romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, October 31, 2011

बदलाचा इतिहास_धर्म

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा! 

सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?
वाळीत टाकलं जाणं हा सर्रास भयानक अनुभव होता.त्याचा अंदाज विठ्ठलपंतांना नव्हता? असूनही ते त्यात पडले.मुलांचं काय? हा यक्षप्रश्न होता.या प्रवासाचा शेवट उभयता पतीपत्नींनी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवण्यात होणं तसं अपरिहार्यच नाही का? पत्नी तर केवळ पतीबरोबर जायचं म्हणून आत्मसमर्पणाला तयार झाली असेल.तिला तिच्या लहानग्या चार-चार मुलांबद्दल काहीच वाटलं नसेल? विठ्ठलपंतांचा हा तीन टोकांवरचा प्रवास मग चमत्कारिक वाटू लागतो.तीन टोकाच्या कृती करणं या मागची मानसिकता काय असेल? विशेषत: हे वास्तवातलं उदाहरण आहे म्हटल्यावर उत्सुकता जास्तच ताणली जाते.  सरतेशेवटी मुलांचं काय? त्या मुलांचा या सगळ्यात काय दोष? त्याना तर अग्निदिव्यातून जावं लागल्याचं स्पष्टं होतं.पुढचे, पाठीवर मांडे भाजणं, भिंत चालवणं, रेड्याच्या तोंडून वेद वदवणं हा झाला चमत्काराचा भाग.चमत्काराचा भाग तर्कात बसत नाही म्हणून तो सोडून देऊ पण भोगावं तर लागलं असेलच.वाळीत टाकलं जाणं, जिथे तिथे अवमान होणं आणि त्यातून तावून, सुलाखून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी चार-चार अध्यात्मिक रत्नं निर्माण होणं हा पुन्हा एक आश्चर्यकारक प्रवास. विठ्ठलपंतांकडून निर्माण झालेल्या त्या पार्श्वभूमीमुळेच केवळ ही अशी फळं जन्माला आली? मराठी भाषेचा एक आद्यकवी जन्मला.त्यानं ज्ञानेश्वरी सांगितली, पसायदान मांडलं, ते ही इतक्या लहान वयात!- आणि नंतर, आता काही करायला उरलं नाही म्हणून त्यानं समाधीही घेतली!
वर म्हटल्याप्रमाणे विठ्ठलपंतांचा धर्मबदल हा केवळ वाच्यार्थानं घेतला जातो तसं धर्मांतर नव्हे.ते एकाच धर्मातल्या एका पद्धतीतून दुसरय़ा पद्धतीत जाणं (गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमात) आणि परत फिरणं या स्वरूपाचा प्रवास आहे.ह्या प्रवासातली व्यक्तीव्यक्तींच्या मानसिकतेतली, जगण्यातली, त्याना तत्कालिन समाजानं दिलेल्या वागणुकीतली आणि त्यामुळे एकूणच होणारी घुसळण अस्वस्थ करते, विचार करायला लावते, नाही? या उदाहरणाचा विशेष म्हणजे अतोनात सहनशक्ती अनुसरून ह्यातल्या अंतिम टप्प्यातल्या सर्वच व्यक्तींनी एक सकारात्मक कार्य उभं करणं, जगाला एक उदाहरण घालून देणं हा सगळ्यावरचा कळस म्हणता येईल.सकारात्मक असणं म्हणजे आणखी काय असतं?..

कवि नारायण वामन टिळक अर्थात रेव्हरंड टिळक हे पुढचं उदाहरण.ते संस्कृत शिकले.इंग्रजी आणि इतर विषय शिकून झाल्यावर शिक्षण सोडून देऊन ते चरितार्थासाठी आणि गृहस्थधर्म निभावण्यासाठी शिक्षक झाले.लक्ष्मीबाई टिळकांपाशी अधिकृत शालेय शिक्षण नव्हतं.टिळकांनी प्रोत्साहन देऊन त्याना मराठी लिहावाचायला शिकवलं.स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाईंचं आत्मचरित्र मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड मानला जातो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधे ना.वा.टिळकांनी नोकरया केल्या.शिक्षक, पुरोहित आणि छापखान्यातला खिळे जुळवणारा अशा त्या होत्या.नागपुरात त्याना संस्कृत साहित्याचा भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली.संस्कृतात कविता केल्या.’ऋषी’ ह्या हिंदू धर्मविषयक उहापोह करणारय़ा नियतकालिकाचे ते संपादक होते.
नागपूरहून राजनंदगाव ह्या त्या वेळच्या एका संस्थानाकडे आगगाडीने प्रवास करत असताना, प्रवासात त्यांची भेट अर्नेस्ट वॉर्ड ह्या ख्रिश्चन धर्मगुरूशी झाली.वॉर्ड हे फ्री मेथॉडिस्ट चर्च या संप्रदायाचे होते.त्यानी स्वधर्माविषयी टिळकांशी बातचीत सुरू केली.टिळकांना त्यानी बायबलची एक प्रत भेट म्हणून दिली.त्याचवेळी वॉर्ड हे टिळकांच्या कानात कुजबुजल्याचं सांगण्यात येतं.’तुम्ही दोन वर्षांच्या आत सर्वरक्षक येशूच्या प्रेमळ पंखांखाली याल!’ हे ते वाक्यं.
त्याचवेळी हिंदू धर्मातली कर्मकांडं आणि जातीव्यवस्था यावर हा तरल मनाचा कवी आणि अभ्यासक नाराज होता.आजही हिंदू धर्मातल्या प्रमुख बोट ठेवल्या जाणारय़ा गोष्टी, इतक्या काळानंतरही, त्याच राहिल्या आहेत.जाणते आजही ह्या गोष्टींवर नाराज आहेत आणि त्याचवेळी कर्मकांडांनी पुन्हा भयावह रूप घेतलंय.जगण्यातली टोकाची अनिश्चितता हे त्याचं कारण सांगितलं जातं.राजकारणी त्याचा वापर करून घेताएत.जातीव्यवस्था एकीकडे जाळपोळ, बलात्कार, अजून वाळीत टाकणं अशा त्याच त्या मध्ययुगीन मानसिकतेत दिसते तर दुसरीकडे आरक्षण हा विषय दिवसेंदिवस समाजात दुफळी निर्माण करू लागलाय.राजकारणी इथेही अग्रक्रमाने धुडगूस घालू लागले आहेत.जातीव्यवस्थेचं धृवीकरण इत्यादी होतं आहे काय?.. असो! हिंदूधर्मातल्या कर्मकांडं आणि जातीव्यवस्था ह्या गोष्टी संवेदनशील मनाला बोचणारय़ा होत्या त्या तशाच राहिल्या आहेत असं दिसतं.
टिळकांनी धर्मांतर केलं.त्यातलीही विशेष गोष्टं म्हणजे तसं करत असताना त्यानी आपल्या पत्नीला, जिचा हिंदूधर्मावर गाढ विश्वास होता तिला तसं केल्याचं कळवलंच नाही! या धार्मिक मतांतरामुळे पतीपत्नींमधे वेगळं रहाण्याइतपत दुरावा आला.या काळात लक्ष्मीबाईंनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला.त्या ख्रिश्चन धर्माकडे ओढल्या गेल्या आणि शेवटी त्यांनीही धर्मांतर केलं.दोघांचं सहजीवन आणखी प्रेममय झालं.हिंदू विवाहसंस्था भक्कम झाली ती पतिव्रताव्रत आणि एकपत्नीव्रत यांमुळे असं म्हटलं जातं.विवाहानंतर, इतक्या उशीरा पतीपत्नीनं एकत्र येणं आणि एकरूपही होणं हे अगम्य असल्याचं म्हटलं जातं.परदेशात अचानक गायब होणारे नवरे, घटस्फोटित स्त्रीपुरूषांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी होणं, एकपालकी कुटुंबांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणं या पार्श्वभूमीवर लेखक भालचंद्र नेमाडे एके ठिकाणी असं म्हणतात की आपल्या देशातल्या अफाट जनसमूहाचं सामाजिक स्थैर्य अबाधित राखणारय़ा हिंदू विवाहसंस्था या गोष्टीचा संबंध एकूण मानवी समाजाच्या मानसिक आरोग्याशी जोडला पाहिजे.   
अहमदनगरला रहात असताना आलेल्या प्लेगच्या साथीत उभयता पतीपत्नींनी केलेलं सेवाकार्य, सफाई कामगारांनी त्याचवेळेला केलेला संप मोडून काढणं, ते शरण आल्यावर त्यांचं उद्बोधन करणं, डॉक्टरांकडून प्लेगरूग्णांच्या सेवेबद्दल मिळालेलं मानपत्रं नाकारणं आणि केवळ सेवाधर्माचा धडा घालून देणं हे सकारात्मक कार्य केवळ वाखाणण्याजोगं.ख्रिस्तावरील अपार श्रद्धेमुळे करुणा, दया, सत्य, मानवता आणि सहृदयतेने केलेला सर्व विश्वाचा विचार ही मूल्यं त्यांच्या ठायी प्रकट झाली?  की हा या दोघांचा स्थायीभाव होता? धर्मांतर केलं असतं आणि नसतं तरीही त्यांनी या प्रकारचं कार्य केलं असतं की नसतं?
धर्मांतरांमुळे टिळक पतीपत्नीला सामाजिक जाचाला तोंड द्यावंच लागलं होतं.समाजानं वाळीत टाकणं म्हणजे काय? याची कल्पनाच आपण फक्त करू शकतो.त्या कल्पनेनेही आपल्यासारख्याच्या अंगावर काटा येतो.

अस्पृश्यांवर होत असलेल्या युगानुगाच्या अन्यायाचं काय? सवर्णांनी त्याना जनावरासारखी वागणूक दिली म्हणजे काय काय केलं हे नुसतं वाचून, ऐकून आज संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो.हिंदू धर्मातल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं हे फलित.अशी व्यवस्था समाजात सुसूत्रता यावी म्हणून आल्याचं सांगतात पण त्यानं विषमतेचा भला मोठा डोंगर उभा केला.जो आजतागायत मिटता मिटलेला नाही.महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज यांनी तळमळीने यासंबंधात कार्य केलं.डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी याच समाजात जन्म घेतला.आपली आणि आपल्या ज्ञातीबांधवांची दारूण अवस्था जवळून पाहिली.बडोदे संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना तिथे अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.दोन देशातल्या या परस्पर अनुभवांमुळे आपल्या देशाला, समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचंच हे त्यांनी पक्कं ठरवलं.अमेरिका, लंडन इथे उच्च शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यानी विविध वृत्तपत्रे चालवून अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत आपल्याच हिंदू बांधवांसमोर सतत मांडली.नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी सत्त्याग्रह केला.त्यात ते यशस्वीही झाले. 
हिंदू धर्मात राहूनच त्यानी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला.केवळ महाडचे चवदार तळे किंवा नाशिकचे काळाराम मंदिर एवढ्यापुरतं काम त्याना करायचं नव्हतं तर अस्पृश्य मानले गेलेल्यांना सन्मानाने जगता यावं हे त्यांच्या लढ्याचं उद्दिष्ट होतं.मनुस्मृतीचं जाहीर दहनही त्यानी केलं.त्यानंतरही तथाकथित उच्चवर्णीय आपल्या वर्तनात आणि मानसिकतेत बदल करत नाहीत हे त्यांच्या पुरेपूर लक्षात आल्यावर त्यानी ’मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’ अशी प्रतिज्ञाच केली.सरतेशेवटी पाच लाख अपृश्य बांधवांसह त्यानी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.धर्मपरिवर्तन केलं.जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचं ठरवलं तेव्हा सखोल अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला.

यानंतर थोडसं, जबरदस्तीनं धर्मांतर या विषयाकडे वळूया.हे खरं तर आपण इथे विचारात घेत असलेल्या विषयाचं दुसरं टोक.पण काही वेळा असं अगदी दुसरं टोक गाठल्यावर आपण विचार करत असलेल्या विषयातले आणखी काही दुवे आपल्याला मिळून विचार सर्वंकष होण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
हे जबरदस्तीचं धर्मांतर ठळकपणे दिसतं पाच पाच मुघल पातशहा हिंदूस्थानात धुमाकूळ घालत होते त्या काळात.हिंदू स्त्रिया, पुरूष, बालकांवर अत्त्याचारांची परिसीमा गाठली जात होती आणि श्री रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकमेव हिंदवी स्वराज्य उभारण्याचं कठीण काम शिवाजीराजानी केलं.हे करत असताना जबरदस्तीनं धर्मांतर करवल्या गेलेल्यांना अस्पृश्याची वागणूक मिळू नये म्हणून राजांनी शुद्धिकरणं करवून घेतली.नेताजी पालकरांचं शुद्धिकरण हे ठळक उदाहरण.

मुख्यत्वे मुस्लिम धर्म आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म यांनी भारतात कालांतराने पाय पसरले.मुस्लिम राज्यकर्त्यांची जुलमी धर्मांतरं आणि ख्रिश्चन मिशनरय़ांचा धर्मप्रसार (शर्कराअवगुंठीत औषधासारखा?) उल्लेखनीय आहे.विहीरीत पाव टाकणं आणि त्या विहीरीचं पाणी नकळत किंवा नाईलाज झाल्यामुळं वापरावं लागल्यामुळे धर्मांतर होणं ही गोष्टही नोंदली गेली.समाजानं अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यासाठी आणखी एक नवा वर्ग त्यामुळे तयार केला झाला.शुद्धिकरण हा पर्याय या समस्येवर वापरला गेल्याचं दिसतं.या इतर धर्मांनी असे प्रकार राबवले पण हिंदू धर्माच्या प्रसारकांनी असे मार्ग अवलंबल्याचे दिसत नाही.अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार करणारय़ा आदि शंकराचार्यांनी भारतभर फिरून विविध विचारसरणी आणि धर्मांचा पुरस्कार करणारय़ा विद्वानांशी वादविवाद करून आपली मतं सिद्ध केली असं सांगितलं जातं.हिंदू धर्माकडे आकर्षित झाल्यामुळेच हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतल्याचं जगभर दिसतं.हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतलेल्या जगभरातल्या व्यक्तींची यादी आंतरजालावर इथे बघायला मिळते.

धर्मांतराविषयी जालावर शोध घेत असताना या जालनिशीवर भारतातल्या विविध प्रांतातली सद्यकाळातली ख्रिश्चन धर्मांतरं मांडलेली दिसली.यातलं पहिलंच उदाहरण वाचताना पुन्हा चमत्कार इत्यादीचा प्रभाव जाणवला.दोन दोन राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेला मूळ हिंदू, दक्षिणेतल्या एका मंदिराच्या मुख्य पुजारी घराण्यातला मुलगा हा अनुभव सांगतो आहे.त्यात तो बनारस-तामिळनाडू आगगाडीच्या प्रवासात मधेच मध्यप्रदेशात उतरला तो कुणी आवाज (?) त्याला तशा सूचना देतोय म्हणून.मग त्याला पूर्वी ८०० किमी दूर भेटलेला एक संन्यासी तिथल्या रेल्वेस्टेशनवर अचानक भेटतो.तो त्याला नर्मदाकिनारी बाप्तिस्मा होईपर्यंत मार्गदर्शन करतो.एका अर्थाने अतिपरिचयात अवज्ञा असं आपण वर्षानुवर्षं बघत असलेल्या किंवा पाळत असलेल्या धर्माबद्दल होत असावं काय?

नंतरच्या काळातली काही उदाहरणं त्रोटक स्वरूपात:
मोहम्मद अली जिना या पाकीस्तान निर्मितीपुरुषाचे पूर्वज हिंदू राजपूत होते.त्यांचे आजोबा पूंजा गोकुळदास मेघजी हे हिंदू भाटीया रजपूत होते ज्यानी नंतर इस्लाम धर्म स्विकारला.जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले.कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधे येत असे.जिन्हाभाई पूंजा हे एक भरभराट झालेले गुजराती व्यापारी होते.काठियावाडमधलं गोंडल हे त्यांचं मूळ स्थान.जिना स्वत: एक हुशार वकिल म्हणून फाळणीपूर्व भारतात सुप्रसिद्ध होते.मलबार हिल इथे आजही अस्तित्वात असलेलं जिना हाऊस महम्मद अली जिना यांचंच.जिना यांचा दुसरा विवाह रत्नाबाई पेटिट यांच्याशी झाला.त्या जिनांपेक्षा चोवीस वर्षांनी लहान होत्या.सर दिनशॉ पेटिट या जिनांच्या मुंबईतल्या पारसी मित्राच्या त्या कन्या.पेटिट ग्रंथालय, पेटिट स्कूल ह्या संस्था मुंबईत आजही अस्तित्वात आहेत.त्या दोघांच्या विवाहाला दोन्हीबाजूनी प्रचंड विरोध झाला.दिना जिना अर्थात दिना वाडिया हे जिना पतीपत्नीचं एकमेव अपत्य.दिनांचं शिक्षण इंग्लंड आणि भारतात झालं.त्यानी नेविल वाडिया या इंग्लिश उद्योजकाशी लग्न केलं.नेविल वाडियांचे वडील सर नेस वाडिया ह्यांनी भारतात बॉम्बे डाईंग ही प्रसिद्ध कंपनी स्थापली.मुंबईला कापड उद्योग म्हणून जगन्मान्यता देण्यात त्यांचा हात होता.नेविल वाडिया पारसी म्हणून जन्मले असले तरी सर नेस वाडियांनी दरम्यान झोराष्ट्रियन धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला होता.नेविल वाडिया नंतरच्या आयुष्यात पुन्हा झोराष्ट्रियन झाले! अशी ही धर्मांतराची गुंतागुंत!
(वाडिया कुटुंबाची मुंबईत भरपूर जमिन आहे.टाटा कुटुंबाशी त्यांचं नातं आहे.मुंबईतल्या जिना हाऊसच्या मालकीचं प्रकरण हे भारत पाकिस्तान संबंधातलं आणखी एक परिमाण.हा संक्षिप्त अवांतर तपशील.)    

सुप्रसिद्ध ऑस्कर विजेता संगीतकार अल्ला रख्खा रेहेमान अर्थात ए.आर.रेहेमान हा ए.एस्.दिलीपकुमार म्हणून एका मुदलियार कुटुंबात जन्माला आला.त्याचे वडील आर.ए.शेखर हे मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत नावाजलेले संगीतकार होते.अवस्था हालाखीची होती.आर ए शेखर त्यांच्या वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी वारले.लहान बहिण गंभीर आजारी असताना १९८४ मधे ए.एस्.दिलीपकुमार आणि त्याच्या कुटुंबियांची काद्री इस्लाम या पंथाशी ओळख झाली.जवळीक झाली आणि १९८९ मधे वयाच्या २३ व्या वर्षी आजच्या ए.आर.रेहेमाननं कुटुंबियांसकट इस्लाम धर्म स्विकारला.

पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ म्हणजेच पूर्वाश्रमीचा युसूफ योहाना हा अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मला.राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पाकिस्तानात आढळलेल्या वाल्मिकी या दलित जातीतला त्याचा जन्म.हे कुटुंब नंतर ख्रिश्चन झालं.२००५ मधे इस्लाम धर्म स्विकारून युसूफ योहाना, मोहम्मद युसूफ झाला.त्या आधी तो पाकिस्तान क्रिकेट टीमचा पहिला परधर्मी (ख्रिश्चन) कर्णधार म्हणून नोंदला गेला होता.तब्लिघी जमात या संप्रदायाच्या शिकवणीकडे तो ओढला गेला त्यावेळी त्याची लहान मुलगी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने आजारी होती असं वाचल्याचं आठवतं. 

स्टीव्ह जॉब्स हा अलिकडेच दिवंगत झालेला ऍपल या कंपनीचा प्रणेता.अनौरस म्हणून जन्मलेला, दत्तक मात्यापित्यांकडे सुपुर्द झालेला आणि स्वत:हून घर सोडून बाहेर पडलेला.सुरवातीच्या हालाखीच्या दिवसात  पोट भरून जेवण मोफत मिळतं म्हणून दर रविवारी सात किलोमीटर चालत हरेकृष्ण मंदिरात जावं लागत असे.प्रचंड प्रतिभाशाली आणि सर्जनशील अशी ही युगप्रवर्तक म्हणावी अशी महान व्यक्ती नंतरच्या काळात बुद्धधर्माच्या तत्वज्ञानाने आकर्षित होऊन बुद्धधर्मीय झाली होती...

6 comments:

Shriraj said...

जिनाचा हा इतिहास मला अजिबातच माहीत नव्हता. मस्त माहितीपूर्ण लेख झालाय हा. आभार विनायक!

विनायक पंडित said...

स्वागत श्रीराज! नेहेमीपेक्षा वेगळं काही करून बघण्याचा प्रयत्न केलाय.तुमचा अभिप्राय मोलाचा.धन्यवाद!

Asha Joglekar said...

लेख माहितीपूर्ण खरा पण धर्मांतरा मागची मानसिकता (कारणं) अंबेडकर अन् रे. टिळकां ची उदाहरणं सोडली तर आर्थिक ओढगस्त परधरमियांनी दाखवलेल्या धाकटदपशा किंवा लालूच हीच म्हणावी लागतील स्टीव जॉब्जचं उदाहरण वगळता ।

विनायक पंडित said...

स्वागत आशाजी! एका वाक्यात आपला आशय अगदी तंतोतंत खरा. चर्चा घडावी आणि मला आणखी काही समजावं म्हणून एक धागा http://mr.upakram.org/node/3523 इथेही सोडलाय. अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार!

Anonymous said...

माहितीपूर्ण लेख....
बरीच नवीन माहिती मिळाली ...आभार्स...

विनायक पंडित said...

स्वागत देवेन! आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल मन:पूर्वक अनेक अनेक आभार्स! :)