आदितेजस बाप स्वत:लाच विभागून घेतो
अनेक तप्त गोळ्यांमधे
प्रत्येकाचं स्वत:चं वेगळं अस्तित्व असूनही
त्याना स्वत:भोवती फिरवत, थंड करत
त्याना, त्यांच्या अनेक वंशजाना उर्जा पुरवत, प्रकाश देत
स्वत: सतत खदखदत
सूक्ष्मतम बापही स्वत:लाच विभागून घेतोय
अनेक सूक्ष्म पिल्लांमधे
अंतिमत: सर्व प्राणीजात निर्माण करून
परमेश्वरासारखा शरीराशरीरांमधे वास करत
सजीव पेशींचा मूलभूत घटक बनून
अदृश्य बापाची मात्र सगळी अंशात्मक विभागणी
दर प्राणीमात्रात त्याचा अंश असतो म्हणे
तो वरून पहात रहातो
आपल्या अनेक पुत्रांच्या हालअपेष्टा, विटंबना
क्षुद्र कीटकांकडून
आणि त्याच्या एका पुत्राला मिळालेलं देवत्व
सहकाऱ्यांकडूनच भरवल्या गेलेल्या
शेवटच्या जेवणानंतर
लाकडात खिळ्यांनी चिणून…