romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, March 21, 2008

सर

मी नेहमीप्रमाणे
माझ्या उभ्या आडव्या फराट्यात हरवलेला
वेळेआधीच खुराड्यात हजर
आत्ता तू यावीस, इथे आत्ता तू हवी होतीस!
तू म्हणजे रूसून बसलेला पाऊस…
फराट्यांमधे माझं आयुष्याचा कागदबोळा शोधत रहाणं…
मग कधीतरी अचानक
तू घाईघाईत चपला काढून टाकल्याचा आवाज
अकल्पित येणारी पावसाची सर!
तिचा आनंद काही औरच! नाही?

Monday, March 17, 2008

ती

ती उत्फुल्ल खळाळत धावते
अनेकांना तृप्त करत, नवीन जीवनं वसवत
राग आला की त्यानाच पोटात खेचत
अनेक सवतींसह आपल्या प्रियकराकडे
एखाद्या शोडषेप्रमाणे
पण सवतीमत्सर न करता…
ती आता प्रियकराबरोबरच संसार करतेय
कधी तरंग उमटवत, कधी उफाळत,
किनाऱ्याशी झुंजत, कधी भरत, कधी ओहोटत
वाऱ्यावर स्वार होत त्याच्या हातात हात घालून
प्रियकराला झालेला उष्मादाह शमवण्यासाठी
स्वत: वायुरूप होऊन अवकाशात जातेय
संततधारेने त्याच्यावर बरसून
त्याला थंड करण्यासाठी
एखाद्या गृहिणीसारखी, एखाद्या पतिव्रतेसारखी…
आता ती व्रतस्थ तपस्विनी वानप्रस्थाश्रमातली
ध्यानस्थ शीतल अभेद्य खडक
एक अष्टमांश वर सात अष्टमांश
आपल्या प्रियकरातच सामावलेली
यावेळी ती दोन्हीही
कूळ आणि मूळ शहाण्यानं शोधू नये अशी
तशीच हळूहळू प्रियकरातच विलीन होणारी
नव्या सवतींची वाट बघत
परंपरागत भारतीय स्त्रीसारखी…

प्रेमिक

एक मधू गोळा करता करता
इतका गुंग झाला की
पाकळ्या कधी मिटल्या
काळरात्र कधी झाली
त्याचं त्यालाच कळलं नाही
तेव्हापासून तो शहाणा झालाय
या फुलावरून त्या फुलावर
मध गोळा करत फिरतोय
पाकळ्या मिटायच्या आत…
एक उबेच्या आशेने अजून
उर्जेकडेच झेपावतोय
धारातीर्थी पडून परत परत
उर्जेकडेच झेपावतोय
काजळी होण्यासाठीच फक्त…
एक मनोभावे प्रदक्षिणा घालतोय
बापाकडून प्रकाश घेऊन
लुप्त होत, वाढत वाढत
पूर्ण सुखावत, सुखवत
कलेकलेने रोड होत जातो
पुन्हा लुप्त होण्यासाठी
अनेक आवर्तनांत…
एक सरळ अनंताकडेच झेप घेतोय
हरतोय, मागे होतोय, उफाळतोय
आणि त्याच वेळी इतर अनेकींना
आपल्यात ओढून घेतोय वर्षानुवर्षं
पुन्हा उचंबळण्यासाठी
आपल्या अथांगपणाला साक्षी ठेऊन
प्रतिबिंबित करतोय
फक्त ती अप्राप्य निळाईच…

बाप

आदितेजस बाप स्वत:लाच विभागून घेतो
अनेक तप्त गोळ्यांमधे
प्रत्येकाचं स्वत:चं वेगळं अस्तित्व असूनही
त्याना स्वत:भोवती फिरवत, थंड करत
त्याना, त्यांच्या अनेक वंशजाना उर्जा पुरवत, प्रकाश देत
स्वत: सतत खदखदत
सूक्ष्मतम बापही स्वत:लाच विभागून घेतोय
अनेक सूक्ष्म पिल्लांमधे
अंतिमत: सर्व प्राणीजात निर्माण करून
परमेश्वरासारखा शरीराशरीरांमधे वास करत
सजीव पेशींचा मूलभूत घटक बनून
अदृश्य बापाची मात्र सगळी अंशात्मक विभागणी
दर प्राणीमात्रात त्याचा अंश असतो म्हणे
तो वरून पहात रहातो
आपल्या अनेक पुत्रांच्या हालअपेष्टा, विटंबना
क्षुद्र कीटकांकडून
आणि त्याच्या एका पुत्राला मिळालेलं देवत्व
सहकाऱ्यांकडूनच भरवल्या गेलेल्या
शेवटच्या जेवणानंतर
लाकडात खिळ्यांनी चिणून…

हरिणी

असतेस नेहमी तशीच बावरलेली
मला ठाऊक आहे
पण तू मात्र शोधत असतेस
कस्तुरी लपलेली…

Monday, March 10, 2008

गाव

चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझा गाव आहे…
गावतो स्वप्नात अन्‌ निसटतो जागेपणी
अळवावर मोतियाचा झरणारा थेंब आहे…
भान जागे आणि उरी एक वेडा पीर उध्वस्त
आठवांच्या खंडरात फिरणारा डोंब आहे…
राबतात हात माझे अनोळखी चेहेरा तयांचा
रेषांतच गुंतलेला आयुष्याचा कोंब आहे…
चालतो स्वखुषीने मग हास्य माझे लोपते का
अंतरीच्या जख्मेला का रडणारी झोंब आहे...
चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझाही गाव आहे
त्याना गवसली आपुली घरे
मी घर अन् गाव माझे शोधण्यात मग्न आहे…

Sunday, March 9, 2008

बुरूज

आमच्या प्रायोगिक नाटकाची तिकीटं
ब्लॅकने विकली आहेत
असं मी अभिमानाने सांगायचो
तो तिकीटविक्रीवर बसणारा
माझा काळा मित्र
एकदा म्हणाला, विन्या,
इमला अचानक जमीनदोस्त होऊ नये कधी
खूप मोठा आघात सहन करावा लागतो
पेलवत नाही
त्यापेक्षा हळूहळू ढासळत गेलेला बरा
हळूहळूपणामुळे सवय होत जाते
नंतर नंतर काहीच वाटेनासंही होतं
तेव्हा मला कळला खऱ्या अर्थाने
अर्थशास्त्रातला घटत्या उपयुक्ततेचा सिध्दांत
आणि मी त्याना ओरडून सांगायला लागलो!-
कोसळा! कोसळा माझ्यावर!
तुमची दमछाक होईपर्यंत!!
त्यांची दमछाक होतच नाही
आणि तरीही मी आश्चर्यकारकरित्या उभा असतो
एखाद्या बुरुजासारखा
माझं ढासळलेपण सावरत…