प्रतीक्षाऽ
स्टेशनमधे गाडी शिरण्याआधीच चार तास
मी तयार असतो
आणि माझ्या या तयार असण्याला
उतावीळपणा म्हटलं जातं
म्हणून तुझं फावलंय!
माझा सगळा आत्मकेंद्रितपणा
मी माझ्या सगळ्याच शब्दांमधून मांडतो
आणि माझं हसं होतं
म्हणून तू शेफारलीएस!
अगंऽ आख्खी दिंडी माझ्यामागून
माझ्यापुढे निघून जातेय
आणि मी आहे तिथेच
जळतं लाकूड उराशी घेऊन
तुला वाटतं तू जिंकतेएस!
कुठे कुठे आडवी नाही आलीस?
अगदी माझी आई मला सोडून जात असताना
आणि नंतर मी बाप होऊ घातल्यावरही?
पण लक्षात ठेव!
माझी सगळी गात्रं थकली
आणि हातात आधाराला जरी काठी आली
तरीही मी लढत रहाणारच!
तू माझ्या संपण्याची वाट बघत बस
मला तुझी पर्वा नाही!!!