romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, December 27, 2011

भरत रंगानी (६)

भाग ५ इथे वाचा!
त्या नंतरच्या घडामोडी केवळ अद्भूत या सदरात मोडणारय़ा अशाच होत्या.
जणू अवघं जागतिक उद्योगजगत भरत रंगानीभोवती एकवटलं.
अविकसित, अर्धविकसित, विकसनशील आणि पूर्णपणे विकसित अशा जगातल्या जवळजवळ सगळ्या राष्ट्रांचे उद्योग जगतातले प्रतिनिधी खोरय़ाने भरताच्या भेटीला येऊ लागले. उत्तमोत्तम उद्योगकरार घेऊन. आणि भरत रंगानीच्या मनाप्रमाणे त्या करारांची फलश्रुती होऊन मोठ्या आनंदाने आपापल्या देशात परतू लागले.
भरत रंगानीच्या प्रतिभेला जणू धुमारेच फुटले या काळात. अनेक गोष्टी त्याला योग्य वेळेला सुचत. त्याचा बिझनेस सेन्स बघून भलेभले चाट पडत. भरतच्या चालींपुढे चाली न सुचून भलेभले नतमस्तक होत.
परराष्ट्रांचा हा प्रतिसाद बघून मगच राष्ट्रातले उरलेसुरले उद्योजक, उद्योगसमूह, नोकरशहा, राजकारणी भरताचे गुलाम बनले.
अनेक मांडलिक राजांचा जणू सम्राट झालेला भरत.
त्याला सहजासहजी झोप लागू लागली.
जपाचं घोषवाक्यही बदललं.
मी जगज्जेता आहे. कायमचा.
याच सुमारास पत्नीबरोबरच्या अवर्णनीय सुखाच्या आनंदात एक वेगळी गोष्टं भरतच्या आयुष्यात निदर्शनाला आली. तृप्तीच्या आनंदात आकंठ डुंबल्यानंतरच्या एका क्षणी भरतच्या पत्नीचा हात भरतच्या पार्श्वभागाच्या जरा वर, कमरेवर विसावला आणि हाताला झटका बसल्यासारखा झाला. पत्नीनं चाचपलं. मग भरतनं चाचपलं.
पिंगपॉंगच्या चेंडूसारखी वाढ, केवळ सूज नव्हे अशी टणक, झाली आहे असा प्राथमिक निष्कर्ष निघाला.
त्याचवेळी भरतनं आपल्या उद्योगसमूहाच्या संचालक मंडळावर दयाबुद्धिने आश्रय दिलेला त्याच्या दूरच्या नात्यातला एक चुलतभाऊ भरतच्या दैदिप्यमान यशाच्या चढत्या कमानीमुळे पराकोटीचा अस्वस्थ होत होता.
भरतच्या कमरेवर झालेल्या त्या छोट्या चेंडूएवढ्या वाढीमुळे, आऊट्ग्रोथमुळे भरतची पत्नी सचिंत झाली. स्त्रीसुलभ स्वभावाला अनुसरून अनेक साशंकता आणि भितीचे अनेक पदर मनाशी बांधून ती भरतला क्षणोक्षणी सावध करू लागली. पुरूषस्वभावाला अनुसरून भरत रंगानी पत्नीच्या अनेक सल्ल्यांना पिंगपॉंगच्या चेंडूप्रमाणेच टोलवू लागला.
अनेक परराष्ट्रप्रमुखांच्या भेटीचा एक मोठा दौरा भरत रंगानीसाठी आयोजित केला जात होता. भरतला त्याचे वेध लागले होते.
देशात पत्रकारपरिषदा झडू लागल्या.
चौथ्या किंवा पाचव्या पत्रकारपरिषदेत एका देशी पण विचक्षण पत्रकाराच्या लक्षात एक गोष्टं आली. ती अर्थातच भरतच्या उद्योगविश्वातल्या कर्तृत्वाच्या परिघातली नसून गावगप्पा या स्वरूपातलीच होती. त्यानं देशी पत्रकारी तडफेला जागून, प्रत्यक्ष भरतला गाठूनच तिची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला.
आपण आपल्या शरीराचा कमरेतून बदललेला कोन हा जाणीवपूर्वक आहे? की काही आजारपण?
कदाचित जागतिक उद्योगविस्ताराचं ओझं!- असं या प्रश्नावर उत्तर देऊन, पत्रकाराची खिल्ली उडवून भरत त्या क्षणी जोरदार खळाळून हसला.
पण एका सनसनाटी वाहिनीवर त्या प्रसंगाचं चित्रण प्रत्यक्ष बघून मात्र भरतला सावध व्हावंच लागलं.
आजकाल तो लक्षात येण्याइतपत पुढे झुकून चालू लागला होता.
झोपण्याआधीच्या स्नानासमयी भरतनं शहानिशा केली. ’त्याजागेचा आकार आता लांबुडका होऊ लागला होता.
मजा म्हणजे भरतला दुखत नव्हतं, खुपत नव्हतं, वेदना होत नव्हत्या. त्याच्या सगळ्या हालचाली त्या वाढीला अनुकूल अशा आपोआप होत होत्या.
भरतच्या मनात येण्याचा अवकाश भरतच्या पत्नीनं पुढच्या पत्रकारपरिषदेच्या आधीच परदेशातल्या एका तज्ज्ञ डॉक्टरची भेट नक्की केली. ती सर्वार्थानं गुप्त असणार होती.
काही गोष्टी तर भरतला अर्धांगिनीपासूनही गुप्त ठेवायच्या होत्या. परकीय चलनातली मोठी रक्कम डॉक्टरला प्राप्त झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी सुलभ झाल्या.
भरत आणि त्याच्या अर्धांगिनीशी डॉक्टर खूपच मोकळेपणाने बोलला. कसल्याश्या धक्क्याने, माराने सूज यावी आणि मलम चोळून लावल्यावर ती निघून जावी अशा प्रकारचं हे दुखणं असल्याचं त्या तज्ज्ञानं भरतच्या अर्धांगिनीला पुरेपूर भासवलं.
मुळात व्यापारी कुटुंबातली, शिक्षणाची वगैरे फारशी आवड नसलेली आणि कुठल्याही गोष्टीचा फार खोलवर विचार न करण्याचं बाळकडू मिळालेली असल्यामुळे तिलाही ते खरं भासलं.
वैद्यक व्यवसायातल्या त्या पूर्णपणे व्यावसायिक तज्ज्ञानं भरतला एकट्याला आत नेऊन त्याची तपासणी केली. त्यानंतर निदान. बोलणं माफक. फक्त मुद्याचं टोक पकडूनच. टू द पॉईंट. शस्त्रक्रिया करण्याची ही वेळ नाही. वाढ अजून होणार. आणखी काही भेटींमधे शस्त्रक्रियेचं ठरवायला वाव आहे.
तोंडानं तो एवढंच बोलला पण भरतला त्यानं प्रत्यक्ष पाहिल्यापासूनच- भरतचं उभं रहाणं, हालचाली, चालणं, वावरणं- ते भरत त्याचा निरोप घेईपर्यंत- त्या तज्ज्ञाची नजर, त्याचे डोळे जे बोलत होते ते जास्त महत्वाचं, अधिक काही सांगणारं होतं. भरत चाणाक्ष होता म्हणूनच त्याला ते अचूक समजू शकलं.
तज्ज्ञाच्या भेटीला येतानाच्या विमानप्रवासात भरतनं शांत झोप काढली होती. अर्धांगिनी भरतच्या दुखण्याविषयीच्या ताणानं अखंड प्रवास चुळबुळत होती.
परतताना अर्धांगिनी विमानउड्डाण होण्याआधीच निश्चिंत निजली. भरत सजग राहिला.
पुढे काय होणार आहे हे भरतला पुरेपूर कळून चुकलं होतं..

No comments: