romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, October 19, 2011

भरत रंगानी (२)

भाग १ इथे वाचा!
..आणि, भरतनं काय काय केलं नव्हतं? समूह व्यवस्थापनाच्या पुस्तकी शिक्षणात तो पारंगत झाला.वडलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रत्यक्ष कामातले अ पासून ज्ञ पर्यंतचे धडे गिरवले.स्वबळावर जोखमी पत्करून समूहवाढीला मदत केली.आधुनिकता तसुभरही ढिली होऊ दिली नाही.अनेक छिद्रं हरप्रयत्ने बुजवली.पण.. नाव वडलांचंच वाढलं.वाढत राहिलं.घेतलं गेलं.
वडलांनीही सगळं वेळोवेळी हातात दिलं.त्यामुळे त्यांच्याशी विद्रोह- तो तर त्याच्यासारख्या कुणालाच परवडणारा नव्हता- पण तरीही, वेगळी चूल, स्वत:चं कर्तृत्व, स्थान, यश असलं हिंदी चित्रपटासारखं आयुष्यही त्याच्या वाटेला आलं नव्हतं.आलं असतं तरी वेढेवळसे घेत कर्तृत्व वगैरे दाखवण्यापेक्षा वेळीच समेट करणं किंवा गोष्टी विद्रोहापर्यंत न पोचवता प्रछन्नं जगत रहाणं असा धूर्तपणा त्याच्याकडे होता (भांडवलाचा स्टेकच केवढा मोठा होता!) मग स्वत:ची वेळ येण्याची वाट पहात बसता आलं असतं.
बरं, भरतनं तरीही काही केलं नाही असं नाहीच.वडलांच्या निधनानंतर त्यांच्याच प्रतिमेचा उपयोग करून तो चाली आखू लागला.त्यांच्याहीपेक्षा मोठ्या होण्याच्या.त्याने अनेक खाजगी, निमसरकारी, सरकारी उद्योग स्वत:च्या समूहाच्या पंखाखाली घेतले.यात अनेक क्षेत्रं अशी होती जी थोरल्या रंगानींच्या काळात दुर्लक्षित राहिली होती.
परंपरेने उद्योगजगताकडून वर्ज्य ठरवल्या गेलेल्या अनेक महत्वाच्या व्यासपीठांवर तो दिसू लागला.
अनेक क्षेत्रांतल्या मान्यवर लोकांबरोबर तो सतत वावरू लागला.
कालपेक्षा आज एक पाऊल नक्कीच पुढे पडत होतं पण घोडं तरीही कुठेतरी अडत होतं.एकिकडे एक दिवसात दहा पावलं पुढे जाण्याचं ध्येय होतं आणि दुसरीकडे भरभक्कम कर्तृत्व गाजवलेल्या बापाच्या पोटच्या वारसाचं भागधेय कपाळी लिहिलं गेलं होतं.
या सगळ्यातून उठून वर येण्यासाठी जुजबी, घिसेपिटे उपाय लागू पडणार नव्हते.एका क्षणात जादूची कांडी फिरवता येईल, सगळ्या नाड्या एकाच वेळी हातात येतील, एकमेव भारतीय असा गौरव होईल- असा जालिम पण सहज- उपाय सापडावा असा ध्यास लागला होता! निदिध्यास! रात्रंदिवस!
भरतच्या मनाला ध्यास लागला.ध्यास लागेपर्यंतच्या प्रवासात सर्वबाजूनी विचार केला गेला होता.आडाखे आणि त्यानंतर चाली करून ध्यासाची पूर्तता करता येणं भरतला शक्य वाटत होतं.
ह्या त्याच्या शक्य वाटण्याच्या कामी पुन्हा त्याचे वडीलच उपयोगी पडले.भरतला त्यात गैर वाटण्यासारखं काहीच नव्हतं.बाय हूक ऑर क्रूक- येनं केनं प्रकारेणं- खरी, आपल्याला जिचा ध्यास आहे ती, वाट सापडणं महत्वाचं होतं.
ही वाट शोधण्यातही अनेक तास खर्ची पडले.डोक्याचं भुस्काट पडता पडता बाकी राहिलं.जागतिक उद्यमजगताचा इतिहास, अनेक चरित्रग्रंथ, भरमसाठ वेबसाईट्स त्याने पालथ्या घातल्या.माहितीचा फडशा पाडला.अनेक उद्योगपतींना- उद्योगसमूहाचे राजे असलेल्यांना- प्रत्यक्ष भेटला..
गावाला वळसा घातला आणि कळसा काखेतच गवसला!
इथेही वडीलच कामी आले.
द सक्सेसफुल बिझनेसमन शुड हॅव अनकॅनी सेन्स ऑफ पर्सेप्शन!
वडील नेहेमी म्हणायचे, म्हणायचे काय? जपच करायचे!
मजा अशी होती की तोही गेली अनेक वर्षं हे वाक्य मनात घोळवत होता.
The successful businessman should have uncanny sense of perception!
यशस्वी उद्योजकाजवळ अनैसर्गिक, गूढ अशी आकलनशक्ती हवी!
अतिपरिचयात अवज्ञा असं काहीतरी झालं होतं आणि कोणे एके दिवशी भरत रंगानी त्या आफ्रिकन वन्यजीव संग्रहालयाजवळ असलेल्या गुप्त विश्रामधामात ध्यासाचं कोडं सोडवत असताना लख्खं प्रकाश पडल्यासारखं ते वाक्यं त्याच्या अंत:चक्षूंसमोर नाचू लागलं.पिच्छाच सोडेना!
त्याच्या या विश्रामधामाकडच्या फेरय़ा वाढू लागल्या.गुप्त ठिकाण असल्यामुळे अनेक सुरक्षाकवचं- अर्थात उद्योजकांनीच तयार केलेली- भेदावी लागत.एकूणच जागतिक उद्योगजगताला एकांत आणि विश्राम कसा मिळणार?
या भरतानं कशाचीही पर्वा केली नाही..
दिशा मिळाली पण पुढे काय?..               (क्रमश:)           Post a Comment