भाग ३ इथे वाचा!
कुटीत शिरल्याबरोबर तो आधी स्नानगृहात दाखल झाला. नैसर्गिक वातावरणातला तो धबधबा आणि त्या सरोवरसदृष्य रचनेत तो डुंबू लागला. वेगवेगळे तांत्रिक बदल करून घेऊन स्वत:ला सुखवू लागला.
स्नानगृहात दाखल झाल्यावर नेहेमीप्रमाणे जपाला ध्वनी मिळाला. भरताचा गंभीर ध्वनी आसमंतात घुमू लागला. हे आसमंत मानवरचित होतं. भिंतीपलिकडे कुटीचे इतर अनेक कक्ष होते. आणि कुठल्याच भिंतींना कान नव्हते. जप लीक होण्याची कोणतीही भीती नव्हती.
भरताच्या या उन्मादी अवस्थेचं आणखी एक कारण होतं. त्यानं वडलांचा तोच जप जरा बदलून घेतला होता. आणि आजच्या युगात अशा बदलालाच तर सर्जन- क्रिएशन- असं म्हणतात. भरतही तसंच समजून त्या अवस्थेत गेला होता. जप करत होता.
I possess the uncanny sense of perception!
मी अनैसर्गिक आकलनशक्तीचा मालक आहे!
जे मिळवायचं आहे ते मिळालेलंच आहे असं स्वत:ला बजावण्याचं, स्वत:मधे ठसवण्याचं तत्वं!
जपाचा गूढगंभीर ध्वनी. ध्वनीचं अविरत आवर्तन. जपाचे अनेक पडसाद. शरीराआत. बाहेर.
या क्रियेमुळं हळूहळू जागृत अवस्थेला येणारं बधीरपण. अर्धवट निद्रित अवस्था. सोबतीला उबदार पाण्याचा अभिषेक सर्वांगावर. नेहेमीसारखी, अलिकडच्या आराधनेच्या काळात सतत प्रत्ययाला येणारी पराकोटीची आनंदीअवस्था भरतला आत्यंतिक सुखवू लागली. त्या तंद्रितच स्नान आटोपून तो स्नानगृहाबाहेर आला. वस्त्रं बदलण्याच्या उबदार कक्षात त्यानं प्रवेश केला. आतल्या या पराकोटीच्या आनंदी अवस्थेबद्दल त्याच्या मनाच्या तटस्थ असलेल्या एका भागाचं असं निरीक्षण होतं की ही अवस्था हळूहळू लोप पावून संपूर्ण मन पुन्हा या व्यवहारी जगात येण्यास फार वेळ लागत नसे. क्वचित कमी क्वचित जास्त.
पण आज ही पराकोटीची आनंदी अवस्था चांगलीच लांबली होती. भरत हे भारलेपण एंजॉय करत होता.
वस्त्रं बदलण्याच्या उबदार कक्षाच्या आतल्या भिंती म्हणजे अखंड असा आरसा होता. आरसप्रतल. पावडर आणि स्प्रे स्वरूपात असलेली सुगंधी द्रव्यं त्यानं यंत्रानं वाळवलेल्या आपल्या सर्वांगावर शिंपडून घेतली. आज केलेली कुठलीही कृती डोंगराएवढ्या आनंदात भर टाकणारीच होत होती.
आपल्या देखण्या आणि सुयोग्य काळजी घेऊन प्रमाणबद्ध राखलेल्या शरीराला सर्व कोनांनी न्याहाळत, बिंब आणि प्रतिबिंब निरखत त्यानं तिथल्या एका स्टॅंडवरचा आपला निजण्यासाठी घालण्याचा गाऊन उचलला. दोन्ही बाहू पसरून तो जाड, मुलायम, फर असलेला गाऊन चढवताना क्षणभर झेप घेणारय़ा गरूडपक्षाप्रमाणे त्याचे बाहू पसरले गेले. मिष्कीलपणे मनातल्या विचारांसमवेत वावरत तो गाऊनची बटणं लावू लागला. अजूनही सगळ्याच गोष्टी यंत्रं करत नाहीत याचा अभिमान तेव्हा त्याच्या चेहेरय़ावर असल्याचं त्याला सभोवतालच्या आरसप्रतलात दिसलं. पराकोटीच्या आनंदाच्या सीमेवरचा मिष्कीलपणा माणसाला गर्वावस्थेकडे तर नेत नाही? अजूनही आपल्या मनाचा एक कोपरा तटस्थपणे निरीक्षण करत असल्याचं जाणवून भरतनं आपले पाय फ्लोअरिंगच्या गुळगुळीत चमकदार प्रतलावर घट्ट रोवले.
त्याचवेळी तो प्रथम चमकला. मग स्वत:शी हसला. पराकोटीचा आनंद आता पराकोटीच्या मिष्किलपणात परावर्तीत होत होता आणि सभोवतालच्या आरसप्रतलात परावर्तीत होत होतं एक अनोखं दृष्यं.
गुफ्फेदार फरचं एक गुबगुबीत गोल टोक गुळगुळीत चमकदार फ्लोअरिंगवर पडलं होतं आणि गाऊनच्या कमरेला बांधण्याचा तो फरचा पट्टा भरतच्या कमरेजवळ पोचलेला होता. पट्ट्याचं दुसरं टोक कमरेजवळ असणारय़ा अनेक वाद्यांपैकी एका वादीत अडकलेलं होतं.
फरच्या गाऊनचा कमरेवर बांधायचा तो गुबगुबीत फरचा गुफ्फेदार पट्टा म्हणजे आपल्या शरीराचा एक अवयवच आहे असं भरतच्या मिष्कील मनाला वाटून गेलं होतं. आरसप्रतलात अनेक कोनांतून ते पहात असताना भरतचा मिष्कीलपणा धावू लागला होता. भरतचा मूळचा मिष्कीलपणा पूर्ण जागृत अवस्थेला आला होता. उद्योगाच्या जबाबदारीचं भान आल्यापासून तो हळूहळू लुप्त झाला होता. अनेक वर्षं दडून बसला होता. आज अचानक वाट फुटल्यामुळे तो उफाळून आला होता. भरत अनेक कोनांतून त्या दृष्याकडे बघत आता चक्कं खिदळू लागला. असं स्वत:वर हसणंही त्यानं भरभराटीला आलेला उद्योगपती या बिरूदावलीखाली गमावलं होतं. आता त्याच्यातलं लहान मूल संपूर्णपणे जागं झालं. प्रतिबिंबभर पसरलं... (क्रमश:)
No comments:
Post a Comment