romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, May 8, 2012

नॉरबुलिंगका (Norbulingka)

नॉरबुलिंगका! काय आहे नॉरबुलिंगका? केवळ एक विचित्र शीर्षक द्यायचं म्हणून दिलंय नॉरबुलिंगका? नाही! अलिकडेच अमृतसर, धर्मशाला, डलहौसी असा दौरा झाला. अर्थातच स्थलदर्शन, रहाटगाडग्यापासून आराम इत्यादीसाठी. १८ एप्रिलला प्रस्थान आणि ३० एप्रिलच्या पहाटे परत. मग नेहेमीप्रमाणे ते सांगावं असं वाटलं. अमुक गाडी पकडून आधी इथे पोचलो. मुक्काम केला. ज्येवलो. झोपलो. सकाळी उठलो. स्थळदर्शनासाठी... असं दैनंदिनीवजा लिहावं असं वाटेना. मुळात होतं काय की कितीही झाली तरी अशी भेट ही धावती भेट होते. त्यात ती पर्यटनसंस्थेबरोबर केली तर आखीव रेखीव होते. तसं होण्यात काही न्यून आहे असं अजिबात नाही पण थोड्या कालावधीत अमुक एका प्रदेशाचा ’फील’- निश्चित अंदाज येत नाही. निश्चित अंदाज असा शब्द मुद्दाम वापरतोय कारण अमुक एका प्रदेशाबद्दल एक वेगळं मत तयार निश्चित होतं पण तेच अंतिम असं मानता येत नाही. दुसरी शक्यता अशा प्रदेशातून पायी भटकंती करण्याची. न ठरवता भ्रमण करण्याची. ती आळशीपणामुळे आणि अर्थातच अनेक व्यवहार्य कारणामुळे अजमावली जात नाही. तसं न करताही कधी कधी अचानक एक वेगळं स्थळ समोर येऊन उभं ठाकतं. भारून टाकतं. त्यात शिरल्यावर सगळं सगळं विसरून गुंग व्हायला होतं. मला वाटतं स्थळ उत्तम असल्याचं हे मुख्य परिमाण आहे. तर नॉरबुलिंगका... ’इथे आणखी एक मॉनेस्ट्री- बौद्धमठ आहे. खरं तर साईटसीईंगमधे अंतर्भूत नाही पण अधूनमधून वेळेच्या उपलब्धीनुसार पर्यटकांना आम्ही इथे आणत असतो’ असं आमच्याबरोबरचे दौरा व्यवस्थापक, मार्गदर्शक इत्यादी अनेक भूमिकांमधे लीलया आणि यशस्वी संचार करणारे म्हणाले तेव्हा आम्ही नुकताच नॉरबुलिंगका मधे प्रवेश केलेला होता...  आत शिरताना मार्गदर्शकाची वाक्य कानावर पडत होती आणि समोर चढत्या पातळीवरचं एक शिल्प दृगोचर होत होतं. चित्रपटातल्या एखाद्या झूमसारखं. होय, मला आशियाई चित्रपटात पाहिलेल्या थायलंड देशाच्या एका प्रवेशिकेची आठवण झाली. दगडांची नक्षी करत नेऊन एक एक पायरी तयार करत चढत जाणार्‍या पायर्‍या. त्या दगडांच्या सांध्यातून, पायर्‍यांच्या कोपर्‍याकोपर्‍यांतून रूजवलेली फुलझाडांची झुडपं. त्यावर फुललेली छोटी छोटी फुलं. दगडांच्या सांध्यांमधे मातीचंच लिंपण असावं. त्यामुळे त्या रचनेला एक भूतकालीन रम्यतेचं स्वरूप आलेलं... पुन्हा या सगळ्याला किनार होती पाण्याच्या ओहळाची. कृत्रिमरित्या खेळवलेला ओहोळ. ओहोळाचा खरं तर परिघ. मधेच तो ओहोळ एका डबक्यात सोडून दिलेला. छोटसं पण देखणं डबकं. त्यात नुकत्याच सुरू झालेल्या संध्याकाळच्या पावसामुळे आलेलं गढुळपण. त्यात दिसणारे सोडलेले मासे... सगळं रचलेलं तरीही त्यात नैसर्गिकपण आणलेली उत्स्फूर्तता. नैसर्गिक वेडेवाकडेपणा... मला पुन्हा तो थायलंडचा चित्रपट आठवू लागलेला. त्यात अशा पद्धतीच्या मठाचा आतला परिसर कॅमेर्‍यानं व्यवस्थित दाखवलेला... मी इथे वर पाहिलं. राजवाड्यासारखी रचना असलेला तो वाडा.. वाडाच म्हणालो मी मनात. मग भूतकाळातल्या माझ्या आजोळच्या वाड्यात, भोवतालात असलेल्या हौदावर, त्यातल्या गढूळ पाण्यातल्या माशांवर.. फिरून आलो. सगळं खूप जवळचं वाटायला लागलं... वारंवार लक्ष जायला लागलं सोन्याच्या मुलामा दिलेल्या त्या वाड्यावरच्या नक्षीकामावर..
वाड्याच्या जवळ गेलो. आतल्या मखमली लालभडक भिंती, मखमली लालभडक भलेमोठे- पूर्वीच्या वाड्यांना असत तसे दरवाजे.. त्यावरची सोन्याच्या मुलाम्याची नक्षी... आणि केंद्रभागात भला मोठा सोनेरी बुद्ध... अर्धपुतळा स्वरूपातला... उंचच उंच... इथली रचना थोडीशी चर्चच्या केंद्रस्थानी असते तशी. बुद्धापर्यंत पुन्हा पातळ्या. लाल रंगाचं आवरण घातलेल्या पायर्‍या. एका पायरीवर सद्य दलाई लामांचं छायाचित्र... खूपच छान वाटत होतं.. एखाद्या वातावरणाने आपल्याला आपल्या आठवणीतली चित्र दिसायला लागली तर ते वातावरण आणखीनच भावतं का?... असेल. पण बघत रहावं, इथून हलूच नये असं वाटणारं ते वातावरण... प्रसन्न करणारं...
काही धर्मस्थळं म्युझियमसारखी वाटतात तसं इथे वाटलं नाही. रचना केली आहे हे कळूनही नैसर्गिकतेचा प्रत्त्यय देणारं असं काही.. आपोआप पावलं रेंगाळली. शेजारी तिबेटियन डॉल्स म्युझियम आहे. तिथे चला. अशी सूचना आल्यावर उत्सुकतेने तिथेही डोकावलो.चीनमधे त्रास झालेल्या तिबेटी नागरिकांना भारताने आश्रय दिला. त्या तिबेटी नागरिकांनी धर्मशाला या हिमाचल प्रदेशातल्या भागात आपल्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारी दालनं उघडली. त्यातलं हे एक. या बाहुल्यांच्या घरात तिबेट प्रांतातल्या वेगवेगळ्या जातींच्या, प्रजातींच्या, टोळ्यांच्या चालिरिती, त्यांच्यात साजरे होणारे समारंभ, त्यांची हत्त्यारे इत्यादींच्या देखण्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. काचेच्या प्रकाशमान पेट्यात ठेवलेल्या गुहेसारख्या अंधार्‍या लांबलचक भुयारासारख्या सभागृहात या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. या बघायला विशेषत: वृद्ध तिबेटी पर्यटक येतात आणि भारावून पुन्हा पुन्हा हे बाहुल्यांचं घर न्याहाळत रहातात. त्यांच्या डोळ्यात किंचित पाणी आहे की काय असं त्या निर्माण केलेल्या गूढ अंधारात त्यांच्याकडे बघताना चाटून गेलं. आपल्या प्रदेशातून हाकललं जाणं. काही स्वरूपातलं स्थैर्य मिळणं आणि तरीही मातृभूमीपासून हिरावलं गेल्याचा सल. या ज्येष्ठ नागरिकांच्या देहेबोलीतून जाणवतो. वृद्धत्वाच्या परिमाणामुळे तो अधिकच गडद होत असावा.
इथल्या तिबेटी निर्वासितांना भारत सरकारनं खूप प्रमाणात सवलती दिल्या आहेत. क्वचित इतक्या की भोवतालचे भारतीय त्यानं नाराज होतात. तिबेटी निर्वासितांना मतदानाचा हक्क नाही. हे निर्वासित ’भटाला दिली ओसरी’ सारखे इथे रहातात. यांनी निर्मिलेल्या पुस्तकांमधे भारत सरकारबद्दलचा रोष वाईट पद्धतीनं बाहेर आलेला आहे. त्याना भारत सरकारही आपल्यावर अन्याय करतं आहे असं वाटतंय. अशी मतं इथे कानावर आली. चीन सरकारनं त्यांच्यावर अन्याय केलाच आहे. त्याचे फलक विशेषत: मॅकलोडगंज इथे दिसतात. मॅकलोडगंज इथे बौद्धमठ आहे. तो विशेष प्रसिद्ध आहे. या मठाजवळ सद्य दलाई लामांचं निवासस्थान आहे. तो दलाई लामांचा मठ म्हणून ओळखला जातो. परदेशी चलनातल्या भरपूर देणग्या मिळवणारा हा मठ आहे. मला स्वत:ला तो जास्त म्युझीयमसारखा वाटला. त्याविषयी पुन्हा कधीतरी...  
नॉरबुलिंगका संदर्भातली आणखी काही चित्रं!
पहिलं चित्र आहे फिरत्या दंडगोलांच्या रांगेचं. सोनेरी मुलामा असलेल्या दंडगोलांवरून हात फिरवत मंत्रसदृष्य जप करणं हा बौद्धमठात येणार्‍या भक्तांचा महत्वाचा उपचार. 
दुसरं चित्र आहे अंतर्गत सजावटीच्या नमुन्याचं.
तिसरं चित्र आहे मखमली, सोनेरी नक्षीकाम असलेल्या दरवाज्याचं.
चौथं चित्र आवाराचं आणि पाचवं आहे विशाल बुद्धाचं!

 
    (या आधीच्या सिरसी, कर्नाटक दौर्‍याच्या पोस्ट्स इथे जरूर पहा!)

Post a Comment