"अगं आई गं!.. केलाय की!" महेश शोधू लागतो.
"कुठेय?"
कडले स्वत:च्या छातीवर हात ठेवतात, "हा काय!"
"तुम्ही?"
 कडले अवघडलेला हात घराच्या दिशेने वळवताएत,  "तो माल! हा हमाल!"
"गर्दी खूप होती दोन दिवस! बर्‍याच ऍडमिशन झालेल्या दिसताएत!"
"चिक्कार! पाळणाघर म्हणजे धर्मशाळा झाल्याएत अलिकडे! त्यात आमची निमा दिसायला छान!-"
"हो!"
"अगदी लगेच हो म्हणालास!.. परवा शेवटी नाक्यावर बोर्डच लावून आलो! हाऊसफुल्ल म्हणून!"
"चांगलाय की! बिझनेस चांगला चाललाय!"
"उपयोग काय?"
"आता काय झालं?"
"पोटाला मूल नाही हो आमच्या!"
"अहो होईल! धीर धरावा माणसानं!"
"अजून?" कडले आपल्या टकलावरून हात फिरवत राहिलेएत.
"ही सगळी मुलं तुमचीच की नाहीतरी! आं?"
"हो! जरा वेळानं म्हणशील त्यांचे बापही तुमचेच!"
"अहो ते त्यांचे!" बोलता बोलता महेशनं पाळणाघराकडे हात केलाय.
"क- कुणाच्ये?"
"त्या मुलांचेच हो असं काय करता!"
".. अंकुडीला कधी पाठवतोएस?"
"कुठे?"
"अरे आमच्या घरी!"
"कशाला?"
"अरे आमच्या पाळणाघरी म्हणतोय मी! आता ठेवायलाच लागणार तुला!"
"का? का?"
"कॅ? कॅ? अरे हा रिकामजी म्हणजे हेर आहे सोसायटीतला! पक्का! सगळे हेअर उडालेले असले तरी! अभिनंदन!"
"कशाबद्दल?"
कडलेकाका चेकाळलेएत, "काल संध्याकाळी गौरीला सांभाळून आणल्याबद्दल! काय हे महेश! दुसर्‍यांदा बाबा होणार तू! दुसर्‍यांदा! आमचं आपलं नुस्तं पाळणाघर! त्यात पाळणा नाहीच!.. ते जाऊ दे!.. मग? काय करतोस?"
"अहो असं काय करताय? आई- आई- आई आहे ना माझी! तिला असलं काही-"
"कुठेय?"
"क- क- कुठे- कुठे म्हणजे?- दे- देवळात गेलीए ती मारूतीच्या!"
"सोन्या मारूतीच्या ना! पुण्याच्या-"
"तु- तुम्हाला पण सांगितलं तिनी? बापरे! म्हणजे आत्ता जी गेली ती-" कडले हसत राहिलेत.
"आत्ता, आत्ता देवळातच गेल्याएत त्या! समोरच्या! बघितलं न मी त्याना आत्ता!"
"हुऽऽश्श!"
"पण उद्याचं काय?"
"उद्या? म्हणजे उद्या जाणार आहे ती?"
"अरे उद्या म्हणजे- उद्या, परवा, तेरवा कधी तरी जाणारच त्या!"
"नाही! नाही! आम्ही तिला जाऊ देणार नाही!"
"अरे! काय जबरदस्ती करणार आहात? त्यापेक्षा मी काय म्हणतो-"
"काय?"
"अंकितला ठेव ना आमच्याकडे!" खाजगीत कुजबुजल्यासारखं करत अंगचटीला येऊ लागतात.
महेश तसाच कुजबुजतो, "नको! तुमचं हाऊसफुल्ल झालंय आधीच!"
"ते मी बघतो रे! ठेव ना!"
"मला अंकितला कुठेही ठेवायचं नाही तुम्ही-"
"अंकुडी माझी लाडकी आहे रे ती! आमच्याकडे ठेऊन तर बघ!"  
"नाही! नाही!"
"असं काय करतोस रे?"
"काका! ही तुमची पटवापटवी दुसर्‍या कुणाकडे तरी करा! माझ्याजवळ नको! मी अंकितला कुठेही ठेवणार नाही!.. अरे बापरे साडेदहा वाजून गेले इथेच! आज पुन्हा लेटमार्क! म्हणजे एक सीएल गेली!.. याऽऽयला या सोंगाच्या नादी लागून-"
"मऽहेऽश! अरे घराची चावी तरी दे!"
"कशाला?.. घरात नाहिए अंकित आत्ता!"
"अरे तुझी आई आ येईल ना देवळातून!"
"हो च्यायला लक्षातच नाही आलं! ही घ्या!"
संधी साधून कडले महेशचा हातच पकडतात, "अंकितचं काय करतोस?"
"अहो सोडाऽ सोडाऽ सोडा हो! हल्ली लोक काय वाट्टेल तो विचार करतात! सोडा!.. अंकितचं नं करतो न मी करतो- मी करतोऽऽ-"
"ठेवतोस न? ठेवतोस न आमच्याकडे?"
कसाबसा स्वत:ला सोडवून घेत निघतो, " आयलाऽ यांचं काही खरं नाहिए! अंकितला पोलिस प्रोटेक्शनमधेच ठेवायला लागणार आता!.. काका! काका! काका!ऽऽ"
"तुला मीच वाचवणार रे पुतण्या आताऽ बोल!"
"काकाऽ आई आली की तेवढी चावी द्या तिलाऽ"
" हो हो द्येतो रेऽऽ.. हुऽऽश्श! चला! आधी हे सामान ठेवतो घरी.. आणि मग ही चावी.."
एकेक पिशवी पुन्हा आंगाखांद्यावर चढवतात आणि आपल्या घराच्या, पाळणाघराच्या पायर्‍या चढू लागतात...  (क्रमश:)

No comments: