romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, May 12, 2012

अमृतसरीयां दी हॅट्टी!

हे शीर्षक मात्र वेगळेपणासाठी दिलंय हे सुरवातीलाच कबूल करतो! :) म्हणजे लिहायचंय अमृतसरबद्दलच. शिवाय हट्टी की हॅट्टी (Hatti) याबद्दल साशंक आहे. ती शंकाही कुणी दुरूस्त केल्यास स्वागत. इथली हट्टी पंजाबीतली आहे हं मराठीतली नव्हे. मराठीतल्या हट्टीशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. (असं मीच आपलं माझ्या मनात म्हणतो! :D) पंजाबीतली हॅट्टी किंवा हट्टी म्हणजे दुकान. पंजाबी भाषा खरंतर अजिबात कळत नाही पण दुकानांवरचे गुरमुखीतले फलक बारकाईने बघितल्यावर ते हॅट्टी असावं असं वाटलं. प्रदेशातल्या बर्‍याच दुकानांवर ’बब्बी दी हॅट्टी’, ’अमृतसरीयां दी हॅट्टी’, ’खन्ने दी हॅट्टी’ अशी नावं किंवा उपनावं आढळतात. हट्टी- हॅट्टी मधे काय बरोबर ते जाणकार सांगतीलच. पण मी इथे केवळ दुकानांबद्दल नाही सांगणार. अमृतसर बाय रोड किंवा रस्तामार्गे अमृतसर असा थोडासा अनुभव घ्यायला मिळाला त्याबद्दल सांगेन.
प्रवासवर्णन या प्रकाराचं काय करायचं हे तुमचं एव्हाना ठरलं असेलच. म्हणजे ज्याला कुणाला वाचावसं वाटतं, वाटत नाही किंवा मधे एका सार्वजनिक संस्थळावरच्या चावडीवर प्रवासवर्णन इत्यादीवर साफच काट मारून तात्विक (?) इत्यादी वादसंवाद करून नेमकं भाषाविषयक ज्ञान वाढवण्यावर भर देण्याची सल्लावजा सूचना दिली गेली तसे तुम्ही असाल; जसे असाल त्याप्रमाणे या, वाचा, प्रतिसाद द्या. आपणा सर्वांचंच इथे स्वागत आहे! आज मात्र निदान सुरवात तरी आम्ही आलो, पोचलो, विसावलो इत्यादी पद्धतीची, ठोकळेवजा प्रवासवर्णनात असते तशीच असणार, हेही आधीच जाहीर करतो! :) ठोकळेवजा अनुभव, ठोकळेवजा भाषा, ठोकळेबद्ध की काही भाषा अभिव्यक्ती असं सगळं काहीतरीही त्या ’तात्विक’ इत्यादीतलं असणार हे तुम्ही ओळखलं असेलच. एखाद्या भाषावृद्धीविषयक (तात्विक) चर्चेमुळे एखाद्या ब्लॉगर म्हणवून घेणार्‍याच्या असलेल्या डोक्याला चालना मिळते ती अशी! असो! :D आपण चाललो होतो अमृतसरच्या रस्त्याने. तात्विक इत्यादी वळण सध्या घेण्यापेक्षा स्वभावधर्माप्रमाणे सरळच जाऊ. काय?
दुसरं म्हणजे या लेखांकात चित्रं वगैरे असतीलच असं नाही. असतील तर कमी असतील. नाहीतर आपली स्वत:ची स्टाईलछाप चित्रं वगैरे टाकतात बॉ! असा आणखी गोड न भासणारा इत्यादी गैरसमज!.. तरीही असो! अमृतसर!
दिल्लीच्या हजरत निजामुद्दिन (हे जरा धाडसानंच लिहितोय कारण सुरवाती सुरवातीला ह वरून जी सुरवात करायचो ती पहिल्या शब्दातली उरलेली तीन अक्षरं आणि पुढच्या शब्दातला नि गाळून थेट पुढेच जायचो. मग जो उच्चार व्हायचा तो चारचौघात होणं अप्रस्तुत. तोंडात मारल्यासारखं होतं हो. भाषा जीभेवरही चांगली खेळली पाहिजे असाही (तात्विक?) उपदेश मिळाला. तेव्हा कुठे हे लिहिणं जमलंय.)
तर हजरत निजामुद्दिन रेल्वेस्थानकावरून टॅक्सी करायची की रिक्षा? नक्की कशात लुटणार नाहीत किंवा कमी लुटतील हा तिढा महत्प्रयासानं सोडवून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणं मग तिथल्या  वेटिंगरूममधे जागा मिळवणं, राखणं, सामान राखणं- आपलं आणि क्वचित दुसर्‍याचंही- आणि पुढल्या गाडीची वाऽऽट पहात रहाणं असा स्वत:चाच पार ’गोदो’ करून घेतल्यावर दिल्ली-अमृतसर शताब्दीनं कब्जा घेतला. रेल्वेचे आभार मानावे असं वाटलं. सुंदर आणि प्रशस्त डबे, नाश्ताजेवणाची उत्तम आणि तत्पर सोय, नशीबाच्या साथीमुळे सहप्रवासीही जवळजवळ उत्तम. कुर्सीयान असूनही अमृतसरपर्यंतचा प्रवास छानच झाला. शीतल वातानुकुलतेची साथ होतीच. भल्यामोठ्या टिंटेड खिडक्यांच्या काचांमधून प्रदेशाचा फील :) इत्यादी घ्यायलाही सुरवात झाली. सोबतीला लुधियाना, जालंधर इत्यादी दरम्यानच्या स्थानविशेषांबद्दलची ध्वनिमुद्रित माहिती रेल्वेद्वारे प्रसारित केली जात होती. रेल्वेचा एकूण उपक्रम खरंच आवडला.
हो हो हो अजून अमृतसर बाय रोड- रस्तामार्गे अमृतसर बाकी आहे- लक्षात आहे माझ्या!
अमृतसरला म्हणजे अमृतसर रेल्वेस्थानकावर सर आले होते. प्रवासी कंपनीचे प्रतिनिधी (हे प्रतिनिधी म्हणणं म्हणजे खरंतर ठोकळेबद्ध. मला म्हणायचंय टूर एस्कॉर्ट, व्यवस्थापक असे सर्वेसर्वा) तर सर दोन होते. दोघांनी पटापटा सामान उचलायलाच सुरवात केली. दौरा संपेपर्यंत हे आणि त्यांचे असिस्टंट्स- सहाय्यक कुणाही प्रवाशाला त्याचं सामान उचलू देत नाहीत. त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच! मग टेंपो ट्रॅव्हलर. रस्ताप्रवास सुरू! रात्रीचे पावणेअकराबिकरा झाल्यामुळे काही स्पष्ट होत नव्हतं. बरं मात्र वाटत होतं. बघता बघता गाडी भल्यामोठ्या राष्ट्रीय महामार्गावर आली आणि शेतजमीनीसारख्या गवताळ जमिनीवर अंतराअंतराने बांधलेल्या टूमदार बंगल्यांकडे खडकाळ रस्त्यावरून खडखडत निघाली. हॉटेलवर पोचली.
दुसर्‍या दिवशीच्या नाश्त्याच्या वेळी हॉटेल मालकांची ओळख करून देण्यात आली. चाळीशीचे, उमदे पंजाबी गृहस्थ. हिंदी- इंग्रजी चक्कं पंजाबी ढंगाने न बोलणारे, उच्चशिक्षित. गेल्या चार पिढ्यांचा धंद्याचा इतिहास. हे वाट वाकडी करून वेगळ्या धंद्यात. बोलायला लागले. बोलणं मात्रं जरा अतिशयोक्तीपूर्ण (पंजाबी ढंगाचं?) जरा नाटकीय वळणं असलेलं.
ज्या राष्ट्रीय महामार्गावरून आत आलो तो महामार्ग म्हणजे अगदी पूर्वीचा शेर शाह सुरी मार्ग आणि त्यानंतरचा ग्रॅंड ट्रंक रोड आणि सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १! त्याचा डौलही तसाच. प्रशस्त मार्गिका. ज्या ज्यावेळी आम्ही तिथून गेलो तेव्हा फारशी वर्दळ नाही. त्यामुळे सुसाट वेगानं पळणारी वहानं. पार अफगाणिस्तानातून इथे सुकामेवा इत्यादी येतो. भारत पाकिस्तान व्यापार या हमरस्त्यावरूनच चालतो. दिल्ली-लाहोर बससेवा इथूनच मार्गस्थ होते हे वेगळं सांगायला नको. आमचं हॉटेल अमृतसर शहरापासून ७ किलोमीटरवर आणि हॉटेलपासून वाघा बॉर्डर फक्त ३५ किलोमीटरवर. पाकिस्तान फक्त पाऊण तासावर! वाघा बॉर्डरमधलं वाघा पाकिस्तानातलं, अत्तारी आपल्याकडचं. या प्रशस्त मार्गिकांवरून दोन्ही देशांमधल्या रेषेपर्यंत जाताना बंगले इत्यादी मागे पडायला लागतात. सैनिकी वसाहतींद्वारे सैनिकी मालकीचा प्रदेश सुरू होतो. हळूहळू फक्त गवताळ पठार उरतं आणि मग भारताचं प्रवेशद्वार- खरं गेटवे ऑफ इंडिया- दिसायला लागतं. हॉटेलमालकानं तितक्यात तुमचं मुंबईचं ताज समोरचं गेटवे खरं गेटवे ऑफ इंडिया नव्हेच अशी पंजाबी चिमटावजा मल्लीनाथी केलीच.
नंतरचं रस्तामार्गे अमृतसर होतं शहरात सुवर्णमंदिर, जालियांवाला बागेकडे नेणारं. पहिल्याच प्रवासात या स्थळांवर पोहोचण्याचीच उत्सुकता जास्त होती. धाब्याची, नुसत्या विटांच्या भिंतींची आणि लांबलचक उंच कंपाऊडवॉल रचनेची एकसंध, कुलुपबंद व्हावीत अशी घरं ही या प्रदेशातली खसियत. खूपच वर जाणार्‍या तापमानापासून बचाव करण्यासाठी भिंतीना गिलावा- प्लॅस्टरिंग केलं जात नाही. पण गढीसारखी कुलुपबंदता ठळकपणे दिसणारी. त्याचं आणखीही काही कारण असेल?
ऑटोमोबाईल धंद्यासंदर्भातली दुकानं, गॅरेजेसही भरपूर. मुंबईत ग्रॅंटरोड वगैरे भागात सरदारजी आणि त्यांची ऑटोमोबाईलची  दुकानं दिसतात तशी अमृतसरमधेही दिसतात. स्वर्णमंदिराच्या- हरमिंदरसाहिबच्या स्थानमहात्म्यामुळे अकाली, निरंकारी अशा पंथांचे, वेगवेगळ्या पोषाख-पटक्यामुळे ओळखता येणारे सरदार भरपूर. आपण इतरच वेगळे आणि उठून दिसणारे इतके सरदार आजूबाजूला...
नंतरचा अमृतसरकडे येणार रस्ताप्रवास हा दौरा संपता संपतानाचा. मन थोडसं शांत, थोडी हूरहूर दौरा संपल्याची, आम्हाला टेन्शन- सांगितलेलं ’तात्काळ’ आरक्षण झालंय ते आजचं नव्हे उद्याचं. आणखी एक दिवस- कॉम्प्लीमेंटरी स्टे दिलेला असला तरी -कसा घालवायचा अशा मनस्थितीतलं.
अमृतसरकडे येताना लागणारं पठाणकोट. पठाणकोट हे मध्यवर्ती स्थान. पंजाब, हिमाचल आणि जम्मू काश्मीर अशी तीन राज्यं भेटण्याचं ठिकाण. नुरपूर, बटाला, धारिवाल (बहुदा माणिकचंद गुटख्याच्या मालकाचं गाव!) अशी मस्त गावं लागतात. गावातले छोटे रस्ते. त्यात तुंबणारं हटवादी ट्रॅफिक आणि ह्याच्या, त्याच्या नावाच्या हॅट्ट्या! :D भरपूर भाज्याफळं घेऊन बसलेले विक्रेते...
मग शेतं लागतात.. गव्हाची. पार क्षितिजापर्यंत पोचलेली. पिकून पिवळीजर्द झालेली. काही शेतांमधे समृद्ध पंजाबी शेतकर्‍यांनी कापणीयंत्र लावलेली. शेत कापून एका बाजूला पडलेलं, गव्हाच्या दाण्यांची रास दुसर्‍या बाजूला. जवळ गव्हांची पोती भरून तयार होत असलेली...

मग आणखी बरंच अंतर कापून आल्यावर लागणारी मंडई. गव्हाचं भलमोठं भांडार, कोठार; पोतीबंद! पोत्यांचा खच. त्यावर अलिकडे सुरू झालेल्या संध्याकाळच्या पावसाचं सावट. मंडईच्या प्रवेशद्वाराबाहेर खचाखच ओसंडून वहाणारी पोती भरलेले भलेमोठे ट्रक्स. रांगेत उभे राहून ताटकळणारे. प्रचंड गहू पिकलाय राज्यात. त्यादिवशीचा (२७ एप्रिल) भाव, टेंपोट्रॅवलरचा धाडसी चालक गुरनामनं सांगितलेला, १३५०/- रूपये क्विंटल! गाडीतल्या मध्यमवर्गीयांचा आपापल्या शहरातल्या गव्हाच्या भावाचा हिशोब चालू. परखडपणे सांगायचं तर सडून जावा इतका गहू पिकतो आणि तरी कित्त्येक पोटं उपाशी रहातात हे आपल्या देशाचं परंपरागत दुर्दैव. राजकारण्यांच्या खुर्च्या घट्टं. सडू दे काही होऊ दे! राजकारनी निवांत!  इथे मात्र असो! असं अजिबात म्हणणार नाही! नाही म्हणजे नाही!
शेवटचा दिवस. हॉटेलमालकानं त्याच्या नव्हे पण जवळच्या दुसर्‍या हॉटेलमधे केलेली सोय. प्रत्येक गोष्टं आपण विचारल्यावर कळत असते. समोरून काहीही स्पष्टं केलं जात नाही. हा जवळ जवळ नेहेमीचा अनुभव. सगळीचकडचा. काही विचारायला गेल्यावर कळतं की या हॉटेलात फक्त दुपारी एक वाजेपर्यंतचीच सोय. परतीची रेल्वे रात्री साडेनऊनंतरची. मग कॉम्प्लीमेंटरी स्टे, नाश्ता, जेवण याबरोबर कंपल्सरी दुपारी १ ते रात्री कमीतकमी ८ वाजेपर्यंत उघड्यावर! टाईमपास करणं भाग. मग? मग अमृतसर बाय रोड! दुसरं काय?
ठरवलेली ऑटो. तिचा मालक लखविंदर. तो जाड रस्सीला बांधलेली विटी ऑटोच्या सीटखाली खुपसतो. तो ऑटोचा स्टार्टर. रस्सी जोर लाऊन डोक्याच्यावर खेचल्यावर ऑटो घुर्रर घुर्रर्रर करत चालू होते. तसाच आवाज करत मार्गस्थ होते. तिचा वेग इतका की ती मार्गस्थ झालीए की जागेवरच घुरघुरतेय हे कळायला वेळ आणि संयम आवश्यक. संयम एकूणच आवश्यक. संयम नेम म्हणून पाळणार्‍याला संयम जास्तच आवश्यक! लखविंदरचा चेहेरा तो गप्प बसलेला असला की बोलक्या बाहुल्यांच्या खेळात असलेल्या सरदारजीसारखा. डिट्टो. बोलायला, हसायला लागला की नॉर्मल.
तो चारशे रूपयात आम्हाला अमृतसर फिरवणार आणि रात्री रेल्वेस्थानकावर सोडणार. अमृतसरमधे तो आम्हाला  तिथलं कपडा मार्केट- कतरा जैमेल सिंघ (Katra Jaimal Singh) आणि तिथला अल्फा वन मॉल इथे नेणार. आमच्या गृहमंत्री अजून मिणमिणती शॉपिंग आशा बाळगून. कतरा जैमेल सिंघवर त्याने सोडल्यावर आम्ही पायी फिरायला सुरवात केली. मार्केट म्हणावं तर मुंबईसारख्या शहराच्या तुलनेत दोन गल्ल्या क्रॉफर्ड मार्केटच्या. परिसर अगदी जुनाट लूक असलेला. शनिवार दुपार असूनही दुकानात गिर्‍हाईक नाही म्हणजे नाही. विशेष वैविध्य नाही. भावात फारशी तफावत नाही. मुख्य म्हणजे बार्गेनिंग जवळजवळ नाहीच. मग हरमिंदरसाहेब- स्वर्णमंदिराजवळ. तिथेही एका दुकानात आधी खरेदी केलेली तेवढच बरं दुकान- हॅट्टी. बाकी... इतर हॅट्ट्यांमधे बसलेले सरदार मालक मात्र समृद्ध अवस्थेतले आणि गिर्‍हाईकांची वानवा किंवा तेच वास्तव असेल. आपण बघताना सगळीकडे आपल्या शहराशी तुलना करणार...
त्यात पाऊस. मग भरपेट लस्सी आणि एक मोजडीजोड यावर समाधान.
अल्फा वन मॉल म्हणजे आत गेल्यावर मुंबई काय आणि अमरतसर काय? मॉलसंस्कृतीची आपल्याला आदत झालीए. आत गेल्यावर खरेदी करायचं बंधन नाही. चेकींग असलं तरी आत गेल्यावर हटकणारं कुणी नाही. उत्तम वातानुकूलन. आत प्रदर्शनीय असं सगळंच. सगळंच. त्यातही यातलं एक दालन वेगळं. जुन्या रचनेतल्या प्राचीन वस्तू, कपड्यांचं. किंमती फक्त बघायच्या... प्रदर्शनीयता कायम.
त्याच संकुलात मग तळघरात हायपरसिटी. आणखी एका बाजूला शॉपर्स स्टॉप असं सगळं. इथेही गिर्‍हाईक नाहीच. वेळ दुपारी तीन-चारची असेल म्हणून असेल. आपल्या शहरात तरी दिवसा कितपत गिर्‍हाईक मॉल्समधे...
असं हे रस्तामार्गे अमृतसर. शेवटचा प्रवास रेल्वेस्थानकाकडे. लखविंदर भलत्याच रस्त्याने नेतोय. पण बरं वाटतंय. लखविंदर पाच ते आठ हा वेळ कुठेतरी घालवून परत आलाय. त्याचे पैसे अजून देणं बाकी आहे. हॉटेलमालकानं दुपारी फक्त १ पर्यंतचा कॉम्प्लीमेंटरी स्टे, नाश्ता, जेवणच देणार असा जवळजवळ दम दिला होता. पण संध्याकाळी त्यानं चहा पाजलाय. त्यावर कळस म्हणजे रात्रीचं जेवण वेगवेगळ्या कागदी ड्ब्यांमधे पॅक करून दिलंय, त्याचे पैसे देऊ करूनही न घेता! दुपारी मालकीणबाईनं हक्कानं आईस्क्रिम खिलवलं होतंच. अशा सगळ्या पंजाबी बेसूमार आतिथ्याच्या कौतुकमय गोष्टी आमच्या डोक्यात आणि तोंडावर आहेत. हॉटेलमालकानं ’तात्काळ’ तिकीट आरक्षणाची झालेली चूक भरून काढलीय आणि आपलं, आपल्या धंद्याचं, आपल्या प्रांताचं गुडविल आमच्या मनात कायम राखलंय...
हे झालं रस्तामार्गे अमृतसर! अजून बरंच सांगायचं आहे दोस्तानो! हेही बरंच झालं म्हणा म्हणता म्हणता!
भेटत राहूच! :)                   
(या आधीच्या सिरसी, कर्नाटक दौर्‍याच्या पोस्ट्स इथे जरूर पहा!) 

No comments: