romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, October 18, 2011

भरत रंगानी (१)

भरत रंगानीचं हेलिकॉप्टर आफ्रिकन वाईल्डलाईफ सॅंन्क्च्युअरी जवळ असलेल्या खाजगी आणि गुप्त अशा हेलिपॅडवर अलगद उतरलं.वन्यजीव संग्रहालयाच्या जवळची ही धावपट्टी अतिशय गुप्त ठिकाणी तर होतीच पण तिच्याजवळ भर जंगलात आणि तरीही सुरक्षित असं गुप्त विश्राम संकुलही होतं.जगभरातल्या निवडक उद्योजकांसाठीचं.त्यांनीच स्वत: निर्माण केलेलं.आक्रमक माध्यमांपासूनही ते अनेक वर्षं कसं गुप्त राहिलं हे एक आश्चर्यंच!
या उद्योजक बांधवांमधे भरत रंगानी हा एकमेव भारतीय उद्योजक विश्राम संकुलातली एक टुमदार कुटी अडवून होता.अर्थातच भरत रंगानी हा भारतातला आघाडीचा उद्योजक होता हे वेगळं सांगायला नकोच.खरं तर भरतच्या वडलांनी हा अवाढव्य उद्योगसमूह निर्माण केला, वाढवला.त्याची प्रचंड वाढ भरतच्या कारकिर्दीत झाली हे खरं असलं तरी मूळ श्रेय त्याच्या वडलांच्या उद्यमशीलतेलाच जात राहिलं.अनेक क्षेत्रात पसरलेल्या या क्रमांक एकवरच्या उद्योगसमूहाला ब्रॅंडनेमबरोबरच थोरल्या रंगानींचं अवघं व्यक्तिमत्वच जाहिरातीसाठी वापरता येत होतं.फायद्याच्या अनेक कसोट्या उद्योगसमूह लांघत होता.
थोरल्या रंगानींचं वयोमानपरत्वे जाणं हि ही रंगानी समूहासाठी इष्टापत्तीच म्हणायला पाहिजे.नवीन जाहिरातकल्पनेचा उत्तम वापर करून आता समूहानं आपली ए+ ही अत्त्युत्तम श्रेणीही कायम राखली.या कल्पनेमागचा मेंदू होता भरतचा.व्यापारी वातावरणात बाल्य, तारुण्य घालवून आता प्रौढ आणि परिपक्व झालेल्या भरतचा.
भरतजवळ काय नव्हतं? मेंदू तर होताच.उत्तम परदेशी शिक्षण होतं.देखणं व्यक्तिमत्व होतं.राजकारणी, समाजकारणी, माध्यमं यांच्याशी एकाच वेळी तो उत्तम संबंध राखू शकत होता.बहिणी तोलामोलाच्या घराण्यांत पडल्यामुळे समूहाला अडचणीत आणू शकणारय़ा प्रवाहांचा आपसूक बंदोबस्त झाला होता.स्वत:च्या बायकोमुळे करोडोंचं काम एका झटक्यात झालं होतं.बायको लावण्यवती होती.भरतचं आणि तिचं एकमेकांवर निरातिशय प्रेम होतं.त्या वेलीवर दोन गोंडस फुलंही उमलली होती.उमलून ती सध्या परदेशातल्या नावाजलेल्या शैक्षणिक विश्वात विसावली होती.भरतजवळ काय नव्हतं?
भरतजवळ नव्हतं ते कायमचं भारतातलं नंबर १ चं स्थान.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सर्वत्र खुलेपणा आलेल्या अर्थव्यवस्थेत स्पर्धा वाढत होती.समूहाअंतर्गत आणि समूहासमूहामधली युद्धं- मग ती शीत असोत की उष्णं असोत- वाढत होती; त्रासदायक ठरत होती.बंदोबस्त करण्यात भरत वाकबगार होता, सरकारपासून ते सामान्य व्यक्तिपर्यंतचा; पण आता हा नेहेमीचाच खेळ होऊन बसला होता.उत्तम बुद्धिबळपटूप्रमाणं त्याला पुढच्या चाली रचाव्या लागत नसत, त्या आधीच तयार होत.या सगळ्यामुळे काहीशी दगदग मात्र होत होती.हे सगळं टाळणारा एखादा जालिम पण सहजपणे उपयोगात आणण्याजोगा उपाय आपल्याकडे का असू नये? असं त्याच्या मनानं घेतलं तर ते नवल नव्हतं.नंबर १ चं स्थान कायम टिकणं अत्यंत आवश्यक होतं!
त्याचवेळी, खरं तर त्या आधीपासूनच कधीतरी त्याला आणखी एक गोष्टं खुपू लागली होती.रंगानी उद्योगसमूहाला भरतचं स्वत:चं असं देणं काय? कॉन्ट्रिब्युशन काय? असा सवाल काल आलेला उद्योजक करू लागला होता.यात रंगानी उद्योगसमूहाबद्दल काहीबाही बोलून आपण प्रकाशात येण्याचा गुळगुळीत डाव असला तरी मूळ प्रश्नं भरतच्या मते हळूहळू महत्वाचा ठरवला जात होता.भरतच्या सदसद्विवेकबुद्धिलाही तो आता वेटोळे घालू लागला होता.थोरल्या रंगानींच्या निधनानंतर या प्रश्नाने जोर धरला होता.
तर भरतजवळ नव्हती ती कायमचं शिखरावर असण्याची खात्री आणि स्वत:च्या कॉन्ट्रिब्युशनच्या दुखण्यावरचा अक्सीर इलाज.
पण भरतजवळ स्वत:चा असा मेंदू होता.आपल्याजवळ काय नाही याची त्याला वेळीच जाण आली होती.दुसरा कुणी असता तर तो अनेक पिढ्यांसाठी कमवलेल्यातला आपला हिस्सा ओरपत राहिला असता. समूह सरासरी नफ्यात कायम ठेवत लाईफ मस्त एंजॉय करत राहिला असता.
त्यातला नव्हता म्हणूनच भरत रंगानी वेगळा होता..       (क्रमश:)            

3 comments:

Anagha said...

वाचतेय. आत्ता हा भाग वाचला.
कुतूहल निर्माण झालंय...पण घाईघाईत वाचायला नाही आवडत मला...म्हणून मग आता दुसरा भाग संध्याकाळी वाचेन. :)

Shriraj said...

गोष्टीचा सेटअप एकदम मस्त आहे. पुढचा भाग वाचायला घेतो.

विनायक पंडित said...

स्वागत अनघा! आभार! अगदी खरंय तुमचं म्हणणं.जरूर कळवा! :)
स्वागत आणि धन्यवाद श्रीराज! अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे! :)