romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, December 22, 2011

भरत रंगानी (५)

जराशानं भरतामधला प्रौढ माणूस, परिपक्व व्यवहारी, आघाडीचा उद्योजक भानावर येऊ लागला तशी त्यानं फरचा तो पट्टा कमरेभोवती गाऊनच्या सगळ्या वाद्यांमधे नीट ओवला. पट्टा घट्ट आवळून ओटीपोटाजवळ त्याची घट्ट गाठ बांधून छान फूल तयार केलं. समोर आरसप्रतलात पाहिलं त्यावेळी त्याचं मन पूर्ण निर्विकार झालं. शांत झालं. असं त्याला वाटलं. आत्मविश्वासपूर्ण दमदार पावलं टाकत तो वस्त्रबदल कक्षातून बाहेर पडला.
शयनकक्षाकडे जाणारय़ा मार्गिकेत वाटेत एका काऊंटरजवळ तो थांबला. कळ दाबल्यावर काचेचं आवरण दूर होऊन एक भरलेला उंच ग्लास वर आला. ही वेळ त्यानं नेमलेल्या आहार नियंत्रण समितीनं घालून दिलेल्या नियमाप्रमाणं हे पौष्टिक पेय पिण्याची होती. शांतपणे तो ते प्याला. मन आणि शांत होत जात असताना तो शयनकक्षात शिरला. आखून दिलेल्या वेळेप्रमाणे ही वेळ शरीर शांत करण्याची होती. ते शरीर जे उद्योग जगतातल्या अनेक घडामोडींचा, त्यामुळे येणारय़ा ताणांचा सतत सामना करत होतं. झोपणं ही क्रिया त्या व्यवहारी जगात दुरापास्तच होती. शरीर शांत करून मनाला सतत उभारी प्राप्त करून देणं हे या विश्रामधामाचं मुख्य काम होतं.
तो आडवा झाला. आज शरीराला विश्रांत करणारय़ा आज्ञावलीचीही गरज नव्हती. जागृत मनाचं राज्य पूर्णपणे संपून सुप्त मनाचं अधिराज्य कधीच सुरू झालं होतं.
              आय पझेस द अनकॅनी सेन्स ऑफ पर्सेप्शन!
             मी अनैसर्गिक आकलनशक्तीचा मालक आहे!  
सुसुप्तमनात मुरलेला जपही आपोआप सुरू झाला होता. एरवीसारखा. जपाच्या पार्श्वभूमीला मानसचित्रं मात्र आज होती ती वैशिष्ट्यपूर्ण अशी होती. दडलेलं लहानमूल जागलेला भरत. आपलं बिंब प्रतिबिंब न्याहाळणारा मिष्कील भरत. गुफ्फेदार फरचा कमरेपासून खाली, गुळगुळीत चमकदार फ्लोअरिंगवर लोळणारा गाऊनचा पट्टा. अनेक कोनांतून मिष्कीलपणे बघत स्वत:वरच अनेक कमेंट्स करून पराकोटीचा आनंद आणखी वाढवणारा भरत..
रात्रभर एक अप्रतिम चलत्चित्रपट भरतच्या आत चालू राहिला.
भरत सकाळी उठला तो प्रचंड उत्साहात. कमालीचा उत्साह. आजवर कधीही न जाणवलेला. आत्मविश्वासपूर्ण मनस्थिती. तिचं कमालीचं सातत्य. एरवी लपंडाव चालू असे. आत्मविश्वास, त्याचा चढत जाणारा आलेख. आमविश्वासाचं शिखर. काही क्षण स्वस्थता, शांतता. की लगेच साशंकतेची उतरण चालू होई. ठरल्याप्रमाणे. मग संदिग्धता मनाचा कब्जा घेई. अस्वस्थता पाठोपाठ येई. संभ्रमावस्थेला आमंत्रणाची गरजच नसे. मनाचा कल्लोळ सुरू होई. स्वयंसूचनांचं भान केव्हा येईल त्याचा नेम नसे. जेवढ्या लवकर ते येईल तेवढ्या लवकर आत्मविश्वासाचा मार्ग चाचपणं सुकर होई. हा मार्ग जेवढ्या पटकन्सापडेल तेवढा पुढचा प्रवास साधता येई की पुन्हा..
अलिकडच्या काळात आत्मविश्वासपूर्ण मनस्थिती राखणं, ती लांबवणं शक्य होत होतं. पण आज सकाळी उठल्यानंतर भरतला जाणवणारा आत्मविश्वास पराकोटीचा होता. त्याचा आलेख चढताच राहिला. तरीही त्याला शिखर नव्हतं. जणू त्या गोष्टीतल्यासारखा जादूचा वेल. आकाशात पोहचवणारा. असं काहीतरी..
त्या पराकोटीच्या आत्मविश्वासावर स्वार होतच भरत रंगानीनं आफ्रिकेतल्या वन्यजीव अभयारण्यातलं आपलं वर्तमान वास्तव्य संपवून आपल्या उद्योगजगताकडे प्रयाण केलं.
त्या नंतरच्या घडामोडी केवळ अद्भूत या सदरात मोडणारय़ा अशाच होत्या..

No comments: