भाग २ इथे वाचा!
दिशा मिळाली पण पुढे काय?.. त्यासाठी चिंतन, मनन- ती दिशा बरोबर पकडून- करत रहाणं महत्वाचं होतं.
दिशा मिळाली पण पुढे काय?.. त्यासाठी चिंतन, मनन- ती दिशा बरोबर पकडून- करत रहाणं महत्वाचं होतं.
त्याला आठवत राहिलं. वडील सतत जप करायचे. सतत कसला जप? एकदम विचारावं अशी जवळीक अजून झालेली नव्हती. वडील बाकी कशापेक्षा उद्योगातच रमलेले. वडील बेसावध असताना त्याला जपाचं ते वाक्यं कळलं. तो मागावरच राहिला ते वेगळ्या कारणासाठी. वडील कर्तृत्व म्हणजेच देव मानतात, वेगळा देव नाही. मग हा जप कसला?
एका बेसावध, मोक्याच्या आणि वडलांच्या फुरसतीच्या मोजक्या क्षणी त्याने वडलांना तो जपच बोलून दाखवला. वडील आयुष्यात पहिल्यांदा बहुदा चाट पडलेले. मग त्यांच्या डोळ्यात ती विशिष्ट चमक झळकली. चेहेरय़ावर भरतबद्दलचं कौतुक दाटलं. नंतर त्यानी स्वत:हून त्या वाक्याचा अर्थ त्याला उलगडून सांगितला.
पण अशी आकलनशक्ती कशी मिळणार? मिळवणार?
भरतच्या या प्रश्नावर वडील दिलखुलास हसले. भरतची पाठ थोपटताना त्यांची पुढची काळजी बहुतेक मिटली असावी.
श्वास घेताना धंदा. श्वास सोडताना धंदा. दिवस रात्रं, जगता मरता, खाता पिता.. धंदा. तपश्चर्या असते राजा हीऽ आणि मग एक दिवस ती शक्ती माळ घालते!
असं म्हणून ते खळखळून हसले. फार कमी वेळा ते असं हसल्याचं भरतनं बघितलं होतं. हसत असतानाच ते पुन्हा त्या तंद्रित गेले. नेहेमीच्या. ध्यान म्हणायचे ते त्याला. मग पुन्हा आपल्या कामात गढून गेल्यावर त्याला ते एखाद्या ऋषीसारखेच भासू लागले.
त्या क्षणाने खरं तर भरतच्या आयुष्याला कलाटणीच दिली असणार. पण तो अमुक क्षण कलाटणी देणारा आहे हे माणसाला आकळावं लागतं. त्यानंतरच्या अनेक हिशोबी, किंमती, मौल्यवान, धंदेवाईक असंख्य क्षणांच्या अनेक पदरी थरांखाली तो क्षण दडपला गेला. त्याचं जीवाश्म झालं.
.. आणि आज, कोळशाच्या अनेक थरांखाली जसा हिरा सापडावा, तसा तो क्षण त्याच्या आत लखलखला.
वारंवार लखलखून त्यानं भरतचं अंत:चक्र चालू केलं.
वारंवार लखलखून त्यानं भरतचं अंत:चक्र चालू केलं.
मला नाही सापडली अशी आकलनशक्ती अद्याप? कुठे कमी पडलो मी? माझ्याजवळ आहे ती? कसं समजायचं? माझ्या कर्तृत्वावरून? निखळ कर्तृत्व आहे माझ्याजवळ? की आहे ते सगळंच वडलांमुळे झाकोळलेलं? इथपर्यंत आलो मी माझ्याच जोखमीवर. परदेशात जोखमी कुणी घेतल्या? कुणी वाढवला धंदा जगात? वडलांनी वाव दिला, हा पदर रहातोच आहे तरीही. फक्त माझं असं असं मी काय केलं? काय राहिलं होतं- आहे- मला गाठण्यासारखं?.. आहे! हे सगळं जग! तेच पादाक्रांत केलं तरच शाबित होईल माझं निखळ कर्तृत्व? केवळ माझं असं?
अंत:चक्राच्या या फेरय़ात तो सतत अडकू लागला. काय साधायचं होतं त्याला? जे साधायचं होतं ते त्याच्या दृष्टीनं ऍबस्ट्रॅक्ट होतं, अमूर्त स्वरूपाचं काही. निराकार. समजण्याच्या पलिकडचं..
मग भरतनं साध्याचा विचार तूर्तास बाजूला केला आणि तो साधनेच्या मागे लागला.
अशी आकलनशक्ती आपल्याकडे काही प्रमाणात तरी आहे. अन्यथा आपण इतकी प्रगती करूच शकलो नसतो. मग ती आकलनशक्ती आणखी टोकदार कशी करायची?
असे विचार एका बाजूला आणि-
जग पादाक्रांत करायचं म्हणजे नक्की काय?
हा भुंगा दुसरय़ा बाजूला..
आफ्रिकन विश्रामधामातल्या त्याचा मुक्काम वाढू लागला. वडलांच्या ’त्या’ आठवणींसंदर्भात सुचलेल्या ’ध्यान’ या शब्दावरून आता त्याला प्रेरणा मिळाली. अध्यात्माचा त्याचा अभ्यास होता. ध्यान करणं त्याला अपरिचित नव्हतं.
एरवीपेक्षा वेगळी प्रेरणा यावेळी कार्यरत होती. ती अति तीव्र होती. पराकोटीची. ऍब्स्ट्रॅक्टच म्हणावी अशी.
वेगळ्या संदर्भात तो अध्यात्मातले वेगवेगळे प्रवाह ताडून पहात होता.
वडलांचा या शक्तीसंदर्भात काही अभ्यास होता का हे शोधण्यासाठी त्याने वडलांच्या अनेक रोजनिश्या पालथ्या घातल्या.
कशामुळेही असेल, मनाची उभारी कायम रहात होती. यश दृष्टीपथात आहे याची मनोमन खात्री वाटत होती. टारगेट्सवर टारगेट्स अचिव्ह करण्यात अग्रेसर असलेला हा उद्योजक कल्पनातीत टारगेटही गाठण्याची ईर्ष्या धरत होता. त्याची धुंदी जराही कमी होत नव्हती.
बरं, त्या धुंदीतही वास्तव न विसरता आपल्या समूहाची काळजी घेत तो विश्रामधामात परतत होता. समूह आगेकूच करतच होता.
आजही उत्फुल्ल, उत्कट अशा मनोवस्थेत तो आपल्या हेलिकॉप्टरमधून धावपट्टीवर उतरला. सुरक्षारक्षकांनी त्याचं वाहन हॅंगरमधे लपवलं. मोकळा श्वास घेत भरत रंगानी रमतगमत आपल्या कुटीकडे चालू लागला. आतला जप अलिकडे आपोआपच चालू असतो, चालू रहातो असं त्याच्या लक्षात आलं होतं. ही उत्फुल्ल, उत्कट मनोवस्था त्याचीच द्योतक होती.. (क्रमश:)
No comments:
Post a Comment